मग मी रूमवर येवून आवरून प्रशिक्षणासाठी गेले. नाओला मी आल्यामुळे आनंद झाला. मी नसताना ३ दिवस तिला कंटाळा आला होता. त्या दिवशी काही माझे लक्षच लागले नाही वर्गात. पण पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून रुटीन सुरू झाले.
प्रशिक्षणामध्ये आम्हाला पहिला १ महिना ओरिएंटेशन होते. संगणकाची माहिती आणि 'सी' भाषा इत्यादीची ओळख. मी अभियांत्रिकीला असताना हे शिकले असल्याने मला आधीच ते येत होते. नाओ हे पहिल्यांदाच शिकत होती. त्यामुळे ती मला खूप वेळा शंका विचारत असे. मी त्याचे माझ्या परीने निरसन करत असे.