
चित्रपट हे एकंदरीतच आयुष्याबरोबर एक सुरेल लेहरा धरून आहेत. 'क्या करूं गुरुदेव, मेरे तो डायलॉगही खत्म हो गयें, वरना मैं आपकोभी मात दे जाता' यामागची वेदना, 'दोनों बातें हैं मां, जादा पैसा आयें, तो नींद नही आती, नींद आये तो जादा पैसा नही आता' यामागचा विचार आणि 'तुम उस लडकेसे शादी नही करोगी जिससे तुम प्रेम करती हो, तुम उस लडकेसे शादी करोगी जिससे मै प्रेम करता हूं, यानेके रामप्रसादसे' यामागचा विनोद... हे सगळे आहे कित्येक वर्षांपूर्वीचे, पण आजही तेवढाच आनंद देऊन जाते. गाणी तर काय, नेहमीच आपले बोट धरून चालत आलेली आहेत. आणि हे सगळे फक्त कालच्या जमान्यात होते असे नाही. आजही एखादा 'तारे जमीं पर' एखादा 'रंग दे बसंती', एखादा 'मेट्रो', एखादा 'हनीमून ट्रॅव्हल्स' अगदी 'जब वी मेट' या चमत्कारिक धेडगुजरी नावाचा चित्रपट... असा अपूर्व आनंद देऊन जातात. करमणूक, विरंगुळा आणि चार घटका सुखाच्या जाव्यात हा हेतू हे चित्रपटांच्या मागचे असावेत हे ठीक, पण एखाद्या चित्रपटाने काही घसघशीत प्रश्न समोर टाकले, एखाद्या प्रसंगाने अस्वस्थ, अंतर्मुख केले तर ते त्या चित्रपटाचे यशच म्हणावे लागेल. किंबहुना चित्रपट हे माध्यम प्रगल्भ झाल्याचे ते लक्षणच ठरावे. एका विशिष्ट वयानंतर किंवा वाचनानंतर फिक्शन वाचायचा जसा कंटाळा येतो, तसेच निव्वळ मनोरंजन करणारे उथळ चित्रपटही नकोसे वाटतात. करमणूक हे उद्दिष्ट असावे, पण फक्त तेवढेच असू नये इतकेच.
"तुम्हारी जनरेशन के पास सवाल बहोत है... " कुलभूषण खरबंदाच्या तोंडून गुलजारने हा प्रश्न विचारला त्यालाही बरीच वर्षे झाली. आजच्या पिढीसमोर खूप आहेत, पण किमान प्रश्न तरी आहेत असे समाधान त्या 'हुतूतू' या चित्रपटात मिळाले होते. पण तीही आता जुनी गोष्ट झाली. प्रश्न? आणि तेही चित्रपटात? छट! काहीतरीच काय! चित्रपट असे प्रश्न वगैरे टाकण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी काढायचा नसतो. असलाच तर प्रश्न असा असावा की मी माझी आत्ताची गर्लफ्रेंड (किंवा बॉयफ्रेंड) सोडून देऊन नवी / नवा कसा मिळवू? आणि हा काही कमी महत्त्वाचा प्रश्न नाही बरे!
'जाने तू ना जाने ना' हा आजच्या पिढीमध्ये कमालीचा लोकप्रिय झालेला चित्रपट असेच काही मौलिक प्रश्न समोर टाकतो. 'दिल चाहता है' जिथे संपतो तिथे 'जाने तू' सुरू होतो असे कुणीसे म्हणाले. 'दिचाहै' चांगलाच होता. प्रेम म्हणजे काय याच्या शोधातले तीन तरुण आणि प्रत्येकाला आपापल्या परीने त्याची झालेली उकल ही थीम दिचाहै मध्ये नीट व्यवस्थितपणे हाताळली होती. म्हणून उत्सुकतेने आणि तसा बऱ्याच उशीरा 'जातूयाजाना' ला गेलो.