'अरे ए, प्रभाकर' समोरच्या चाळीतल्या अप्पांची हाक कानावर पडली आणि मी थबकलो. दिड फुट बाय साडेपाच फुट क्षेत्रफळाची अप्पांची मुर्ती व्हरांड्यात पहुडली होती. पहुडली कसली, काकूंनी अंगणात टाकलेल्या वाळवणाची राखण करण्याकरता काकूंनीच अप्पांचं बुजगावणं आरामखुर्चीत बसवून ठेवलं होतं. चट्टेरी-पट्टेरी लेंघा आणि बगलेतून ओघळलेला, बिन बाह्यांचा, भोकं पडलेला गंजीफॉक या वेशातील 'या' वॉचमनला अंगणातल्या चिमण्याही भित नव्हत्या.
'काय अप्पा, काकूंनी दम मारून राखणीला बसविले वाटतं?'
'अँ...ती काय दम देते मला. मलाच सकाळ सकाळ कांही उद्योग नव्हता म्हणून म्हंटलं काही वाळवण असेल तर टाक उन्हात, मी करतो राखण. अरे तेवढेच मलाही 'ड' जीवनसत्व मिळते.'
'अप्पा, सावलीत बसून 'ड' जीवनसत्व नाही मिळत कधी.'
'अरे, जाऊदे. इतका वेळ उन्हातच होतो. आत्ता जरा सावलीत आलो. आणि हवय कोणाला जास्तीचे 'ड' जीवनसत्व? माझी हाड आहेत मजबूत.'
'तरीच गेल्या वर्षी मोरीत पाय घसरून पडले आणि मांडीचे हाड मोडून घेतले होते' काकू बाहेर येत म्हणाल्या.
'ते तुमच्या मुळे. माझ्या आधी आंघोळ कोणी केली होती? मोरीत मध्यभागी तांब्या कोणी ठेवला होता?'
'पण मोडलं होतं नं हाड? मग हाडं मजबूत आहेत म्हणून थापा कशाला ठोकता त्या बिचाऱ्याला?'
'हे बघा तुम्ही दोन कप चहा ठेवा फक्कडपैकी, जा.'
'तो केंव्हाच ठेवलाय. तुम्ही प्रभाकरला हाक मारलीत तेंव्हाच.'
'बरं ते जाऊदे. तुम्ही हाक कशाकरता मारलीत?' मी गाडी मूळ पदावर आणण्याच्या प्रयत्नात म्हणालो.
'अरे ऐकवायची असेल पुन्हा त्या नाडकर्ण्यामुळे हुकलेल्या शेवटच्या प्रमोशनची गोष्ट. बाई, बाई, बाई माझे तर अगदी कान किटले ते ऐकून ऐकून.' काकू.
'अहो, मला रिटायर्ड होऊन झाली आता तेरा वर्ष. आणि त्या हरामखोराचं नांव काढून कशाला उगीच माझा रविवार खराब करताय? तूम्ही आपलं चहाचं बघा, जा.'
'जाते... जाते. येऊन जाऊन मेली माझीच अडचण आहे या घरात.'
'पाहा आता. मी असं म्हंटल तरी कारे?' पण एव्हाना काकू गेल्याही होत्या आंत.
'बोला अप्पा.'
'अरे काही नाही. तू इथल्या जवळच्या बँकेत असतोस ना.....तर माझं खातं तुमच्याच बँकेत, पण पार तिथे माझ्या ऑफिसजवळ आहे. नोकरीत असताना ठीक होतं. पण आता म्हातारपणी एवढ्या दूर चालवतही नाही आणि उठसूट रिक्षाही परवडत नाही. माझ खातं तुझ्या ब्रँचला बदलून घ्यायचा विचार आहे. शिवाय मी माझ्या ऑफिसला अर्ज करतोय की बाबांनो, माझं पेन्शन प्रभाकरच्या ब्रँचला पाठवा. म्हणजे कसं, मला बर पडेल.'
'ते होऊन जाईल अप्पा. तुम्हाला जरा २-४ सह्या कराव्या लागतील. कदाचीत, एखादे वेळी यावे लागेल बँकेत. बस्. '
'ते मी करतो. तसंच, माझा अर्ज माझ्या ऑफिसात जरा नेऊन दे. आणि त्या हरामखोर नाडकर्ण्याची सही घ्यायला विसरू नकोस कॉपीवर.'
'आला नं तो नाडकर्णी पुन्हा कथेत?' काकूंनी चहाचा कप माझ्या हातात दिला, बिनसाखरेचा चहा अप्पांना देवून, स्टीलच्या पेल्यातला चहा स्वतः जवळ ठेवला.'हरिदासाची कथा मूळपदावर. सारखं सारखं त्याला हरामखोर म्हणायचं आणि आपण समाधान मिळवायचं.'
'एकदा नाही दहादा म्हणेन हरामखोर.. हरामखोर... हरामखोर. कोणाच्या बापाची भिती आहे काय?'
'बापाची नाही, मुलांची भिती बाळगा त्या नाडकर्ण्याच्या. मोठी झाली आहेत आता. एक दिवस येतील आणि तुमची कवळी काढून हातात देतील, मग बसाल एवढेसे तोंड करून, चेन लावून बंद केलेल्या पाकीटासारखे तोंड करून.' माझ्या डोळ्यासमोर अप्पांचे बिनकवळीचे, सुरकुतलेल्या ओठांचे तोंड दिसू लागून मला हसू आले.
'काही घाबरू नका काकू. काही होत नाही, आम्ही आहोत नं! आणि आपल्यावर अन्याय झाल्याची भावना असेल नं तर ती बोलून टाकावी, मनात ठेवू नये, मनाचा कोंडमारा होऊन प्रकृतीवर परिणाम होतो.'
'बघा! बघा! जरा. तुमच्या पेक्षा लहान आहे पण.....बोलणार होतो आता.'
'काय बोलणार होता? त्याला अक्कल जास्त आहे हेच नं. ती तर आहेच म्हणून तर ब्यँकेत एवढा मोठा ऑफिसर आहे. सरकारी खात्यात खर्डेघाशी करीत निवृत्त होणाऱ्यातला नाही, तो.' काकूंनी घरात जाता जाता बॉल परतवला होता.
'तुला सांगतो प्रभाकर, आमच्या श्वशुरांनी हिच्या शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष्य केलं नाहीतर कलेक्टर झाली असती. गेला पक्षी, फर्डी वकील नक्कीच झाली असती.'
हसत हसत अप्पांचा निरोप घेवून मी निघालो. अप्पांचे खाते आमच्या ब्रँचला बदलून घेणे कठीण नव्हते. अप्पांनी ४ लाख ४७ हजार रूपये जमवले होते. शिवाय पेन्शनही चांगले मिळत होते. मुलगा अमेरिकेत होता. तोही कधी कधी पैसे पाठवायचा. अप्पांना आणि काकूंना अमेरिकेला बोलवायचा. पण अप्पांचा हट्ट होता, 'नाही जायचं अमेरिकेला, काय ठेवलय डबोलं तिथे? इथे काय वाईट आहे. आम्हाला देशाभिमान आहे म्हंटल अजून.' असे ते तोंडाने म्हणायचे पण एकदा मला अगदी खाजगीत म्हणाले, 'अरे काय आहे माहिती आहे का? मला विमानात बसायची फार भिती वाटते. अरे खाली कांही आधार नाही आणि एवढ्या उंचीवर उडायचं, तेही इतके तास... नकोरे बाबा! या पेक्षा आपल्या देशी एश्ट्या बऱ्या. खड्यातनं गेली तरी चारही चाकं कशी जमिनीशी आपलं नातं सोडीत नाहीत.' अप्पांचे हे गुपित मी, त्यांच्या सांगण्यावरून, माझ्या जवळच ठेवलं होतं. अगदी काकूंजवळही बोलायच नाही या शपथेवर.
पण काकू, कलेक्टरच नाही तर शेरलॉक होम्सही होऊ शकल्या असत्या. संध्याकाळी अप्पा भाजी आणायला गेले होते आणि तांदूळ निवडणाऱ्या काकूंशी बोलता-बोलता अमेरीकेचा विषय निघाला. तशा काकू म्हणाल्या,' अरे! ते देशप्रेम वगैरे सब झूट आहे रे! विमानात बसायला घाबरतात. पण तसे बोलायचे नाहीत. 'मी विमानात बसायला घाबरतो' असे बायकोजवळ कबूल करायला लाज वाटते, झालं. दूसरं कांही नाही.'
मी उडालोच. 'पण असं कशावरून म्हणता तुम्ही काकू?' मी पुन्हा काकूंना छेडलं.
'अरे!, कशावरून काय? लग्न झाल्यापासून पाहातेय नं मी. साधं मेलं गिरगावात बसने जायचे म्हंटले तरी बसमध्ये चढता - उतरता अजूनही माझा हात धरून चढतात उतरतात.' काकूंनी तोंडाला पदर लावला. पासष्टाव्यावर्षीही काकू झकास लाजल्या होत्या.
'काकू, ते तुमची काळजी घेत असतील.' मी पुन्हा अप्पांची बाजू घेतली.
मान वर न करता काकूंनी मानेला हलकेच झटका दिला आणि माझं मत तांदूळातल्या खड्याप्रमाणे उडवून लावलं. थोडावेळ काकू विचारात गढल्या. मग म्हणाल्या,' असेलही बाबा तू म्हणतोस तसे. बस मध्ये कितीही गर्दी असली तरी स्वतः उभे राहतात पण माझ्यासाठी बसायला जागा मिळवून देतात. मला म्हणतात, 'मी काय रिटायर्ड माणूस. दिवसभर आरामखुर्चीत बसून असतो. तुला रिटायरमेंट नाही, तू दिवसभर कामं करीत असतेस, तू बस.''
'पाहा, म्हणजे ते कितीही भांडले तरी, काकू, मनाने अप्पा तसे प्रेमळच म्हणायचे.'
'होय रे बाबा! तुझे अप्पा प्रेमळच. पण त्या प्रेमापायी समोरच्याला काय दुःख भोगावी लागतात याचा कांही विचार कराल की नाही.....स्वतःची आजारपणं......' काकूंनी पदर डोळ्यांना लावला. त्यांनी ओठ घट्ट दाबून हुंदका आवरला तरी त्यांचे शरीर गदगदत राहीले. कांही तरी गंभीर बाब होती. मी थांबलो. काकूंना शांत होण्यास वेळ दिला. कांही वेळाने काकूंनी स्वतःला सावरलं.
'अरे! स्वतःची आजारपणंही लपवायची? मला दुःख होऊ नये म्हणून? होमासमोर शपथा घ्यायच्या एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हायच्या आणि प्रत्यक्षात जन्मजन्मीच्या सहचारीणीला फसवायचं. आपल्या आजारपणाचा थांग लागू द्यायचा नाही.'
अजून मला अंदाज येत नव्हता. असा काय आजार अप्पांना असणार आहे? चांगले धडधाकट दिसत होते. हं आता, वयोमानानुसार हालचाली मंदावल्या होत्या पण अजून चालते-फिरते होते.
'काकू, मला सांगण्यासारखं नाही का? माझा आग्रह नाही. पण काळजी वाटते...'
'अरे तू काय वेगळा का आहेस? आमचा सुभाष तसा तू. काय सांगू आणि कसं सांगू? पण उद्या वेळ पडली तर आख्या चाळीत तूच एक मदतीचा आणि भरवशाचा. बाबा रे! मी केलय तसच मन घट्ट कर.... तुझ्या अप्पांना..... कॅन्सर आहे.'
'काकू..... काय सांगताय काऽऽऽय?'