धंदेवाईक? दुसरी बाजू. मला दिसलेली...

अत्यानंद यांचे खालील लेख वाचल्यानंतर प्रतिसाद द्यावा असा विचार होता. पण त्यांनी त्यांच्या लेखाची विरंगुळा / मौजमजा  ह्या लेखनप्रकारात नोंद केल्याचे पाहिले आणि माझा विचार बदलून एक स्वतंत्र लेख लिहावा असे वाटले.

http://www.manogat.com/node/9674

घेलाशेठचे ते स्वामीपुराण ऐकून मी म्हटले, "ह्याऽऽ! त्यात काय! माझ्या बाबतीतही हे असेच घडते!

http://www.manogat.com/node/9713

कधी मन:शक्तीला तर कधी तुम्हालाच आवाहन करून 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' वगैरे गोंडस आणि सहज पटेल अशा भाषेत त्या 'सद्गुरू जीवनराव' पद्धतीने लोकांना आकर्षित करायचे. आपण जे काही बोलतो त्याच्या ध्वनीफिती,चित्रफिती,पुस्तके आणि असेच बरेच साहित्य लोकांच्या गळी उतरवायचे असा उघड उघड भावनांशी खेळ मांडून त्यातून अर्थप्राप्ती करायची.

आपली विवेकबुध्दी गहाण टाकलेल्या लोकांच्या कमजोरीचा फायदा उचलणारे असे हे महाभाग सद्या पदोपदी दृष्टीस पडतात आणि लोकही मेंढरांप्रमाणे त्यांच्या मागे जातात. आदिकालापासून सुरू झालेला हा खेळ जगाच्या अंतापर्यंत चालणार आहे. मदारी बदलतील पण माकडे तीच असणार आहेत!

अशा विषयाकडे विरंगुळा / मौजमजा ह्या दृष्टीने पाहिले जाऊ नये या मताचा मी आहे.

कर्मधर्मसंयोगाने आपण उल्लेख केलेल्या काहींशी माझा प्रत्यक्ष संबंध आला आहे.

                बापू म्हणजे आशारामबापू की अनिरुद्धबापू की मुरारीबापू हे आपण स्पष्ट लिहिले नाही. पण एकंदर वर्णन हे अनिरुद्धबापूंकडे निर्देश करत आहे असे वाटते. त्यांना मी अजून प्रत्यक्ष पाहिले नाही, ऐकले नाही, वाचले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतप्रदर्शन करण्याचा मला काही अधिकार आहे असे वाटत नाही.

               मात्र आशारामबापूंची प्रवचने मी प्रत्यक्ष ऐकली आहेत. त्यांचा मुख्य भर हा कथाकथनात्मक आणि भक्तीरसतेवर असतो असे मला वाटते. पण त्यांच्यासमवेत नामस्मरण करण्याचा आनंद हा वेगळ्या पातळीवरचा असतो.प्रवचनांमध्ये अधून मधून आयुर्वेदाबद्दल सांगणे किंवा रोजच्या आजारपणावर घरगुती उपाय सांगणे हा त्यांचा स्वभाव आहे. मला त्यांच्या प्रवचनांमध्ये विचारांपेक्षा नामसंकीर्तनात अधिक गोडी होती. त्यांचा श्रोतृवर्गही सर्वसामान्य असल्यामुळे त्यांचा भर हा भक्तिरस, मानवी  जीवनात एकमेकांशी व्यवहार कसे असावेत यावर अधिक होता.

          दुसरे म्हणजे मुरारीबापू- ज्यांनी रामनामाचा-रामकथेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिक्षकीपेशातील नोकरी सोडून पूर्णवेळ रामकथा करण्यात आपले आयुष्य कारणी लावले. मी स्वतः त्यांच्या रामकथेचा आस्वाद घेतला आहे.

            आपण पांडुरंगशास्त्री आठवले यांना कसे विसरलात हे कळले नाही. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे कार्य महाराष्ट्रात फारसे नव्हते. पण गुजराथ मध्ये त्यांनी केलेले कार्य आणि त्याची लोकांनी ( हिऱ्यांना पैलू पाडणारे कलाकार (हिराघसू) आणि कोळी बांधवांनी ) दिलेली पोचपावती मी स्वतः: पाहिली आहे. विशेषता: त्यांचे मशालगीत!

           आपली विवेकबुद्धी गहाण टाकलेल्या लोकांच्या कमजोरीचा फायदा उचलणारे असे हे महाभाग

आपण जे काही बोलतो त्याच्या ध्वनीफिती,चित्रफिती,पुस्तके आणि असेच बरेच साहित्य लोकांच्या गळी उतरवायचे असा उघड उघड भावनांशी खेळ मांडून त्यातून अर्थप्राप्ती करायची

या प्रकारात ते नक्कीच येत नाहीत असे माझे प्रामाणिक मत आहे

 तर कधी तुम्हालाच आवाहन करून 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' वगैरे गोंडस आणि सहज पटेल अशा भाषेत त्या 'सद्गुरू जीवनराव' पध्दतीने लोकांना आकर्षित करायचे.

माझ्या माहितीप्रमाणे हा संदेश महाराष्ट्रात तरी श्री. वामनराव पै यांनी दिला आहे. त्यांचा श्री. वामनराव पै, नामधारक वामनराव पै ते सद्गुरू वामनराव पै ह्या प्रवासाचा मी माझ्या वयाच्या १७ व्या वर्षांपासून साक्षीदार आहे.  त्यांची आणि माझी ओळख झाली ती पुस्तकाच्या माध्यमातूनच. त्या पुस्तकातील विचार मला आवडले आणि मी प्रवचनांना जाऊ लागलो. सुरुवातीला त्यांचे प्रवचन संपले की मी एका कोपऱ्यात बसून त्यांचे आणि त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींचे निरिक्षण करत असे. मी अनेक वेळा पाहिले की हा "माणूस" प्रवचन संपले की पुन्हा नामात दंग होऊन जायचा. नामात दंग झालेल्या त्यांना मी पाहिले आणि "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" हे आठवल्यानंतर आणि प्रत्यक्ष प्रचिती घेतल्यानंतर मी त्यांच्या पायांवर डोके ठेऊ लागलो. प्रवचनांची टिपणं काढून माझ्या शंका त्यांना विचारून त्याचे निरसन करून घेत असे. ते घरी गेले की आम्हा कार्यकर्त्यांचे काम म्हणजे लोकांना बसण्यासाठी अंथरलेल्या बारदानांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवणे.
               तेव्हा कार्य करत होतो;पण अनुग्रह घेऊन गुरू-शिष्याचे नाते प्रस्थापित केले नव्हते.शिक्षण संपले आणि अनुग्रह घेतला. नंतर भावस्मरण आणि नुकतीच दिलेली दिव्यसाधना ह्यामुळे त्यांचे सद्गुरूरूप मनात भरले. मी हरिपाठावरील निरूपण संपवले आणि त्याच बुधवारी आमच्या मंडळाच्या सचिवांचा फोन आला आणि मनात असलेली दिव्यसाधनेची ओढ पूर्ण होण्यासाठी सद्गुरूंनी स्वतःहून माझ्या नावाची सूचना करून मला बोलवण्याची सचिवांना आज्ञा केली. काही महिन्यांनी सर्वसाक्षींशी बोलत असता सद्गूंरूंचा परत फोन आला आणि मला त्यांनी घरी बोलावले. गीता-ज्ञानेश्वरीतील काही ओव्या आणि समाधीसुखाची अनुभूती यावर मार्गदर्शन केले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुखाचा दिवस होता.

                कोणत्याही संस्थेत, कार्यात हवसे, नवसे आणि गवसे हे असणारच. आपण कोणत्या यादीत आपले नाव टाकायचे हे आपण ठरवायचे. आपण माकड म्हणून सबोधिले जावे, मेंढरं म्हणून आपली अवहेलना केली जावी की शिष्योत्तम म्हणून आपल्याला सद्गुंरूनी आपले हृदगत सांगावे हे ज्याचे त्याने ठरवावे. कारण " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"

               एका जिर्ण हनुमान मंदिरात सुरू झालेले नामसंप्रदाय मंडळ आज लोकांसमोर उभे आहे ते " जीवनविद्या मिशन" म्हणून.               त्यांनी स्वतः:ची नोकरी, कुटुंब सांभाळून सुरू केलेला हरिनामाचा प्रचार "ज्ञानेशांचा संदेश" या ग्रंथरूपाने प्रकाशित होण्यासाठी त्यांच्याच साधकवर्गाने, जो त्याकाळी मुंबईतील गिरणीकामगार होता, आपल्या पगारातून, प्रॉविडंड फंडातून पैसे काढून मदत केली. स्वतः श्री.वामनराव अजूनही त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून रॉयल्टी घेत नाहीत. त्यांनी जे कार्य केले ते मुख्यत: कोंकणातील गिरणीकामगार वर्गासाठी. त्यावेळची त्या समाजाची वैचारिक पातळी आणि मानसिकता लक्षात घेतली तर त्यांनी दिलेला  " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " हा संदेश गोंडस किंवा लोकांना निव्वळ आकर्षित करून घेण्यासाठी आहे असा आरोप करणे चुकीचे आहे. "तत्वमसि" " अहंब्रह्मास्मी" ह्या वेदांतशिकवणीच्या जवळ जाणाऱ्या ह्या संदेशाला कुणी भावनांशी खेळणे असे संबोधने हे त्याच्या अज्ञानाचे प्रकटीकरण आहेच. पण मूळ ग्रंथाचे वाचन न करता त्यावर टीका करणे हे दांभिकपणाचे आहे.

               आजवरच्या महाराष्ट्रातील संतपरंपरेकडे पाहिले तर त्यांनी समाजाची मानसिकता बदलण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. अंहकार गेल्याशिवाय स्वार्थत्याग नाही; स्वार्थत्यागाशिवाय समाज एकसंध होणे नाही. अहंकाराचा नाश करण्यासाठी देवाची स्थापना अंतर्मनात करणे आवश्यक आहे किंवा आत्मज्ञानाची ओळख झाली पाहिजे. सर्व संतांची हीच तर तळमळ आहे. संतांनी आपले हित नामात आहे हे ओळखले आणि तोच संदेश त्यांनी समाजाला दिला. " हाकारोनी सांगे तुका । नाम घेता राहो नका " असे कितीही सांगितले तरी त्यांच्यात दोष पाहणारे होते; आहेत आणि असणारच. अशा सर्वांना घेऊन तर पुढे जायचे आहे संतांना.

                मी अनेक संतांकडे गेलो आहे. किर्तनकारांशी वाद घातला आहे. कधी कधी माझी आई मला म्हणायची,  "तुझे पटत नाही तर जाऊ नकोस. पण त्यांच्याबरोबर इतर मंडळी निदान देवाचे नाव घेतात ते तरी बंद करू नकोस."

                बाई आणि आई ह्यामध्ये जसे म्हणता येते की आई ही बाई असतेच पण पण प्रत्येक बाई ही आई असू शकत नाही तसेच म्हणता येईल की प्रत्येक सद्गुरू हे संत असतात पण सर्व संत हे सद्गुरू नसतात. ते ज्ञान देण्याची कला फार कमी संतांना अवगत असते. जिज्ञासूंनी श्री. शिरीष कवडे लिखित " दिक्षा रहस्य " हे छोटे पुस्तक वाचावे. मग लक्षात येईल की सद्गुरुपदावर आरुढ होणे हे वाटते इतके सोपे नाही. विश्वामित्र "देवर्षि" झाले. पण त्यांना खंत होती ती वसिष्ठांप्रमाणे " ब्रह्मर्षि' होता येत नाही त्याची. हा सूक्ष्म भेद फक्त ज्ञानीच जाणू शकतात.

                पूर्वीच्या काळी साधुसंतांना, कलावंतांना राजाश्रय होता. आज लोकशाहीत लोकाश्रय घेतांना लोकांना हवे ते देण्यात कमीपणा तो कोणता?

                आज जगाच्या नकाशात खिजगणतीतही नसलेल्या माझ्या कार्यालयात बसून मी माझे विचार मनोगत ह्या माध्यमातून जगापर्यंत पोचवत असेन तर मनोगतकारांचे आभार मानायचे सोडून त्यांच्यावर अर्थप्राप्तीचे धंधे करतात, दुसरे काय? असे आरोप करणे सवंगपणाचे आहे असे मला वाटते. त्याचप्रमाणे पुस्तकं.ध्वनीफिती इ. माध्यमांद्वारे आपले नामप्रसाराचे आणि समाज बांधिलकीचे कार्य करणे यात गैर ते काय? त्या कार्याची अर्थप्राप्तीचे साधन अशी संभावना करणे चूकच नाही का?

                आजवर मी तरी कुणा प्रवचनकारांनी अथवा त्यांच्या शिष्यांनी कुणावर ग्रंथ, ध्वनीफिती अथवा फोटो घेण्याची सक्ती केल्याचे पाहिले नाही. स्वखुषीचा हा मामला आहे. मला हवे ते मिळाले तर मी त्यासाठी काही देण्याची तयारी दाखवली तर त्यात गैर ते काय?