गुलमोहोर - ५

चिंचा काढून झाल्यावर समीरदादाने धापकन खाली उडी मारली. परतताना राजूच्या आईने हाक मारली. "जोगराजू (जगातल्या सगळ्या मुलांची नावे राजू असल्याने मग अशी बारशी करावी लागत), जरा येऊन जाशील जाताना". याचा अर्थ "जाताना ये" असा होतो हे मला आता कळू लागले होते. आम्ही आत गेलो. "कुठून येऊ राह्यला तुझा राजूदादा? " कोंकणातून म्हटल्यावर त्यांना काहीच उमगले नाही. त्यांच्या शाळेत भूगोल शिकवलेला नसावा बहुधा. "सटाण्याच्याबी पुढं का? " त्यांचे माहेर सटाणा असल्याने त्यांना जगात त्याहून लांब काही असते याची जाणीवच नव्हती. "चिवडा खाऊन जाशील थोडा" म्हणत त्यांनी चिवड्याच्या वाट्या आमच्या पुढ्यात सारल्या. "उज्जूनं केला नं चिवडा. यंदा बारावी पास होईल" आता हे समीरदादाला सांगायची काय गरज होती? आणि यंदा पास होईल याची काय खात्री होती? काही कळत नव्हते. तिखटामिठाची मुक्त उधळण असलेला तो चिवडा कसाबसा संपवून आम्ही परतलो.

अरेच्या! घरी पोचलो तर ज्योत्स्नाताई हजर. "पापडाची चटणी केलीच होती, म्हटलं याला देऊन यावी". याला?  समीरदादाशी एकदम अरेतुरे? काय समजते कोण ही स्वतःला? मी समीरदादाकडे पाहिले. पण तो शांतच होता. आणि चक्क एकटक तिच्याकडेच पाहत होता. मी तिरसटून तिच्या हातातली वाटी हिसकावून घेतली आणि स्वैपाकघरात गेलो तो चांगला दहा-पंधरा मिनिटे आलोच नाही. बघा काय बघायचे आहे ते! मी परतेपर्यंत ज्योत्स्नाताई गेलीही होती. आणि बऱ्याचशा चिंचा कमी झालेल्या दिसत होत्या.

रात्री गच्चीत झोपताना समीरदादा गप्प गप्प होता. सप्तर्षी नाहीत की व्याध नाही. "दमलो रे बुवा आज. कालच्या प्रवासाचा शिणवटा आज उतरलेला दिसतोय अंगावर" असे म्हणून त्याने कूस बदलली आणि झोपून गेला.

सकाळी त्याला जोशीतात्यांच्या विहिरीवर घेऊन गेलो. समीरदादा मस्त पोहत असे. माझ्यासारखे जेमतेम तरंगत नसे. मला पाण्यात डुबकायला फारसे आवडत नसे. पेणच्या तळ्यात तात्यांच्या बँकेतल्या राजाभाऊंनी मला पोहायला शिकवले होते पण ते मी जीव वाचवण्यापुरतेच शिकून घेतले. समीरदादाने मात्र त्या दिवशी कायकाय प्रकार करून दाखवले. बाणासारखा त्याने पाण्यात सूर मारला. मग उडी मारताना हवेतच मांडी घालून धबालकन पाण्यात पडला. मग बराच वेळ काहीच हालचाल न करता पाठीवर तरंगत राहिला. काय नि काय.

दहाचा भोंगा झाल्यावर तो एकदम जागा झाल्यासारखा झाला. "कितीचा भोंगा रे हा? ". दहाचा म्हटल्यावर त्याची घाईगडबड सुरू झाली. इतकी, की ओल्या लंगोटावरच मी हाफपँट घातली. घरी येईस्तोवर सबंध हाफपँट भिजली होती.

आमच्या गच्चीवर वाळवणे घालण्याची लगबग चालू होती. करंकाळ काकू गहू आणि मिरच्या पसरत होत्या. ज्योत्स्नाताई त्यांना मदत करीत होती. आता हिचा इथे काय संबंध? आणि तिच्या घराला स्वतंत्र वेगळी गच्ची होती की.

मी कपडे बदलतोय तोवर समीरदादाही वाळवणे घालायला गेला. एवढीशी वाळवणे घालायला अर्धा तास? मी तर कंटाळून गेलो. मग मी लायब्ररीचे पुस्तक काढून वाचत बसलो. त्या दुपारी ज्योत्स्नाताई जेवायला आमच्याकडेच होती. आईने तिला एकदा ये जेवायला असे म्हटले होते म्हणे.

संध्याकाळी लायब्ररीत पुस्तक बदलायला जायचे होते. येतोस का विचारले तर समीरदादा म्हणाला "जा तूच, मला कंटाळा आला". मग मीच आपला सायकल हाणीत लायब्ररीत गेलो. तिथे मला जोश्यांचा संदीप दिसला. खरेतर त्या दिवशी खेळ टाकून निघून गेला म्हणून मी त्याला कत्र्याच करणार होतो, पण म्हटले राहू द्यावे. कोण कधी उपयोगी येईल सांगता येत नाही. तसा तो उपयोगी आला आज. त्याच्याकडे एक कात्रण होते, ज्यात दारासिंग-किंगकाँग लढतीचे चित्र होते. आता भाऊ-भाऊ आपापसात लढतात, पण बाप कधी मुलाशी लढतो का? म्हणजे पालव्यांच्या राजूचे नाक कापायला बरी माहिती होती. मी ते कात्रण वीस गोट्यांच्या बदल्यात विकत घ्यायचे कबूल केले आणि घरी आलो.

घरी समीरदादा नव्हता. आईला विचारले, तर म्हणाली "जरा फिरून येतो म्हणून गेलाय". च्यामारी! मी विचारले की कंटाळा, आणि मग एकटाएकटा जायला बरा उत्साह येतो.

त्या रात्री गच्चीवर झोपायला समीरदादा लौकर येईचना. आमच्याकडच्या टेपरेकॉर्डरवर तो कुठलीशी हिंदी गाणी ऐकत बसला. मला ती मुकेश का कोण तो त्याची गाणी मुळीच आवडत नाहीत. सर्दी झालेल्या रेड्याने चिंचा खाऊन घसा बसवून घ्यावा तसा तो आवाज. ज्योत्स्नाताई  ती गाणी तिच्या घरी कायम ऐकत बसलेली असे, आणि मला ते मुळीच आवडत नसे. आता समीरदादाकडे ही गेंगाणी गाणी कुठून आली न कळे.

एव्हाना तात्यांच्या बॅंकेचे इन्स्पेक्शन उरकले होते. मग त्यांनी भगवानशेट अग्रवालांच्या मळ्यात जायचा बेत आखला. भगवानशेटच्या लिंबाच्या बागा होत्या आणि त्यातून पोत्यापोत्याने लिंबे निघत.  एकदा तिथे लिंबाचे सरबत पिऊन पिऊन माझ्या पोटाचा हंडा झाला होता. आणि त्यांच्या बागेत मोठ्ठी विहीर होती जिच्या काठावरून ओरडले की छान प्रतिध्वनी घुमे.

भगवानशेटनी जीप पाठवली होती. त्यात मी आणि समीरदादा पुढे बसलो. मला दरवाज्याकडेला बसू द्यायचे नाही म्हणून समीरदादा तिकडे बसला. बरेच झाले. मला नाहीतरी बाहेर बघण्याऐवजी ड्रायव्हरला निरखायलाच आवडे. मला जमले तर एष्टीत ड्रायव्हर व्हायचे होते. संध्याकाळची मुक्कामी जयगड गाडी घेऊन मी निवळी घाटीतून दणकत चाललो आहे असे स्वप्न मला कायम पडे. या जीपला तर तीनतीन गियरचे दांडे होते. ते कशाला म्हणून त्या ड्रायव्हरकाकांना विचारले तर ते म्हणाले "बरसातीच्या मोसमात चाक फसून जाते नं कधीकधी ते या दोन दांड्यांनी निघून येते नं". फारसे कळले नाही.

भगवानशेटच्या बागेत खूप मज्जा आली. लिंबांचा एवढा मोठा ढीग समीरदादाने पहिल्यांदाच पाहिला. आणि ती विहीर तर...  बदलायला कपडे आणले असते तर पोहता आले असते अशी हळहळ त्याने पुनःपुन्हा व्यक्त केली.

बागेत हिंडून झाल्यावर भेळभत्ता आणि लिंबाचे सरबत असा बेत होत. मागच्या अनुभवाने शहाणा झालेला असल्याने मी तीनच भांडी सरबत प्यायलो. पण पोटाचा फुगा झाल्यासारखे वाटले ते वाटलेच.

गप्पा मारताना "पुढचा बेत" या विषयावर समीरदादाने "इंजिनियरिंगला मिळाली तर ठीक, नाहीतर पुण्यात जाईन फर्ग्युसनला बी एस्सी करायला" असे उत्तर दिले. हे फर्ग्युसन कुठून उपटले, आणि काय होते कुणास ठाऊक. पण ते भगवानशेटना ठाऊक होते, कारण त्यांनी पुण्याच्या शेतकी कॉलेजातून शिक्षण केले होते. "मस्त कॉलेज हाए. मेस तर फर्स्ट क्लास. संडेच्या फीस्टला आम्ही जात होते नं कुणाकुणाच्या ओळखी काढून" असे त्यांनी प्रोत्साहन दिले.

परतायला वेळ होऊ लागला तशी समीरदादा जरा अस्वस्थ झाल्यासारखे भासू लागले. अखेर दिवेलागणीला घरी पोचलो. पाच मिनिटे टेकला न टेकला तोच "आलोच" म्हणून समीरदादा पळाला. आता एवढे बागेत हुंदडून अख्खे अंग मोकळे झालेले असताना पाय कशाला वेगळे मोकळे करायला हवे होते? जाऊ देत. मी जोश्यांच्या संदीपकडे ते कात्रण आणायला जायला निघालो. जिना उतरताना मला गच्चीतून काही खसफस ऐकू आल्यासारखे वाटले. भूत? म्हणजे मी तसा भुताला घाबरत नसे उजेडात, पण गच्चीत अंधार होता. मला उगाचच ज्योत्स्नाताईच्या पावडरचा वास आल्यासारखे वाटले. पण मी सरळ खाली निघून गेलो.

त्या रात्री तर समीरदादा बराच वेळ ती हिंदी गाणी ऐकत बसला. मी अगदी कंटाळून गेलो. मग गच्चीवरून परत खाली गेलो तर समीरदादा "हाले दिल हमारा" असले काहीसे मन लावून ऐकत होता. 'दिल' आणि 'हमारा' कळले. तेवढे हिंदी येत होते. पण हाले? हालत असेल तर धरून का ठेवत नाही घट्ट? पण मी तसे विचारले तर समीरदादा नुसतेच कसेनुसे हसला. मलाच वाईट वाटले आणि मी परत वर गेलो.

पुढचे दोनतीन दिवस मलूल गेले.  ज्योत्स्नाताई कुठे गायब झाली होती कोण जाणे.  आणि अचानक फटाके वाजू लागले. ढोल-ताशे कडकडू लागले. निवडणुकांचे निकाल म्हणे जाहीर झाले होते आणि इंदिराबाई हरल्या होत्या. बरे झाले. मला इंदिराबाईंबद्दल फारसे शत्रुत्व असायचे कारण नव्हते, पण ऊठसूट आई त्यांचे नाव घेऊन पुरुषांना टोमणे मारीत असे ते मला बोचे. सारखे आपले "ती एक बाई तुम्हा सगळ्या पुरुषांना भारी पडते आहे" किती वेळ ऐकून घ्यायचे? तात्यांनाही खूप आनंद झाला.  त्या आनंदात त्यांनी गावात 'शोले' आला होता त्याची आम्हा सर्वांसाठी तिकिटे आणली. त्यातले डायलॉग तर माझे आधीच पाठ झालेले होते. शाळेच्या रस्त्यावर गुरुदत्त हॉटेल नावाचे कायम तळणीच्या शिळ्या तेलाचा वास येणारे ठिकाण होते. त्यात अष्टौप्रहर ही कॅसेट किचाटत असे.

आम्ही सिनेमाला निघालो आणि समीरदादा अचानक "आत्ते, दुपारची फोडणीची मिरची बाधली वाटते जरा.... तुम्ही व्हा पुढे, मी आलोच दहा मिनिटांत.... थेटर कुठे आहे ते विचारत येईन बरोबर" असा मागे हटला. दहा मिनिटे कसली, चांगली दुसरी घंटा झाल्यावर तो आला. मी रडकुंडीला आलो. सिनेमाला गेले तर सगळी हालती वा स्थिर चित्रे, अगदी पहिली न्यूजरील आणि रंगीबेरंगी स्लाईडसच्या जाहिरातींसकट, बघितली नाहीत तर मला काहीतरी अपुरे राहिल्यासारखे वाटे. त्या दिवशी आम्ही आत गेलो आणि सिनेमा सुरूच झाला.

पण समीरदादा खूश दिसत होता. मध्यांतरात बाहेर जाऊन त्याने सगळ्यांसाठी खारे शेंगदाणे आणले. आईला सिनेमा फारसा आवडला नाही. त्या 'मेहबूबा मेहबूबा' गाण्याच्या वेळेला तर "पैसे मोजून असल्या निलाजऱ्या बायांना नाचताना का पाहायला यायचे? त्यापेक्षा घरी बसलेले काय वाईट? " हे आणि असे बोलणे तिने गाणे संपेपर्यंत चालू ठेवले. पण शेवटी गब्बरसिंग सापडल्यावर मात्र तिने दबक्या आवाजात "हाण मेल्याला. डुकरासारखा पिसाळलाय नुसता" म्हटलेले मला स्वच्छ ऐकू आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोहून येतो तो ज्योत्स्नाताई हजर. "कौस्तुभराव, आठवीचा अभ्यास आत्तापासूनच सुरू करायला हवा.  वर्गात पहिले यायचे आहे ना? मी घेईन तुझा अभ्यास. " आता हिला हे नसते धंदे कुणी सांगितले होते? नसेल यायचे मला पहिले वर्गात. हिचे काय जात होते? आणि मुळात मला शिकवणारी ही कोण? स्वतःला येत नाही साधी दोन कोडी सोडवता आणि मला शिकवणार. अंबाडा घातला, पावडर फासली आणि दहावीची परीक्षा दिली म्हणजे काय शिंगे फुटली तिला की शेपूट? आणि शिकवायचेच असेल तर दहावी नव्हे, चांगली बारावीची परीक्षा देऊन आलेला समीरदादा होता की माझा.

पण तो गप्प बसला. आणि आईने हा प्रस्ताव सहर्ष मान्य केला. "घे हो अभ्यास त्याचा. तो संतांचा सुमंत नववीत जाईल ना आता, त्याची पुस्तके आणा आत्ताला. शाळा सुरू झाल्यावर नवीन आणू". झालेच. आता कोंकणात जाईपर्यंत काही खरे नव्हते. तिन्ही त्रिकाळ अभ्यासच करायचा तर शाळांना सुट्या का देतात? घ्या. कायम अभ्यास घ्या. रविवारचीपण सुटी देऊ नका. रोज दोडक्याची भाजी खायला घाला. भाजी तरी कशाला, नुसता दोडका उकडूनच द्या ना....

तात्या घरी होते. मी रागारागाने पाय आपटत त्यांच्यापर्यंत तक्रार पोचवली. पण त्यांनी अगदी किरकोळीतच ती निकालात काढली.  हळू आवाजात ते म्हणाले,  "अरे बिट्या, काय जमेल तेवढा कर अभ्यास. अगदी कंटाळाच आला तर हळूच मारायची बुट्टी. बिटूशेठ, तोंडाने कधी 'नाही' म्हणायचे नाही एवढे शिका! ". मला एकदम मोकळे वाटले.

अभ्यास म्हणजे काय, तर ज्योत्स्नाताई काहीतरी पुस्तकातून समजवायला सुरुवात करे, आणि तिचाच कुठेतरी समजुतीचा घोळ होई. मग समीरदादा येई आणि तिला समजवायला बसे. मी राही बाजूलाच. नंतर नंतर माझ्या लक्षात आले, की गोष्टी इथवर पोचल्या, की मी "पाणी पिऊन येतो" असे म्हणून पळालो आणि उशीराने आलो तरी चाले. नंतर असेही कळले, की परत नाहीच आलो तरीही चाले. ह्यॅं! एवढे सोपे होते तर. सकाळी 'अभ्यासाला' सुरुवात करून दिली की पाचदहा मिनिटांत मोकळा.

एकदा अशीच अभ्यासाला सुरुवात करून दिली आणि मी पालव्यांकडे पळालो. तर उज्जूताईने धरले आणि समीरदादाबद्दल खोदून खोदून माहिती विचारू लागली. "त्यादिवशी झाडावरून कुदून दिलं म्हणे त्यानं? " "दिवड भारी विषारी असते नं? " असले प्रश्न विचारत राहिली. मी अगदी कंटाळून गेलो.

एकदा तर अभ्यास सोडून ते दोघेही बाहेर निघाले. मी विचारले कुठे, तर म्हणे "काम आहे". म्हटलं मीपण येतो, तर म्हणे "नको, उगाच तीन तिघाडा काम बिघाडा होईल". मला शिकवत होते! दगड घेतला असता की बरोबर एक. आणि त्याला आणायला गेलो होतो तेव्हा नाही तीन तिघाडा झाले ते? निमित्ते नुसती.

एकदा तात्या बँकेत जायला निघाले होते त्यांना सोडायला मी खाली गेलो होतो. स्कूटर चालू झाली की हॉर्न वाजवायला मला खूप आवडे. चिर्रर्रर्र अशा आवाजाचा तो हॉर्न अंगावर काटाही आणे आणि मजाही वाटे. तर श्रीकृष्ण कुलकर्णीकाका येताना दिसले. त्यांना तात्यांबरोबर बोलायचे होते बहुधा. कारण त्यांनी "मग, मास्टर कौस्तुभ, सायकल एकदम सफाईने चालवायला लागलात असे ऐकतो. जरा बघू तरी" असे म्हणून मला सायकलवर चक्कर मारायला जायला भागच पाडले. मी परतलो तर ते काहीतरी बोलत उभे होते. तात्यांनीही मला कधी नव्हे ते "चला, वर पळा अभ्यासाला" असे सांगून पिटाळले.

वर आलो तर त्या दोघांचा अभ्यास अगदी बंद होता. दोघेही मी दिसल्याबरोबर घुम्यासारखे बसले. समीरदादाचा चेहरा लाल झाला होता आणि ज्योत्स्नाताईच्या गालावरची खळी नाहीशी झाली होती. आधीची कुजबूज जी काही चालू होती त्यात "मग जा आणि सांग त्या उज्ज्वलाला चिवडे नि फिवडे करून द्यायला" असे काहीसे होते. दोघेही फुलदाणीतल्या फुलांसारखे शेजारी शेजारी पण गप्प गप्प बसले. शेवटी शेपूट फलकारीत मांजराने निघून जावे तसे वेणीचे शेपटे उडवीत ज्योत्स्नाताई निघून गेली.

छे. कोंकणात कधी जाणार होतो देव जाणे. मला आता फारच कंटाळा यायला लागला. आणि आम्ही जाईपर्यंत करवंदे शिल्लक असतील का, काजूची बोंडे मिळतील का, भाजीचे फणस असतील का असे प्रश्न फारच छळू लागले. मी जाऊन आईमागे भुणभूण सुरू केली. तीपण या उन्हाळ्याला वैतागलेली दिसली. "जायचे ठीक आहे, पण राहायचे कुठे? तुझ्या दिगंतकीर्ती काकांनी घर उलगडून ठेवलेय ना? आणि कामाला उरका म्हणून नाही. रेंगाळताहेत मेंगळटासारखे. म्यॅट्रीक की फ्यॅट्रीक होऊन काय फायदा? आता गेलो तर राहायचे कुठे? लक्ष्मीनारायणाच्या देवळात? " असा तिचा चढा सूर लागला. हे ठीक झाले. संध्याकाळी तात्यांना "कधी जायचे? " विचारताना आई तरी माझ्या बाजूने आली असती.

संध्याकाळी तात्यांनी स्वतः होऊनच विषय काढला. आईने "कामाचा उरका नाही"चे पालुपद लावल्यावर त्यांनी अगदी समजुतीच्या स्वरात "अगं एकटा हात त्याचा, कुठेकुठे चालणार? गडी म्हटले तरी लक्ष ठेवायला घरचा माणूस नको? " असे बोलणे लावले. दहा मिनिटांत 'घरचा माणूस' म्हणून समीरदादाला पाठवायचे ठरले. मला जरा हिरमुसल्यासारखे झाले, पण नाहीतरी तो माझ्या वाट्याला इथे फारसा येतच नव्हता. आणि कोंकणात गेल्यावर होताच की माझ्याबरोबर तो.

त्या रात्री समीरदादा बऱ्याच उशीरापर्यंत झोपायला आला नाही. मी अगदी जडावून डोळे मिटल्यावर आला. आणि रात्रभर कूस बदलत बसला. माझी झोप एवढी गाढ नाहीये काही.

तात्यांनी समीरदादाच्या जाण्याची सोय दोन दिवसांतच केली. ते दोन दिवस समीरदादा कुठेच बाहेर पडला नाही. नुसती गाणी ऐकत आणि काहीतरी खरडून मग कागद फाडत बसला.

निघायचा दिवस आला. त्याला स्टेशनवर सोडायला मीच जाणार होतो. परत ज्योत्स्नाताईलाही घेऊन जावे की काय असा एक विचार मनात आला, पण म्हटले नको उगाच. फक्त स्टेशनला जातानाचा रस्ता थोडा बदलून तिच्या घराच्या कोपऱ्यावरून गेलो. ती त्यांच्या गच्चीवर उभी होती बहुतेक.

स्टेशनवर मी रीतीप्रमाणे समीरदादाच्या पाया पडलो. त्याचे डोळे भरून आले. मला काही कळेना. "अरे तू शूर ना एवढा. किती साप नि विंचू मारणारा. मग रडायला काय झाले? ती नसती गाणी ऐकत बसला होतास ना, म्हणून. आता गेल्यावर छान 'बन्या-बापू' मधलं 'ले लो भाई चिवडा ले लो' ऐक म्हणजे मस्त वाटेल. " त्याने मला जवळ घेतले आणि म्हणाला "लहान आहेस रे बिटुकल्या अजून तू. बरं हे बघ, हे दोन रुपये ठेव तुला खाऊला. आत पुढे जातोच आहे तर अळूची उसरी मिळवून ठेवतो तुझ्यासाठी. आणि ही चिठ्ठी" त्याने एक चतकोर घडीचा कागद काढला "राणीला दे. बोलू नकोस काही, नुसती चिठ्ठी हातात दे". मला संताप आला. राणी? माझे राज्य असते तर तिला राणीची मोलकरीण करून भांडी घासायला बसवले असते. तिच्यामुळेच समीरदादाला परत जायला लागत होते एवढे मला समजले होते. "जाऊ दे रे. तिची चूक नाहीये. तू काही टाकून बोलू नकोस तिला. तुला माझी शपथ. फक्त ही चिठ्ठी दे. आणि ती काही बोललीच तर म्हणावं विसरून जा सगळं जमलं तर". मी मान हालवली.

दुसऱ्या दिवशी ज्योत्स्नाताई आजोळी पारोळ्याला की पाचोऱ्याला गेली. मग ती मंडळी काश्मीरला गेली.  आणि अकरावीला ज्योत्स्नाताई परत पुण्याला गेली. मी ती चिठ्ठी दिलीच नाही. नाहीतरी तिला काही टाकून न बोलण्याची शपथ होती, चिठ्ठी देण्याची नव्हे.

आबाकाकांना समीरदादाने चांगलीच मदत केली. घर झकास आणि हवेशीर झाले.

समीरदादा मुंबईला जाऊन इंजिनियर झाला आणि अमेरिकेत गेला. आता तो नागरिकत्व पत्करून बॉस्टनला स्थायिक झाला आहे. अधूनमधून फोन असतो. परवाच फोन आला होता सलील बापाच्या पावलावर पाऊल टाकून इंजिनियर झाला म्हणून. सलील नाही भेटला फोनवर. पण त्याची आई भेटली. खुशीत होती ज्योत्स्नावहिनी!