वारी -१०

             सुजित कामावरून आल्यावर घरात प्रवेश करताना एका हातात टपाल आणि दुसऱ्या हातात बराच छापील कागदांचा गठ्ठा घेऊन येत असे.संदेशवहनात इतकी प्रगती झाली तरी अजूनही अमेरिकन लोकांचा विश्वास टपाल खात्यावर आहे याचे कौतुक वाटले.आपल्याकडे मात्र टपालखात्याचे ९०% काम कुरियर सेवेनेच उचलले आहे.यात बहुतेक बँका,निरनिराळ्या कंपन्या यांचा समावेश होतो.एके काळी टपाल दिवसातून दोनदा आणि अगदी वेळच्यावेळी मिळत होते याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. लग्न ठरल्यानंतर भावी पत्नीला मी दररोज पत्र पाठवून बेजार करीत असे त्यामुळे नाइलाजाने चार ओळीचे का होईना उत्तर तिला पाठवावे लागे त्या काळात मी पाठवलेले एक पत्र  दुसऱ्या दिवशी तिला मिळून तिने लगेच पाठवलेले उत्तर मला तिसऱ्या दिवशी देण्याचा चमत्कार पोस्ट खात्याने केला आहे. आमच्या पत्रवाचनातील आतुरता जणू टपालखात्याच्याही लक्षात आली होती.दुसऱ्या एका वेळी माझ्या बडोद्यात राहणाऱ्या बहिणीने माहेरपणासाठी घरी आल्यावर आपल्या पतिराजांना पाठवलेल्या पत्रावर सगळा पत्ता बरोबर लिहून बडोदा व पिन क्रमांक लिहिताना तिला कसली एवढी घाई झाली होती कुणास ठाऊक (कदाचित टपालपेटीतून टपाल निघण्याची वेळ झाली असावी) पण त्या जागी तिने फक्त " बी" एवढे एकच अक्षर लिहिले आणि तसेच पत्र पोस्टात टाकले आणि आश्चर्य म्हणजे पत्त्यातील खाणाखुणांवरून पोस्टखात्याने ते बी म्हणजे बडोदा असेल असा तर्क करून ते पत्र बरोबर इष्ट पत्त्यावर पोहचविले  हे आम्हाला कळण्याचे कारण म्हणजे लगेचच दोन तीन दिवसात आमच्या मेव्हण्यांचे एक जाडजूड पकीत आले.खरेतर त्यांचाही बायकोसाठीच्या प्रेमळ शब्दांचा साठा माझ्याप्रमाणेच लग्नापूर्वी लिहिलेल्या पत्रांमध्येच खतम झाला होता असे असताना त्यांच्या त्या जाडजूड पाकिटाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले पण ते उघडून पाहिल्यावर बहिणीच्या पत्राचे पकीत(अर्थात तिने पाठवलेल्या पत्राचा कागद काढून घेऊन)  त्यात त्यांनी ठेवलेले आणि पाहा कसा बावळटासारखा पत्ता लिहिला आहेस असा शेरा असलेले पत्र त्यात मिळाले.एकेकाळी असे कार्यक्षम असणारे टपाल खाते थोड्याच दिवसात इतके बिघडले की मी एकदा परगावी गेलो आणि परत यायला उशीर होईल अशी तार केली ती मी प्रत्यक्षात शनिवारी घरी पोचल्यावर मिळाली आणि ती वेळेवर न पोचवल्याबद्दल सौ. ने तक्रार करताच हजरजबाबी पोस्टमनने " त्यात शनिवारी पोचत आहे असेच लिहिले आहे ना ? " असा मुंहतोड जवाब दिला.अलीकडे पोस्टखात्याकडे मुदतठेवीव्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टींच्या विक्रीचेही काम सोपवून शासनानेच त्यांच्या मूळ टपालवितरण कामाकडे दुर्लक्ष करण्यास उत्तेजन द्यायला सुरवात केली आहे.
         सुजितच्या सदनिकेच्या बाहेर असलेल्या पत्रपेटीत मात्र पोस्टमन अगदी नियमित टपाल टाकताना दिसे अर्थात त्यांना टपालखात्याची गाडी दिमतीस असे. आताही स्वतंत्र घरात राहायला गेल्यावरही तीच परिस्थिती आहे.मात्र त्यासाठी प्रत्येक घरमालकास घराबाहेर एक छोट्या खांबावर स्वतः ची टपालपेटी बसवावी लागते.आणखी एक चांगली बाब म्हणजे आपल्याला पाठवावयाचे पत्रही या पेटीवर ठेवल्यास ते तो पोस्टमन घेऊन जातो आणि पुढे ते योग्य ठिकाणी पाठवले जाते त्यासाठी पोस्टाची पेटी हुडकावी लागत नाही.पोस्टाच्या पेट्याही बऱ्याच ठिकाणी असतात आणि त्या चांगल्या दणदणीत मोठ्या असून आपल्याकडल्यासारख्या झाडाला अथवा एकाद्या घराच्या भिंतीला लटकवलेल्या नसतात.आपल्याकडील पेट्यांची अवस्था पाहून या पेटीत टपाल कसे टाकायचे याचाच पेच पडतो.पत्र आत घुसवताना ते न फाटता आत जाईल याची दक्षता घ्यावी लागते. लग्नपत्रिकांसारख्या आकाराने मोठ्या आणि संख्येने जास्त  पाठवावयाच्या पाकिटांसाठी तर या पेट्या निरुपयोगीच असतात त्यासाठी पोस्टाच्या इमारतीत जाऊनच सगळी पाकिटे तेथील कर्मचाऱ्याच्या ताब्यात द्यावी लागतात.काटकसर जास्तीत जास्त कशी करावी हे आपल्या टपालखात्याकडून शिकावे कारण टपालकचेरीपासून टपालपेटीपर्यंत प्रत्येक गोष्ट कमीतकमी खर्चाचा आदर्श नमुना असते आणि तरी जनता म्हणते की सरकार उधळपट्टी करते चोराच्या उलट्या बोंबा दुसरे काय? 
       सुजितच्या हातातील कागदांचा दुसरा गठ्ठा असतो निरनिराळ्या मॉल्सच्या आकर्षक योजनांच्या भेंडोळ्यांचा ! एकावर एक फुकट हा प्रकार तर आपल्याकडेही अगदी सार्वत्रिक झाला आहे आणि नवनव्या शॉपिंग कॉम्प्लेक्सेसच्या उद्घाटनाबरोबर यांची संख्या वाढतच असते.इथल्या आणि आपल्या ऑफर्स यातील फरक एवढाच असतो की इथे त्यात फसवणुकीचा प्रकार कमी असतो किंवा नसतोच म्हटले तरी चालेल. घेतलेला माल परत घेण्याविषयी तर ते इतके तत्पर असतात की काही बहाद्दर भारतीयांनी भारतात जाताना नवा कॅंपकॉर्डर किंवा कॅमेरा घेऊन जाऊन तेथील मुक्कामात फोटो किंवा चित्रण करून महिन्याभरात येथे आल्यावर त्या वस्तू परत केलेल्या आहेत आणि काहीही प्रश्न न विचारता त्या परत घेतल्या गेल्या आहेत. कुठल्याही ट्रीपला जाताना ते असेच करतात असे त्यांनी मला अभिमानाने सांगितले.मला स्वतःला आलेला अनुभव म्हणजे मी एक घड्याळ एक डॉलरला मिळाले म्हणून घेतले पण घरी गेल्यावर त्यात काही दोष निघाल्यामुळे ते मी भीतभीतच परत करायला गेलो तर विक्रेतीने एक शब्दही न बोलता पावती पाहून एक डॉलर काढून दिला.थँक्स गिव्हिंग अथवा क्रिस्तमसच्या सेलनंतर तर वस्तू परत घेण्यासाठीच खास काउंटर उघडलेले असतात. वाढदिवसालाही भेटी देताना त्याचबरोबर वस्तूची पावतीही दिली जाते ज्यामुळे आपल्याला पसंत नसेल तर ती वस्तू बदलून घेता येते.महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे कोणतीही खरेदी करायला दूरच जावे लागत असल्याने केवळ वस्तू बदलून घेण्यासाठी  दूर जाण्याचा कंटाळा येत नाही.
     ऑफर्ससाठी लोक किती जीव टाकतात हे एका मॉलच्या थँक्सगिव्हिंग सेलच्या २२ नोव्हेंबरच्या खरेदीसाठी २१ तारखेच्या रात्री बारापासून लोक रांगा लावून उभे होते यावरून लक्षात येईल.एक महिला तर आठ महिन्याची गरोदर असून त्या मॉलपासून ३०-४० मैल अंतरावरून येऊन रांगेत उभी होती.तिला वॉशिंग मशीन अगदी स्वस्तात मिळाले म्हणे.बहुतेक होणाऱ्या बाळाचे कपडे घरच्याघरी धुता यावे यासाठी तिचा हा सगळा आटापिटा असावा. माझ्या मुलाने पण अश्याच एका ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी पहाटे पाच वाजता मॉलपर्यंत जाण्याचा विक्रम केला पण तोपर्यंत त्याला हवी असलेली वस्तू संपल्यामुळे त्याला हात हालवत परत यावे लागले,पण त्यात मजेची गोष्ट म्हणजे घरी आल्यावर सहज काँप्यूटरवर पाहत असताना तीच वस्तू ऑनलाइन खरेदीत त्याच कमी किमतीत उपलब्ध असल्याचे त्याला दिसले आणि त्याबे ऑर्डर नोंदवल्यावर खरोखरच दोन दिवसात ती वस्तू घरपोच मिळाली. आपल्याकडे मात्र अशा ऑफर्सची लालूच दाखवून ग्राहकांना आकर्षित करायचे आणि नंतर मात्र काहीतरी कारण दाखवून नको असलेली वस्तूच ग्राहकाच्या गळ्यात घालायची असे प्रकार होत असल्याचे आम्हाला आम्ही त्या भानगडीत पडत नसल्याने वृत्तपत्रातील बातम्यांवरूनच कळते‌. सिंहगड रस्त्यावरील मॉलमध्येच पेपरची रद्दी २५ रु.किलो या भावाने घ्यावयाचे आमिष दाखवून तेवढ्या रकमेची खरेदी त्या मॉलमध्येच करायला लावून त्यांना नको असलेला माल ग्राहकाच्या गळ्यात घालण्याचे प्रकार घडले आहेत.  
    मॉलमध्ये खरेदीस जाण्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे तेथे वेळ फार जातो आणि गाडी पार्क करायला जागा मिळेल याची खात्री नसते.कधीकधी केवळ गाडी लावायला जागा न मिळाल्यामुळे खरेदीच रद्द करावी लागली आहे. एकदा सुजितसाठी जॅकेट घ्यायला गेलो, सुदैवाने गाडी लावायला जागा मिळाली या आनंदात आम्ही मॉलमध्ये शिरलो.त्याच्या मापाचे जॅकेट शोधायला जवळ जवळ अर्धा पाऊण तास लागला.ते सापडल्यावर सुजितला रेस्टरूमला जायची इच्छा झाली.एवढ्या शोधानंतर सापडलेले जॅकेट मग माझ्या हातात देऊन तो रेस्टरूममध्ये गेला आणि मी त्या जॅकेटचा हँगर हातात धरून वेड्यासारखा उभा , जवळ कुठे बसायलाही जागा नाही. सुजित आल्यावर त्याला आपल्याला पँटही घ्यायची आहे याची आठवण झाली,पुन्हा तेथे जॅकेटसह जाऊन अर्धा तास घालवला,हवी तशी पँट सापडल्यावर मग ती अंगावर घालून बघण्यासाठी तो ट्रायल रूममध्ये गेला तेथून परत येईपर्यंत परत मी जॅकेट घेऊन उभा ! सुदैवाने ती पँट त्याला बरोबर बसली मग त्यानंतर एक लहान मुलाचे जॅकेट आमच्या नातवासाठी घ्यायचे होते‌. सगळीकडे शोधले पण लहान मुलांचे कपडे कोठे दिसेनात अखेर मॉलमधील कर्मचाऱ्यास विचारल्यावर त्याने तो विभाग वरच्या मजल्यावर आहे असे सांगितले मग आम्ही मोठे जॅकेट आणि पँटचे ओझे वागवीत वरच्या मजल्यावर निघालो.तेथे परत जॅकेटचा विभाग शोधण्यात दहा पंधरा मिनिटे गेल्यावर सुदैवाने सापडलेल्या विभागात हवे असलेले जॅकेट पाचच मिनिटात सापडल्यामुळे आनंदाने आम्हाला अगदी आर्किमेडिजसारखे युरेका युरेका म्हणत नाचावेच वाटण्याचे बाकी होते पण एवढ्यावर कुठे भागणार होते त्याच विभागात असणाऱ्या काउंटरवर आम्ही बिल करून पैसे देण्यासाठी थांबलो पण तेथेही आमच्या अगोदर चारपाच मंडळी होतीच.त्या काउंटरवर खरे तर दोन स्त्रिया बिले करण्यासाठी होत्या पण त्यातील एक कोठेतरी गुप्त झाली होती,आमच्या पुढे असणाऱ्या रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या भारतीय स्त्रीचेच बिल तेथे असणारी मुलगी अगदी शांतपणे करत होती.तो सेलचा हंगाम असल्याने आणि त्या पहिल्या स्त्रीने घरी येणाऱ्या भेंडोळ्यांचा इतका सूक्ष्म अभ्यास करून आपल्या दोन अपत्यांसाठी निरनिराळ्या कपड्याच्या तऱ्हा घेतल्या होत्या की तिचे बिल करण्यासाठी एका स्वतंत्र काउंटरचीच आवश्यकता होती. त्यात तिने निवडलेल्या कपड्यांना तिने गोळा केलेली सवलतीची तिकिटे लागू पडत नसल्यास लगेच ती तो कपडा नाकारत असे. अशा प्रकारे तिने नाकारलेल्या कपड्यांचा ढीग आम्हा मागे उभे असणाऱ्या सर्व ग्राहकांच्या एकत्रित खरेदीपेक्षा जास्त होता. शेवटी अर्धा तास वाट पाहिल्यावर एकदाचा तिचा ढीग संपला तरी परत बिलाच्या रकमेविषयी ती त्या क्लार्कशी हुज्जत घालत होतीच तिच्या आणि आमच्या मध्ये असणारे तीन [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18;]अमेरिकन ग्राहक बिचारे शांतपणे हा सर्व गोंधळ पाहत होते अर्थात आम्हीही भारतीय असलो तरी मनातल्या मनात तिला  शिव्या  देण्यापलीकडे काय करणार होतो?[/float]मधल्या तीन गिऱ्हाईकांनी मात्र आमच्यासारखीच अगदी मोजकीच खरेदी केल्यामुळे त्यानंतर पाच दहा मिनिटातच आमचा नंबर लागला आणि मी सुटकेचा श्वास सोडला पण तेवढ्यावर भागण्याचा तो दिवस नव्हता कारण सुजितने खरेदी केलेल्या जॅकेटवर किमतीचा शिक्का असणारा कापडाचा तुकडा तेवढा बरोबर नव्हता त्यामुळे आम्ही खालच्या मजल्यावर जॅकेट निवडले असल्यामुळे तेथील बिलकाउंटरवरच त्याचे बिल होईल असे आम्हाला सांगण्यात आले आणि मग आमची वरात खालच्या मजल्यावर आली सुदैवाने तेथील काउंटरवर दोन बिलिंग क्लर्क्स होते आणि दोघांच्याही पुढे एकएकच गिऱ्हाईक होते.त्यामुळे आमचा नंबर लगेचच लागला पण तेथील क्लार्कनेही सुजितचे जॅकेट उलटसुलट करून पाहत त्यावर किमतीचा शिक्का नसल्यामुळे आम्ही जॅकेट जेथून निवडले तेथे जाऊन तसलेच दुसरे जॅकेट घेऊन या त्याच्यावर असलेला किमतीचा शिक्का पाहून मग बिल करता येईल असे सांगून पुन्हा आम्हाला अगदी सापशिडीच्या खेळासारखे आरंभस्थानावर पाठवले.आता त्या एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आम्ही इतके फिरलो होतो की ते जॅकेट कोठे निवडले होते हे आठवण्यास आणि ती जागा शोधायलाही बराच वेळ गेला सुदैवाने त्याच प्रकारचे दुसरे जॅकेट तेथे होते हे आमचे भाग्य नाहीतर आम्हाला जॅकेट तयार करणाऱ्या उत्पादकाकडेच जावे लागले असते अश्या प्रकारे जवळजवळ दोन तासात तीन वस्तूंची खरेदी (जी मी सिंहगड रोडवरच्या दुकानात घरातून निघून पायी तेथे जाऊन अर्ध्या तासात करून घरी येऊ शकलो असतो)करून आम्ही विजयी मुद्रेने बाहेर पडलो.माझी परिस्थिती अगदी गाढव मेले ओझ्याने आणि शिंगरू मेल हेलपाट्यानं त्यातल्या शिंगरासारखी झाली होती.इतके झाल्यावर जेव्हां सुजितला गाडी कोठे पार्क केली हे आठवेना ( साहजिकच आहे,एवढे उलटसुलट फिरल्यावर असे होणे)तेव्हा मी तेथेच बसकण मारण्याच्या परिस्थितीत होतो पण बसकण मारायलाही जागा नव्हती. अखेर कसेबसे गाडीपर्यंत पोचून घरी आल्यावर आता खरेदीसाठी कधीही न जाण्याचा निश्चयच जणू मी केला.