पृथक्

गाभ्यात पोचुनीही मन तृप्त होत नाही
वय वाढले तरीही संन्यस्त होत नाही

सरतात पावसाळे, सुकतात प्रेमधारा
का मोसमी झरा हा गंगौघ होत नाही?

कोणी मुहूर्त पाही, कोणी वहात जाई
वणव्यात ह्या न कोणी जो दीप्त होत नाही

पश्चात मीलनाच्या होतात भिन्न वाटा
एका विभावरीचे* आयुष्य होत नाही          (*विभावरी = रात्र)


विसरून दीर्घ नाते सुटतात सैल नजरा
काळ्या मण्यात वृत्ती बंदिस्त होत नाही

पृथगात्मता जपावी तादात्म्य पावताना
कोणी कधी कुणाचे आजन्म होत नाही