धुक्यातून उलगडणारे जी ए -२
लेखनाची सुरुवात - सोनपावले
जी.एं. च्या मृत्यूनंतर त्यांच्या अप्रकाशित कथा, अनुवाद आणि इतर साहित्यप्रकारांचे एक बाड जी.एं च्या भगिनी प्रभावती सोलापूरकर यांना मिळाले. त्यातल्या काही साहित्याचे परचुरे प्रकाशन मंदिराने 'सोनपावले' नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. हे तसे जुनेच पुस्तक ( ११ डिसेंबर १९९१). सु.रा. चुनेकर यांनी संपादन केलेल्या या पुस्तकात जी.एं. च्या लिखाणाच्या सुरुवातीच्या काळातल्या प्रयोगांचे चित्र दिसते. अगदी सुरुवातीला शालेय जीवनातले जी.एं. चे लेखन 'ओळखा पाहू', कोडी या स्वरुपाचे आहे. त्यानंतरच्या जी.एं. च्या स्वतंत्र कथालेखनाच्या पहिल्यापहिल्या प्रयत्नांवर त्या काळी प्रसिद्ध असलेल्या लेखकांची, विशेषतः खांडेकरांची मोठी छाप आहे. जी.ए. आणि खांडेकर हे गणित आज ऐकायलाही विचित्र वाटत असले तरी खांडेकरांमुळे जी.ए. त्यांच्या तरुणपणी प्रभावित झाले होते हे निश्चित. 'बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे', 'पंतांना वाटले, या दुसऱ्या बाळपणात सुगंध, पाकळ्या, रंग वगैरे सर्व जातात, फक्त काटे मात्र वाटणीला उरतात!, अश्रू जरी डोळ्यांवाटे बाहेर पडत असले तरी त्यांचे उगमस्थान हृदयच आहे' असली आज हास्यास्पद वाटणारी वाक्ये जी.एं. या त्या वेळच्या कथांमध्ये सर्रास दिसून येतात, हे आज काहीसे गमतीशीर वाटते. नंतरच्या काळात बाकी जी.एं. ना खांडेकरांच्या आदर्शवादी विचारांतला पोकळपणा कळालेला दिसतो. (स्वतः खांडेकरांना तो कळाला की नाही कुणास ठाऊक!) पण एकाच विचाराची पताका खांद्यावर घेऊन आयुष्यभर वाटचाल केलेला लेखक म्हणून जी.एं. ना खांडेकरांविषयी आदर वाटत आला होता. जी.एं. ची खांडेकरांशी प्रत्यक्ष भेट कधी झाली होती असे दिसत नाही, पण खांडेकरांबरोबर त्यांचा पत्रव्यवहार होता. खांडेकर दत्तक जाण्यापूर्वी त्यांचे नाव गणेश आत्माराम खांडेकर की असे काहीसे होते आणि म्हणून त्यांच्या व जी.एं. च्या नावाची आद्याक्षरे एकच -GAK- हे कळाल्यावर आपल्याला एक शाळकरी आनंद झाला होता, असे पुढे कधीतरी जी.एं. नी एका पत्रात लिहिले आहे.