मी व समस्त मार्जार जमात...म्यॅव म्यॅव

(खालील लिखाण हे समस्त मार्जार प्रेमींची माफी मागून करत आहे.तरी ह. घ्या.)
तसे ही माझे व मांजर ह्या प्राण्याचे हे फार पुर्वी पासूनचे वाकडे आहे. म्हणजे मला फार लहानपणापासूनच मांजराची फार भीती वाटते. ही भीती म्हणजे साधी सुधी भीती नसून "दहशत"म्हणावी इतकी आहे. म्हणजे मांजर जरी १० फुटावर दिसले तरी घशाला कोरड पडणे, हात पाय गार पडणे, पोटात गोळा येणे असले सगळे प्रकार सुरू होतात. खरे तर ही भीती आता परदेशी भाषेतील "फोबिया" या प्रकारात येऊन विसावली आहे.ह्या भीती मागचे कारण शोधायचा प्रयत्न केला असता असा निष्कर्ष निघाला की लहानपणापासून जितके भयपट बघितले त्या सर्व चित्रपटात मांजर हे नेहमीच भुताचे प्रतीक म्हणून दाखवण्यात येत असे.त्यामुळे मांजर आणी भुताचे फार जवळचे नाते आहे असे डोक्यात फार घट्ट बसले आहे.तसेच अजून एक कारण म्हणजे लहानपणी ज्या वसतीग्रहात रहात होते तेथे मांजरा संबंधीच्या अफवा रोज जन्माला येत जसे एक बोलणारे मांजर आहे.ते रात्री आपल्याला एकटे गाठून आपल्याशी गप्पा मारते..एक ना दोन अश्या अनेक गोष्टी ऐकत आम्ही मोठ्या झालो.


      त्यातुन नवरा मिळाला तो मांजरांबरोबर वाढला असे म्हटले तरी चालेल असा! त्याला मांजरांविषयी इतके प्रेम की जेवताना शेजारी मांजर,झोपताना अंथरुणात मांजर, दूरचित्रवाणी संच बघताना मांडीत मांजर अहो एव्हढे कमी म्हणून की काय पण पूजा करताना सुद्धा पुढ्यात मांजर घेऊन बसायची सवय.मला तर त्यांच्या घरात पाय ठेवताना जीव मुठीत धरूनच बसावे लागे.मग सरळ एक दिवस सहनशक्ती संपल्यावर मी त्याला एक तर मांजर तरी निवड किंवा मी तरी ह्या धमकी वर निर्णय घेण्यास भाग पाडले. तेंव्हा जरी मी थोड्या काळासाठी सुटकेचा श्वास टाकला असेल तरी ह्या भीतीने काही माझा पाठलाग सोडलेला नाही.


सध्या राणीच्या देशात माझे वास्तव्य आहे.आम्ही ज्या परिसरात राहतो त्याला लंडन रोड असे नाव आहे. हा परिसर म्हणजे साधारण पुण्याच्या भांडारकर रस्ता वा प्रभात रस्ता ह्याला मिळताजुळता आहे. भली मोठी बंगल्यांची रांग आणी त्यात आमची एकमेव उंच इमारत.येथे बरीचशी कुटुंबे ही ज्येष्ठ नागरिक की ज्यांची मुले त्यांना एकमेकांची सोबत ठेवून आपले आयुष्य जगायला दुरदेशी किंवा दूर शहरी राहणारी.मग ह्या एकट्या वयस्कर लोकांनी सोबत म्हणून प्रत्येक घरटी किमान एक तरी अश्या प्रमाणात मांजरे पाळली आहेत.आणी ती सुद्धा भारतातील छोट्या मांजरांसारखी नाही तर खास "सयामी" जातीची. ही भली मोठ्ठी शेपटी आणी गडद हिरवे वा भुरे वा तत्सम भयानक रंगाचे डोळे.आता खरे तर पाळण्यासारखे बरेचशे गोजिरवाणे प्राणी असताना हे लोक मांजरच का पाळत असावेत काय माहीत. अर्थात कोणी त्यांच्या घरात काय पाळावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.पण तरी मांजर नको हो.आमच्या सारख्या घाबरट लोकांची फार पंचाईत होते बुवा. हा तर मी काय सांगत होते..तर ही ब्रिटीशांची मांजरे. ती आपली रोज सकाळी सकाळी ऊन खात रस्त्यावर पडलेली असतात. आणि इतकी माजलेली की बरोबर रस्त्याच्या मध्ये येऊन ताणून देतात.मग रस्त्याने येणारी जाणारी कितीही वाहने असोत त्याचे त्या मांजरांना काही देणेघेणे नसते. मोटारचालक गाडीचा हॉर्न वाजवतात आणी मांजर हलत नाही हे बघून वैतागून सरळ आपला रस्ता बदलून दुसरा रस्ता पकडतात.पण ही मांजरे जागचे हालायचे कष्ट घेत नाहीत. आधी आम्हाला फार विचित्र वाटायचे की कोणीच कसे काही ह्या मांजरांच्या मालकांना बोलत नाही पण थोडी माहिती काढल्यावर असे लक्षात आले की ह्या मांजरांसमोरून गाडी न हालवता मालकांशी वाद घातल्यामुळे बऱ्याच जणांना कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. हे ब्रिटिश त्यांच्या मांजरांबाबत फारच संवेदनशील आहेत.त्या मुळे घराच्या रस्त्यावरून चालणे माझ्यासाठी फारच मुश्कील झाले आहे कारण न जाणो चालताना अचानक समोरून एखादे भयानक मांजर समोरून यायचे आणी नेमकी माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडायची आणी ती नेमकी त्याच्या मालकिणीने ऐकायची.मग न जाणो तिला तीच्या मांजराचा अपमान वाटायचा आणी ती मला "सु" करायची....म्हणून आजकाल मी त्या रस्त्यावरून चालतच नाही तर सरळ पळत सुटते.आजूबाजूला काही बघायचे नाही सरळ रामाचे नाव घ्यायचे आणी पळत सुटायचे ते गल्ली संपली की थांबायचे. असे धावत असताना बरेच रस्त्यावरचे पादचारी तसेच मोटारचालक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत असतात. एकदा तर मी दोन लहानमुलांना माझ्याकडे बघून टाळ्या देताना पण बघितले आहे.पण काय करणार हो.संकटे काही सांगून थोडीच येतात.त्यापेक्षा आपले सुसाट पळत सुटलेले बरे. लोक काय हसतील तेवढ्यापुरते पण एखादी मांजर गुरकावली तर येणार आहेत थोडेच मदतीला.तरी घराबाहेर पडताना मी माझ्या "टेहळणी बुरुजा" वरून (आम्ही आमच्या बैठकीच्या खोलीच्या खिडकीला म्हणतो) नीट बघूनच बाहेर पडते की वाटेत किती धोके संभवतात.तरी पण अचानक उद्बवणाऱ्या मांजरांना कसे तोंड देणार?


कोणाकडे काही उपाय आहे का?