(पृष्ठ ४)
"अहो, हा एकंदर प्रकार विचित्र वाटला तरी काय करणार? आमच्या या व्यवसायात अशा गोष्टी कराव्याच लागतात. खरंतर सुरुवातीपासूनच आपण चूक केली आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. तरी कायदेशीररीत्या सगळं केलेलं बरं! नाही का? काही झालं तरी लालफितीचा सोपस्कार पाळावाच लागतो."
"हो नक्कीच." अँथनी पश्चातापाच्या सुरात म्हणाला. "पण मला एक सांगा, हा तुमचा सार्जंट कार्टर काही फारसा मोकळाढाकळा दिसत नाही, हो ना?"
"नाही सर, सार्जंट कार्टर एक चांगला माणूस आहे, पण त्याला पटवणं ही खरंच एक अवघड बाब आहे."
"ते माझ्या कधीच लक्षात आलंय!" अँथनी.
"बरं ते जाऊ द्या इन्स्पेक्टर," अँथनी पुढे म्हणाला. "पण तुमची काही हरकत नसेल तर मला जरा माझ्याबद्दल सांगा ना?"
"म्हणजे? तुम्ही काय म्हणताय?"
"आता मात्र कमाल झाली राव! अहो मला कधीपासून उत्सुकता लागून राहिली आहे. ही ऍना रोझेंबर्ग कोण होती आणि मी तिचा खून कशासाठी केला आहे?"
"तुम्हाला सर्व काही उद्याच्या वर्तमानपत्रात वाचायला मिळणारच आहे सर."
"पण आता उगाच माझी उत्सुकता कशाला ताणता? जरा वेळ तुमची ही वर्दी, कर्तव्य वगैरे गोष्टी बाजूला ठेवा आणि मला सगळं सांगा तरी!"
"पण असं करणं योग्य ठरेल?"
"अहो आता आपण जवळजवळ मित्र झालोच आहोत, नाही का?"
"वेल, तुम्ही एवढं म्हणता तर.... ऍना रोझेंबर्ग ही एक जर्मन-ज्यू होती. हँपस्टीड ला तिचं घर होतं. मात्र तिच्याजवळ उत्पन्नाचा कोणताही प्रत्यक्ष मार्ग नसूनही दरसाल तिच्याजवळचा पैसा वाढतच गेला."
"माझी अगदी उलट तर्हा आहे. उत्पन्नाचा मार्ग असूनही मी मात्र दरवर्षी गरीब होत चाललोय. हँपस्टीडला रहायला असतो तर बरं झालं असतं. मी ऐकलंय की हँपस्टीड अगदी भन्नाट ठिकाण आहे."
"एकेकाळी" वेरॉलने पुढे सांगायला सुरुवात केली. "तिचा सेकंड हँड कपड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय होता."
"आलं लक्षात!" ऍंथनी मध्येच म्हणाला. "मी सुद्धा माझा गणवेश युद्धानंतर विकला होता. पूर्ण नाही पण इतर काही सटरफटर गोष्टी! मला आठवतं, सोनेरी जर, लाल रंगाच्या पँटी वगैरेंनी तो फ्लॅट ओसंडून वाहत होता. एक जाडा माणूस रोल्स रॉईसमधून त्याच्या नोकराबरोबर बॅग घेऊन आला आणि सगळ्य़ासाठी त्याने मला एक पाऊंड देऊ केला. अजून एक कोट आणि गॉगल दिल्यावर मग कुठे तो दोन पाऊंड द्यायला तयार झाला. नोकराने सगळे कपडे बॅगेत भरले आणि त्या जाड माणसाने मला दहा पौंडांची नोट दिली आणि माझ्याकडे सुट्टे मागितले."
"जवळजवळ दहा वर्षांपूर्वी," इन्स्पेक्टरने पुढे बोलायला सुरुवात केली, "लंडनमध्ये स्पेनचे बरेच राजकीय आश्रित राहत होते. त्यांच्यामध्ये कुणीतरी डॉन फर्नांडो फेरारेझ आपल्या बायको, मुलासह राहत होता. तो खूपच गरीब होता आणि त्याची पत्नी आजारी पडली होती. एकदिवस ऍना रोझेंबर्गने ते राहत असलेल्या ठिकाणी त्यांना भेट दिली आणि काही विकायचं आहे का म्हणून चौकशी केली. नेमका डॉन फर्नांडो त्यावेळेस घराबाहेर होता आणि त्याच्या पत्नीने एक अतिशय सुंदर अशी स्पॅनिश शाल विकायचं ठरवलं, जी तिच्या नवर्याने स्पेन सोडण्य़ापूर्वी तिला भेट दिली होती. जेव्हा डॉन फर्नांडो परतला तेव्हा मात्र शाल विकल्याचं कळताच त्याच्या संतापाला पारावार राहिला नाही. ती परत मिळवण्याचा त्याने बराच प्रयत्न केला, जो निष्फळ ठरला. सरतेशेवटी सेकंड हँड कपड्यांचा व्यवसाय करणारी ती स्त्री त्याला सापडली. मात्र तिने आधीच ती शाल एका बाईला विकली होती आणि तिचं नाव काही तिला आठवत नव्हतं. डॉन फर्नांडो आता पुरता निराश झाला. दोनच महिन्यानंतर भर रस्त्यात चाकूने भोसकून त्याच्यावर वार करण्यात आले आणि त्या जखमांमुळेच त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासूनच ऍना रोझेंबर्गकडे संशयास्पदरीत्या पाण्यासारखा पैसा वहायला सुरुवात झाली. पुढच्या दहा वर्षांत तिच्या घरी जवळजवळ आठ वेळा चोरी झाली. चार प्रयत्न फसले आणि कुणाच्याच हाती काही लागलं नाही. उरलेल्या चारवेळी मात्र एक भरीव, कलाकुसर केलेली एक शाल चोरीच्या मालात समाविष्ट होती."
इन्स्पेक्टर जरा क्षणभर थांबला मात्र अँथनीच्या चेहर्यावरची उत्कंठा पाहताच त्याने पुढे बोलायला सुरुवात केली.
"एका आठवड्यापूर्वी डॉन फर्नांडोची तरूण मुलगी, कार्मन फेरारेझ फ्रान्सच्या एका कॉन्व्हेंटमधून इकडे आली. सर्वप्रथम तिने हँपस्टीडमधल्या ऍना रोझेंबर्गचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. तिथे तिचं त्या म्हातार्या बाईशी कडाक्याचं भांडण झालं. निघताना तिचं बोलणं तिथेच काम करणार्या एका नोकराने ऐकलं. "ती तुझ्याकडे अजूनही आहे!" कार्मन ओरडली, "एवढी सगळी वर्षं तिच्यामुळेच तू श्रीमंत झाली आहेस. पण मी तुला खात्रीनं सांगते शेवटी कधीतरी तुझं दुर्दैव तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. ती ठेवून घेण्याचा तुला काही एक अधिकार नाही आणि एक दिवस निश्चितच असा उगवेल की ती हजार फुलांची शाल आपल्याला कधी दिसलीच नसती तर बरं झालं असतं असं तुला वाटेल."
त्यानंतर तीन दिवसांनी, ज्या हॉटेलात ती उतरली होती त्या हॉटेलातून कार्मन फेरारेझ अचानक गायब झाली. तिच्या खोलीत एक नाव आणि पत्ता सापडला. नाव होतं कॉनरॅड फ्लेकमन. तसंच एका जुन्या वस्तूंच्या विक्रेत्याकडून आलेली चिठ्ठी सापडली ज्यात त्याने तिच्याकडे असलेली एक शाल विकायची आहे का ह्याबद्दल चौकशी केलेली होती. त्या चिठ्ठीवर असलेला पत्ता खोटा होता.
आतापर्यंत हे तर स्पष्ट झालं की ती शालच या एकूण प्रकरणाच्या मुळाशी होती. काल सकाळी कॉनरॅड फ्लेकमनने ऍना रोझेंबर्गची भेट घेतली. एका तासापेक्षा जास्त वेळ त्यांची बोलणी चाललेली होती. मात्र तो निघताना तिचा चेहरा पांढराफटक पडलेला होता. त्या भेटीचा निश्चितच तिच्यावर परिणाम झाला होता. तरीदेखील कॉनरॅड फ्लेकमन परत कधी आलाच तर त्याला आत सोडण्य़ाबद्दल आणि आडकाठी न करण्याबद्दल तिने नोकरांना बजावून ठेवलं. काल रात्री साधारण नऊ वाजता ती घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. आज सकाळी कॉनरॅड फ्लेकमनच्या घरात चाकूने भोसकून खून केलेला तिचा मृतदेह मिळाला. आणि तिच्या जवळच खाली जमिनीवर............. काय असावं? तुला काय वाटतं?
"शाल?" अँथनी अधीरतेने म्हणाला.
"नाही, काहीतरी त्याच्याहून भयंकर. ज्याच्यामुळे क्षणार्धात शालीचं सगळं रहस्य उलगडलं आणि तिची खरी किंमत कळाली. पण एक मिनिट... मला वाटतं आमचा वरिष्ठ अधिकारी..... "
मध्येच घरातली बेल वाजली होती. अँथनीने मोठ्या मुष्किलीने आपली उत्सुकता दाबून ठेवली आणि इन्स्पेक्टरच्या परतण्याची तो वाट पाहू लागला. थोड्याच वेळात सहीसलामत सुटणार असल्याने तो निर्धास्त होता. त्याच्या बोटांचे ठसे घेताच त्यांना त्यांची चूक कळून येणार होती. त्यानंतर कदाचित कार्मनने देखील फोन केला असता. आणि ती हजार फुलांची शाल! खरंच, काय विलक्षण हकीकत होती! त्या मुलीच्या सावळ्या सौंदर्याला एकदम शोभून दिसेल अशी! कार्मन फेरारेझ.....
पण लवकरच आपल्या दिवास्वप्नातून त्याने स्व:तला सावरलं. इन्स्पेक्टरला परत यायला फारच वेळ लागला होता. तो उठला आणि त्यानं दार उघडलं. परंतु फ्लॅटमध्ये विलक्षण शांतता पसरलेली होती.
ते गेले की काय? अर्थात त्याला न सांगता जाणं तर शक्यच नव्हतं. तो पळतच पुढल्या खोलीत आला, पण ती रिकामी होती. बैठकीची खोलीत सुद्धा कोणीच नव्हतं. आणि सगळ्या घराला एक अस्ताव्यस्त कळा आलेली होती. बापरे! त्याचा भांड्यांचा संग्रह. चांदीची भांडी! त्याने पळतच घरभर शोध घेतला. पण सगळीकडे तीच परिस्थिती होती. संपूर्ण घर लुटण्य़ात आलं होतं. अगदी कवडीमोल वस्तूंपासून त्याने एवढ्या रसिकतेने जमवलेल्या सगळ्या वस्तू नाहीश्या झाल्या होत्या.
विव्हळत, लटपटत्या पायांनीच डोक्याला हात लावून तो खुर्चीत बसला. मात्र पुढच्या दाराची बेल वाजल्याने त्याला उठावं लागलं. त्याने दार उघडलं तर दारात रॉजर उभा होता.
"माफ करा सर पण त्या गृहस्थाने सांगितलं की तुम्ही मला बोलवलंय म्हणून" रॉजर म्हणाला.
"कोण गृहस्थ?"