दिसते नवे तरीही...

दिसते नवे तरीही, सारे जुनेच आहे...
तुझियाविना सखे हे, जीवन उणेच आहे...

चढवून गे मुखवटा, दुनियेत हिंडतो मी
वदनावरी हसू अन्, हृदयात ठेच आहे...


मी शोध घेत जातो, नाठाळ पैंजणांचा
त्यांचे सुरेल गाणे, मज पारखेच आहे...


आकर्षणे उथळशी, येऊन खूप गेली
वाटे तुला पहाता, ते आगळेच आहे...


बोलायचे मलाही, बोलायचे तुलाही
कोणी सुरू करावे, बस हाच पेच आहे...