कट्ट्यावरच्या गप्पा....

डिसेंबरचा महिना, कडाक्याची थंडी, नुकताच बंबातल्या गरम-गरम पाण्याने आंघोळ केलेला मराठी इयत्ता चौथीतला मी. काय मजा होती म्हणून सांगू यार...! सकाळी ६ वाजता आम्हाला सहलीला (पिकनिक नाही) घेऊन जायला शाळेच्या आवारात बस येणार होती. मी रात्री गादीखाली घडी करून ठेवलेला शाळेचा गणवेष बाहेर काढला. 'काय मस्त इस्त्री झाली आहे', मनातला विचार गुदगुल्या करीत होता. आईने पहाटे उठून बटाट्याची पिवळी भाजी (सहल स्पेशल) आणि खार्‍या पुर्‍या केल्या होत्या. सर्व जामानिमा करून, डबा घेऊन मी माझ्या मित्राकडे पोहोचलो. आम्ही दोघेही शाळेकडे निघालो. बोचर्‍या थंडीत पितळेच्या डब्याची उब (त्या काळी 'स्टेनलेस स्टीलचा डबा' ही चैन परवडणारी नव्हती.) मन उल्हासीत करीत होती.............


अरे यार, अशा कितीतरी आठवणी मनांत कधी-कधी दाटी करतात. मन एकाग्र केले तर 'पितळी डब्याची ती उब' आजही जाणवते. तसाच जाणवतो आईच्या मऊ सुती पातळाचा स्पर्ष. थंडीत, पांघरूणाला आतून एखादे पातळ जोडून घेतले की कडकड वाजणारे दात थांबायचे. चावर्‍या पांघरूणात ते मऊसूत पातळ म्हणजे स्वर्गसुख असायचे.


शाळेत माझ्या पुढे तीन वर्ष असणारी ताई म्हणजे मराठी आणि संस्कृतचा पापड. कायम पहिल्या २ नंबरात. त्यामुळे घरात, नातेवाईकांत कायम कौतुकाचा विषय. मी हुषार नाही पण अगदी 'ढ' ही नाही. आईच्या मते नर्मदेतला गोटा. उचापत्या भयंकर. विज्ञान हा माझा आवडीचा विषय तर गणित हा माझ्या सरांचा आवडता विषय. या एका गोष्टीवरून आमच्यात (सरांमध्ये आणि माझ्यात) बरेच मतभेद होते. म्हणजे 'मतं' माझी होती 'भेद' ते करायचे. भाषा विषयात मराठी माझ्या आवडीची, संस्कृत भाषांतरावर तरून न्यायची (व्याकरण विचारू नका), हिंदी राष्ट्र्भाषेचा 'जाज्वल्य' की काय म्हणतात तसा अभिमान होता म्हणून आणि इंग्रजी (इथे मी एक आवंढा गिळला आहे) घरच्यांनी, शाळेतल्यांनी, शिक्षणक्षेत्रातील तज्ञांनी जबरदस्तीने माझ्या गळी उतरवली होती. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या अदृष्य पायर्‍या (एकही पायरी न चुकता) गृहपाठाच्या कठड्याला धरून-धरून चढलो. त्या काळी 'शिकवणी' लावणं म्हणजे स्वत:हून 'मी 'ढ' आहे' असा डांगोरा पिटणं होतं. कांही मुलं 'गाईड' वापरत म्हणून 'बदनाम' होती. (सहशिक्षण असूनही...) मनापासून शाळा का आवडली नाही? देव जाणे.. छोडो यार. कुछ और बात करते है?।


त्याकाळी मे महीन्यात आमच्या परिसरात चित्रपटांच्या ३-४ शुटींग्ज एक दिवसाआड कुठे-कुठे चालायच्या. कुठे देवानंद-कल्पना कार्तिक, कुठे दारासींग-मुमताज, कुठे फाईट सीन्स तर कुठे पौराणिक युध्द चित्रीत होत असायचे. साधारण दुपारी १२ पर्यंत कुठे-कुठे शुटीग साठी कोण कोण आले आहे याचा पत्ता लागायचा. आम्ही दारासींगला पहायला जायचो...मुमताजला 'पाहण्याच्या' वयाला पोहोचलो नव्हतो.


माझ्या घशाला खर्‍या अर्थाने कोरड पडली ती पहिल्या वर्षी कॉलेजात माझ्या मित्रांचा आणि माझा नंबर (Roll Call) वेगवेगळ्या वर्गात आला आहे हे आमच्या क्लास टीचरला 'इंग्रजीत' समजाऊन सांगताना. (त्या बाई जवळ बरेच पेशन्स होते, राव). तसं म्हंटले तर आमच्या मराठी शाळेतून एकत्र आलेले आम्ही तिघे वर्षभर, टॉयलेटसकट सर्वत्र, एकत्रच संचार करायचो. एकाच बाकावर बसायचो.   


पहिला हिंदी चित्रपट स्वतंत्रपणे एअर कंडीशन्ड चित्रपटगृहात पाहिला तो याच काळात. चित्रपटाचे विश्लेषण करण्याचा बौद्धीक आवाका नव्हता. तीन तासांचे थंड वातावरण आणि हेलनचा गरमा-गरम नाच यातच पैसा वसूल झाला. दूसर्‍यांदा घशाला कोरड पडली ती 'इंग्रजी' चित्रपटातली 'चितपट' दृष्य पाहताना. एअर कंडीशन्ड वातावरणातही घाम फुटला होता. शेजारच्या मित्राशी बोलतानाही आवाज भयंकर घोगरा झाला होता. चित्रपट संपवून बाहेर आल्यावर आपल्या ओळखीचे कुणी आपल्याला पाहात तर नाही नं या विचारांनी भरभर बाहेर पडलो होतो. चित्रपटाची गर्दी टाळून मुख्य रस्त्यावर आल्यावर सोडलेला सुस्कारा मागच्या पुढच्या कमीतकमी ५-१० जणांनी तरी ऐकला असेल.


मित्रांबरोबरच पहिल्यांदा Grade -1 A.C.  हॉटेलात पाय टाकला तो मुरगळता मुरगळता वाचला होता. आत शिरताना, माझ्यापेक्षा कमीतकमी फुटभर तरी उंच असलेल्या, पगडबंद दारवानाने दरवाजा उघडून धरल्यावर मला अगदी ओशाळवाणे वाटले. या ओशाळ्या भावनेतून वर यायच्या आतच दरवाजाच्या आत पाऊल टाकले. ते अंधारात. आंत सर्वत्र अंधार करणारे दिवे होते. खाली मऊ गुबगुबीत लाल गालीचा. (त्याचा रंग लाल आहे हे निघेपर्यंत डोळे अंधाराला सरावल्यामुळे कळले) बाहेरच्या तीव्र उन्हात फरसबंद पायर्‍यांवरून एकदम अंधारात गुबगुबीत गालीच्यावर पाय पडल्यावर मुरगळणार नाहीतर काय होणार? मेनू मागवला. वेटरने कमरेत अगदी वाकून 'सादर' केला. हा वेटर आणखीन लाजवत होता. अनोळखी पदार्थांची यादी आणि त्याहून त्या पदार्थांच्या किमती पाहून आमचे डोळे रेनकोटाच्या बटनाशी बरोबरी करू लागले. मॅट्रीक पर्यंत, खाण्याच्या पदार्थांच्या इंग्रजी यादीत सँडविच हा एकच पदार्थ दूरून का होईना पण ओळखीचा होता. किंमत आम्हा तिघांच्याही खिशाला परवडणारी होती म्हणून 'तीन व्हेजीटेबल सँडविच' ही इंग्रजी वाटेल अशी 'मराठी'तून ऑर्डर दिली. एव्हाना तिथल्या, वातावरणाला नाही तरी, अंधाराला डोळे सरावले होते. १५-२० पैकी आमचे धरून ३ टबले भरली होती. A.C.त कुडकुडत, हळू आवाजात, आम्हाला परक्या असणार्‍या त्या वातावरणावर भाष्य करत, एकमेकांना चोरट्या टाळ्या देत, आम्ही सँडविचची वाट पाहात होतो. मुख्य पदार्थ राहिला दूर पण इतर म्हणजे चटणी, सॉस इत्यादी वस्तूंची टेबलावर मांडामांड झाली. पुन्हा वेटर गायब. भुकेने कळवळलेल्या माझ्या एका मित्राने सॉस प्लेट मधे घेऊन कोणी पाहणार नाही याची काळजी घेत चोरून बोटाने  चाटायला सुरुवात केली. इडली म्हंटल्यावर शेवटचा 'ली' पुरा व्हायच्या आत टेबलावर इडली येणार्‍या उडप्याच्या संस्कृतीतून आलेल्या आम्हाला हा अक्षम्य उशिर अस्वस्थ करीत होता. टेबलावर सँडविच आले तेंव्हा तो  नाश्ता नव्हता, पूर्ण जेवणच होतं. पूर्वी कधी न पाहीलेल्या आकाराच्या स्लाइसमध्ये बनविलेल्या त्या सँडविचचे चार मोठ्ठाले त्रिकोण, पोटॅटो चिप्स (त्यालाच फ्रेंच फाईज म्हणातात हे पश्चात ज्ञान), पोटॅटो वेफर्स, काकडीच्या कंगोरेवाल्या स्लाईसच्या पानांवर टोमॅटोच्या सालाचे लालबुंद फुल. बापरे...बापरे ते सँडविच संपावायला आम्हाला पाऊण तास लागला. एका मित्राने तर चोरट्या आवाजात ढेकरही दिला. बाहेर पडताना त्या दारवानालाही 'टीप' द्यायची असते हे आम्हाला कोणालाच ठाऊक नव्हतं.


जगाचा पहिल्यांदाच स्वतंत्रपणे अनुभव घेण्याच्या उपद्व्यापात असे अनेक अनुभव आहेत ज्यांच्या आठवणींनी आजही करमणूक होते. तुमच्याही अशा कांही आठवणी असतील.... शेअर करूया?


सांताक्रूझला टी. सी. ने विदाऊट तिकिट पकडले, पहिल्यांदा नॉनन्व्हेज खाल्ले, पहिली बिअर असे अनेक अनुभव आपण कट्ट्यावर माझ्या कडून ऐकणार आहात. आज एवढेच पुरे. नाहीतर कंटाळाल आणि कट्ट्यावर मी आलो की 'आला बोअर' किंवा 'आला पिळ काढू' अशा अर्थाच्या एकमेकांना कोपरखळ्या माराल.


OK Buy.....