निःश्‍वास

निःश्‍वास

दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला. हवेतच हात झटकून तो ताजातवाना झाला, आणि त्याला भुकेची जाणीव झाली.
आईबाप आणि हरवलेल्या बहिणीची आठवण कायमची पुसून शंकर फलाटाकडे धावला आणि त्याने गर्दीसमोर हात पसरला. पुरसे पैसे जमताच स्टॉलवरून घेतलेल्या वडापावच्या चवीत तो हरवून गेला...
...त्या दिवसापासून शंकरला मुंबईच्या रेल्वे फलाटांचं वेड लागलं. फलाटावर उतरताच त्याच्याच वयाच्या एकदोन जणांशी शंकरनं दोस्तीचा हात पुढे केला आणि जगण्याच्या युक्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली. गर्दीसमोर हात पसरून झाले, की सात वर्षांचा शंकर रुळांवरच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायच्या आणि त्या विकून येणाऱ्या पैशातून मित्रांबरोबर बिडी-सिगारेटच्या धुरात भूतकाळ विसरायचा. कधी भीक मिळाली नाही, तर पॉलिशच्या रिकाम्या डब्यांमधले "सोल्यूशन' ठसका लागेपर्यंत हुंगायचा आणि त्या नशेतच दिवसभर तहानभूक विसरायचा... कधी "व्हाईटनर' हुंगून त्यात बुडून जायचा... कधी हातात चार पैसे जास्त खुळखुळले, तर "गुटख्या'ची "पार्टी' करायचा, आणि रात्री पुलाखालच्या अड्ड्यावरची "हातभट्टी' झोकायचा...
"छत्रपती शिवाजी' टर्मिनस, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, दादर, वांद्रयाच्या फलाटावर देशाच्या चारी दिशांनी येणाऱ्या गाड्यांच्या गर्दीतून शंकरसारखी शेकडो मुलं रोज दाखल होतात, आणि मिनिटामिनिटाला उसळणारी बिनचेहऱ्याची गर्दी त्यांना सहज सामावून घेते... एवढ्या "मॅक्‍झिमम सिटी'ला रोज भर पडणाऱ्या अशा शे-दोनशे पोराटोरांच्या गर्दीनं काहीच फरक पडत नसतो. मुंबईच्या रस्त्यांवर, रेल्वे स्टेशनांवर, सिग्नलजवळ आणि फूटपाथवर असे हजारो शंकर वर्षानुवर्षे आपले अस्तित्वहीन आयुष्य ढकलताहेत. मुंबईच्या लोकसंख्येच्या आकडेवारीत त्यांना स्थान नाही. त्यांच्याजवळ "नागरिकत्वा'चा पुरावा नाही, आणि "माणूस' असल्याचाही दाखला नाही. "बाळाचा पहिला हक्क' असलेला "जन्माचा दाखला' नाही, आणि कोणत्याही मानवी संस्कृतीशी त्यांचं नातं नाही.
केवळ दोन पाय, दोन हात, कुठलीतरी भाषा, आणि मेलेलं, पण मानवी मन एवढीच "माणूसपणा'ची लक्षणं असलेली हजारो मुले "उद्याच्या अंधारा'त स्वतःला ढकलून देऊन वावरताहेत. मनच नसल्याने माणुसकी नाही आणि माणूसपणाशी संबंधच नसल्याने माणसाच्या सुखदुःखांशीही देणघेणं नाही, अशा या मुलांच्या व्यवहारांवर माणसांच्या जगानं गुन्हेगारीचा शिक्का मारला असला, तरी "गुन्हेगारी' या शब्दाचा अर्थ त्यांना मात्र माहीत नाही. कारण ते तर त्यांचं 'जगणं' आहे. हरपलेल्या भूतकाळासोबत अनेकांनी आपली नावंही पुसून टाकली आहेत, आणि "काळ्या धंद्यांचं भांडवल' म्हणून अनेकांनी नकळत आपल्या आयुष्य त्या दुनियेला निमूटपणे अर्पण केलं आहे. हातपाय तुटलेली, नजरा हरवलेली अपंग मुले म्हणजे कुणाच्या तरी "धंद्या'चं भांडवल असतं. जमलेला पैसा संध्याकाळी कुठल्यातरी भाईच्या हातात ठेवला तरच आपल्या पोटात काहीतरी पडेल या आशेनं ही मुलं गर्दीत "वळवळत' असतात. एखादा कुणीतरी "पाकीटमारी'चं "कसब' मिळवतो, आणि कधी पकडला गेला, तर तोंड बंद ठेवून अर्धमेला होईपर्यंत मारही खातो. कुणी फेरीवाल्यांच्या मालाला गिऱ्हाईक मिळवण्यासाठी जिवाच्या आकांतानं ओरडायचं काम पत्करतो, तर कुणी पाण्याचा धंदा करणाऱ्या टोळीत सामील होऊन रुळावरच्या बाटल्या स्टेशनवरच्या नळाखाली भरून गाडी सुटतासुटता गिऱ्हाईकाच्या गळ्यात मारून "गंडवायचा' धंदा स्वीकारतो. व्हाईटनर, सोल्यूशन आणि "पावडर'च्या नशेत बुडालेला कुणी नकळत स्वतःची किडनीदेखील गमावून बसतो आणि खंगत खंगत मरणाला कवटाळतो...
एखाद्या "नशीबवाना'स मात्र, अनपेक्षितपणे नव्या आयुष्याची, "माणसांच्या जगा'ची वाट सापडते...
सावत्र आईच्या माराच्या भीतीने आणि आपल्या हातून लहान बहीण हरवल्याच्या भयाने सातव्या वर्षीच रस्त्यावरच्या जगात दाखल झालेल्या शंकरला सुदैवाने पुन्हा "माणसांच्या जगा'ची वाट सापडली आहे. वाट चुकलेल्या मुलांना जगण्याचा अर्थ समजावून देणाऱ्या "समतोल फाऊंडेशन' नावाच्या एका संस्थेला आता सामाजिक जाणीवांची साथ मिळू लागली आहे. "भविष्य' आणि "आयुष्य' अशा शब्दांची ओळख व्हायच्या आधीच, कदाचित अपघातानेच रस्त्यांवर फेकल्या गेलेल्या मुलांच्या जीवनातील अंधार पुसण्यासाठी "समतोल'च्या मदतीला समाजातील "माणुसकी' अनेक हातांनी सरसावली आहे.
"समतोल फाऊंडेशन'च्या, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र रेल्वे स्टेशनांवर ठिय्या मारून बाहेरगावांतून पळून मुंबईत आलेल्या मुलांची विस्कटलेली आयुष्ये सावरण्याचा संकल्प सोडला आणि या मुलांसाठी आशेचा किरण उगवला. अशा शेकडो मुलांचे "समतोल'शी नाते जुळले आहे. "समतोल'च्या "मनपरिवर्तन शिबिरा'त अनेक मुलं नव्या आयुष्याला सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. नशेबाजी, चोरी, भीक मागणे हेच ज्यांचे जीवन, अशा अनेकांना आता त्यापासून मुक्ती मिळाली आहे, आणि त्यांनी पुसलेला भूतकाळही पुन्हा जागा झाला आहे. माणसांच्या जगाबाहेर, रस्त्यावर जगणाऱ्या या मुलांची मेलेली मने पुन्हा "जिवंत' होऊ लागली आहेत...
दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरचं "घर' सातव्या वर्षीच सोडलेल्या शंकरला आज चौदाव्या वर्षी पुन्हा घराची ओढ लागली आहे, पण आता त्याच्या आईबापांचाच ठावाठिकाणा लागत नाही... "समतोल'ने अलीकडेच अशा काही मुलांच्या आईबापांशी संपर्क साधला आणि मूल हरवल्यामुळे विस्कटलेल्या अनेक संसारांमध्ये नवा उत्साह संचारला. "स्पर्श' करणाऱ्या एका क्षणाने काही जणांची ताटातूट संपविली आणि "समतोल'च्या आधाराने पुन्हा उभे राहिलेल्या अनेकांना पुन्हा आपापल्या घराची ओढ लागली. "शिबिरात मला रोज आंघोळ करायला मिळायची'... हे कुणा "शाहरूख'चे, इवल्या आयुष्यात कधीच न मिळालेल्या आनंदाच्या कल्पनांना शब्दरूप देणारे उद्‌गार "माणसांच्या जगा'ला अंतर्मुख करून सोडणारे आहेत...
समाजातील माणुसकीच्या आधारामुळे "समतोल'च्या कामाला आज दिशा मिळाली असली, तरी हे काम सोपे नाही. कायद्याच्या कचाट्याबरोबरच, या कामात "समतोल'ला सुरुवातीला काळ्या धंद्याच्या दुनियेच्या धाकालाही सामोरे जावे लागले. पण चांगल्या कामाची खात्री झाली, की आधाराचे हातही भक्कम होतात, याचा अनुभव या काळात "समतोल'ने घेतला आहे. आता रेल्वे स्टेशनवरच्या "कायद्याच्या रक्षकां'चाही पाठिंबा "समतोल'ला मिळाला आहे. त्यामुळे अशा मुलांना पुन्हा माणसांच्या जगात आणण्याचे काम सोपे झाले आहे. [float=size:18:place:top;color:453C3D;background:ECE7E1;breadth:200;place:top;]अनेक मुलांना न कळत्या वयातच स्वीकारलेले रस्त्यावरचे आयुष्यच आवडू लागते, आणि माणसांच्या जगात यायला ती राजी होत नाहीत.[/float] अशा मुलांमधले मन "जागे' करण्याचे काम ही संस्था करते. रस्त्यावरच्या मुलांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी अनुदाने मिळवून काम करणाऱ्या बिगरशासकीय संस्थांची- "एनजीओ'ची- मुंबईत कमतरता नाही. "समतोल'ला मात्र फक्त समाजातील संवेदनशीलतेचा आधार मिळाला आहे. "माणुसकीची शक्ती' समतोलच्या पाठीशी उभी आहे. या शक्तीच्या आधारावर आजवर अनेक चुकलेल्या, हरवलेल्या जिवांना आपल्या हरवलेल्या मायेची पाखर पुन्हा मिळाली. या पुनर्भेटीचा प्रत्येक क्षण हाच "समतोल'ला आधार देणाऱ्या शक्तीला नवे खतपाणी घालत असतो.वर्षानुवर्षे व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या माणसांच्या जगापासून दुरावलेल्या या मुलांच्या भविष्याच्या दिशा आता उजळल्या आहेत... अशा अनेक कोमेजत्या कळ्या आश्‍वस्त भविष्याच्या जाणीवांनी निःश्‍वास टाकू लागल्या आहेत...
("समतोल'चा संपर्क क्र.- ०२२- २५४५२६४४, ९१-९८९२९ ६११२४)

साहित्यसेवा???

     ही हॉ ही हॉ असा गाढवाच्या आवाजात ओरडणारा मोबाईलचा गजर वाजायला लागतो तेव्हा सकाळचे साडेआठ वाजलेले असतात.खरं तर सकाळी साडेसहा वाजता उठवण्याची मोबाईलला आज्ञा असते.पण डुलकी नामक कळ जवळजवळ सात ते आठ वेळा दाबली गेल्याने मोबाईलचाही नाईलाज होतो.आता मात्र मनोगती उठतो.सूर्याचे प्रखर किरण डोळ्यावर आल्याने चैतन्याच्या प्रकाशवाटेवर चालल्याचा त्याला भास होतो.त्यामुळेच उठल्यावर आजूबाजूच्या परिस्थितीचा एकंदर अंदाज यायला त्याला थोडा वेळ लागतो.हे रोजचंच आहे.पण आज! आजचा दिवस वेगळा आहे.आज त्याचं पहिलं अपत्य मनोगतावर झळकणार आहे,आणि प्रतिसादांच्या संख्येवरून तो आपल्या साहित्यसेवेचं पाणी जोखणार आहे.म्हणूनच एका विलक्षण उत्साहाने मनोगती कामाला लागतो.
    रोजची क्षुद्र नित्यकर्म करण्यात आणखी एखादा तास उडून जातो.शेवटी हुश्श करत तो संगणकाचा पडदा उघडतो तेव्हा घड्याळात,दुकानात मांडलेल्या घड्याळांप्रमाणे दहा वाजून दहा मिनिटं झालेली असतात.पण संगणक सुरु होताच त्याला कळतं की नेहमीप्रमाणे (त्याच्याच गलथानपणामुळे)मराठी शब्द संपले आहेत.त्याची खूपच चिडचिड होते.झालं,म्हणजे आता झक मारत शब्दभांडारात जाउन आधी शब्द विकत आणावे लागतील.एवढ्या सकाळसकाळ त्या दुकानाच्या मालकाला तोंड द्यावं लागणार या कल्पनेनं त्याच्या पोटात गोळा येतो.कारण त्याने(म्हणजे दुकानदाराने)दुकानदार बनण्याच्या सगळ्या परीक्षा दिलेल्या असतात,त्यामुळेच ग्राहकांशी कसं वागावं हे त्याला चांगलंच कळतं.
    चडफडत मनोगती दोन घास पोटात ढकलतो आणि पायात चपला सरकवून शब्द आणण्यासाठी बाहेर पडतो.(जाण्यापूर्वी तो दार लावून घ्यायला विसरत नाही.) बाहेर आल्यावर ऊन अर्थातच मी म्हणत असतं.उन मी म्हणतं तर थंडी काय तू म्हणते का असा त्याला नेहमीच प्रश्न पडतो. स्वत:ला शहाणं समजणा-या त्या दुकानदारालाच आता या वाक्प्रचाराचा अर्थ विचारायचा अशी मनोगती मनाशी नोंद करतो आणि चालू लागतो.
    ब-याच पायपिटीनंतर 'अक्षरसखा शब्दभांडार खाजगी मर्यादित' ही लांबलचक पाटी दिसल्यावर मनोगतीला हुरुप येतो."साल्याचं स्वत:चंच शब्दाचं दुकान आहे,त्याला काय होतंय लंबेचौडे शब्द वापरायला"असा विचार मनोगतीच्या मनात येतो आणि तो दुकानात पाऊल ठेवतो.उन्हातून सावलीत आल्यामुळं त्याला हायसं की काय म्हणतात ते वाटतं.दुकानदाराचा अर्थातच ग्राहकसेवेबद्दल दशदिशात लौकिक असल्यामुळे दोनचार टाळक्यांखेरीज दुकानात कोणीही नसतं.दुकानदाराकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून कोणते शब्द घ्यावेत याचा मनोगती विचार करू लागतो.प्रतिसाद देताना उपयोगी पडतील म्हणून तो तीनचार 'सहमत' आणि वीसपंचवीस 'असहमत' घेतो.चार जोडी पु.ले.शु.पुरतील असं त्याला वाटतं.उत्तम,छान,चालू द्यात,लगे रहो,आणखी येउ द्यात वगैरे शब्द त्याने आधीच किलोवर घेतलेले असल्याने ते परत घेण्याच्या फंदात तो पडत नाही.थोड्याच दिवसात लिहायच्या एका जडजंबाल लेखासाठी तो सर्वसमावेशक,उन्नती,सांगोपांग,महामेरु,फलनिष्पत्ती,कर्तव्यपरायण आदी दिग्मूढ करणारे वजनदार शब्द घेतो ज्यामुळे पिशवीचं वजन अर्थातच बरंच वाढतं.काउंटरपाशी आल्यावर 'पन्नास शब्दांवर दोन म्हणी मोफत' ही सुचना वाचून मनोगती आशेने आपले शब्द मोजतो.ते एकोणपन्नास झालेले असतात.शेवटी घ्यायचा म्हणून तो एक 'संत' विकत घेतो.(लागलाच तर!)
      काउंटरवर येउन तो पैसे चुकते करतो आणि मोफत म्हणी काय मिळतात हे एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने पाहू लागतो.मात्र 'आपला तो बाब्या आणि दुस-याचं ते कार्टं' आणि 'हपापाचा माल गपापा' या म्हणी पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते."तुमचा न खपणा-या शब्दांचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी तुम्ही या असल्या म्हणी आमच्या गळ्यात मारता काय?" तो आवेशाने ओरडतो."घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर राहू द्या" दुकानदार मनोगतीला सुनावतो. क्षणभरासाठी पिशवीतून महामेरु काढून दुकानदाराच्या डोक्यात मारावा असं मनोगतीला वाटतं पण तो स्वत:ला सावरतो आणि पुटपुटत दुकानाबाहेर पडतो.चटचट पावलं उचलत तो घराजवळ पोहोचतो तेव्हाही उन मीच म्हणत असतं आणि त्या दुकानदाराची जिरवायला तो अर्थ विचारायचं तो नेहमीप्रमाणे विसरलेला असतो.
     घरात पाऊल ठेवताच तो पंख्याचं बटण चालू करतो.थंडगार पाणी पिताच त्याच्या चित्तवृत्ती का काय म्हणतात त्या उल्हसित होतात.पण अजून खरी कामगिरीतर पुढेच असते.शब्दांची पिशवी तो जवळ ओढतो आणि संगणक चालू करतो.पण लवकरच त्याची निराशा होते. 'कॅनॉट फाईंड सर्व्हर' नामक शब्द जगातलं अंतिम सत्य असल्याप्रमाणे पडद्यावर झळकू लागतात.तोपर्यंत काहीतरी करायचं म्हणून तो की-बोर्डवरच्या काही की काढून आणलेले शब्द संगणकात भरायचं काम सुरु करतो.तेवढ्यात आंतरजालही सुरु होतं.नेहमीप्रमाणे ज्यांना मराठीत लिहण्या-बोलण्याची आवड आहे त्यांच्या मनोगतावर येउन तो चिकटतो.प्रतिसादाबाबत मनोगती भलताच चिकित्सकपणा दाखवतो.उगाच कुणालाही तो प्रतिसाद देत बसत नाही.लेखनाचं योग्य मूल्यमापन आणि परीक्षण करायची आपल्यावरची जबाबदारी तो ईमानेतबारे पार पाडतो.कंपूबाजीकडे तो सोयीस्करपणे  दुर्लक्ष करतो.मंद गतीच्या आंतरजालामुळे प्रत्येक लेख वाचायला त्याला बराच वेळ लागतो.नेमकं शेवटच्या प्रतिसादापाशी आल्यावर कृपया पान ताजंतवानं करायची सूचना झळकते. रिफ्रेश करत बसलं तर सगळं काही परत यायला पंधरा मिनिटं लागतात हे जाणून मनोगती पडद्यावर थोडं पाणी शिंपडतो आणि पडदा स्वच्छपणे पुसुन घेतो.काम होऊन जातं आणि तो स्वत:च्याच युक्तीवर जाम खूष होतो.पण परत त्याची नजर घड्याळाकडे जाते आणि सर्व्हर कोलमडायच्या आत लेख लिहण्याचा तो निर्णय घेतो.
            आयुष्यात पहिल्यांदाच त्याचं आंतरजाल साथ देतं आणि आयुष्यात पहिल्यांदाच लेख यशस्वीपणे पाठवण्यात तो यशस्वी होतो.एव्हाना त्याला खूपच तरतरीत वाटू लागलेलं असतं आणि तो समाधानाने संगणक बंद करतो.पण हाय रे दुर्दैवा!नेहमीप्रमाणे जाण्याची नोंद करायला तो नेहमीप्रमाणेच विसरलेला असतो.पुन्हा संगणक सुरु करण्यापेक्षा आपलं नाव चोवीस तास मनोगतावर झळकलेलं काय वाईट? यातच समाधान मानून पोटाच्या ज्वलंत प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी त्याची पावलं आपसूक किचनकडे वळतात.

माझ्या प्रेमकहाण्या भाग २

मी आता नवीन घरी आलो पण मला शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागलं आता मी बारावीत गेलो होतो एका लहानश्या गावांतून एका मोठ्या शहरात आलो इथे मला मायेची माणसं कमी आणि व्यवहारी माणसं जास्त भेटली इकडे मात्र मला उथळ प्रेमा पेक्षा संवेदनशील प्रेम काय असत ते समजलं आणि प्रेम ह्या विषयात माझा अनुभव मोठा झाला.

वारी -११

          सहा महिन्यासाठी भारताबाहेर राहण्यात माझ्या दृष्टीने महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या काळात इकडल्या कोठल्याही कार्यालयाचे तोंड पाहावे लागत नाही.इथल्या कार्यालयात मग ते कोणतेही असो ,जायचे म्हणजे माझ्या अंगावर अगदी काटा उभा राहतो. अगदी आपल्या आपुलकीच्या माणसांची अशी जाहिरात केलेल्या बँकेतसुद्धा जायचे माझ्या जिवावर येते.आता ए.टी.एम्. वर पैसे काढण्याची सोय झाल्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जायचे काम कमीच पडते म्हणा पण त्यामुळे तर कधीतरीच बँकेत जाताना छातीत  आणखीच धडधडू लागते.ए. टी. एम् . मुळे प्रत्यक्ष बँकेत जावे लागले नाही तरी तेथूनही दूरनियंत्रणाने ग्राहकास छळता येतच नाही असे नाही. एकदा माझ्या मित्राने एका नामवंत बँकेच्या पुणे विद्यापीठ द्वारावरील ए. टी. एम्.मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण बहुधा यंत्रातील कॅश संपल्यामुळे किंवा आणखी कोणत्यातरी कारणामुळे पैसे काही मिळाले नाहीत मात्र जी स्लिप यंत्रातून बाहेर पडली त्यावरून पैसे खात्यातून मात्र वजा झाले होते.त्या बिचाऱ्याचे धाबे दणाणले.त्याने लगेच तेथूनच बँकेला फोन केला पण त्यांनी उलट निर्ढावल्यासारखे त्यालाच विचारले,"तुम्हाला पैसे मिळाले नाहीत कशावरून?"ते प्रकरण नंतर बरेच दिवस चालू होते.
       मला मात्र एकदा कर्मधर्मसंयोगाने बँकेला छळण्याचा योग लाभला.त्यावेळी मी औरंगाबादला होतो आणि त्याच महान बँकेत माझे खाते होते.आणखी सुदैवाने माझे तेथील एका खिडकीधारकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे मला पैसे काढायला काही त्रास व्हायचा नाही.त्यावेळी पैसे चेकने काढण्याऐवजी बँकेतील स्लिप भरूनच काढले जायचे.(आजही त्या बँकेचा आग्रह असतो की चेकचा कागद महाग असल्यामुळे पैसे स्लिपनेच काढा किती ही काटकसर  !)त्यामुळे पासबुकच्या नोंदीवरूनच आपली शिल्लक(असलीतर) काय आहे हे कळायचे.माझे पासबुक संपले होते आणि मी मागणी करूनही मला नवे पासबुक मिळाले नव्हते तसे मी शाखाप्रमुखांच्याही निदर्शनास आणले होते.त्यामुळे माझ्या खात्यात शिल्लक आहे का नाही आणि असल्यास किती आहे याची कल्पना मला नव्हती. खिडकीवरील मित्राने शिल्लक असेल या कल्पनेने मला हवी ती रक्कम दिली आणि मी खिडकी सोडली.त्यानंतर माझी बदली औरंगाबादहून सोलापूरला झाली आणि मला त्वरित सोलापूरला जावे लागले.सोलापूरला मी थोडा स्थिरस्थावर होईतोवर एक दिवस अचानक आमच्या घरी त्या बँकेचे मॅनेजरमहोदय हजर झाले.मला आश्चर्यच वाटले कारण त्यांचा आणि माझा परिचय असला तरी लगेच सोलापूरला माझ्या घरी येऊन माझी गाठ घ्यावी इतका दृढ नव्हता.त्यांचे बँकेचे काम तेथे निघाल्यामुळे आलो अशी सुरवात करून अंदरकी बात नंतर उघड करत ते म्हणाले ," अहो,तुमच्या खात्यात रक्कम नसताना तुम्ही पैसे काढलेत आणि इकडे आलात आता आमची पंचाईत झाली आहे." यावर मी बँकेकडून नवीन पासबुक न मिळाल्यामुळे असे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणल्यावर आता झाले ते झाले पण आता लवकर पैसे भरून टाका अशी विनंती त्यांनी केली.मी बँकेला पत्र लिहून माझी चूक नसताना असे झाल्यामुळे मला शक्य होईल त्यावेळी आणि त्या पद्धतीने मी पैसे भरेन असे कळवले आणि तसेच केले.
                भारतात कोणत्याही कामासाठी शासकीय वा निमशासकीय कचेरीत जायचे म्हणजे माझे मानसिक संतुलन तेथे जाण्यापूर्वीच आपल्याला कोणते अनुभव येणार या कल्पनेने बिघडायला सुरवात होते कदाचित हा माझाही दोष असू शकेल. कोणत्याही ऑफिसच्या खिडकीमागील व्यक्ती आपल्याकडे शत्रुवत् पाहत आहे असे उगीचच वाटते. तरुण वयात अंगात रग असल्याने अशा व्यक्तीशी आवश्यक असल्यास भांडण्याची खुमखुमी होती पण आता तो उत्साह उरला नाही. ऑफिस ऑफिस ही पंकज कपूरची मालिका जरा अतिशयोक्तिपूर्ण असली तरी त्यातील निरनिराळ्या ऑफिसात येणारा अनुभव बऱ्याच अंशी आपल्याला येणाऱ्या अनुभवांशी मिळताजुळता असतो.कोणत्याही ऑफिसात न जावेसे वाटण्यामागे हेच कारण असते. त्यामुळे अमेरिकेत अशा कामाविषयीचे काही अनुभव मुलाकडून ऐकल्यावर येथील सामान्य नागरिकाचा हेवाच वाटू लागला.
    माझ्या मुलाला ग्रीनकार्ड मिळण्याच्या वेळी जन्मतारखेचा दाखला आवश्यक होता.आजपर्यंत त्याच्या एस्.एस्‌. सी. च्या प्रमाणपत्रावरील तारखेवर काम भागत होते पण आता मात्र येथील कार्यालयाला  त्याचा जन्म ज्या तहसील वा ग्रामपंचायत क्षेत्रात झाला त्यांचाच म्हणजे सुजितच्या बाबतीत औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्यविभागाचाच हवा होता.जन्ममृत्यूच्या दाखल्याविषयी आकाशवाणीवरील (त्यावेळी टी.व्ही. ऊर्फ दूरदर्शन नव्हते) निवेदक कानीकपाळी ओरडत असतानाही नेहमीच्या आळशी प्रवृत्तीनुसार लगेच आवश्यक नसल्यामुळे त्याच्या जन्माचे प्रमाणपत्र ताबडतोब घेऊन ठेवावे असे काही मला वाटले नाही. मुलांना शाळेत घालतानासुद्धा आम्हाला या दाखल्यांची जरुरी पडली नव्हती त्यामुळे सुजितचा जन्माचा दाखला आपण घेतलाच नाही याची आठवण जेव्हा त्याने आम्हाला फोन करून त्याची अडचण सांगितली तेव्हा झाली .त्याच्या एका मित्राचा जन्म सोलापूरला झाला होता त्यालाही अशीच  अडचण उपस्थित झाली होती.आपापल्या महापालिकांमध्ये आम्ही पालकांनी बऱ्याच चकरा मारण्यासाठी कंबर कसली. कारण इतक्या पूर्वीचे प्रमाणपत्र मिळवायचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख शोधण्यासारखे इतिहाससंशोधनाचे काम होते आणि ते महापालिका कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे होते. त्यामानाने मी सुदैवी ठरलो कारण सुजितचा जन्म शासकीय रुग्णालयात झाला होता आणि  सुजितच्या जन्माचे रेकॉर्ड रुग्णालयातून महापालिकेला गेल्याचा पुरावा उपलब्ध झाला त्याचा उपयोग होऊन शिवाय थोडासा हात मोकळा सोडल्यावर काम झाले.
      सुजितच्या मित्राच्या वडिलांना म्हणजे माझ्या सोलापूरच्या मित्राला महापालिकेने बऱ्याच चकरा मारायला लावून शेवटी काही ताकास तूर लागू दिली नाही.त्यांचा लगेचच अमेरिकेस जाण्याचा बेत होता त्यामुळे बरोबरच प्रमाणपत्र घेऊन जायचे त्याने ठरवले होते पण आता ते शक्य नव्हते म्हणून त्यांनी अमेरिकेत गेल्यावर तेथे तसे शपथपत्र (ऍफिडेविट)करायचे असे ठरवले. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर अगदी प्रथम ते काम करायचे त्यांनी ठरवले.त्याप्रमाणे त्यांच्या मुलाने नोटरीच्या कार्यालयात फोन करून अशा प्रकारचे ऍफिडेविट करावयाचे आहे त्यासाठी पूर्वसम्मती मागितल्यावर त्याला नोटरीने एका विशिष्ट दिवशी वडिलांना घेऊन येण्यास आणि काही कागदपत्र पुरावा म्हणून घेऊन येण्यास सांगितले. माझा मित्र त्या दिवशी सांगितलेल्या वेळी गेला. नोटरी त्याच्या टेबलावर सर्व कागदपत्र घेऊन वाटच पाहत होते.त्याची जी काही फी होती ती भरून पावती त्यांना दाखवल्यावर त्यांनी माझ्या मित्राच्या सह्या त्या ऑफिसने तयार केलेल्या कागदपत्रावर घेतल्या हे काम साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटात झाले आणि भारतात असलेल्या नोटरीच्या अनुभवानंतर देण्याघेण्याच्या वाटाघाटी काय करायच्या या चिंतेत असणाऱ्या मित्राला अधिकाऱ्यानेच "तुमचे काम झाले आहे आता तुम्ही जाऊ शकता" असे सांगितल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने नंतर मला हे सांगितल्यावर आपणही उगीचच महापालिकेच्या चकरा मारल्या असे वाटून गेले.
      वरील घटना केवळ अमेरिकेत सामान्य नागरिकांना लहानसहान कामासाठी कसा त्रास होत नाही याचे उदाहरण म्हणून सांगितली.मात्र अशा सोप्या पद्धतीने गोष्टी होत असल्याने जन्माचा दाखला किंवा खोटे पासपोर्टसुद्धा दहशतवादी किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार कसे मिळवतात याचे वर्णन ऑर्थर हेली यांच्या द इव्हिनिंग न्यूज या कादंबरीत वाचायला मिळाल्यावर  सामान्य नागरिकास त्रास झाला तरी चालेल पण देशाचे नुकसान व्हायला नको या हेतूने प्रेरित झाल्यामुळेच भारतीय पालिका, पोलिस किंवा पासपोर्ट ऑफिसमधील कर्मचारीही आपले काम एवढ्या बारकाईने   करतात  हे ध्यानात येऊन त्यांच्या दक्षतेचे कौतुक करावेसे वाटले मात्र त्यांच्या या दक्षतेतून नेमकी नको असलेले (किंवा पोलिसांना हवे असलेले)लोकच कसे सुटतात हे कोडे मात्र उलगडले नाही.
     अमेरिकेतील ऑफिसचा आणखी एक अनुभव माझ्या मुलाला मोटर चालन परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) घेण्याच्या वेळी आला.त्याला भारतात चारचाकी वाहन चालवण्याचा कायम स्वरूपाचा परवाना होताच पण येथील नियम वेगळे शिवाय लेफ्ट हँड ड्राइव्ह असल्यामुळे त्याला येथील आर. टी. ओ. (त्याला येथे  डिपार्टमेंट ऑफ मोटर व्हेइकल्स म्हणतात)कडे जाणे आलेच.आमच्या घराजवळील  ऑफिसला त्याने भेट दिली तेव्हा ते  डी. एम्. व्ही. ऑफिस नसून एकाद्या छोट्या आय.टी.कंपनीचे ऑफिस असावे असे त्याला वाटले. आत शिरताच त्याला एक छोटा फॉर्म स्वागतिकेकडून मिळाला आणि तो भरून दिल्यावर  लेखी परीक्षेसाठी एका संगणकाकडे त्याला पाठवण्यात आले. वाहन चालनाच्या नियमांविषयी ३० प्रश्न संगणकावर त्यांना विचारण्यात येतात आणि त्यातील ८०% प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे आवश्यक होते.माझ्या मुलाने अगोदरच तयारी केल्यामुळे त्याने २४ प्रश्नांची उत्तरे ओळीने बरोबर दिल्यावर त्याला पुढचे प्रश्न न विचारताच तू पास झाला आहेस असे संगणकावर सूचित करण्यात आले.त्यानंतर प्रत्यक्ष गाडी चालवण्यास सांगतील असे त्याला वातलए पण तसे काही न होता एकदम त्याच्या हातात परवानाच देण्यात आला,कारण त्याला  पुणे आर.टी.ओ.कडून चारचाकी वाहन चालवण्याचा कायम परवाना मिळालेला होता आणि  बहुधा पुण्यात गाडी चालवणारा जगात कोठेही गाडी चालवू शकेल याचा त्यांना विश्वास असावा. तसा परवाना नसलेल्या त्याच्या बायकोलाही काहीही कटकट न करता परवाना मिळाला मात्र तिला प्रथम शिकाऊ परवाना काढून काही दिवसांनी लेखी ( संगणकापुढील) परीक्षा देऊन प्रत्यक्ष गाडी चालवून दाखवावे लागले.
        याच ऑफिसने एका स्त्रीला या टेस्टसाठी जवळ जवळ २५-३० वेळा यायला लावले होते आणि इतक्या चकरा मारायला लावल्यावर तिने टेस्ट व्यवस्थित दिल्यामुळेच तिला परवाना देण्यात आला असे एका बातमीत मी वाचले होते. कदाचित त्या तरुणीने आपले नाव गिनीज बुकमध्ये यावे या हेतूने असे मुद्दामच केले असल्यास न कळे.पण आणखी एक मजेची गोष्ट म्हणजे एकदा मोटर ड्रायव्हिंग स्कूलची फी भरली की  परवाना मिळेपर्यंत कोणतीही ज्यादा फी न घेता त्या व्यक्तीला ट्रेनिंग द्यावे लागते म्हणे.आपल्याकडे मात्र एकदा फी भरली की एका महिन्यात तुम्हाला गाडी चालवता येवो अथवा न येवो मोटर ड्रायव्हिंग स्कूल परवाना मिळवून देण्याची हमीच घेत असते.काही वेळा तुम्ही टेस्ट न देताही परवाना घरपोच मिळतो इतक्या सुविधा असल्यावर उगीचच आर .टी. ओ.कडे जाण्याची तसदी कशाला घ्यायची?
       अमेरिकन शासकीय कार्यालये जरी सामान्य माणसाचा असा विचार करत असली तरी काम बारकाईने आणि शक्य तेवढ्या कंटाळवाण्या पद्धतीने करण्याचा भारतीय बाणा आपण सोडायला तयार नसतो. याचा अनुभव आपल्या पर्वण्यांचे नूतनीकरणाच्या वेळी माझ्या मुलांना आला. न्यूयॉर्कमधील भारतीय [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18;]पासपोर्ट ऑफिससुद्धा कोणत्याही भारतीय शहरातील पासपोर्ट ऑफिसच्या तोंडात मारेल इतके गचाळ आणि तितकेच अकार्यक्षम आहे. न्यूयॉर्कमधील एका जुनाट इमारतीच्या तळघरातील दोन खोल्यांमध्ये हे थाटलेले आहे.[/float] पासपोर्ट आणि व्हिसासंबंधित वेगवेगळी कामे सांभाळण्यासाठी यात आठ खिडक्या किंवा टेबले आहेत,पासपोर्टचीच कामे जास्त असतात कारण भारतात जाण्यासाठी व्हिसा मागायला अमेरिकन नागरिकांची अजून गर्दी व्हायला सुरवात झाली नाही.(मध्ये एका पेपरमध्ये एक कार्टून आले होते त्यात रुपया इतका वधारलाय की भारतात जायला व्हिसा मिळत नाही याबद्दल एक अमेरिकन नागरिक खट्टू झाल्याचे दाखवले आहे`.)त्यामुळे खरे तर पासपोर्टचेच काम महत्त्वाचे असून त्यासाठी तीन खिडक्यांचा वापर करण्यात येतो आणि इतर बिनमहत्त्वाच्या कामासाठी बाकीच्या खिडक्यांचा! त्यामुळे पासपोर्टच्या खिडक्यांसमोर बऱ्याच लांब रांगा असतात बऱ्याच वेळा एवढ्या माणसांना उभे राहायला पुरेशी जागाही त्या ऑफिसात नाही.
          पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी लागणारे सर्व कागदपत्र घेऊन आणि जुना पासपोर्ट घेऊन आपण त्या ऑफिसमध्ये प्रवेश केल्यावर रांग लावायच्या जागेपासून अडचणीस सुरवात होते इतकी ती जागा आकाराने लहान आहे,नेहमीप्रमाणे या खिडकीवर नको त्या खिडकीवर जा असे होऊन एका खिडकीवर कागदपत्र स्वीकारले जाऊन त्याची पावती मिळाल्यावर  खास भारतीय पद्धतीनुसार आमच्या चिरंजीवांना एक आठवड्यानंतर पासपोर्ट न्यायला येण्यास सांगण्यात आले .आता परत एक दिवस रजा काढून येण्याऐवजी त्यातल्या त्यात प्रयत्न करायचा म्हणून त्यांनी सांगितलेल्या दिवशी ऑफिसमधून जरा लवकर निघून पासपोर्ट मिळतो का पाहावे असा त्याने विचार केला.पासपोर्ट ऑफिसमधील बऱ्याच खिडक्यांपैकी एकावर उभा राहिल्यावर  त्याचा नंबर आल्यावर पावती पाहून ही पावती ज्या खिडकीवर मिळाली त्याच खिडकीवर जा असा सल्ला देण्यात आला.त्या खिडकीवर बरीच गर्दी होती शिवाय त्या रांगेतील पहिला क्रमांक खिडकीतून दिसणाऱ्या माणसाशी हुज्जत घालत होता त्याअर्थी आपले काम आज होत नाही अशी चिरंजीवांची खात्री पटली पण तेवढ्यात त्या खिडकीवर जास्त गर्दी आहे असे पाहून त्यावरील काही व्यक्तींनी शेजारच्या खिडकीवर जावे अशी सूचना करण्याचे सौजन्य दाखवण्यात आले खरे पण झटपट ती खिडकी गाठणाऱ्या माझ्या मुलाने ती पावती दाखवताच त्या खिडकीतील कर्मचाऱ्याने मात्र त्या सौजन्याची ऐशी तैशी असे म्हणत  हा क्रमांक माझ्याकडे नाही असे म्हणून हात झटकले पण माझ्या मुलाने दोनच मिनिटापूर्वी तुम्हीच अशी घोषणा केली होती असे सांगितल्यावर आणि सुदैवाने शेजारील खिडकीतील व्यक्तीकडे त्या क्रमांकाचा पासपोर्ट होता हे ध्यानात आल्यामुळे त्याला तो मिळाला खरा पण पुढच्या लोकांना मात्र दुसऱ्या दिवशीच या असे सांगण्यात आले. हा अनुभव ऐकल्यावर आपण भारतातच आहोत असे वाटून गेले.तरीही आपल्याकडे पासपोर्ट नूतनीकरण म्हणजे अगदी पुनश्च हरी ओम्  असा जो प्रकार असतो म्हणजे पुन्हा पोलिस चौकशी वगैरे सव्यापसव्यास तोंड द्यावे लागते  तेवढा  तरी येथे नसतो एवढीच त्यातल्या त्यात जमेची बाब!     

लहान मुलांची आकलन क्षमता/शक्ती

आज सकाळी कार्यालयात जाण्याकरिता बसमध्ये बसलो होतो. माझा भ्रमणध्वनी वाजला. पाहिले तर बहिणीचा फोन. उचलला पण काही आवाज नाही आला. थोड्यावेळाने बहिणीने संदेश पाठवला की तिने फोन नाही केला. अनिकेत फोनशी खेळत होता. अनिकेत म्हणजे माझा भाचा. वय फक्त ९ महिने. मी बहिणीला संदेश पाठवला. "बरे आहे. त्याला कळते की फोन कसा लावावा. आता तो फक्त बोलणे जमण्याची वाट बघत असेल." :)

सत्यशोधक समीक्षक

सत्यशोधक समीक्षक
मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे. केशवराव हे विदर्भातील अमरावतीचे निवासी. विसाव्या शतकातील आस्वादक संगीत समीक्षा आणि मराठी सुगम संगीत यावर केशवरावांनी "केशवमुद्रा' उमटविली. त्यायोगे त्यांनी या शतकाला कृतज्ञ केले आहे, अशी भावना ज्येष्ठ समीक्षक श्रीरंग संगोराम यांनी व्यक्त केली आहे.

आज दि. १४ डिसेंबरला रात्री उल्कावर्षाव

आज दि. १४-१५ डिसेंबरला रात्री उल्कावर्षाव

मिथुन राशीतील जेमिनिड्स उल्कावर्षाव

आज शुक्रवार दि. १४ डिसेंबर रोजी रात्री १०:१५ व त्यानंतर पूर्ण रात्र मिथुन राशीतून होणारा सुप्रसिद्ध असा जेमिनिड्स उल्कावर्षाव पाहण्याची चांगली संधी लाभणार आहे. चंद्र लवकर मावळ्णार असल्याने काळोखी रात्र उल्कावर्षाव पाहण्यास अनुकूल असेल. तसेच सर्वाधिक वर्षावाची वेळ मध्य आशिया क्षेत्रासाठी व भारतासाठी योग्य अशी आहे. रात्री १०:१५ ही सर्वाधिक उल्कावर्षावाची वेळ आहे. पण तेव्हा मिथुनरास पुरेशी वर आलेली नसेल. तरी त्यानंतरही खूप उल्का बघायला मिळतील.

भुरकुंडीचे देव - २

शतकानुशतकांचा जुना असलेला, पण अजूनही टवटवीतपणा टिकवून असलेला शालू चापूनचोपून नेसून ती हळुवारपणे गाभार्‍याच्या पायर्‍या चढू लागली. गर्भागारातून पैंजणांचा रुणझुणता नाद उमटला आणि आतून भरजरी वस्त्रे नेसलेली ती दगडी उंबरठ्यापर्यंत आली.

भुरकुंडीचे देव - १

भुरकुंडीमध्ये उन्हाळा नेहमीसारखाच आला नि गेला. वेगळे म्हणजे एवढेच घडले, की उन्हाळा आरंभतानाच अच्युतने त्याच्या खळ्यातल्या दिव्याच्या उजेडाला आलेल्या माकडांना हाकलण्याच्या नादात नादुरुस्त होऊन घेतले. मुळात त्या माकडांनी उजेडाला बसण्याखेरीज त्याचे काहीही नुकसान केलेले नव्हते. अगदी खळ्याला लागून असलेल्या गोटीआंब्याला चांगलाच बहर आला होता त्यालाही हात लावला नव्हता. पण का कुणास ठाऊक, अच्युतचे आधीच तिरके असलेले डोके सरकले. विजेची देयके चढत्या भाजणीत भरत असल्याने त्याला आता त्या विजेबरोबरच त्या प्रकाशावरही आपला अधिकार असल्याचे भासू लागले होते. त्या उजेडात कांबळ्यांच्या जनूला प्रेमपत्र लिहायला आलेल्या रामा घडश्याच्या 'इनय'ला त्याने अर्वाच्य (म्हणजे नेहमीच्या) शिव्या देत पिटाळून लावले होते.

धुक्यातून उलगडणारे जी ए -१

थोडेसे प्रास्ताविक:
११ डिसेंबर हा जी.ए. कुलकर्णींचा विसावा स्मृतिदिन. अशा प्रकारच्या लेखाची सुरुवात साधारणतः 'मराठी कथाविश्वावर आपल्या लिखाणाचे लालजर्द स्वस्तिकचिन्ह उमटवून अचानक अंधारात विरून गेलेल्या ज्येष्ठ कथाकार कै. जी. ए. कुलकर्णी यांच्या पवित्र स्मृतीला अनेकानेक वंदन करून..' वगैरे अशा घसाभरू वाक्याने करण्याचा शिरस्ता आहे. या सगळ्या प्रकाराचा जी. एं. ना विलक्षण तिटकारा होता. लेखक हा फक्त त्याच्या लिखाणातून बघावा, त्यापलीकडे तो एक सर्वसाधारण माणूस असतो, त्यामुळे 'Writing, Not the writer' हे वाक्य जी. एं. च्या वैयक्तिक आणि खाजगी लिखाणात अनेक वेळा येते. पण इतके वस्तुनिष्ठ राहणे विशेषतः मराठी माणसाला परवडत नाही. जरा कुणी कुठे काहीसे बरे केले की कधी एकदा आपण त्याला देव करून टाकतो, असे त्याला होऊन जाते. पण ते असो. तर या निमित्ताने जी. एं चे काही तसे अनोळखी लिखाण आणि त्यांनी केलेला उदंड पत्रव्यवहार यातून या कोड्यासारख्या माणसाची लेखक म्हणून काहीशी नवी ओळख करून घेता येते हे पाहावे हा या प्रस्तावित लेखमालिकेचा उद्देश आहे.
हे करत असताना मनात पहिली भावना आहे ती अपराधीपणाची. आपल्या लिखाणाची आणि त्यातूनही आयुष्यभर जपलेल्या आपल्या खाजगी आयुष्याची अशी चिरफाड - चिरफाडच, त्याला रसग्रहण वगैरे म्हणणे योग्य नाही - जी. एं. ना अजिबात रुचले नसते. इंग्रजी लेखकांच्या मृत्यूनंतर त्यांचा पत्रव्यवहार प्रकाशित करण्याची पद्धत आहे. इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास - व्यासंगच- असणाऱ्या जी.एं. ना हे माहीत नसणे शक्यच नाही. तरीही त्यांनी आपण लिहिलेल्या बऱ्याच पत्रांत 'हे अगदी घरगुती आणि खाजगी आहे, चुकूनही यातला एकही शब्द बाहेर जाऊ देऊ नका' असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या काही पत्रांतले काही उल्लेख अस्वस्थ करणारे, क्वचित त्यांच्या आपल्या मनातल्या प्रतिमेला छेद देणारेही आहेत. मग हे सगळे कशाला करायचे? आधीच असंख्य पूर्वग्रह आणि गैरसमजांच्या जाळ्यात गुरफटलेल्या या दिवंगत साहित्यिकाचे असे विच्छेदन कशासाठी?