पुढे काय होणार या विचारांनीच मला कसेतरी होत होते. पण एक गोष्ट होती ती म्हणजे नकाराची अपेक्षा, आणि मी त्याला तयार होतो. ठरल्यावेळेला मी तिकडे पोहोचलो. थोड्याच वेळात आमच्या बाईसाहेब पण आल्याच. मी खुपच कसल्यातरी दबावाखाली होतो. काही वेळ उगाचच इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. घड्याळाचे काटे पुढे-पुढे जात होते. शेवटी अधीक वेळ घालवण्यात अर्थ नाही म्हणुन मी सरळ विषयाला हात घालायचे ठरवले.
प्रथम मी तिला विचारले, "तुला माहित आहे का मी तुला कशाला इकडे बोलावले?" ती हसली, जणु काही तिला माहीत आहे कशाला ते. पण मला नाही म्हणाली.
मग मी तिला म्हणालो, "मी जे काही बोलेन, ते निट आधी ऐकुन घे आणी नंतर बोल.. आणी अजिबात हसायचे नाही."..
तीः "ठिक आहे".
मग प्रथम मी तिला माझ्याबद्दल थोडक्यात सांगीतले, माझे पालक, नातेवाईक, माझी शैक्षणीक वाटचाल, माझा स्वभाव, आवडी-निवडी, माझे भविष्याबाबतचे विचार वगैरे. मी तिला माझ्या जिवनात येउन गेलेल्या माझ्या प्रेमप्रकरणांबद्दल पण सांगीतले, हो उगाच नको अंधारात ठेवायला. तिने सगळे हे शांत पणे ऐकुन घेतले. त्यामुळे माझा आत्मविश्वास थोडा वाढला आणी मला जरा मोकळे-मोकळे वाटायला लागले. मग मी तिला माझे जोडीदाराबद्दल चे मत सांगीतले आणी म्हणालो ".. थोडक्यात ती तुझ्यासारखी असावी." ती परत हसली. [मस्त रे !! छान टाकलास.. पोरगी हसली बघ !] मग एकदमच विचारले "माझ्याशी लग्न करशील??, मला तु खुप आवडतेस असे मी म्हणणार नाही कारण खुप शब्दाची व्याप्ती कमी आहे, तु मला त्यापेक्षाही कितीतरी अधीक आवडतेस." अवकाशात शांतता कशी भासत असेल ते मी अनुभवले. मी हे सर्व खाली मान घालुनच बोलत होतो. माझे कान तिचे बोलणे ऐकायला असुसले होते.. पण ती काहीच बोलली नाही. मी वर पाहिले, ती माझ्याकडेच बघत होती. तिच्या मनात काय चालले असेल त्याची मला काहीच कल्पना येत नव्हती.