कवीमनाचा व्यापारी-राज कपूर

वुडहाऊससारखा राजकपूरही एकतर संपूर्ण आवडावा लागतो, नाहीतर अजिबात नाही. 'दे गयी धोखा हमें नीली नीली आंखे' हे एकतर संपूर्ण पटते किंवा अजिबात नाही 'तुम्हारा कसूर नही है रीटा, मेरी सूरत ही ऐसी है' यावर पूर्ण विश्वास बसतो, किंवा अजिबात नाही!
पैशाच्या राक्षसी जबड्यात आदर्शवादाचा बळी जाणे, हे आपण किती वेळा पाहिले आहे! 'श्री ४२०' काढणारा राज कपूर 'राम तेरी गंगा मैली' काढू शकतो याला काय म्हणावे? 'केलेवाली, अगर मैने तुम्हारा पैसा नही दिया तो?' 'तो हम समझेगा, हमारा बेटा खा गया' हा प्रसंग चित्रीत करणारा हळवा दिग्दर्शक झीनत अमानसारख्या नायिकेला घेऊन सिनेमा काढतो हा कुणाचा पराभव म्हणायचा? 'मोती कुत्ता नही है...' यामागची वेदना तुम्हाला कळत नाही, तर मग घ्या लेको डिंपलपासून सोनिया सहानीपर्यंत सगळ्यांचे वस्त्रहरण केलेला आंबटशौकीन 'बॉबी'!' हा कुणी कुणावर उगवलेला सूड म्हणायचा?
पण ते असो. तो संवेदनशीलतेची भळभळती जखम वागवणारा राज कपूर आपल्याला आठवायचा नाही. ही जखम होण्याआधीचा, तळहातावर हृदय घेऊन प्रेमाच्या शोधात वावरणारा राज कपूर आपण आठवू. 'आज गरीब भी गरीब को नही पहचानता' ही व्यथा बाळगणारा, 'ये घर तो ईट पत्थर का है, लेकिन उस सोने के घर से तुम हम को कैसे निकालेगा मिस डिसा?' अशी माया लावणारा, 'दिलपे मरनेवाले, मरेंगे भिखारी' म्हणत हसणारा... 

प्रेमभंग आणि विरह यातच धन्यता मानण्याच्या त्या जमान्यात राज कपूरकडं दु:ख आणि वेदना व्यक्त करण्यासाठी एक अमोघ अस्त्र होतं ते म्हणजे हास्य. एकीकडे खुरटलेली दाढी आणि वर्षानुवर्षे बरा होत नसणारा बद्धकोष्ठ असल्यासारखा चेहरा घेऊन ' टूटे हुवे ख्वाबोंने' म्हणत 'दलीप' फिरत होता. दुसरीकडे चुकून दोन वेळा कायम चूर्ण घेतल्यासारखा चेहरा घेऊन 'दुखी मन मेरे' म्हणत देव आनंद प्रेमाचे 'गली कूंचे' धुंडाळत होता. त्यात 'टूटा जिस तारे पे नजर थी हमारी' म्हणून राज कपूर हसला आणि देवदास होण्याची तमन्ना बाळगणारी एक पिढी ' अपना आदमी है, भिडू...' म्हणत गारद झाली.  'ऐ दिल की लगी क्या तुझ को खबर, एक दर्द उठा भर आई नजर' म्हणत हातातल्या चाकूनं त्यानं नारळाच्या झाडावर प्रियेच्या नावाची अक्षरं खोदत स्मित केलं आणि लोकांचे डोळे पाणावले. 'जाण्याआधी मला तुझे न रडणारे डोळे पाहू दे' असं त्या रशियन पाहुणीनं म्हणताच त्यानं डोळ्यावरचा काळा चष्मा काढला आणि तो हसला.... असा हसला की व. पु. काळ्यांच्या शब्दात सांगायचं तर त्यापेक्षा त्यानं एखादा हुंदका दिला असता, तर जास्त बरं झालं असतं!

राज कपूरचं हेच हास्य कधीकधी कमालीचं जहरी आणि कडवट होत असे. 'ओ मेरे सनम...' या गाण्याच्या वेळी
'सुनते थे प्यार की दुनिया में दो दिल मुश्किल से समाते है
क्या गैर वहां, अपनों तक के, साये भी न आने पाते है
हमने आखिर क्या देख लिया
क्या बात है क्यूं हैरान है हम"

असं म्हणत हातातला व्हिस्कीचा ग्लास फिरवत राज कपूरनं केलेलं छद्मी हास्य कोण विसरेल?

राज कपूरचा चेहरा नुसताच देखणा नव्हता, तर तो कमालीचा लवचिक होता. श्री ४२० मध्ये मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या सुशिक्षित तरुणाला एक भिकारी जीवनातले एक कडवट सत्य सांगतो, 'पढे-लिखे, इमानदार. मेहनती इन्सान को यहां काम नही मिल सकता. क्योंकि ये बंबई है मेरे भाई, बंबई!'. या प्रसंगात राज कपूरने चेहऱ्यावर आश्चर्य, धक्का आणि दु:ख याचं काय बहारदार मिश्रण दाखवलंय! याच सिनेमात 'इचक दाना बिचक दाना' या गाण्याच्या वेळी नर्गिसने घातलेल्या उखाण्याचे उत्तर तो चुकीचे देतो, तेंव्हाचे त्याचे शरमणे, लाजणेही असेच लक्षात राहून गेले आहे.

'भोला-भाला छोरा' च्या भूमिका करताना राज कपूरच्या चेहऱ्यावरची निरागसता पहात रहावी अशी असे. त्यात त्याला मिळालेले संवादही आशयपूर्ण आणि प्रवाही होते. 'जिस देश में गंगा बहती है' मध्ये फटाकडी कम्मो त्याला 'तुम कौन जात हो - मरद के औरत?' असं विचारते तेंव्हा 'अभी तक तो मरद हूं जी, आगे शिवजी मालिक है' असं तो म्हणतो ते अगदी लाजवाब. 'माफ करना कम्मोजी, मुझे अंदर की बात समझनेमे जरा टैम लगता है..' हेही पालुपद अगदी लोभस.

आणि राज कपूरची माझ्या मते सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे 'जागते रहो'.  ही तर काय, सेल्युलॉइडवर बंदिस्त झालेली एक कविताच आहे. जबरदस्त बांधीव पटकथा आणि शंभू मित्रांचे हळुवार दिग्दर्शन यांनी हा चित्रपट 'आर. के. ' च्या 'क्लासिक्स' या यादीत जाऊन बसला आहे. खेडेगावातून रोजगाराच्या शोधात आलेला आणि एक पेलाभर पाणी प्यायला मिळावे म्हणून कासावीस झालेला एक तरुण - त्याला शहराचे कायकाय रंग एका रात्रीत बघायला मिळतात! सभ्यतेचे बुरखे पांघरून आपले हिडीस चेहरे लपवणाऱ्या या लोकांच्या गर्दीत त्याला एका रात्रीत धडा मिळतो तो बेईमान होण्याचा! या महाचोरांनी 'चोर, चोर' म्हणून आळ घेतलेला हा तरुण शेवटी सकाळच्या प्रकाशापासूनही लपू पहातो. मग तिथे येते एक छोटी निरागस मुलगी  त्याला विचारते : 'डरते हो? क्यों? तुमने तो कुछ नही किया है!' अरे, खरंच की! 'मन सुद्द तुझं.. ची आठवण यावी असा प्रसंग! मग हा निष्पाप तरुण ताठ मानेने त्या चोरबाजारातून बाहेर पडतो. एका रात्रीत पर्दाफाश झालेल्या संभवितांना पोलीस पकडून नेत असतात. ते सगळं मागं टाकून, जणू त्या रात्रीबरोबर रात्रीचे सगळे अनुभव मावळल्यासारखे मागे टाकून हा तरुण प्रकाशात येतो  आणि त्याला समोरच्या मंदिरात झाडांना पाणी घालणारी एक तरुणी दिसते. पाणी! ज्यामुळे हे सगळं रामायण घडलं ते घोटभर पाणी! व्याकुळ झालेला हा तरुण तिच्याकडे पाण्याची याचना करतो. भिकाऱ्यासारखा दिसणारा हा तरुण बघून ती तरुणी क्षणभर बावरते. मग तिच्या चेहऱ्यावर करुणा दाटून येते. अपार, कैवल्यस्वरूपी करुणा!  ती घागरीतल्या पाण्याची धार त्याच्या हातात धरते आणि तो तहानलेला, थकलेला तरुण ओंजळीने ते पाणी घटाघटा पिऊ लागतो. चित्रपट संपतो.
'जागते रहो' मधला 'जिंदगी ख्वाब है' म्हणत झिंगणारा मोतीलाल जसा कायमस्वरूपी लक्षात राहिलाय तसाच हा गावंढळ, अशिक्षित अनामिक राज कपूर! मळके, फाटकेतुटके कपडे, वाढलेली दाढी, चेहऱ्यावर भीती आणि कोरडा पडलेला घसा आपल्या हृदयाला स्पर्श करून जातो.

'नसीब' या तद्दन बाजारू सिनेमात मनमोहन देसाईनं आख्खी फिल्म इंडस्ट्री एका गाण्यात गोळा केली. त्या वेळी वेटर अमिताभनं आग्रहानं ऍकॉर्डियन राजकपूरच्या गळ्यात अडकवलं आणि त्या थकलेल्या, बेडौल शरीराच्या शोमननं त्यावर बोटं फिरवत चार पावलं टाकली..... काळ सर्रकन मागे गेला. निळ्या डोळ्यांचा, लालबुंद चेहऱ्याचा एक देखणा प्रेमी आपल्या प्रेमाचा जाहीर इजहार करीत गायला लागला
'आप हमारे दिल को चुराकर, ख्वाब चुराये जाते हैं
ये इकतर्फा रस्म-ए-वफा हम, फिरभी निभाये जाते हैं
चाहत का दस्तूर है लेकिन, आपको ही मालूम नही
जिस महफिल में शमा हो, परवाना जायेगा'

हाच राज कपूर आपण आठवू आणि लक्षात ठेवू. 'आज तुम्हे विद्या की नही, माया की जरूरत है' हा साक्षात्कार होण्यापूर्वीचा 'सीधी सी बात, ना मिर्ची मसाला' सांगणारा एक दिलवाला! 'रंजो गम मेरे जीवन साथी, आंधियोंमे जली जीवन बाती, भूख ने है बडी प्यार से पाला' म्हणत अगदी तस्से हसणारा!