आवराआवरीचा क्रॉनिक आजार

रविवारचा सुंदर दिवस. सकाळचे ८.३०. 'टॅडॅडँग टॅडॅडँग'(आम्ही 'वेध भविष्याचे' ला त्याच्या संगीतावरुन हे नाव दिले आहे) ला अजून अर्धा तास वेळ आहे. बाहेर बदाबदा पाऊस पडतो आहे. कोणाच्याही आतेमामेभावाचं, भाच्याचं लग्न नाहीये. कोणीही विमा एजंट योजना समजवायला येणार नाहीये. कोणीही आपल्या नुकत्या झालेल्या परदेशदौऱ्याचे फोटो दाखवायला घरी येणार नाहीये. किंवा कोणीही घरी बोलावले नाहीये. नवऱ्याच्या चुलतमावसबहीण चिंगीचे मावसकाका पुण्यात चक्कर टाकून रविवारी घरी भेट देऊन जाणार नाहीयेत. आणि अशावेळी आतापर्यंत दबून राहिलेला आवराआवरीचा आजार डोकं वर काढतो.


सुरुवात होते ती कपड्याच्या कपाटापासून. 'शी, किती पसरलंय! आवरायलाच पाहिजे.' मग त्वेषाने सर्व कपडे खणातून खाली जमीनीवर भिरकावले जातात. नवरा पलंगावर आडवातिडवा लोळत पेपर वाचत असतो. तो घाबरुन उठतो. त्याच्यापुढे पुढचे दोन तास आवराआवर आणि 'वर चढून हे काढ, ते ठेव' चं भीषण आज्ञापालन दिसायला लागतं. 'आता हे काय काढलंस? घड्या तर होत्या ना कपड्यांच्या? मग का सगळे खाली टाकलेस? मुळात दर आठवड्याला कपडे अस्ताव्यस्त होतातच कसे? मिसमॅनेजमेंट.'
'बाबा रे, एकतर शांत पेपर वाच नाहीतर मला मदत कर.तुझे कपडे हँगरला असतात. तुला काय कळणार बायकी कपड्यांच्या रचारचीतल्या यातना? मी आज कपडे व्यवस्थित लावल्याशिवाय 'टॅडॅडँग टॅडॅडँग' बघणार नाहीये.तूच माझी रास बघून ठेव.'
'मी मदत करणार नाही. मी रचलेलं काही तुला पटत नाही. तुझं तू आवर, काय वाट्टेल तो गोंधळ घाल. मी बाहेर पेपर वाचतो.' नवऱ्याचे रणांगणातून पलायन.


लहानपणी आईला कपड्यांचं कपाट आवरताना बघायचे तेव्हा मी विचारायचे, 'आई, आपण जर एका खोलीत चार पाच मोठ्या दोऱ्या टांगल्या आणि कपडे कायम त्या दोऱ्यांवर ठेवले तर? घड्या करायचा आणि कपडे आवरायचा सवालच नाही!'
'इथे शहरात घरात माणसांना रहायला खोल्या मिळत नाहीत आणि तू कपड्यांना एका खोलीची गोष्ट करतेस. उद्या म्हणशील धुतलेली भांडी लावूच नकोस,एक मोठ्ठी टोपली आणून त्यातच धुऊन त्यातच राहूदे.'
'हो मी पुढे तेच सांगणार होते तुला.'
'महान आहेस. मोठी झालीस की कळेल हं तुला! आता मला काम करु देत.'


आता बायकांचे कपडे म्हणजे कसे विविधरंगी, विविधआकारी आणि सुळसुळीत. साहजिकच कपड्यांचा रचलेला बुरुज रोज खणातून कपडे ओढून काढताना ढासळणार. ढासळलेला बुरुज रोज तात्पुरता उभा राहणार. शेवटी एक अवस्था अशी येणार की बुरुज नुसती हवा लागली तरी ढासळेल. म्हणजे बुरुज परत दोन तास खर्च करुन नीट बांधणं आलं.   


कपड्यांनंतर समोरचं अस्ताव्यस्त पसरलेलं टेबल भेडसावायला लागतं. नाहीतरी चार दिवसापूर्वी आलेलं बँकेचं चेकबुक शोधायचं असतं. त्यामुळे हेही काम 'आधी लगीन कोंडाण्याचं' मध्ये जातं. कागदं भसाभसा उपसली जातात.
'अरे आत ये आणि मला सांग तुझ्या कागदातलं काय काय फेकायचं आहे ते.' 
'सध्या माझ्या कपाटात कोंब. मी पुढच्याच्या पुढच्या शनिवारी कपाट आवरणार आहे तेव्हा बघीन.' (नवरा 'शॉर्ट टर्म प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍप्रोच' चा उपयोग करुन पेपरवाचनातील व्यत्यय टाळतो.)
'आत ये आणि मला माळ्याच्या कपाटातल्या माझ्या अभ्यासाच्या जुन्या फायली काढून दे.'
'माळ्याचं कपाट' म्हटल्यावर नवऱ्याला काम टाळताही येत नाही कारण ते 'उंची' मुळे कायम त्याच्या वाट्याला गेलेलं.
'हे काय गं? सगळा पसारा एकाच दिवशी काढायलाच पाहिजे का? टेबल पुढच्या रविवारी आवरलं तर नाही का चालणार? आणि अजून किती कागदं गादीखाली दडपणार?गादीला आलेल्या टेंगळांनी पाठ दुखते. अशाने एक दिवस गादीखाली सर्व कागदं जाऊन आपण टेबलावर झोपायची वेळ येईल.'    
'ते गादीखालचं मी आवरणार आहे पुढच्या रविवारी‌. सध्या राहूदेत.'


मग पुढे टप्प्याटप्प्याने 'सखू येईपर्यंत स्वयंपाकघरातलं शेल्फ आवरणे', 'फ्रिज साफ करणे' 'बाहेरचे रद्दीचे कपाट आवरणे' ही कामं वेळापत्रकावर येतात. आजार गंभीर स्वरुप धारण करु लागतो..
'मी केस कापून आणि वडे घेऊन  येतो. तुझ्या आवरा आवरीत लवकर काही पोटात जाईल असं वाटत नाही.'
'अर्धा तास थांब आणि मी कपाटातली सॉर्टेड रद्दी देते ती घेऊन जा‌. सॉर्टेड रद्दीचे दोनचार रुपये जास्त मिळतील.'
'त्याच्यासाठी थांबलो तर न्हावी बंद होईल.रविवारी फक्त ३ तास  उघडा असतो.' असं म्हणून नवऱ्याचे गनिमी काव्याने घराबाहेर प्रयाण.


तरी बरं का, हे शेल्फ एक महिन्यापूर्वी नव्हतं. तेव्हा इथल्या वस्तू कुठे असतील बरं? आता तर त्यांना दुसरी जागा पण नाही. वस्तू अशा जादूने द्याल तितकी सगळी जागा कशी व्यापतात?आता काढलेल्या वस्तू कुठे ठेवायच्या?हां, सध्या माळ्यावर टाकू. नंतर बघता येईल. म्हणून सर्व वस्तू माळ्यावर दडपल्या जातात.चादरी वॉशिंग मशिनात टाकून साबण आणायला न्हाणीघरात जावं तर न्हाणीघराच्या कपाटातून चार साबण आणि एक टूथपेस्ट आत्महत्या करते..देवा रे! मुळात इतके साबण शिल्लक राहतातच कसे? या घरातले लोक आंघोळ करतात की नाही?
(क्रमशः)