अस्मादिकांचे वास्तव्य सध्या इंदूर शहरात आहे. काही गावांची नाव उच्चारली तरी अंगावर रोमांच उमटतात. ग्वाल्हेर, इंदूर, अटक, पानिपत ही गावं त्यापैकीच. कारण या गावांना इतिहासाचा स्पर्श आहे. उत्तर दिग्विजय करायला निघालेल्या मराठ्यांच्या फौजांनी नर्मदापार झेप घेताना अनेक ठिकाणी आपल्या पराक्रमाचे झेंडे गाडले. या मोहिमांमधील ही काही गावं. इंदूर हे त्यातले मध्य भारतातील महत्त्वाचे ठिकाण. मल्हारराव होळकरांच्या कर्तृत्वाचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाच्या काळात या या भागाची वाटणी झाली आणि ग्वाल्हेर शिंद्याच्या वाट्याला, इंदूर होळकरांकडे आणि धार पवारांकडे गेले. पण प्रामुख्याने अमराठी प्रांतातील प्रमुख मराठी गावे सांगताना ग्वाल्हेर व इंदूर ही नावं प्रामुख्याने येतात.
(थोडं विषयांतर, सुरवातीला उज्जैन शिंद्यांकडे होतं. पण तेथे महाकालेश्वर (ज्योतिर्लिंग) हा एकच राजा असतो, अशी समजूत आहे. तो इतरांना तेथे राहू देत नाही, असे मानतात. म्हणून शिंद्यांचा राजवाडाही गावाबाहेरच बांधण्यात आला. त्यानंतर त्यांनी तेथून सर्व काही हलवून ग्वाल्हेरला कूच केलं. धार व देवास ही पवारांच्या धाकटी पाती व थोरली पाती यांच्या वाटणीत वेगळी झालेली संस्थानं आहेत.)
त्यापैकी इंदुरात मी रहातो. मराठ्यांच्या विशेषतः पेशवाईच्या काळात उत्तर दिग्विजयासाठी मराठी फौजांनी स्वाऱ्या केल्या. त्यानंतर मराठी सत्ता येथे प्रस्थापित झाल्यानंतर अनेक मराठी कुटुंबे येथे स्थिरावली. त्यानंतरही येत राहिली. अगदी विसाव्या शतकातही रेल्वे खाते वा केंद्र सरकारच्या नोकरीच्या निमित्ताने अनेक कुटुंबे महाराष्ट्रातून येथे आली. स्थिरावली. त्यामुळे मध्यप्रदेशात ठिकठिकाणी मराठी कुटुंबे सापडतात. अनेक ठिकाणी त्यांच्या वेगळ्या गल्ल्या आहेत. इंदूर, ग्वाल्हेर व्यतिरिक्त धार, देवास, महेश्वर, जबलपूर, झाबुआ अशा अनेक ठिकाणी मराठी लोक आहेत.