बुद्धीला कितीही ताण दिला, तरी बालपणातल्या सर्वात पहिल्या अनुभवाची आठवण म्हंटली की, मला ते वादळ आठवतं. झाडाच्या उंच शेंड्यावर आमचं घरटं होतं. सोसाट्याच्या वार्यात झाडाचा शेंडा जवळ-जवळ ५ ते ७ फुट झुकत होता. घरट्यात मी एकटाच होतो. घरट्याबाहेर पण त्याच फांदीला गच्च धरून आई बसली होती. फांदीच्या प्रत्येक हेलकाव्या सरशी, आता आपण एवढ्या उंचावरून पडणार या, भितीने मी अक्षरश: कोकलत होतो. मला आई-बाबांसारखं उडता येत नव्हतं. शेजारी बसलेली आई, सारखी पंखांनी तोल सावरत होती. ती घाबरलेली नव्हती. मधे मधे काव काव करून मला धीर देत होती. पण मला, घरट्याला, सोडून कुठे जात नव्हती. बाबा कुठे बाहेर गेले होते. आईला त्यांचीही काळजी वाटत नव्हती पण या वादळात त्यांनी जवळ असावं, अगदी घरात नाही तरी निदान समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर, नजरेसमोर असावं असं तीला वाटत होतं. संघ्याकाळी मित्रांसमवेत समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर गप्पा मारत बसणं हा माझ्या बाबांचा छंदच होता. पण आज ते (आणि त्यांचे मित्रही) कुठे दिसत नव्हते. मी तर जाम घाबरलो होतो. वार्याने फांदी झोका खाऊ लागली की मी डोळे बंद करून घ्यायचो आणि जिवाच्या आकांताने काऽऽव काऽऽव ओरडायचो. आई हसायची आणि सांगायची,'कांही होत नाही. घरट्यातल्या तारा गच्च धरून बस. घरटं कांही पडायचं नाही.' मी तसं करत होतो पण भिती जात नव्हती. किती वेळ त्यात गेला कळलं नाही. पण, बर्याच वेळाने वारा मंदावला, झाडाच्या शेंड्याचे झोके घेणं थांबलं. शेंडा हळूवार हलत राहीला. भिती दूर पळाली. मजा वाटू लागली. मी हसू लागलो. आई आता उडून गेली. बहूतेक ती बाबांना शोधायला बाहेर गेली असावी. आई आणि बाबा परतले तो पर्यंत मी झोपलो होतो. त्यांच्या बोलण्याने जागा झालो. बाबांनी त्यांच्या चोचीतून आणलेल्या अळ्या मला खाऊ घातल्या आणि पायात धरलेली एक मोठी अळी आईला दिली. आईने बाबांच्या अंगावर पिसांमध्ये अडकलेले कचर्याचे कण आपल्या चोचीने काढून टाकले. बाबा अळ्या छान छान आणायचे. पोपटी रंगाच्या अळ्या मला खूप खूप आवडायच्या. बाबा त्या जास्त आणायचे. पण बाबा तपकिरी रंगाच्या अळ्याही आणायचे. त्या चवीला एकदम बेकार असायच्या, मला मुळीच आवडायच्या नाहीत पण त्या खायला लागायच्या. त्याने पंखात ताकद येते असे आई सांगायची. मी कधी खायचे नाटक करून ती अळी थूंकून टाकली तर बाबा माझ्या डोक्यावर चोच मारायचे. खूप लागायचं. डोळ्यात पाणी यायचं. खाली टाकलेली अळी पुन्हा उचलून आई भरवायची.