विवेक मद्याच्या नशेत घरी आलेला होता !
दाराची बेल वाजली म्हणून अर्धवट झोपेत असलेली स्नेहा दार उघडण्यासाठी उठली. विवेकच असणार ह्याची खात्री होती, कारण संध्याकाळीच 'बाहेर जेवणार' असल्याचा त्याचा फोन येऊन गेलेला होता. सेफ्टी डोअर मधून खात्री करीत तीने दरवाजा उघडला. अचानक आलेल्या एका विचित्र वासाने डोळ्यावरची तीची झोप उडाली. तीला तो वास नेमका कसला ते कळले नाही. तशीच अर्धवट झोपेत चालत ती बेड वर जाऊन पडली. विवेक कपडे बदलून व बाथरुमला जाऊन आला व बेडवर लवंडला. परत तोच दर्प तीच्या नाकांत शिरला. पडल्या पडल्या तो दुर्गंध कसला असावा ते आठवण्याचा प्रयत्न ती करींत होती. आणी खाडकन तीचे डोळे उघडले..... हा नक्कीच मद्याचा दर्प होता; कारण कधी विवेक बरोबर हॉटेल मध्ये जेवायला गेली की, तेथे आजूबाजूच्या टेबलांवरून तसला दुर्गंध यायचा.... रात्रभर तीला झोप लागली नाही. ती स्वत:ची समजूत घालिंत होती की कदाचित हा तो दुर्गंध नसावा, परंतू वातानुकूलित खोलीत आता तो चांगलाच जाणवत होता.