दिव्या डायनिंग टेबलवर वह्या-पुस्तकांचा ढिगारा पुढ्यात घेऊन बसली होती. प्रत्येक पुस्तकाला सुबकपणे कव्हर लावलं जात होतं. तिने कात्रीने कापलेले त्रिकोणी चिठोरे एका तालात तरंगत खाली पडत होते. अंशू ता चिट्योऱ्यांशी खेळत होता. कव्हर लावणं झाल्यावर दिव्या आणि अंशू वह्यापुस्तकांवर लेबल चिकटविणार होते. लेबल विलग करताना कागद जरासा तिरका फाटला गेला असता तरी दिव्याला तेवढ्यापुरती रुखरुख वाटली असती. सगळी लेबलं चिकटवून झाल्यावर दिव्याने आपल्या वेलांटीदार अक्षरांत अंशुचं नाव-वर्ग-विषय वगैरे तपशील लिहून काढले असते आणि मग त्या नीटस, सुरेख गठ्ठ्याकडे जरा कौतुकाने, जराशा अभिमानाने बघितले असते.