वारी २३

      दुसऱ्या अमेरिका वारीनंतर परत जाताना एअर इंडियाने इंगा दाखवल्यामुळे फ्रॅंक्फर्ट विमानतळावरच नऊ तास घालवताना मी यापुढे झेल्या ( पहा :माणदेशी माणसे ) च्या भाषेत आता हाणकाबगार अमेरिकेत जानार न्हाय असे पुटपुटत असलेले सौ.ने गंभीर चेहरा करून ऐकून घेतले असले तरी मनातल्या मनात ती आणि तिच्याबरोबर नियतीही निश्चितच हसली असणार.
       त्या घटकेला तरी मी याबाबतीत अगदी ठाम होतो.पण असे मोठे निश्चय करण्यात जितका मी प्रवीण होतो तितकाच ते पार पाडायला जो ठामपणा लागतो त्याचा मात्र माझ्याकडे पूर्णपणे अभाव आहे.आणि आपण काहीही ठरवले तरी शेवटी परिस्थिती आपल्याला काही विशिष्ट प्रकारे वागायला भाग पाडते तसेही झाले असावे त्यामुळे २००५ च्या जानेवारीत भारतात परत आल्यावर मार्च २००६ पर्यंतच काय ते आम्ही भारतात थांबू शकलो. सुजितलाही डिसेंबर २००५ मध्ये एक छोकरा झाला. त्यावेळी आलेले संयुक्ताचे आई वडील मार्च ३१,२००६ ला परत जाणार होते एअर इंडियाच्या (हो हो एअर इंडियाच्याच अहो कशीही झाले तरी ती आपली हवाई सेवा) ज्या उड्डाणाने ते भारतात जाणार होते तेच विमान भारतातून आम्ही घेऊन आलो (वा तेच विमान आम्हाला घेऊन आले) म्हणजे त्यांची आणि आमची नेवार्क विमानतळावरच गाठ पडली. शासकीय सेवेत असताना चार्ज हॅंडिंग आणि टेकिंग ओव्हरचा जो प्रकार असतो तो आम्ही अगदी विमानतळावर पार पाडला,आणि त्यांच्या लेकीची आणि नातवंडाची जबाबदारी घेऊन आता सुखाने घरी जा असे त्यांना सांगितले अर्थात लेकीला आणि नातवाला सोडून जाताना जे वाईट वाटायचे ते त्यांना वाटलेच असणार.
   या वेळी आमचे दोन्ही चिरंजीव एडिसनमध्येच पण वेगळ्या ठिकाणी रहात होते.सुजित त्याच्या नव्या घरात १० हेदर ड्राइव्ह येथे तर जयवंत टॉल ओक रोडवरील एव्हरग्रीन अपार्टमेंट मध्ये.मागील वर्षी प्रथमेश नर्सरी म्हणजे प्रीस्कूलमध्ये जात होता.ती खाजगी शिक्षणसंस्था होती आणि तेथील फी पण भरपूर होती पण आता पहिल्या वर्गासाठी येथील पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.या शाळेत फी नसतेच पण पालकाचे वास्तव्य त्या विभागात असणे आवश्यक असते त्यामुळे जयवंतला स्वत:च्या नावावर घर असणे आवश्यक होते. या परिस्थितीमुळे प्रथमेश मात्र जाम वैतागला होता. आजी आजोबा एडिसनमध्ये असताना ते आपल्या जवळ न रहाता काकाकडे रहातात हे त्याला पटत नव्हते. मधूनमधून जरी आम्ही प्रथमेशकडे राहिलो तरी त्याचे समाधान तेवढ्याने न झाल्याने आमचे तिकिट वाया गेले असे तो म्हणायचा.काकाकडे आल्यावर त्याला परत जायचेही जिवावर यायचे.तेथे आम्ही तर होतोच शिवाय घरातच झोका,घसरगुंडी ही साधने असल्याने त्याला खेळायला आवडायचे.सुमित अजून लहान असल्याने ही साधने वापरण्यात तो त्याचा स्पर्धकही नव्हता.
   आम्ही अमेरिकेत पोचलो तेव्हां उन्हाळा नुकताच सुरू झाला होता त्यामुळे अजून झाडांवर पानांचा पत्ता नव्हता,पण आम्ही गेल्यावर पालवी फुटू लागली.या नव्या भागात सर्व रस्त्यांना हेदर,लव्हेंडर,पेरिविंकल,हनिसकल अशी निरनिराळ्या फुलझाडांची नावे दिली आहेत आणि त्या त्या रस्त्यांवर खरोखर तशी झाडे होती.विंटरर्ग्रीन हा रस्ता या सगळ्या गल्ल्या जोडत पुढे ग्रोव्ह ऍव्हेन्युला मिळतो.त्या भागात सगळी स्वतंत्र घरेच आहेत, आणि बहुतेकांची रचना बरीचशी सारखी म्हणजे तळमजल्यावर मोठा हॉल, किचन डायनिंग व लिव्हिंग रूम आणि वरच्या मजल्यावर तीन बेडरूम.शिवाय वर दोन आणि खाली अर्धी बाथरूम.काही घरांना तळघर होते पण सुजितच्या घरात ते नाही.या भागात अपार्टमेंट जवळजवळ नाहीतच म्हटले तरी चालेल.
      ग्रोव्ह ऍव्हेन्यु आणि इनमन ऍव्हेन्यु  असे दोन मुख्य रस्ते त्या भागाकडे येणारे आहेत.या दोन रस्त्यांच्या जोडणा्ऱ्या कोपऱ्यावर एक ज्येष्ठ नागरिक गृह (Senior's home)आहे त्याला इनमनग्रोव्ह असेच नाव आहे. त्यात रहाणारे ज्येष्ठ नागरिक बहुधा स्वत:च्या कार चालवणारे आहेत. त्यामुळे या इमारतीसमोर भली मोठी जागा गाडीतळ म्हणून राखून ठेवलेली आहे याशिवाय सभोवती इमारतीच्या क्षेत्रफळाच्या अनेक पट मोठी मोकळी जागा आहे.अशा जागा पाहिल्या की पुण्यात फिरायला जाऊ इच्छिणाऱ्या आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींना मोकळा रस्ता शोधणे  किती कठीण जाऊ लागले आहे याची आठवण होऊन परत गेल्यावर तीच कसरत आपल्याला करावी लागणार या कल्पनेने अगदी दाटून कंठ येतो.इनमन ग्रोव्हच्याच बाजूला एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्यात खरेदी करण्यासाठी फक्त रस्ताच ओलांडावा लागतो. ज्येष्ठ नागरिक संकुलातून ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडून मॉलमध्ये जातात त्यांना सोयिस्कर व्हावे म्हणून मध्ये आडवा पट्टा त्यांच्यासाठी रेघा मारून सुरक्षित ठेवलेला आहे त्यावर सीनिअर्स क्रॉसिंग असे लिहिलेले त्याचेवर एकादा/दी ज्येष्ठ चालत असेल तर गाडी/ड्या खरोखरच थांबतात.आपल्याकडेही सिंहगडरस्त्यावर एका ठिकाणी असा पट्टा मारून ठेवला आहे पण इतर वेळी तर सोडाच पण  वाहनांसाठी लाल दिवा असला तरीही मी जीव मुठीत धरूनच त्यावरून रस्ता ओलांडायला सुरवात करतो.
      आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली असली तरी त्यांच्यासाठी रेल्वे अथवा एस.टी.त भाड्यात आणि आयकरात थोडी सवलत दिली की त्यांची योग्य ती काळजी घेतली असे शासनाला वाटते.अर्थात शासनाला दोष देण्यात काय अर्थ कारण घरातील पुढच्या पिढीलाही ज्येष्ठ मंडळी शक्यतो नकोच असतात.नुकतेच अमेरिकेत गेलेल्या एका मुलाने अमेरिकेत नेण्याचे आपल्या आईवडिलांना कबूल करून त्यांना रहाते घर विकायला लावले आणि त्या सर्व पैशासह विमानतळावर नेऊन त्यांना तेथेच सोडून तो एकटाच अमेरिकेत गेल्याची हृदयद्रावक घटना वाचण्यात आली होती.अमेरिकेत वा पाश्चिमात्य राष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना आपली मुले वा नातवंडे सांभाळतील अशी वेडगळ कल्पनाच बाळगली जात नाही त्यामुळे काही म्हातारी माणसे आपल्या मुला नातवंडांसमवेत रहात असली तर तो अपवाद समजण्यात येतो आणि त्यामुळेच बहुधा ज्येष्ठांना योग्य त्या सवलती देण्याचा प्रयत्न केला जातो. याउलट आपल्याकडे मुलाने अथवा मुलीने आपल्या आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे असा कायदा केला की आपले कर्तव्य संपले अशी शासनाची समजूत असते.त्यानंतर त्या तरतुदीचे पुढे काय होते याकडे कोण लक्ष देणार? 
        या भागात आम्ही प्रथमच आल्यामुळे रस्त्यांची नीटशी माहिती नसल्याने मी सकाळच्या फिरण्याची सुरवात जरा बिचकतच केली.पण नंतर लक्षात आले की हा भाग ग्रोव्ह अव्हेन्यू.इनमन अव्हेन्यू,आणि विंटर ग्रीन या रस्त्यांनी असा वेढला गेला आहे की त्यावर चुकणे शक्यच नाही.त्यामुळे माझे फिरणे अगदी मोकळेपणी होऊ लागले.फिरता फिरता एक दिवस एक भारतीय गृहस्थ समोरून येताना दिसले.तसे बरेच भारतीय या रस्त्यावर दिसत आणि त्यातील बहुतांश गुजराती असल्याने "केम छो " नेच सुरवात करत कारण जगात फक्त गुजराती भाषाच चालते असा त्यांचा ठाम समज असतो.मग गुजरातमध्ये गेल्यावर तर बोलायलाच नको.मी एकदा बडोद्याच्या एम. एस. युनिव्हर्सिटीत एका शिक्षण शिबिरासाठी गेलो असताना तेथे प्रशिक्षण देणारे प्राध्यापकही समोरील सगळे प्रशिक्षणार्थी गुजरातीच आहेत अशा समजुतीत बेदिक्कतपणे आपल्या भाषणात गुजरातीचा सढळ वापर करत त्यावेळी मला उठून त्यांना तेथील निम्मे लोक गुजरातच्या बाहेरून आलेले आहेत याची जाणीव करून द्यावी लागली.  याउलट महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत घराबाहेर पडले की हिंदी किंवा इंग्रजीच चालते असा मराठी माणसाचा दाट समज असतो मग अमेरिकेत गेल्यावर तर प्रश्नच नाही.त्यामुळे यांनी प्रथम इंग्रजीत सुरवात केल्यावर ते गुजराती नाहीत याची खात्री झाली आणि त्यांच्या उच्चारावरून बहुधा द.भारतीय नसावेत असे वाटले आणि खरेच ते आमचे  आडनावबंधूच निघाले आणि मग एकदम मराठीत बोलायला सुरवात झाली.त्यांना मग इतकी आपुलकी वाटली की ते आपले घरच दाखवायला मला बरोबर घेऊन गेले.विंटर ग्रीन रस्त्याच्या शेवटी असणाऱ्या बॉक्सवुड कोर्ट या भागात ते रहात होते आणि त्यांच्या मुलाकडे ते आले होते.त्यानंतर त्यांची व माझी इतकी दोस्ती झाली की ते दररोज मला फिरायला बोलवायला यायचे किंवा मी त्यांच्याकडे जाऊन मग आम्ही फिरायला जात असू. पुढे भारतात गेल्यावरही ही दोस्ती टिकून आहे.