वारी--९
न्यू जर्सी एडिसन ला आल्यावर लगेच जेट लॅगचा त्रास होईल अशी अपेक्षा होती.पण तसे न होता उलट झोपच उडून गेली.कदाचित पुष्पक मधील कमाल हसनला गोंगाट नसलेल्या जागी झोप येत नाही तसे प्रदूषण -हवेचे आणि ध्वनीचेही- नसल्यामुळेच की काय कोणास ठाऊक .आमच्या पुण्याच्या सदनिकासंकुलात वाहनाच्या हॉर्नचा वापर एकमेकांना आव्हान करण्यासाठी केला जातो् आणि हा आपला वारसा अगदी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पासूनचा आहे.इथे अमेरिकेत आल्यापासून हॉर्नचा आवाज काढणे हे असभ्यतेचे समजण्यात येते की काय अशी शंका येते उगीचच हॉर्न वाजवल्याबद्दल शिक्षा होत असावी. आपल्याकडे कसे रस्त्यात रणशिंग फुंकत असल्यासारखे हॉर्न वाजवत वाहने चालवत असतात हॉर्न हे एकादे मनोरंजन करण्याचे किंवा कुणालाही घराबाहेर बोलावण्यासाठी वापरायचे साधन आहे अशी लोकांची समजूत असते. हॉर्नचा आवाज कमी वाटतो म्हणून की काय रस्त्यात निरनिराळी घोषणायुद्धे चालू असतात.ध्वनिप्रदूषणामुळे बरीच जनता बहिरी झाली असली तरी आपला हा छंद सुटत नाही. येथे मात्र सारे कसे शांतशांत वाटत होते.तीच गोष्ट प्रदूषणाची.आपल्याकडे पोल्यूशन तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या गाड्यातून आणि जवळजवळ सर्व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनातून धुराचे लोट बाहेर पडत असतात.येथे त्याचाही मागमूस नव्हता त्यामुळे आणि निघाल्यापासूनच्या दगदगीमुळे आणि नंतरही काही दिवस नीट झोप न लागल्यामुळे सर्दी आणि खोकल्याने मला बेजार करून टाकले तरीही दैनंदिन व्यवहार मी कसेतरी पार पाडत होतो.इन्शुअरन्स काढला असला तरी सर्दीखोकल्यासाठी डॉक्टरकडे जावेसे वाटेना,त्यामुळे नेहमीच्याच ज्या गोळ्या मी बरोबर आणल्या होत्या त्यांचा वापर आणि गरम पाण्याच्या गुळण्या, व्हिक्सची वाफ घेणे अशा उपायांचा अवलंब करूनच आपले दुखणे हटवण्याचा माझा इरादा होता आणि तेच योग्य होते हे पुढे माझ्या मुलाला सर्दीखोकला झाल्यावर येथील डॉक्टरांनी जो अंटिबायॉटिक्सचा मारा त्याच्यावर केला त्यावरून समजले.त्यादृष्टीने भारतात असणे खूपच फायदेशीर असते असे वाटले. येथे अगोदर इन्शुअरन्स असल्याशिवाय डॉक्टरकडे प्रवेशच नसतो म्हटले तरी चालेल.आणि परत डॉक्टरची अपोइंटमेंट मिळण्यापूर्वी रोग किंवा रोगी संपण्याची शक्यता असते.एकूण डॉक्टरांची वृत्ती लोकांना घाबरवण्याची असते आणि त्यामुळे आपल्या बुद्धीने उपचार करणे शक्यच नसते. त्यामुळे बरेच भारतीय आयुर्वेदिक उपचार सोयिस्कर, स्वस्त आणि खात्रीलायक असतात तेही करायला भारतातून गेलेल्या नव्या पिढीचे ( म्हणजे आमच्या पुढच्या ) लोक घाबरतात. अगदी लहानपणी मुलाला मधाचे बोट चाटवण्याची आपली भारतीय पद्धत तर इथे मधाची चवही वर्षाच्या आतील मुलास द्यायची नाही.तीच गोष्ट वरच्या दुधाची.आमच्या पहिल्या नातवाला गायीचे दूध चौथ्या पाचव्या महिन्यात आम्ही देऊ लागलो आणि त्याचा अमेरिकेत जन्मलेला धाकटा भाऊ मात्र वर्षाचा झाला तरी अजून पावडरचे दूधच -त्याला फॉर्म्युला म्हणतात म्हणे- पीत आहे. माझ्या सात वर्षाच्या नातवाची दाढ किडली ती काढण्यासाठी दंतवैद्याची ऍपॉइंटमेंट घेऊन मुलगा आणि सून त्याला घेऊन गेले तर तेथे दोन तास वाट पाहून डॉक्टरकडे गेल्यावर हा आता अडल्ट झाला आहे आणि त्याचा इन्शुअरन्स तो किड असताना काढला होता ,त्याचा इन्शुअरन्स ऍडल्ट या सदरात काढून ऍडल्टचे दात काढणाऱ्या दंतवैद्याकडे त्याला न्या अशी त्याची बोळवण करण्यात आली.आता ज्या दंतवैद्याला दात काढता येतात त्याला लहान मुलाचे दात काढणे काय किंवा मोठ्या माणसाचे काय काय फरक पडणार आहे ?मी तर माझे आणि माझ्या ह्याच नातवाच्या बापाचे ( तो त्यावेळी सात आठ वर्षाचाच होता ) एकाच डॉक्टरकडून एकाच बैठकीत ( किंवा खुर्चीत )काढून आलो होतो ( पहा मनोगत दिवाळी अंक अक्कलदाढ आली तर हा माझाच अनुभव)याची आठवण होऊन या डॉक्टरला काय म्हणावे असे म्हणून कपाळावर हात मारून घेतला. बर [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18;]पुन्हा ऍडल्टचे दात काढणाऱ्या डॉक्टरची ऍपॉइंटमेंट घेण्यासाठी इन्शुअरन्स कव्हर नाही त्यासाठी पुन्हा इन्शुअरन्स कंपनीला कळवून वाट पाहा. मला वाटते तोपर्यंत नातवाचा दात आपोआपच पडेल.[/float]
मेडिकल इन्शुअरन्स हा आणखी वेगळाच प्रकार आहे.त्यात काही गोष्टींचा समावेश होतो तर काहींचा नाही आणि हे आपण आजारी पडल्यावरच कळते. आपल्याला ज्या टेस्ट घ्यायला सांगतात त्याचा अहवाल आपल्या हातात पडत नाही तो सरळ ज्या डॉक्टरकडून औषधोपचार घेता त्याच्याकडेच पाठवला जातो.वैद्यकीय बाबींवर होणारा खर्च अगदी डोळे पांढरे करणारा असतो.अमेरिकेतच परिचय झालेले माझे एक मित्र हृदयविकाराने आजारी पडले आणि त्यानी इन्शुअरन्स काढला असूनही त्यांच्या उपचाराचा खर्च इतका झाला की त्यातील काही भाग अजून देण्याचे बाकी आहे असे त्यांच्या मुलाकडून आम्ही पुढच्या वारीवर आलो तेव्हां कळले.
येथे सदनिकेत आजूबाजूला कोण आहे याचा पत्ता कमीच लागतो,कारण दारावर नावाचे फलक लावण्याची पद्धत नाही.पण काही कारणामुळे अगदी शेजारी त्याचबरोबर आमच्या बरोबर खाली पण कोण राहते त्याचा पत्ता लागलाच.एकदा आमचे वॉशिंग मशीन बंद पडल्यामुळे सुजितने संकुल कार्यालयास फोन केला आणि त्यानी माणूस पाठवतो म्हणून सांगितल्यावर तो कामावर गेला.आमच्या भारतीय अनुभावानुसार सुजित घरी परत आल्यावरच किंवा त्यानंतरही काही वेळा फोन केल्याव्र माणूस ये ईल अशी अपेक्षा होती.पण थोड्याच वेळाने दारावरील बेल टरारली. अशा वेळी कोण येणार आणि तेही सुजित घरी नसताना तरीही आम्ही भीतभीत दरवाजा किलकिला केला.एक उंचापुरा गोरा माणूस दारात उभा राहून काहीतरी सांगत होता पण त्याचे इंग्लिश आमच्या कळण्यापलिकडले होते ,आता याला घरात घ्यायचे की नाही हा पेच आम्हाला पडला.सुदैवाने आमच्या शेजारच्या सदनिकेतील व्यक्ती बाहेर डोकावली आणि त्याने तो आलेला माणूस संकुल कार्यालयाने पाठवलेला आहे असे सांगितले.आमचे वॉशिंग मशीन बंद पडले आहे हे त्यानेच त्याला सांगितले.आलेल्या माणसाचे बोलणे तो स्पॅनिश असल्यामुळे आम्हाला कळले नव्हते.आमच्या शेजाऱ्याने दुभाषाचे काम केले आणि आमची अडचण दूर झाली. आमचा हा शेजारी मुंबईचाच होता आणि गुजराती असला तरी त्याला मराठी बऱ्यापैकी येत होते.पुढे त्याच्या आईची आणि माझ्या सौ. ची बरीच दोस्ती झाली. त्यानंतर तो मधूनमधून गप्पा मारू लागला. तरी घरी येऊन बसण्याची प्रथा नाहीच म्हटले तर चालेल.
आमच्या बरोबर खाली राहणारा पण भारतीयच होता पण त्याचा परिचय जरा वेगळ्या संदर्भात झाला.एक दिवस आम्ही दोघेच घरात असताना दुपारी जरा वामकुक्षी घेत असताना बेल वाजली.आम्ही आश्चर्याने दार उघडले तर एक साधारण पंचवीस वर्षाची भारतीय तरुणी दारात उभी."अंकल, यू आर मेकिंग नॉइज अंड आय कॅनॉट स्लीप" अस त्रासिक मुद्रेने ती म्हणत होती.आमच्या चालण्याचा आवाज होत असे हे खरे पण आम्ही चालत नसताना होत असेल असे वाटले नव्हते.तिला आम्हीही विश्रांतीच घेत होतो असे सांगितल्यावर चेहरा आणखीच वाकडा करून निघून गेली. सुजित ऑफिसमधून आल्यावर त्याला सांगितल्यावर तो म्हणाला,"तिला असे वर येऊन आपल्याला सांगण्याचे कारण नव्हते" ते प्रकरण तेवढ्यावरच मिटेल असे वाटले होते पण त्यानंतरही आम्ही एकदा रात्री उशीरा घरी आल्यावर त्या नवराबायकोला त्रास झाल्याचे नवऱ्याने आम्हाला वर येऊन सांगितले त्यावेळी सुजित असल्यामुळे त्याने त्याला "व्हाय आर यू इस्टर्बिंग अस? यू कॅन मेक कंप्लेंटटू अपार्टमेंट ऑफिस" असा दम दिला.ते एक सिंधी जोडपे होते. पुढे पुढे आम्ही चालू लागलो की ते खालून छतावर काहीतरी आपटून आवाज काढायचे.थोडक्यात आमचे अघोषित ध्वनियुद्धच चालू झाले पण त्याचा शेवट कसा होईल याचाच आम्ही विचार करत असताना आश्चर्य म्हणजे एकदिवस खरोखरच आम्हाला संकुलकार्यालयाकडून पत्र आले आणि त्यात तुमच्याखाली राहणाऱ्या भाडेकरूला छतावर आवाज करून तुम्ही त्रास देता आणि अशी तक्रारपुन्हा आल्यास तुम्हाला सदनिका सोडावी लागेल" अशी नोटिस आली. त्यानंतर आम्ही ते पत्र घेऊन सदनिका कार्यालयात गेलो तेव्हा तेथे असलेल्या सदनिका प्रतिनिधी ती एक तरुण स्त्रीच होती आम्हाला धीर देऊन "असा आवाज येतच असतो याची आम्हाला जाणीव आहे" असे सांगितले.त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो तरीही आमच्यासारख्या नवागतांची झोप काही दिवस उडवायला ती घटना पुरेशी झाली. भारतात शासकीय गृहसंकुलात राहत असताना शेजाऱ्यांशी भांडण्याचे काही प्रसंग आले होते पण त्यामुळे घरातून हकालपट्टी होण्याची ताकीद मिळाली नव्हती.तेथे आपली भांडणे आपाआपसात मिटवावी असा शासकीय दृष्टिकोण होता.आबानी अशावेळी तंटामुक्त गाव तशी तंटामुक्त सदनिकेची योजना लागू केली असती.पण येथे मात्र या कारणामुळे लहान मुले असणाऱ्या पालकांना वरच्या मजल्यावर राहणे ही शिक्षाच वाटत असणार असे वाटले.
आम्ही येथे आल्यापासून आणखी एक महत्त्वाची जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे वीज पाणी आणि फोन अखंड चालू होते ते कधी बंद आहेत असे जाणवले नाही.भारतातून येणाऱ्याना ही गोष्ट खासच जाणवणार विशेषतः नियमित भारनियमनाला तोंड देणाऱ्या आम्हाला तरी.भारनियमनामुळे बराच वेळ वाया जातो हे खरेच पण गप्पा मारायला तो एक महत्त्वाचा विषय मात्र असतो आणि त्याबाबतीत आम्ही पुण्याचे लोक त्याहूनही मुंबई (उपनगरातील नव्हे)चे लोक किती भाग्यवान आहोत याचा टेंभा मरवण्यातील शान काही औरच ! आम्ही येथे आल्यावर एकदाच काय ती वीज गायब झाली पण तरीही सुजितकडे गरम पाणी गॅसच्या बॉयलरवरच होत असल्याने आम्हाला ती गोष्ट विशेष जाणवेपर्यंत वीज पुन्हा सुरूही झाली.पुण्यात अलिकडे भारनियमन बरेच कमी प्रमाणात असले तरी त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे कामाचेही तंत्र बसवावे लागते.केबलवाल्याचे आणि आमचे भारनियमन वेगवेगळ्या वेळात असल्याने दूरदर्शन दुप्पट काळ बंद असते.या सगळ्या गोष्टींच्या अभावामुळे बरेच वाटले. सुजितच्या घरातच वॉशिंग मशीन असल्यामुळे कपडे हवे तेव्हां धुवून टाकता येत होते त्यामुळे कपडे धुणारी बाई आली आता अंघोळ करून घ्या असा लकडा लावण्याचे सौ. चे सौख्य हिरावले गेले होते आणि माझी एक डोकेदुखी कमी झाली होती!काही सदनिकांत स्वतंत्र वॉशिंग मशीन नसते त्यांच्यासाठी सार्वजनिक वस्त्रस्वच्छता केंद्र संपूर्ण संकुलासाठी असून त्यात बरीच यंत्रे ठेवलेली असतात आणि ठराविक रकाम देऊन तेथे कपडे घेऊन जाऊन ठराविक रक्कम देऊन कपडे धुवून घेता येतात.आमच्या जवळील गुजराती बहुल वसाहतीत ही सोय होती.प्रथम त्यात काही नाणी टाकून यंत्र वापरण्याची सोय होती परंतु गुजूभाईनी त्यातून शक्कल काढून अमेरिकन नाण्यांच्याच आकाराची भारतीय नाणी टाकून स्वस्तात कपडे धुवून घेण्याची क्लुप्ती योजल्यामुळे ती व्यवस्था बंद करून सरळ सरळ प्रथम कपड्यांच्या आकारमानानुसार रक्कम घेऊनच यंत्र वापरण्याची परवानगी देण्यात येते.तेथे बराच वेळ जात असल्यामुळे बरेच लोक आठवड्यातून एकदा अगर दोनदाच कपडे धुण्याचा उपक्रम करतात.