वारी---७
अमेरिकेत जाण्यापूर्वी पद्मश्री पु̮.ल.देशपांडे यांचा " एक बेपत्ता देश" या शीर्षकाचा लेख वाचला होता.त्यात त्यांच्या अमेरिकावास्तव्यात ते बाहेर पडले असताना एका म्हातारीला एक पत्ता विचारायला जातात तेव्हा ती म्हातारी कशी थरथर कापायला लागते कारण एकट्यादुकट्या व्यक्तीला गाठून लुबाडण्याचे प्रसंग बरेच घडत असल्यामुळे हा आपल्यावर चाल करायला आलाय की काय अशी अनुभवामुळे तिला कशी भीती वाटते याचा उल्लेख असल्यामुळे मी फिरायला बाहेर पडल्यावर अमेरिकन म्हाताऱ्या बाईला आपल्या कोठल्याही कृतीमुळे भीती वाटू नये याची दक्षता घ्यायचे ठरवले होते (तरुणीच्या बाबतीत माझ्याबरोबर सौ. असल्यामुळे ही शक्यता नव्हती )पण या अमेरिकनांनी त्याही बाबतीत आमची दांडी उडवली.कारण एकदा मी आणि सौ. दोघेही फिरायला बाहेर पडलो.आम्हाला फारशी थंडी वाजत नसल्यामुळे आम्ही साधे स्वेटर्स घालून बाहेर पडलो तर एक अमेरिकन म्हातारा आमच्याजवळ येऊन अगदी कनवाळूपणे म्हणाला."अरे तुम्ही एवढ्या थडीत फक्त साधे स्वेटर्स घालून काय बाहेर पडलाय जॅकेटस घाला उद्यापासून . " अमेरिकन माणसे अगदीच माणूसघाणी किंवा माणसांना घाबरणारी असतात ही माझी गैरसमजूत दूर केल्याबद्दल आणि आम्हाला प्रेमळ सल्ला दिल्याबद्दल त्या म्हाताऱ्याचे दुसऱ्या म्हाताऱ्याने(म्हणजे मी) आभार मानले आणि आम्ही पुढे गेलो.त्यानंतर पुढे एकदा माझ्या मित्राच्या मुलाकडे ( तो माझ्या मुलाचा मित्रही आहे.) आम्ही रहायला गेलो तेव्हा सकाळी फिरायला गेलो तेव्हा त्याच्या अमेरिकन तरुण शेजारणीनेही मला गूड मॉर्निंग केले आणि तू माझ्या शेजाऱ्याचा पाहुणा आहेस ना अशी माझी विचारपूस पण केली.रस्त्यावर बऱ्याच अमेरिकनांनी गुडमॉर्निंग म्हणून आपल्या देशाविषयीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला उलट मधूनमधून दिसणाऱ्या भारतीय वाटणाऱ्यानी आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला ( आमच्याविषयी ते पण असेच म्हणत असतील) .पण एकूणच येथील लोक समोर येणाऱ्या व्यक्तीला हाय हॅलो म्हणतातच असे दिसले. अगदी तिकिटाच्या खिडकीत गेलेला माणूस अगोदर हाय म्हणूनच तिकिट मागणार.तरीही या देशाला एक बेपत्ता देश असा किताब पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या चोखंदळ व्यक्तीने का द्यावा समजले नाही. अर्थात त्यांच्याच सांगण्याप्रमाणे " हर गार्डाची शिट्टी न्यारी " त्याप्रमाणे अमेरिकेचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा.
आम्ही तर कोणत्याही वेळी निर्धास्तपणे हिंडत होतो पण एकदा आमच्या मित्राकडे आम्ही दोघेच त्याचे घर जवळ असल्याने पायीच गेलो असता परतायला थोडा अंधार झाला तर त्यांच्या सुनेने आता चालत परत जाऊ नका असे सांगून आम्हाला आपल्या गाडीतून सोडण्याची तयारी दाखवली कारण आमच्या परतीच्या रस्त्यावर काही मुलांनी रस्त्यावर जाणाऱ्या व्यक्तीना लुटण्याचा प्रयत्न केला असे तिला समजले होते. आपल्याकडेही अगदी दिवसा ढवळ्या स्त्रियांच्या गळ्यातील साखळ्या,मंगळसूत्र घेऊन पसार होण्याचे असे प्रकार चालतातच.पण तरीही मर्द मराठ्यांनी अंगावर दागिने घालून बाहेर पडण्याची परंपरा सोडलेली नाही. पुण्यात असताना तर माझ्या एका मित्राला सकाळी नऊ वाजता तो रस्त्यावरून चालत असताना अगदी साळसूदपणे एका स्कूटरवाल्याने थांबवले आणि " अहो काका ते गृहस्थ तुम्हाला बोलावत आहेत असे सांगितले.माझ्या मित्राने थांबून पाहिले तर त्या व्यक्तीने जवळ येऊन " अहो काका पुढे दंगा सुरू झाला आहे तुमची आंगठी, घड्याळ आणि चेन काढून जपून ठेवा म्हणून त्याला अंगठी घड्याळ आणि चेन काढायला लावली आणि त्यालाच रुमालात गुंडाळायला लावली आणि त्याच्या हातातून घेऊन त्याच्या खिशात ठेवण्याचे नाटक केले.आमच्या मित्राने"तुम्ही कोण विचारल्यावर गुप्त पोलिस असे सांगितले आणि निघून गेला.थोड्या वेळाने मित्राने खिशात हात घालून पाहिले तर काय आंगठी,चेन आणि घड्याळ बेपत्ता.एकूण आपला देश बेपत्ता नसला तरी येथे वस्तू आणि कधीकधी माणसेही बेपत्ता होतात हे खरे ! एक गोष्ट मात्र खरी आपल्या देशात रस्त्यावर एकटेदुकटे असणे क्वचितच शक्य असते आणि येथे मात्र रस्त्यावर हिंडणारे लोक कमीच.एकदा तर मी रस्ता चुकलो तर योग्य रस्ता विचारण्यासाठी मला अक्षरशः माणसे हुडकत हिंडावे लागले.
फिरण्यासाठी सगळेच रस्ते मोकळे असल्यामुळे मी बऱ्याच रस्त्यांचा शोध घेतला.रस्त्याना वेगवेगळ्या प्रकारे संबोधण्याचे कारण काही मला कळले नाही.कधी रोड,तर कधी स्ट्रीट तर कधी अव्हेन्यू तर कधी ड्राइव्ह तर कधी बुलेवार्ड,तर कधी नुसतेच सीटी ( हा कशाचा शॉर्ट फॉर्म आहे?),हायवेला रूट म्हणतात.आपल्याकडेही पूर्वी बोळ(शालूकरांचा) गल्ली (तपकीर),आळी ( दाणे)असे काही शब्दभेद होते पण आता मात्र शुद्ध रोड हा बहुतांशी एकच पर्याय वापरला जातो. अगदीच मराठीचा अभिमानी असेल तर मार्ग अथवा पथ हे शब्द वापरतोऽनेक रस्त्यांच्या पाहणीत येथील घरांचे बरेच नमुने पहायला मिळाले. बाहेरून पहायला घरे एकाद्या काड्या पेटीच्या घरासारखी भासतात कारण लाकडाचा जास्तीतजास्त वापर हिंवाळ्यात बर्फ घरावर साठायला नको म्हणून छते उतरती आणि भिंतींवरसुद्धा तिरप्या लाकडी पट्ट्या बसवलेल्या असतात̱ छतांना ती उतरती असल्यामुळे हिरवा , तपकिरी.करडा, निळा वेगवेगळे रंग दिलेले दिसू शकले आणि लाकडी भिंतीना पण. घरासमोर भरपूर मोकळी जागा आणि त्यावर हिरवेगार लॉन समोर सुंदर फुलझाडे आणि त्यांच्यावर आलेली सुंदर फुले सकाळी शेजारच्या घरातील म्हातारी माणसे देवपुजेला पळवत नाहीत̮. लॉनवर छान संगमरवरी पुतळे आणि त्याना धक्का लागेल अशी मुळीच काळजी लोकांना वाटत नाही हे आश्चर्य.कारण आमच्या भारतातल्या घरापुढील बागेतील फुले आम्ही उठण्यापूर्वी शेजारच्या आजींच्या देवांची पूजा करण्यासाठी गायब होतात एवढेच काय समोर ठेवलेली कचऱ्याची कुंडीसुद्धा टिकत नाही.येथे जागेचा तुटवडा नसल्यामुळे घरेही चांगलीच प्रशस्त असावीत. असावीत म्हणण्याचे कारण मी काही एकूण एक घरे पाहिली नाहीत पण पाहिली तेवढी कमीतकमी दहा हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळावर बांधलेली आणि तीन शयनकक्ष तीन विश्राम खोल्या (रेस्टरूम) आणि तळघरयुक्त.तळघरात संगीतवाद्ये,टेबलटेनिसचे टेबल आणि बऱ्याच वस्तूंचा साठा असतो.माझ्या एका विद्यार्थ्याने जागा विकत घेऊन घर बांधले आहे त्यात सात शयनकक्ष आहेत.त्या नवराबायकोस एकच मुलगी आहें नवरा कामावर गेल्यावर मुलीला शोधत राहणे एवढे एकच काम बायकोला पुरत असेल.सुजितनेही दोन वर्षानी मोठे घर विकत घेतले त्यातही तीन शयनकक्ष आहेतच.बहुतेक घरे तीन पातळ्यांची म्हणजे तळघर,तळमजला आणि पहिला मजला शयनकक्ष पहिल्या मजल्यावर तळमजल्यावर दिवाणखाना, स्वयंपाकघर,आणी कुटुंबखोली (फॅमिली रूम) अशी रचना असणारी असतात. समोर व मागे बऱ्यापैकी लॉन असतेच.काही फुलझाडांचे ताटवे, मोठी झाडेपण दिसली,मात्र फळझाडे घराच्या आवारात कमी दिसली̱. घराला कुंपण घालण्याची पद्धत कमीच दिसली यावरून शेजाऱ्यांशी जागेच्या मालकीवरून वाद होत नसावेत.माझे घर बांधून कांपाउंड वॉलसुद्धा झाल्यावर ती आपल्या हद्दीतून गेल्याचा दावा नंतर घर बांधणाऱ्या माझ्या शेजाऱ्याने कसा केला होता आणि आपली कांपाउंड वॉल माझ्या हद्दीतून नेण्याचा कसा प्रयत्न केला होता याची यावेळी आठवण झाली. बागेतील फुले फळे किंवा शोभेच्या वस्तू पळवल्या जाण्याची भीती लोकांना वाटत नसावी. त्यामुळे गृहसंकुलातदेखील लोक लहान मुलांच्या सायकलीसारख्या वस्तू बेदिक्कत बाहेर राहू देतात.कारण घरात अडचण होते.त्यामुळे पुढच्या आमच्या वारीत मी तीन वर्षाच्या नातवास घेऊन फिरायला गेल्यावर अशी बाहेर असलेली सायकल वापरायचा हट्ट तो करू लागल्यावर माझी पंचाईत झाली. .`
रस्त्यावरून जाताना काही दुकानांची नावे पाहिल्यावर येथील लोकाना आपल्यासारखी काव्यदृष्टी नाही याची जाणीव झाली.केस कापण्याचे कोठलेही दुकान असले तर त्यावर नाव नुसते हेअर कट किंवा नेल्स (नखे कापण्यासाठी वेगळे दुकान प्रथमच पाहिले.आपल्याकडे सलूनमध्ये सर्वच गोष्टी एकत्र करण्याची पद्धत!)किंवा कॉफीच्या दुकानावर एक्ष्प्रेसो अथवा जी असेल ती कॉफी किंवा लाँड्रीला नुसते वॉशर. बुटांच्या दुकानाला नाव काय तर म्हणे पेलेस शूज .आपल्याकडे कसे चैतन्य फूटवेअर, उत्कर्ष लाँड्री अशी नावे वाचूनच दुकानात शिरायला उत्साह येतो.साड्यांच्या दुकानांची नावे तर काय विचारायलाच नको.वस्तू वापरण्याच्या बाबतीत सारख्या नवीननवीन वस्तूंचा आग्रह धरणारे अमेरिकन लोक नावांच्याच बाबतीत येवढे कंजूष का काही समजले नाही. या बाबतीत त्यांच्या इंग्रज परंपरेचा वारसा त्यांनी सोडला नाही असे दिसते (भो पंचम जॉर्ज )त्यामुळे मुलाला बापाचेच नाव ज्यूनिअर म्हणून लावायची पद्धत बऱ्याच वेळा वापरलेली दिसते. जॉर्ज बुशसुद्धा या तडाक्यातून सुटले नाहीत.आपण पहिल्यापासूनच नावे ठेवण्याच्या ( म्हणजे दुसरा अर्थ नव्हे) कलेत पारंगत त्यामुळे विष्णुसहस्त्र नाम आपल्याकडे असते आणि तरीही मूल होताना आणखी नव्या नावाचा शोध अगदी इंटरनेटवर घेतला जातो. त्यामुळे शेक्सपीयरने नावात काय आहे असे म्हटले असले तरी आपल्याकडे तरी नावातच सर्व काही आहे हे निश्चित !