सूचनाः ह्या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत. कुणाशी साधर्म्य असल्यास योगायोग मानावा.
स्वप्नातल्या कळ्यांनो
संगणकशास्राच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा तास संपवून शैलेशने आपल्या अध्यापक कक्षात पाऊल टाकले. घड्याळ्याकडे नजर जाताच त्याने चटकन" अरे, आज उशीर तर झाला नाही ना ?"असे म्हणत याहू निरोपकावर आलेले निरोप पाहिले. प्राची, आसावरी, आदिती, वैदेही सगळ्याजणी एका संभाषणकक्षात येऊन आपली वाट पाहतं असतील आणि उशीर केल्याबद्दल"काका, तुम्ही असे कसे विसरलात ?"असे ऐकावे लागेल याची त्याने तयारी ठेवली होती. मित्रमंडळींशी याहू निरोपकावर फ्रेंच भाषेवर चर्चा व वाद विवाद करण्याची त्यांची नेहमीची वेळ होऊन गेली होती तरी अजून कोणाचाच पत्ता नव्हता. "काही न सांगता सगळ्या गायब कश्या झाल्या?" अशा विचारत शैलेश होता तेवढ्यात निरोपकावर"काय काका आहात का?"असे विनीत ने लिहिले.
"विनीत,तू कसा आहेस? सगळ्या मुली सोडून माझ्या मागे कसा काय लागलास रे बाबा?"