आता काळ बदलला आहे. कदाचित नव्या पिढीतल्या मुलींची मानसिकताही बदलली असेल. ही गोष्ट पंधरा वीस वर्षापूर्वी घडलेली आहे. प्रमोद, प्रमिला, अनिकेत आणि अद्वैत यांचे एक सुरेख चौकोनी कुटुंब होते. प्रमोदला चांगली नोकरी होती, अनिकेत आणि अद्वैत त्या वेळेस शाळेत शिकत होते. प्रमिला त्या सर्वांची उत्तम काळजी घेत होती. अचानक एके दिवशी प्रमिलाच्या पोटात असह्य कळा येऊ लागल्या. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायचे ठरवले. शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणी वगैरे सगळी मंडळी मदतीला धावून आली. कोणी त्यांच्या घरी राहून मुलांकडे पाहिले, कोणी जेवण बनवून आणून दिले, कोणी आणखी तीनचार मित्रांना बरोबर आणले, त्या सर्वांनी रक्तदान केले, कोणी प्रमोदच्या सोबत सावलीसारखे हॉस्पिटलात राहिले, कोणी इतर लागेल ती धांवपळ केली. सारे कांही एकदाचे सुरळीतपणे पार पडले. शल्यक्रिया यशस्वी झाली. प्रमिलाला चार पांच दिवसांनी हॉस्पिटलातून डिस्चार्ज मिळणार असे ठरले.
त्यानंतर मात्र महिनाभर तिची भरपूर काळजी घ्यायची होती. मुख्य म्हणजे तिच्या जखमेवर ताण पडू नये यासाठी तिने संपूर्ण विश्रांती घेणे आवश्यक होते तसेच संसर्ग टाळण्याच्या व जखम लवकर भरून येण्याच्या दृष्टीने तिला दिवसातून चार वेळा निर्जंतुक, सात्विक व पौष्टिक आहार देणे महत्वाचे होते. भेटायला येणारे लोक अनेक सूचना करीत होते. बहुतेक लोकांनी नात्यातल्या एखाद्या बाईमाणसाला मदतीसाठी बोलावून घ्यावयाचा सल्ला दिला. आजकालच्या जगात बहुतेक सुशिक्षित महिला नोकरी वा व्यवसाय करीत असतात. ते नसले तरी नवरा व मुले यांच्या कामाच्या व्यापात त्या सतत गुंतलेल्या असतात. एखादी आणीबाणीच आली तर त्या कसे तरी आपला संसार सोडून चार दिवस त्यातून उठून यायचा प्रयत्न करतील,पण असे महिनाभर येऊन राहू शकेल अशी कोठली मोकळी व्यक्ती प्रमोदच्या डोळ्यासमोर उभी राहीना. कांही लोकांनी हॉटेल, कॅंटीन वगैरे मधून डबा आणणे सुचवले तर कांही लोकांनी घरगुती जेवण बनवून देणाऱ्या महिलांची मदत घेण्याचा त्यातल्या त्यात योग्य सल्ला दिला. पण त्यांची नांवे, पत्ते, फोन नंबर वगैरे कांही कोणाला पटकन सांगता आले नाहीत. "आता आमचे काम झाले आहे, यापुढे तुमचे तुम्ही बघून घ्या." एवढेच त्यांना मनातून सुचवायचे होते हे प्रमोदच्या लक्षात आले. त्यानेही मग जास्त खोलात जाऊन चौकशी केली नाही.
रुग्णवाहिकेत घालून तिला गांवाकडे घेऊन जायचा सल्ला कांही लोकांनी दिला. पण निसर्गाच्या कुशीत दडलेले रम्य गांव, तिथली सर्व सुखसोयींनी युक्त अशी उंच हवेली वगैरे गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात असत्या तर ते सगळे सुख सोडून मुंबईला खुराड्यात रहायला यायची त्याला हौस होती कां? गांवाकडे अजून नांवाला एक घर होते. पण प्रमोदची आई गेल्यापासून तिथली चूलसुद्धा कधी पेटली नव्हती. गॅसची सोय तिथे नव्हतीच. विजेचा कधीच भरोसा नसायचा आणि दिवसातून फारफारतर तासभर नळाला पाणी यायचे, तेसुद्धा अंगणातल्या नळावर घागरीने भरून घरात आणावे लागे. प्रमोद लहानपणी या सगळ्यातून गेला असला तरी आता मुंबईमधल्या सुखासीनतेची त्याला संवय झाली होती. सगळ्या कामांसाठी माणसे ठेवायची म्हंटली तरी गेल्या गेल्या तो ती कुठून आणणार होता? अशा जागी प्रमिलाला कसली विश्रांती मिळणार होती? कांही लोकांनी तर चक्क महिनाभर कुठल्या तरी नर्सिंग होम, हॉलिडे होम, रिमांड होम, सॅनिटोरियम, प्लॅनेटोरियम वगैरेमध्ये जाऊन रहायचा सल्ला दिला. कुठेतरी ऐकलेल्या व आपल्याला न समजलेल्या इंग्रजी शब्दांचा वापर करण्याचा सोस यापलीकडे त्यात कांही तथ्य नव्हतेच.
प्रमोदने सगळ्यांचेच सांगणे कृतज्ञतापूर्वक ऐकून घेतले. 'ऐकावे जनाचे नि करावे मनाचे' या उक्तीप्रमाणे वागायचे त्याने ठरवले होते. स्वयंपाकघरात जाऊन त्याने फडताळातले सगळे डबे उघडून पाहिले. विळी, खिसणी, चाळणी वगैरे कामाच्या गोष्टी कुठे आहेत ते बघून ठेवले. आणखी कोणकोणत्या गोष्टी लागतील याची यादी बनवून बाजारातून त्या आणल्या. लग्न होण्यापूर्वीच एकट्याने रहात असतांना त्याने बरीचशी पाककला शिकून घेतली होती. तिची उजळणी केली. 'स्वयंपाक' या विषयावरची रुचिरासारखी पुस्तके अडगळीतून बाहेर काढून पुन्हा एकदा वाचून काढली. प्रमिलाला घरी आणल्यानंतर कंबरेला पायजम्यावरच आणखी एक पंचा गुंडाळून त्याने बल्लवाचार्याचा अवतार धारण केला. एक वही बनवून त्यात रोज चारी वेळचा मेनू तो लिहून ठेवत असे व त्या दृष्टीने सकाळीच कामाला लागत असे. प्रत्येक पदार्थासाठी लागणारे साहित्य जमवून आधी ओट्यावर मांडून ठेवी. संवय नसल्यामुळे हळूहळू पण काळजीपूर्वक रीत्या कृतीमधली एक एक गोष्ट करीत जाई. कुठे शंका आली तर आधी थोडेसे सॅंपल बनवून पाही आणि पुरेसा आत्मविश्वास आल्यावर बाकीचे साहित्य हातात घेई. सुरुवातीला चपात्यांचे आकार आफ्रीका, ऑस्ट्रेलिया खंडासारखे दिसत, पण "ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा" या चोखामेळ्याच्या अभंगावरून स्फूर्ती घेऊन पचनासाठी त्या समान जाडीने लाटल्या गेल्या आहेत व नीट भाजल्या जात आहेत इकडे अधिक लक्ष पुरवीत असे. हळूहळू त्यांचा आकारसुद्धा वर्तुळाकृती व्हायला लागला. इतर पदार्थही मनासारखे बनू लागले.
प्रमोदला रोज तो स्वयंपाकघरात करीत असलेल्या नवनवीन प्रयोगातून मिळत असलेल्या छोट्या छोट्या यशातून भरपूर आनंद मिळत होता. त्याच्या ऑफीसातले प्रकल्प पूर्ण व्हायला वर्षानुवर्षे लागत असत. इथे मनात विचार आल्यापासून तासाभरात त्याची अंमलबजावणी होऊन केलेल्या प्रयत्नांचे फलित अक्षरशः चाखायला मिळे. त्यात तो खूष होता. मुलांनाही त्याने बनवलेले पदार्थ खायला आवडत होते. प्रमिलाची तब्येत झपाट्याने सुधारत होती. याअर्थी प्रमोदचे प्रयत्न तिच्या पचनी पडत होते, अंगी लागत होते. एकंदरीत ठीक चालले होते.
अनेक वेळा प्रमिलाची चौकशी करायला तिच्या मैत्रिणी जमत असत. 'शरीररचनाविज्ञान' किंवा 'शल्यचिकित्सा' या विषयात कोणाला फारशी गति नसल्यामुळे संवादाची गाडी नेहमी घरकामावरच येई. एका यःकश्चित पुरुषाने शिजवलेले कदान्न खायची वेळ आपल्या सखीवर आलेली पाहून त्यांची कोमल हृदये विदीर्ण होऊन जात व या अवस्थेतून तिची लवकरात लवकर मुक्तता व्हावी अशा शुभेच्या देऊन जाता जाता बल्लवाचार्य प्रमोदकडे एक जळजळीत दृष्टीक्षेप टाकून त्या घरी जात. सुरुवातीला अंगात त्राणच नसल्यामुळे प्रमिला नुसतेच "हां", "हूं" करीत असे. अंगात थोडी ताकत आल्यावर "त्याचं काय झालं, माझ्या नणंदेचं जरा लवकर लग्न होऊन ती सासरी गेल्यावर सासूबाई घरी एकट्याच पडल्या होत्या. म्हणून कधी गरज पडली तर त्या आमच्या ह्यांनाच मदतीला बोलवायच्या. असं थोडं थोडं करीत त्यांनी ह्यांना सगळा स्वैपाक शिकवला हो." असा खुलासा देऊ लागली. खरे तर प्रमोदच्या घरी वापरात असलेल्या गॅस, कूकर, मिक्सर, ओव्हन, फ्रीज वगैरेमधली एकही वस्तू त्याच्या आईच्या स्वयंपाकघरात नव्हती हे प्रमिलाला चांगले ठाऊक होते. स्वयंपाकात लागणारे साहित्य व मुख्य म्हणजे त्यामधील शिजवणे, भाजणे, परतणे, तळणे इत्यादि क्रियांची पहिली ओळख त्याच्या आईने त्याला करून दिली होती. पुढचा प्रवास त्याने स्वतःच केला होता. पण त्याला जर कांही येत असलेच तर त्याचे सारे श्रेय त्याच्या आईला म्हणजे एका स्त्रीलाच देणे हे महत्वाचे होते.
असाच महिना निघून गेला. प्रमिला घरातल्या घरात हिंडू फिरू लागली. तोपर्यंत शाळांनाही सुट्या लागल्या. सुमाताई आणि रेखावहिनी आपापल्या मुलांना घेऊन दोन दोन आठवडे प्रमिलाच्या मदतीला येऊन गेल्या. मुलांना मुंबई दाखवणे जरूरीचे होतेच, शिवाय मुंबईला आल्यावर त्यांना त्यांच्या काका मामांना भेटवून आणणेही आवश्यक होते. हे काम प्रमोदवरच ओघानेच आले. आता गरज संपली असे समजून त्याने ऑफीसला जायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याला ऑफीस सांभाळून ते करावे लागले. दर दोनतीन दिवसाआड त्या पाहुण्यांना कुठे ना कुठे जावे लागत असल्याने त्याला थोडे घराकडेही पहावे लागत होते. प्रमिलाची तब्येत सुधारत गेल्यानंतर तिने पूर्वीप्रमाणे आपला चार्ज घेतला.
असेच आणखी सात आठ महिने गेले. ब-याच कालावधीनंतर कांही महिला नातेवाइकांची भेट झाली. त्यांनी ऑपरेशनबद्दल चौकशी केलीच, तसेच त्या काळात घर कसे चालवले हेही विचारले. एक सेकंदाचा विचार न करता प्रमिलाने उत्तर दिले, "काही दिवस सुमाताई येऊन राहिली होती आणि कांही दिवस रेखावहिनी." प्रमोद जवळच बसला होता. त्याने दुजोरा दिला, "खरंच हांक मारल्याबरोबर दोघी धांवत आल्या बरं. नाहीतर आमचं काय झालं असतं कोणाला ठाऊक."