अमेरिकायण! (भाग १७ : वेडे खेळ)

उन्हाळा सुरू झाल्यापासून दर सप्ताहान्ती कुठे ना कुठे जाणं चालू होतं. यात पुन्हा एकदा अटलांटिक सिटीची वारी झाली, महाराष्ट्र मंडळातला गणेशोत्सव झाला. पण त्याआधी आम्ही एका सप्ताहान्ती "सिक्स फ्लॅग्स" नावाच्या मनोरंजन उद्यानात (ऍम्युझमेंट पार्क) गेलो होतो. आपल्याकडेही त्या धर्तीवर 'एस्सेलवर्ल्ड', 'अप्पूघर' आदी मनोरंजन उद्याने सुरू आहेतच. पण आपल्याकडे असणारे खेळ आणि इथल्या राक्षसी राईडस याची तुलना न केलेलीच बरी. आपले अतिप्रसिद्ध रोलरकोस्टर्स इथल्या राईडस पुढे घसरगुंड्या वाटाव्यात अश्या इथल्या राईडस.

परंतु मला मात्र या राक्षसी खेळांची आवड आहे. काही जण असं म्हणतात की मानसिक स्वास्थ्य ठीक नसणाऱ्याला असे अघोरी खेळ आवडू शकतात. माझ्या मानसिक स्वास्थ्याबद्दल माहीत नाही पण मला हे खेळ फार आवडतात हे मात्र नक्की. तो वेग, ती भिती, तो थरार अन्यत्र नाही मिळत. अर्थात या राईडवर बसणं म्हणजे शौर्याचं लक्षण असतं असं मी काही समजत नाही. इथे प्रश्न शूरपणाचा नक्कीच नाही आहे; कारण रस्त्यावरच्या गर्रर्र करणाऱ्या कुत्र्याला देखील मी टरकून असतो. पण या खेळांमध्ये मात्र वेगळंच स्फुरण चढतं, कैफ चढतो

असो तर सार्वजनिक बस वाहतूक सेवेचा फायदा घेऊन आम्ही अगदी वेळेत सिक्स फ्लॅग्सला पोचलो. तिकिटे आधीच जालावरून काढून घेतली होती. राईडसची कल्पना असल्याने अगदी हलकी न्याहारी केली होती. थोडक्यात स्वतःला पैसे देऊन घाबरवायला, हडबडवायला आम्ही सज्ज होतो. आणि पहिल्या राईडला आम्ही सामोरे गेलो. समोर एक झोपाळा होता. ३०-४० लोकांना बसायला जागा होती. बसल्यावर एका मजबूत दांड्यामागे तुम्ही अडकता. (म्हणजे इतके की हालताही येत नाही.) आणि तो झोपाळा सुरू होतो. आधी हेलकावे घेऊ लागतो.. हळूहळू हेलकावे वाढत जातात. एकवेळ अशी येते की झोपाळा पूर्ण २७० गोल फिरू लागतो. आणि अजून काही वेळातच पूर्ण ३६०. लोक अविश्रांत किंचाळू लागले असतात. पण ही 'थ्रिल' इथेच संपत नाही पुढे आपण जेव्हा खालीडोकं वर पाय स्थितीत असतो तेव्हा हे यंत्र अचानक थांबतं. आपण आता पडणार अशी भीती वाटून आपण जोरजोरात कधी किंचाळू लागतो आपल्यालाही कळत नाही. हे शीर्षासन काही क्षणच टिकतं पण तेवढ्या वेळात "बाळू नीट कडी धर झोका चाले खाली वर!" असं घोकत वाढलेल्या आपल्याला ब्रह्मांड दिसतं हा भाग अलाहिदा. "वॉर्म अप" म्हणून ही राईड झकास होती

अहो हो वॉर्म अपच. कारण पुढे आम्ही ज्या यंत्रांमध्ये बसलो त्याच्या पुढे हा म्हणजे वॉर्म-अपचाच प्रकार होता. यानंतर आम्ही "सुपरमॅन" नावाच्या यंत्रात बसलो. हे तसं रोलर कोस्टरच पण आपल्याला गाडीत सरळ बसवून न फिरवता, हँगरला कपडे लटकवावे तसे आडवे लटकवतात (चित्र पहा!)आणि मग त्या भन्नाट राईडवरून आपले भ्रमण सुरू होते. सुपरमॅन स्थितीमध्ये आधी आपण सावकाश वर वर जातो आणि मग एकदा का ते यंत्र वेग पकडते की आपण क्षणात वर तर क्षणात खाली अशी वेळ येते. इथे चपला-बूट आणि चघळगोळी काढूनच चढावे असा सल्ला दिला जातो. माझ्या मित्राच्या तोंडात यात बसण्याआधी चघळगोळी होती उलटसुलट फिरून जेव्हा पुन्हा पूर्वस्थानी आलो तेव्हा ती तोंडात नव्हती  

"स्क्रीम मशीन" नावाचा पुढचा प्रकार तर अतिभयकारी.  याचं वैशिष्ट्य म्हणजे यात एकापाठोपाठ एक अशी पूर्ण गोलात (३६०) फिरवणारी एक-दोन नव्हे तर तीन वर्तुळे आहेत. यातून घुसळून बाहेर आल्यावर कित्येक क्षण मी सरळ आहे की उलट हेच कळत नव्हते. या राईड नंतर आमच्यातल्या काहींची कोस्टर राईड जिरली आणि यापुढे कोस्टरगिरी न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला  

"एल टोरो" हे नाव वाचलं आणि त्यामागे असणारा अतिभव्य लाकडी सांगाडा पाहिला. हा अतिवेग-गतिकेचा (हे नामकरण रोलरकोस्टरसाठी अस्मादिकांचंच आहे मान्यताप्राप्त  प्रतिशब्द नव्हे) सगळ्यात मूळ प्रकार. ही मला वैयक्तिकरीत्या सगळ्यात आवडलेली राईड. इथे इतर राईडस सारखं सुरक्षिततेचं वातावरण अजिबात नसतं. तुमच्या कमरेला नाममात्र पट्टा असतो. तो ही नायलॉनचा! त्यामुळे तुम्ही बांधलेले नसताच. त्यात सबंध ट्रॅक हा लाकडी आहे. तुम्हाला यात अतिशय उंचावर घेऊन जाऊन जवळ-जवळ सरळ खाली सोडतात. पण असलेल्या स्वातंत्र्यामुळे जी मजा यात येते ती ही बाकी कोणत्याही "बंधनयुक्त" राईडवर येत नाही.

    यानंतरही अनेक राईडवर बसलो. खरंतर मी तर त्यावेळेत जितक्या राईडस पूर्ण करता येतील त्या सगळ्यामध्ये बसलो. त्यातही "मेड्युसा" नावाची राईड म्हणजे या 'विचित्रते'वरचा कळस. जगातील सर्वात मोठ्या "बेसलेस" म्हणजे पायाला आधार नसलेल्या(!) राईडपैकी एक. त्यात ती राईड पाहिली नि मनातल्या मनात एक आवंढा गिळला. एखाद्या लहान मुलाला कागदावर मुक्तपणे रेघोट्या ओढायला द्याव्या आणि त्या आकारानूसार एक सांगाडा बनवून तुम्हाला त्यावरून वेड्यासारखं फिरवावं असा काहीसा प्रकार! (वरील दोन्ही चित्रे मेड्युसाची)

या अश्या ठिकाणी नेहमीची माणसे नेहमीची राहतच नाहीत. एरवी १० माणसं लोळवू शकणारे वीर इथे कोकरू झालेले दिसतात तर म्हातारे म्हणवणारे तरुणांना खिजवत गुरुत्वाकर्षणाच्या तीन पट वेगात वरखाली लीलया करतात. मला माहीत नाही अश्या ठिकाणी मला नक्की काय आवडतं पण कोणत्याही बंधनाशिवाय असं मिळणारं 'स्व'त्त्व कदाचित मला त्याच्याकडे आकर्षित करत असेल. तो कैफ... ती धुंदी... ती मजा... तो आक्रोश... ती भीती... ते वजनरहित भास... या सगळ्यासाठी हे वेडे खेळ मला आवडले पण अजूनही मधूनच खेळावेसे वाटतात!

-ऋषिकेश
टिपः आता शु.चि. चालू झाला आहे त्यामुळे चुका शुद्धीचिकित्सकाच्या समजाव्यात