आमच्या कॉलनीची कथा मी अशरशः जगलो आहे. खरं पाहाता त्या कॉलनीत जन्मलेल्या मलाच काय पण इतर कोणालाही जगण्या व्यतिरिक्त इतर कांही करता येण्यासारखं नव्हतच मुळी.
माझ्या बालपणीच्या आठवणी, कमरे खाली कांही वस्त्र परीधान करण्याचे बंधन नसलेल्या वया पासूनच्या आहेत. ओट्यावर टाकलेली पोळी कुत्र्यासाठी आहे हे, मी पाठीत धपाटा खाऊन शिकलो. (लकीली, त्या आधी पोळीचा एक तुकडा, मी घशात कोंबला होता.) अर्धा तास तारस्वरात रडण्याचा प्रोग्रॅम मी साथी कलाकारांच्या उपस्थिती शिवायही पार पाडला. 'रडू दे. रडण्याने फ्फुफुसे सशक्त होतात.' या आमच्या जन्मदात्याच्या डिक्लरेशनला चॅलेंज करण्याचे माझे वय आणि इतरांची प्राज्ञा नव्हती. न पाळलेलं, तरीही रोजच्या पोळीसाठी आमच्या दारी येणारं कुत्रं माझ्या भावना जाणून असावं. निदान, पोळी न खाता, माझ्याकडे एकदा अशी आणि एकदा तशी मान वाकडी करून बघणाऱ्या त्याच्या डोळ्यांमध्ये मला तसे भाव दिसले होते. माझ्या जन्मदात्रीच्या ईच्छेविरुद्ध पोळीचा तो तुकडा मला द्यावासा वाटला तरीही, रोजचा रतिब तुटेल या विचारांनी, त्या श्वानाधिराजाने तो विचार, त्या तुकड्या बरोबरच स्वतःच्या गळी उतरविला. कुत्र्याने पोळी खाऊन टाकलेली पाहून, बाजूलाच पडलेला माझा स्टीलचा चंबू मी जोरात त्याला फेकून मारला. तो हल्ला शिताफीने चूकवून त्या कुत्र्याने पलायन केले आणि खण् खण् खण् खण् आवाज करीत गेलेल्या त्या चंबूने, आराम खुर्चीत पेपर वाचीत बसलेल्या माझ्या वडीलांच्या पायाला 'ए' एडक्यातल्या एडक्यासारखी धडक दिली. झाला प्रकार लक्षात येऊन आता मार पडणार या विचारानी मी, सरड्याच्या वेगाने, स्वयपांक घराच्या दिशेने रांगत धूम ठोकली परंतु, माझ्या प्रेमळ वडीलांनी एका झेपेत मला अर्ध्या रस्त्यातच गाठले आणि माझ्या मऊ मऊ पार्श्वभागी 'सटॅऽऽक' असा आवाज काढला आणि पाठोपाठ माझे तारस्वरातील रडणे, आख्या कॉलनीत घुमले.
शेजारच्या लठ्ठ आणि गोऱ्यापान पानसे काकूंची, येताजाता मला उचलून पापे घ्यायची वाईट खोड होती. मला आवडायचं नाही. आणि म्हणून त्या मुद्दाम पापे घ्यायच्या. मी गाल पुसून टाकायचो, तर माझे दोन्ही हात धरून त्या तेही करू द्यायच्या नाहीत. शीऽऽ. त्या लांबून बोलतील तेवढे चांगले असायचे. काय काय खाऊ करून आणायच्या. आमची आई पण वेडी. म्हणायची, 'काय काकू कशाला एकेक करून आणता त्याच्या साठी?' मला आईचा राग यायचा. आता आई स्वतः सुद्धा खूप खाऊ बनवायची पण काकू स्वतःहून जर कांही आणत असतील तर उगाच नाही का म्हणायचे? काकू, म्हणायच्या, 'असू द्या हो, गोड आहे तुमचा मुलगा.' मी लवकरच मोठा झालो आणि काकूंची 'ती' वाईट सवय मोडली.