फाउंटनहेड परिचय - पाच
बबआतापर्यंत आपण चार पात्रांची ओळख पाहिली. रोर्क आणि डॉमिनिक हे कथानकाचे आधारस्तंभ आहेत. तर पीटर आणि टूही हे त्यांचे वेगवेगळ्या स्तरांवरचे विरोधक.
आता आपण दोन पात्रांशी ओळख करून घेऊया, आणि मग कथेला सुरूवात!
गेल वायनांड
गेल हा क्षमतेच्या दृष्टीने रोर्कला सर्वात जवळचा आहे. हेल्स किचन ह्या न्यूयॉर्क मधल्या झोपडपट्टीत जन्मलेला आणि वाढलेला गेल अत्यंत हुशार आणि कर्तबगार आहे. लहानपणापासून आपल्या सर्जनशीलतेला "तुला इथे लुडबुड करायला कोणी सांगितलंय? तू इथला मालक नाहीयेस मनमानी करायला" अशा हिणकस शेऱ्यांनी घातला गेलेला बांध न जुमानता स्वतःच्या विजिगिषु वृत्तीच्या बळावर त्याने स्वतःचं भविष्य घडवलं. रोर्कप्रमाणेच त्याला ही स्वतःच्या क्षमतेवर गाढ विश्वास आहे, आणि समाजाबद्दल घृणा. त्याला ही रोर्कप्रमाणेच दुय्यम क्षमतेच्या लोकांबद्दल तिरस्कार आहे. प्रसिद्धी माध्यम (वृत्तपत्र, न्यूजरील्स) आणि जंगम मालमत्ता ह्यांचं प्रचंड साम्राज्य गेलने उभं केलं आहे, त्याला नालायक ठरवणाऱ्या समाजाच्या नाकावर टिच्चून. पण हे करताना त्याने रोर्क पेक्षा वेगळा मार्ग अवलंबला. आपल्याला हवी असलेली सत्ता आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी त्याने स्वतःचं ईमान विकलं. ज्या समाजाची, त्यातल्या रुचिहीन लोकांचा त्याला तिटकारा आहे त्यांना दुर्लक्षिण्याऐवजी गेलने त्यांच्या सवंगतेला खतपाणी घातलं, आणि त्यांना हवं ते पुरवण्याचं काम केलं. हे करत असताना त्याचं मन त्याला खातच होतं, बजावत होतं की तू तुझं ईमान विकून ही सत्ता मिळवतो आहेस. तरीही सत्तेची धुंदी आणि एकदा सत्ता हातात आली की मग मी जग बदलू शकेन असा अहंभाव ह्यामुळे त्याची नैतिक घसरण होतच राहिली. पुढे त्याला डॉमिनिक भेटली, फार वेगळ्या परिस्थितीत, तर तिच्यातल्या नैतिकतेवर आणि अर्थातच सौंदर्यावर तो भाळला आणि प्रेमात पडला. मग रोर्कशी मैत्री झाली आणि त्याला जाणवलं की जो मार्ग रोर्कने स्वीकारला आहे त्यावर आपण चालू शकत नाही, आणि इथे त्याचा पराभव झाला. त्याने स्वतःला बदलण्यासाठी, समाजाला बदलण्यासाठी स्वतःच्या सत्तेचा वापर केला, पण यशस्वी झाला नाही. गेल हा माझ्या मते could-have-been रोर्क आहे.