भारतातून निघण्यापूर्वीच मला येथील 'गोऽरुदेन वुइक्कु' (गोल्डन वीक) चे वेध लागले होते. जपानमधे एप्रिल अखेर व मे च्या पहिल्या आठवड्यात बऱ्याच सुट्या जोडून असल्याने त्याला 'गोल्डन वीक' असे म्हटले जाते. याची सुरुवात होते २९ एप्रिल 'मिदोरी नो हि' - हिरवाई दिवसापासून. मग ३ मे - 'केंपोकिनेनबी '- जपानची घटना कार्यान्वयित झाली तो दिवस, ४ मे - 'कोकुमिन नो क्योऽजित्सु' - दोन सुट्यांमधला दिवस. इथे कायद्याप्रमाणे २ सुट्यांमधल्या दिवशीही सुटी द्यावी लागते, ५ मे- 'कोइनोबोरी' - मुलग्यांचा सण आणि शनिवार -रविवार धरून सलग ५-६ दिवस सुटी मिळते. हा आठवडा म्हणजे रात्री उशीरापर्यंत काम करणाऱ्या लोकांसाठी मौजमजा करण्याची पर्वणीच असते.
मागच्या वेळी जपान मधे असताना तोक्योतील महत्त्वाची ठिकाणे म्हणजे तोक्यो टॉवर, शिबा बाग, आसाकुसा काननोन मंदिर, गोल्डन पूल वगैरे पाहून झाल्याने यावेळी कुठे जावे असा प्रश्न होता. सलग सुटी असल्याने क्योतो-नारा ला जाता आले असते पण सुट्यांमुळे सर्व ट्रेन, विमाने, महामार्ग गर्दीने ओसंडून वाहत असल्याने जवळच कुठेतरी जाण्याचे ठरविले. १ दिवसात परत येण्यासारखे ठिकाण म्हणून 'कामाकुरा' ची निवड केली. 'कामाकुरा' तोक्यो स्टेशन पासून साधारण १ तासाच्या अंतरावर असून मी राहते त्या ठिकाणाहून पाउण तासाच्या अंतरावर आहे. 'कामाकुरा' प्रसिद्ध आहे 'दाईबुत्सु' अर्थात बुद्धाच्या महाकाय मूर्ती साठी. १२व्या शतकापासून १५ व्य शतकापर्यंत 'कामाकुरा' जपानची राजनैतिक, सांस्कृतिक राजधानी होती. कामाकुरा आणि आसपासच्या देवळांची संख्या पाहता, कामाकुराला क्योतो ची छोटी छबी म्हटले जाते.
'कामाकुरा' ला जाणे पक्के केल्यावर माहितीजालावरून कसे आणि कुठे जायचे याची माहिती मिळविली शिवाय सोबतीला कार्यालयातील एक जपानी बाई, हाताकेयामा सान आणि तिचा ७ वर्षांचा मुलगा श्युऽतारो च्यान असे दोघे होते. सकाळी ९.३० ला आम्ही प्रवासाला सुरुवात केली. 'योकोहामा' स्टेशनावर 'कामाकुरा-एनोशिमा फ़्री तिकीट' काढल्याने आम्हाला योकोहामा-कामाकुरा-योकोहामा, शिवाय कामाकुरा व आसपासचा परिसर फिरण्यासाठी 'एनोदेन' रेल्वे किंवा मोनोरेल चा कितीही वेळा वापर करता येणार होता. (कामाकुराला पोचल्यावर एकंदर गर्दी पाहता आम्हाला हे तिकीट काढण्याची सद्बुद्धी देण्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानले). योकोहामापासूनच ट्रेन अगदी खचाखच भरली होती.
'कामाकुरा' ला पोचल्यावर आम्ही तडक 'कामाकुरा' मंदिराच्या दिशेने निघालो. मागच्या वेळी २-४ देवळे पाहिल्याने यावेळी वसंत ऋतुतील सृष्टीसौंदर्य बघण्याचा मानस होता. मंदिराकडे जाणारा रस्ता म्हणजे रस्त्याच्या मधोमध असलेला पदपथ असून, पदपथाच्या दुतर्फा 'साकुरा' (चेरी) ची झाडे आहेत. माझ्या दुर्दैवाने साकुराचा बहर कधीच ओसरल्याने एकाही झाडावर साकुराचे फूल नव्हते. पण अगदीच नाही म्हणायला दुतर्फा 'त्सुत्सुजी' ची फुलझाडे बहरली होती.
कामाकुरा देऊळ इतर जपानी देवळांप्रमाणेच लाल-सोनेरी रंगाचे पॅगोडा पद्धतीचे बांधकाम असलेले आहे. देवळात जायच्या आधी इथे हात आणि तोंड धुऊन आत जाण्याची पद्धत आहे.
देवळात आत शिरताना दोन बाजूला आपल्याकडील जय-विजय प्रमाणे रक्षक आहेत.
देवळाच्या गाभाऱ्यात जाळी ठोकल्याने आत नक्की काय आहे ते मात्र दिसू शकले नाही. नमस्कार करून आम्ही देवळातून बाहेर पडलो आणि मंदिराच्या परिसरातील 'बोतान बाग' बघायला गेलो. बोतान ही डेलियाच्या जवळपास जाणारी फुले असून या बागेतील लाल, पिवळा, लव्हेंडर, किरमिजी, पांढरा असे डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगातील फुले पाहून मन प्रसन्न झाले. बागेतील हिरवळ खूप थंडावा देत होती.


इथून बाहेर पडल्यावर मात्र उन्हाचे चटके बसायला लागले आणि भुकेने कावळे ही कोकलायला लागले. अतिशय अरुंद रस्त्यावरून भरपूर गर्दीतून वाट काढत कुठे खाण्यायोग्य ठिकाण मिळते का ते शोधू लागलो. अनेक ठिकाणी चौकशी केल्यावर कुठेही शाकाहारी खाद्यपदार्थ मिळत नसल्याने अखेर आम्ही 'मॅक डी'त शिरलो आणि त्यांना बीफ वगैरेचा तुकडा काढून नुसते चीज बर्गर देण्याची विनंती केली. पण माझी किव आल्याने माझ्या बरोबरच्या जपानी बाईने तिथल्या सुंदऱ्यांशी चर्चा करून माझ्यासाठी ग्रीन सॅलडही घेतले. अशा रितीने ग्रीन सॅलड, चीज बर्गर, बटाट्याच्या सळ्या आणि सफरचंदाचा ज्युस असे शब्दशः उदरभरण करून आम्ही पुन्हा कामाकुरा च्या 'एनोदेन' रेल्वे स्टेशनाकडे निघालो.
आता पुढे 'दाईबुत्सु' व 'हासेदेरा' बघायला 'हासे' या ठिकाणी जायचे होते. स्टेशनावरची तिकिट काढण्यासाठीची गर्दी पाहून आमच्याकडे पास आहे या आनंदात आम्ही फलाटावर गेलो खरे पण तिथे प्रत्येक डब्यापासच्या ३-३ च्या रांगा पाहून आमचा आनंद काही क्षणातच मावळला. लगेचच 'एनोदेन' ट्रेन आली. पण उतरणाऱ्यांचे प्रमाण आणि चढणाऱ्यांचे प्रमाण पाहता बराच वेळ शाळेतल्या कवायतीसारखे ३-३ च्या रांगेत उभे रहावे लागणार असल्याचे एव्हाना आमच्या लक्षात आले. पुन्हा ५ मिनिटांनी एक ट्रेन आली आणि बरेच लोक उतरल्याने आमच्या आशा पल्लवीत झाल्या. पण याहीवेळी ट्रेन मधे अगदी थोडक्यासाठी चढता आले नाही. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात आम्ही ट्रेनमधे चढण्यात यशस्वी झालो. पण हा जिंकल्याचा आनंद फार थोडे क्षणच टिकला कारण ट्रेनमधून काही जण उतरले असले तरी त्याच्या दुप्पट लोक आत चढले होते. कसेबसे 'हासे' स्टेशन आले आणि आम्हाला उतरण्यासाठी फारसे कष्ट करावेच लागले नाहीत. आम्ही आपोआपच फलाटावर ढकलले गेलो. फक्त इथे धक्काबुक्की, मारामारी, शिव्यागाळ यांची उणीव होती. आणि ट्रेनचे दरवाजे बंद होत असल्याने इथे मुंबईसारखे लोंबकळणारे प्रवासी न दिसल्याची खंत वाटली. बाकी स्वतःला सर्वात आधी फलाटावर उतरायचे असण्याची वृत्ती इथेही दिसून आली.
'हासे' स्टेशनातून बाहेर पडल्यावर बघतो तर काय रस्त्यावर हीऽऽ गर्दी आणि रस्ते पुण्यातल्या रस्त्यांपेक्षाही अरुंद ! आम्ही मुंगीच्या पावलाने पुढे सरकत सरकत अखेर 'दाईबुत्सु' पाशी पोचलो.
आत शिरल्यावर लगेचच बुद्धाचा ३७ फुटी, १२१ टन वजनाची कास्य धातूचा पुतळा दिसला. हा पुतळा असलेले मंदिर १३व्या शतकात बांधण्यात आले होते पण १५व्या शतकाच्या अखेरीस त्सुनामीमुळे इथले मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हा पुतळा मात्र सुरक्षित राहिला तो आजतागायत उन-वारा-पाऊस-बर्फ झेलत आहे. बुद्धाचा विलक्षण शांत चेहरा पाहून समाधान वाटले.
जवळच बुद्धाच्या महाकाय सपाता टांगून ठेवण्यात आल्या आहेत.
बुद्धाच्या पुतळ्याखाली गुहेवजा एक खोली आहे. आत जाऊन पाहण्याचा मोह होत होता पण ती पाहण्यासाठी लोकांची मारुतीच्या शेपटाप्रमाणे लागलेली रांग पाहून मोह आवरता घेतला. मग थोडावेळ तिथेच जपानी युवक-युवतींचे फोटो काढतानाचे माकडचाळे पाहून आम्ही 'हासेदेरा' (हासे मंदिर) कडे कूच केले.
'हासेदेरा' हे छोट्या टेकडीवर बांधले आहे. पायथ्याला तळे, बगीचा आणि पायऱ्या चढून वर गेल्यावर माथ्यावर देऊळ असे स्वरूप आहे.
संपूर्ण वाटेवर दुतर्फा सुंदर फलझाडे आहेत.
माथ्यावर पोचल्यावर मुख्य देऊळ लागते ते एकादशमुखी 'काननोन कामिसामा' (goddess of mercy अवलोकितेश्वर(री?)) चे. प्रत्येक मुखावर वेगळे भाव असलेली ही मूर्ती भारतीय धाटणीची होती. शेजारचे देऊळ 'आमिदा-न्योराई' (अमिताभ बुद्धाचे) चे आहे. त्याशेजारी 'दाईकोकुतेन' अर्थात 'महाकाल' चे देऊळ असून सर्वात शेवटच्या देवळात जिथे बुद्धाची सुत्रे/मंत्र लिहिलेली पुस्तके ठेवली आहेत असे 'रिंझो' (एक लाकडी कपाट) आहे. असे म्हणतात की ते कपाट नुसते जरी फिरविले तरी त्यातील काही सुत्रे वाचण्याइतके पुण्य लाभते.
तिथेच जवळ एका बाजूला 'जिझो' देऊळ आहे.जन्मण्यापूर्वीच मृत्यु पावलेल्या अर्भकांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून तिथे अनेक पुतळे रचले आहेत.
नंतर टेकडीच्या एका टोकापासून दिसणाऱ्या अथांग निळ्या सागराचे सुंदर रूप डोळ्यात साठवून आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यावर पायथ्यापासच्या एका गुहेत अष्टभुजा 'बेनझाईतेन' (सरस्वती) चा पुतळा खोदलेला पाहिला आणि आम्ही 'हासेदेरा' चा निरोप घेतला. आता पुन्हा 'हासे' स्टेशन गाठून 'एनोशिमा' ला जायचा बेत होता. पुन्हा एकदा कवायत आणि कसरत करत आम्ही एकदाचे एनोशिमा कडे जाणाऱ्या एनोदेन ट्रेन मधे चढलो आणि एनोशिमा स्टेशन ला पोचलो.
'एनोशिमा' हे ४ कि.मी. वर पसरलेले एक छोटेसे बेट असून एनोशिमा स्टेशन आणि त'एनोशिमा' बेट यांना साधारण अर्धा कि.मी. लांबीचे चे फक्त (एक पादचारी पूल व एक वाहनांसाठीचा पूल) २ पूलच काय ते एकमेकांना जोडतात. त्सुनामी सारखी भीषण आपत्ती ओढवल्यास इथे काय होईल याचा विचारही करायला नको ! असो.
आम्ही एनोशिमाला आलो ते इथले 'एनोशिमा जिंज्या' (एनोशिमा देऊळ) आणि मत्स्यालय पहायला. एनोशिमा सी-फूड साठी खास प्रसिद्ध आहे म्हणे. दिवसभर चालून चालून थकल्याने आम्ही थोडा वेळ त्या पुलावर विश्रांतीसाठी थांबलो. पाय थांबले म्हणताच तोंड चालू होणे आवश्यक असल्याने मी भारतातून घेऊन आलेले शंकरपाळे पोतडीतून बाहेर काढले. 'आमाई ओकाशि' (गोड खाऊ) आहे म्हटल्यावर जपानी बाईने जरा भीतभीतच एक शंकरपाळा उचलला. मग मात्र 'ओइशिइ ओइशिइ' (चविष्ट) म्हणत तिने आणि श्युऽतारोने आणि मी लगेचच सगळे फस्त केले. यावेळी तिने मला 'इन्दोऱ्योरी' (भारतीय जेवण) किऽऽऽती 'खाराइ' (तिखट) किंवा किऽऽऽती 'आमाइ' (गोड) असते याची टेप वाजवून दाखविली. मग मीही संधीचा फायदा उठवत तोक्यो मधल्या एका 'कारे राइसु' (करी राइस) हॉटेलात किऽऽऽती तिखट 'कारे राइसु' मिळतो आणि मी भारतीय (जपन्यांपेक्षा कित्येक पटीने तिखट खाणारी) असूनही तो 'कारे राइसु' कसा खाऊ शकले नाही याचे 'तिखट'रसभरीत वर्णन करून तिला 'बिक्कुरी' (आश्चर्यचकीत) व्हायला लावले शिवाय 'खाराइ' असूनही भारतातील 'बिर्याणी' आवडते हे तिच्याकडून कबूल करून घेतले तेव्हाच एनोशिमाकडे जाण्यासाठी तिथून उठून उभी राहिले.
'एनोशिमा' बेटावरील रस्ता अगदी अरुंद आणि चढणीचा होता. दुतर्फा सी फूड विकणाऱ्यांची दुकाने, भेटवस्तूंची दुकानांनी गजबजून गेला होता. आम्ही तडक 'एनोशिमा जिंज्या' मधे गेलो. इथे साधारण पुण्याच्या पर्वतीसारखी परिस्थिती होती. बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर अखेर मूळ देऊळ आले.
इथेही नेहमीप्रमाणे बरीच देवळे होती आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे देऊळ म्हणजे 'बेनझाइतेन' म्हणजे सरस्वतीचे देऊळ. जपानमधे ज्याप्रमाणे भारत-चीन प्रवास करून बुद्ध धर्म येऊन थडकला त्याप्रमाणे भारतातील बरेच देवही इथे येऊन पोचले. 'शिचिफुकुजिन' (7 gods of good fortune) मधे हिंदू देवांनाही स्थान मिळाले आहे. 'बेनझाइतेन' (सरस्वती), 'बिशामोनतेन' (वैश्रवेण), 'दाइकोकुतेन' (महाकाल), 'एबिसुतेन', 'होतेइ' (चिनी झेन संन्यासी पु ताइ जो मैत्रेयाचा अवतार मानला जातो), ज्युरोऽजिन, फुकुरोकुजिन अशी त्या सात देवांची नावे आहेत. पण आमच्या दुर्दैवाने वेळ संपून गेल्याने सर्व देवळे तसेच मत्स्यालयही बंद होते. मग डोंगर माथ्यावरच थंडीने कुडकुडत तिथली वनश्री, निळाशार समुद्र बघत थोडावेळ काढल्यावर परतीचा रास्ता पकडला.
आता यावेळी इतके थकायला झाले होते की एनोदेन रेल्वे ने गर्दीतून उभे राहून कामाकुरा पर्यंत जाणे आणि तिथून योकोहामा आणि तिथून पुढे आपापल्या घरी जाणे एव्हढा मोठा प्रवास गर्दीतून करण्याचे त्राणच उरले नव्हते. म्हणून आम्ही एनोशिमा-ओऽफुना 'मोनोरेल' चा पर्याय निवडला. 'मोनोरेल' म्हणजे केबल कार. पहिल्यांदाच मोनोरेलने प्रवास करत होते. पण बाहेर अंधार पडल्याने काहीही दिसत नव्हते. मस्त ऐसपैस बसायला मउमउ सीट आणि बाहेर अंधार म्हणल्यावर एक डुलकी काढणे पसंत केले. मग ओऽफुना पासून 'तोऽकाइदोऽ रेल्वे' ने योकोहामाला लिघालो. ती रेल्वे योकोहामाच्या पुढे मी राहते तिथे 'कावासाकी' पर्यंत जात असल्याने माझ्या साथीदारांनी योकोहामालाच माझा निरोप घेतला. योकोहामा स्टेशन आधी भरगच्च आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम आम्ही दोघींनीही केला आणि सर्वांनी आपापल्या घराचा रस्ता पकडला.