"ओ कम ऑन अक्षय, अकेला क्या बाहर बैठा है यार!!! डान्सवान्स करते हैं यार, चल अंदर"
"छोड ना यार, पहले इसके साथ का रोमान्स तो खत्म कर लूं" म्हणत अक्षयने वर न बघता आणखी एक सिगारेट शिलगावली. पण डान्ससाठी येण्याचे आमंत्रण देण्याच्या सौजन्याबद्दल, तेच ठरलेलं हसू फ़ेकण्यासाठी अक्षय वर बघेस्तोवर "जो तेरी मर्ज़ी!", म्हणून डान्ससाठी बोलवायला आलेला हिमांशू आतल्या 'कैसा जादू डाला रेऽऽ'च्या ढणढणाटात मिसळूनही गेला होता. घटकेघटकेगणिक रात्र तरुण होत चालली होती, आणि तिच्याबरोबरच हेमंतची ग्रॅज्युएशन पार्टीसुद्धा. नुसत्या हेमंतचा तो आज़ डॉ. हेमंत झाला होता आणि चिप्स आणि पिझा स्लाईसेसने चालू झालेल्या त्याच्या पदव्योत्सवाची गाडी बिअर, वाईन, टकिला शॉट्सची स्टेशने घेत, रमतगमत मार्गक्रमणा करत होती. स्वतःलाच स्वतःपेक्षाही जास्त झालेला आनंद दारूचे पेले रिचवण्यातून आणि सिगारेटची पाकिटेच्या पाकिटे संपवण्यातून कसा साज़रा करता येतो, हे अक्षय आज पुन्हा बघत होता. जन्मापासूनची तेवीसएक वर्षे मुंबईतच काढल्यानंतर 'पार्टी कल्चर'त्याला अगदीच नवीन नसले, तरीसुद्धा भारताबाहेर अमेरिकेत राहूनच ते जास्त फुलते, यावर त्याच्या मनाने कधीच शिक्कामोर्तब केले होते. आजची पार्टी ही त्या सिद्धांताची एक 'कन्फ़र्मेटरी टेस्ट'च होती. कविता आणि गझलांबरोबरच्या प्रणयात स्वतःचं भान हरवणाऱ्या अक्षयला, त्यांच्या नशेपुढे पार्ट्यांमधली कडवट चवीची, मिठ्या मारून नि पापे घेऊन हसण्याखिदळण्याची नि त्या ओळखीच्या धुराची नशा नेहमीच कृत्रिम, निरर्थक वाटत आलेली. पण आज तो स्वतःच एका वेगळ्या रोमान्समध्ये गुंतला होता. त्याची नजर निर्विकारपणे आतल्या काळोखावरून फ़िरली. मदमस्त हातवारे करणाऱ्या आकृत्या, फ़ुल्ल व्हॉल्युमवरचं आणि तरीही काही ऐकू न येणारं म्युझिक, 'चीअर्स'च्या किंकाळ्या आपापलं काम प्रामाणिकपणे,चोख बजावत होत्या. खिडकीजवळच्या मंद उजेडात राहुलचे ओठ भावनाच्या ओठांना भिडले, आणि अक्षयचे त्याच्या सिगारेटला. ओळखीच्या अनेक पार्ट्यांसारखीच ही पार्टीसुद्धा त्यानं डोळेभरून श्वासांत कोंबली. पण आज दुसऱ्याच क्षणी तो तिचा सारांश धुराच्या वलयांमध्ये पाहत होता. त्याच वलयांमध्ये त्याला आता कुणाचीतरी ओळख पटू लागली होती.