२९. शरीर

शरीर या जीवनातल्या अत्यंत मध्यवर्ती विषयावर  माझं हे लेखन आहे. लेखनाचा हेतू, ज्यांना ते पटेल त्यांना : शरीराबरोबर मजेत कसं जगावं, शरीराविषयी नक्की काय दृष्टिकोन असावा आणि शरीर ही कशी कमालीची साधी आणि अफलातून रचना आहे  हे समजावं असा आहे. हा शरीराचा विश्लेषणात्मक अभ्यास नाही तर सत्य समजलेल्या व्यक्तीचं रोजच्या जगण्याला उपयोगी व्हावं असं शरीराचं आकलन आहे. तुमचे विधायक प्रतिसाद उपयोगी होतील.

एक, आपण शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहोत. आपल्याला आपण केवळ शरीराच्या आत आहोत असं वाटतं पण वस्तुस्थिती तशी नाही, हे शरीर समजून घ्यायला अत्यंत महत्त्वाचं आहे.

मूल जन्मल्यावर त्याचं पहिल्यांदा जेव्हा लक्ष वेधलं जातं तेव्हा त्याला ‘आपण आहोत’ ही जाणीव होते आणि मग कुठे आहोत? तर शरीरात, अशी जी सुरुवात होते ती मग शेवटापर्यंत तशीच राहते.

आपण शरीराच्या आत आहोत म्हणून बंदी झालोत असं वाटतं आणि शरीराचं ओझं वाटतं. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहोत याची नुसती दखल घेणं जगण्याचा सगळा रंग बदलतं, तुमचा मूड दिवसभर एकदम लाइट राहतो.

दोन, शरीर हे केवळ तीन मूलभूत प्रक्रियांनी सक्रिय आहे: श्वसन, अभिसरण आणि उत्सर्जन. या तीन प्रक्रिया जर सक्षम असतील तर पूर्ण शरीर आरोग्यदायी राहतं.

श्वसन उत्तम राहण्यासाठी दोन अत्यंत सोपे उपाय आहेत एक : प्राणायाम (भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोमविलोम) आणि दोन खेळ (टेबलटेनीस सर्वोत्तम).

खेळणं व्यायामापेक्षा जास्त उपयोगी आहे कारण व्यायाम बंधन वाटतो, खेळाचं तसं नाही आणि चांगला ग्रुप असेल तर खेळणं दिवसाची धमाल सुरुवात करतं. प्राणायाम आणि खेळ श्वसन उत्तम ठेवतात. टेबलटेनीस हा मन आणि शरीर (विशेषतः डोळे) यांचा सहज समन्वय साधून देणारा हलका आणि वर्षभर, कोणत्याही वेळी आणि ऋतूत खेळता येणारा खेळ आहे. टेबलटेनीस इच्छा असेल तर कोणत्याही वयात शिकता येतं.

अभिसरणासाठी योगासनाला पर्याय नाही. (१) पोटावर दाब येईल अशी आसनं (वज्रासनात हाताच्या मुठी पोटाशी ठेवून कपाळ समोर जमिनीला टेकवणं), (२) मांडी घालून बसून शरीराच्या वरच्या भागाचं रोटेशन (पिंगा), (३) त्याच स्थितीत मानेचं रोटेशन, (४) त्याच स्थितीत पावलांचं रोटेशन (५) खांद्यांचं रोटेशन आणि (६) बसून किंवा उभ्यानं पायाचे अंगठे धरणे या सहा प्रक्रियांनी संपूर्ण शरीर लवचीक ठेवून अभिसरण उत्तम ठेवता येतं आणि ते उत्सर्जनाला अत्यंत उपयोगी ठरतं.  

उत्सर्जन ही क्रिया सर्वस्वी: (१) शरीराची लवचीकता, (२) भरपूर आणि अनेकवेळा पाणी पिणे (३) श्वसनाचा जोम आणि (३) शरीराला रुचेल असा पूर्ण समाधान देणारा आहार यावर अवलंबून आहे.

श्वसन, अभिसरण आणि उत्सर्जन या तीन प्रक्रिया उत्तम असतील तर पूर्ण मानसिकता विधायक होऊन इंडोक्राईन सिस्टिम (ग्रंथीस्त्रावाची प्रक्रिया) सक्षम राहते आणि कायम उत्साह वाटतो. उत्साह हा आरोग्याचा एकमेव मानदंड आहे.

संपूर्ण शरीर  हे अन्नाचं रूपांतरण असल्यामुळे अत्यंत मनस्वी आहार हा जीवनातला फार मोठा आनंद आणि आरोग्याचा आधार आहे. आहार या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा आणि संपूर्ण दुर्लक्षित घटक भूक आहे. मला या विषयावर अजिबात चर्चा करावीशी वाटत नाही पण मी अत्यंत निश्चिंतपणे सांगू शकतो की भूके ऐवजी वेळ हा भोजनाचा आधारभूत घटक केल्यानं आणि चव या नैसर्गिक संवेदने एवजी घटक पदार्थांचं विश्लेषण करत बसल्यानं भोजनातली मजा संपली आहे.

विश्रांतीचं मुख्य सूत्र मानसिक प्रक्रिया जवळजवळ थांबणं हे आहे, झोपण्यापूर्वी सर्व कामं होताहोईल तो संपवणं हा मानसिक प्रक्रिया चालू न राहण्याचा एकमेव मार्ग आहे; न झालेली कामं माणूस मनानं करत राहतो हे विश्रांती न मिळण्याचं कारण आहे.  

तुम्ही माना किंवा किंवा मानू नका, निसर्गाचा सर्व प्रयत्न पुनर्निर्मीती आहे त्यामुळे सक्षम शरीरात प्रणयाची शक्यता नेहेमी जागृत असते. प्रणयाची ही क्षमता माणूस सृजनासाठी वापरू शकतो मग ते गाणं असेल, कविता असेल, गद्य लेखन असेल किंवा चित्रकला असेल, ज्यात तुम्हाला गती आणि रूची आहे अशा कोणत्याही प्रकारचं सृजन तुम्ही करू शकता.

आपण शरीर झालो नाही किंवा होत नाही, आपल्याला ‘शरीर आहे’ ही संवेदना आहे. निसर्गानी शरीर हे आपल्याला दिलेलं साधन आहे त्याचा सृजनासाठी, अभिव्यक्तीसाठी आणि मजेत जगण्यासाठी उपयोग करा.

संजय