क्या होती है हमारी ड्यूटी ?

संतोष शिंत्रे

(पृष्ठ २)

एखाद्या माणसाची - अभिनेत्याची बहुविध गोष्टी चांगल्याच, तरीही दर वेळी वेगळ्या करण्याची क्षमता बर्‍याच वेळा आपल्याला त्याचा 'फॅन' बनवून जात असते. दुहेरी भूमिका, हास्यप्रसंग, नशेतले सीन्स, मरतानांचे सीन्स, इतर कुणी मरता-बिरतांना याचे रिस्पॉन्सेस आणि रिऍक्शन्स, या माणसाची इंग्लिश बोलण्यातली (इतरेजनांच्या तुलनेत) सफाई, या माणसानं पडद्यावर (आणि त्याहीपेक्षा पडद्याबाहेर केलेलं आणि फार कमी जणांनी ऐकलेलं) काव्यवाचन - त्यातली शब्दफेक, त्याच्या शब्दहीन ('निःशब्द' कोण म्हटलं ते?) संवादांच्या वेळी दिसणारी डोळ्यांतली ताकद... या सगळ्या सगळ्या गोष्टींमुळेच माझ्यासारखे कैक लोक त्या गळाला अलगद अडकले. आणि असे अडकले, की आता इच्छा आहे.. पण अजून सुटू शकलेला नाही. मधूनच एखादा 'मैं आझाद हूँ" येतो, 'आँखे' येतो, 'खाकी' येतो आणि आशेची ती न संपणारी लकेर पुन्हा मनात गुंजते. जुन्या आठवणी जाग्या होतात.

'बच्चन रिसाइट्स बच्चन' नावाची एक कॅसेट फार मागे एच. एम. व्ही. का कोणी काढली होती, आयुष्यात जर कुणाला काव्यवाचन करायचं असेल तर काय वाटेल ते करुन त्या व्यक्तीनं आधी एकदा ही कॅसेट ज्या मिळेल त्या सीडी, डीव्हीडी रुपात ऐकावी, आणि मग कार्यक्रम करावा. पडद्यावर आपण अमिताभचं जोशपूर्ण (अग्नीपथ) किंवा हळूवार इ. (कभी कभी, सिलसिला) हे असं काव्यवाचन ऐकलं आहे. आता याला पहिली मर्यादा येते, ती अर्थात आम प्रेक्षकांना कळण्याची. त्यामानानं हरिवंशराय बच्चन यांच्या अन्य कविता चांगल्याच गंभीर, तात्विक पातळीवरच्या आणि पुरेसं सर्वंकष, कालातीत भान उमटणार्‍या असतात. सदरहू कॅसेटमधल्या कविता या अशा आहेत. 'कोयल, कॅक्टस, कवि' नावाची एक बेहद्द सुंदर कविता त्यात आहे. त्यात कॅक्टसच्या फुलाशी बोलतांना अमिताभनं आवाजात आणलेला सुंदर हळूवारपणा 'सुपरस्टार' अमिताभचा नाही. फार लहानपणापासून काव्याचे संस्कार झालेला एक उमदा माणूस ते वाचतो आहे. यातच 'बुद्ध और नाचघर' नावांची बुद्धाला उद्देशून लिहीलेली एक काहीशी तिरकस कविता आहे. अनुयायी आणि नंतरच्या मंडळींनी केलेला बौद्ध तत्त्वज्ञानाचा पराभव असा त्याचा विषय आहे. वाचनातून त्यातली आशयघनता अमिताभनं फार उत्कृष्ट रीतीनं श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आहे. 'मैंने जीवन देखा, जीवन का गान किया' कवितेतला आपल्याला बळ देऊन जाणारा आशावाद, अमिताभच्याच आवाजात आपल्यापर्यंत पोहोचतो, हे बरंय. आसपासच्या परिस्थितीबाबत उद्विग्नता व्यक्त करत असतानांच, कवीचा त्या परिस्थितीशी झुंजण्याचा निर्धार व्यक्त करणारी "अगर इनकी खून के छापे लगने थे, तो किसके द्वारपर?" ही विलक्षण अंतर्मुख करणारी कविताही वाचावी, तीही अमिताभनंच.

आमच्यासारखे भले भलेही विषण्ण होतील असे 'लालबादशाह', 'छोटे मियाँ बडे मियाँ' असे उद्योग जेव्हा अमिताभ करत होता, तेव्हा पासून अगदी परवापर्यंत मला त्याला काही करुन एक निरोप पोहोचवायचा होता - की अरे, वडिलांच्या कविता पुन्हा वाच-आणखी एक नाही, दहा सीड्या-कॅसेटी काढ. पण नुकतीच त्यानं घोषणा केली, की वडिलांच्या कसल्यातरी शताब्दिनिमित्त तो त्यांच्या कविता सविस्तर वाचू म्हणतो आहे. पुन्हा एकदा... आशेची लकीर, न संपणारी.

ती कॅसेट मी दोन वर्षं शोधत होतो. अखेर जंगली महाराज रस्त्यावरच्या गणपती ते सिगरेटी, आंबे (सीझन नुसार) असं सगळं विकणार्‍या एका दुकानात मला ती धूळ खात पडलेली मिळाली. ही कॅसेट आपल्याकडे पाहिजे हे ठरवायला कारणीभूतही 'आलाप' मधलं एक अप्रतिम गाणचं होतं. पडद्यावर अमिताभ, त्याला येसूदासचा फिट्ट बसलेला आवाज, हरिवंशराय यांचे शब्द आणि जयदेवचं संगीत, असा एकंदरीत जबरदस्त घाट जुळून आलेलं "कोई गाता, मैं सो जाता.." हे गाणं. चालबिल तर ग्रेट आहेच, पण ह्या कवीच्या आणखी रचना आपण ऐकल्या पाहिजेत हे त्या गाण्यांतल्या पुढच्या ओळींनी मनात ठसवलं. मग कुणीतरी ज्येष्ठ मित्रानं ही कॅसेट आहे हे सांगून डोक्यात किडा सोडला.

आजवर या नटावर लिखाण चिकार झालंय. पण भाऊ पाध्यांचा 'बेबस दुनियेत असंतोषाची स्वप्ने विकणारा' हा 'सा.माणूस'च्या दिवाळी १९७९ मधला लेख अमिताभच्या तत्कालीन यशामागची प्रक्रिया फार सविस्तर पद्धतीनं उकल करुन सांगतो. शीर्षकातच त्या लेखाचा गोषवारा आला आहे. पण त्याला आता वीस वर्षं झाली. या वीस वर्षांमधे त्या लेखात त्यांनी उभा केलेला अमिताभचा चेहरामोहराही भल्याबुर्‍या अनेक गोष्टींमधून काही प्रमाणात बदलला, काही प्रमाणात तोच राहिला. एखाद दोन पिढ्यांना आपल्या कला प्रवासाबरोबर खेचत घेऊन जातात, ते लोक भारतीय मनांवर प्रदीर्घ काळ राज्य करतात. लता, आशा, अशांसारखे लोक. यातच अमिताभ येतो. त्यांचे बरेच इनपुट्स आपण घेतो. त्याच गाणं, कलाविष्कार आपण लहानपणापासून ऐकत, पहात आलेलो असतो. फक्त तेच शब्द, तीच दृश्यं जगण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला ते ते 'इनपुट्स' देत जातात. आज चाळीस वय पार करुन गेलेल्या माझ्या पिढीवर या अशा 'इनपुट्स' चे प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष प्रभाव अमिताभचे तर आहेतच, हे नक्की. आपण ते चारचौघात कबूल करु, ना करु. मी करतो. म्हणजे आमच्या डोक्यात धंदा-उद्योजकतेच्या कल्पना घोळायला लागून 'भांडवला'शी गाडं अडलं, की "आज मेरी जेब में एक फूटी कौडी नही है..." नं आपल्याला तात्पुरता धीर दिलेला असतो. आपलं वाईट केलेला समोर येतो, त्याच्याशी बोलावं तर लागतं, तेव्हा "मेरे जख्म जल्दी नही भरते... गुडबाय, मि. गुप्ता" आठवलं, की ती वेळ आपण बरी निभावून घेतो. मनात असो वा नसो संघर्ष अटळ असतो, तेव्हा "मैं जब भी किसीसे दुष्मनी मोल लेता हूँ, सस्ते महँगे की पर्वा नही करता" हे कुठेतरी कानात किणकिणून जातं. वडील मंडळींशी तीव्र 'मतभेद' आणि कटुतेतही "आप कैसे हैं, पिताजी?" आणि त्यापाठोपाठ अप्रतिम टायमिंगनं बसलेल्या घोड्याच्या पाठीवरचा चाबूक ('आलाप') आपल्याला एका मर्यादेपलीकडे उर्मट बनू देत नाही. एखादी रेशीमतलम आठवण आता पेटीत ठेवायला लागलेल्या मोतीयासारखी जपणंच हातात आहे, हे स्वीकारायला "ये रंज औ-गम की स्याही, जो दिलपे छायी हैं, तेरी नजर की शुआओं मे खो भी सकती थी" या ओळींची मदत होते. गेला बाजार, सुंदर सुंदर पोरींचे आपण 'अंकल' होतोय या धक्क्यातून सावरतांना त्याच वयात अमिताभचा 'हम' आला, आणि त्याच्या ग्रे-हेअर, मूस्टॅश मेकअपमधे, हा ही धक्का सौम्य होऊन गेला. असं काय काय, कितीतरी वेळा, कितीतरी प्रसंगी.

‘शक्ती’ नंतर चांगलाच खाली उतरून ‘अंधा कानून' आम्ही पचवला. पुढे मात्र काही काळ चांगलाच चिंतेत गेला. कमलहासन, रजनीकांत आणि अमिताभ हे तीन 'फेनॉमेनल' लोक एकत्र मिळूनही त्याचा शून्य उपयोग करुन घेतलेला 'गिरफ्तार' आणि मग ओळींनं तकलादू सिनेमे. 'कूली', 'महान', 'नास्तिक', पुकार आणि 'इन्किलाब'. आम्ही 'डायहार्ड' फॅनमंडळी जरा चिंताक्रांत होतो. पण तेवढ्यात 'शराबी' आला. त्यात अमिताभनं असा काही नूर पेश केला, की 'अमिताभ संपला'चे हाकारे तात्काळ बंद झाले. पण पुन्हा 'मर्द' आल्यानं झालेला अपेक्षाभंग होताच. पुन्हा एकदा भीती डोकं वर काढायला लागली. पण याही वेळी आमच्या निष्ठा शाबूत ठेवायला कारणीभूत, एक दक्षिणेचा दिग्दर्शक होता के. भाग्यराज. आमचा 'पक्षबदल' होता होता थांबवणारा हा चित्रपट होता 'आखरी रास्ता'. १९८६. आजतागायत दीवार - त्रिशूल च्या निष्ठेनंच मी हा चित्रपट वीस वर्षं पहात आलो आहे. जबरदस्त गतिमान. एक अत्यंत निश्चित, पक्का विचार करुन उभी केलेली 'अँग्री ओल्ड मॅन' ची अमिताभची कॅरेक्टर. खास अमिताभ शैलीतलं इंग्लिश प्रेक्षकांना ऐकता यावं यासाठी त्याच्या डबलरोल्सचा एकमेकांशी इंग्लिश संवाद. अमिताभनंच सांगितलंय, की के. भाग्यराज तामिळ सोडून काहीच बोलू शकत नव्हता - मग तो दुभाषामार्फत, हावभावानं असं त्याला काय हवंय ते सांगायचा. अमिताभला आपापलाच तो सीन 'बसवायला' लागायचा. या डबलरोल्सच्या (एक तरुण-एक वृद्ध) इंग्लिश संवादांचं 'डबिंग' केवळ अप्रतिम पद्धतीनं आवाज बदलत एका ध्वनिक्षेपात-सलग-अमिताभनं पूर्ण केलं होतं. पहाटे पाच ते आठ या वेळात. या अभिनेत्यानं 'डबिंग'ची हीच वेळ ठरवून घेतलेली आहे. आवाज ताजा असतो, म्हणून की काय ज्यांनी 'आखरी रास्ता'तला हा प्रदीर्घ संवाद ऐकला आहे, त्यांना त्यामागची सलग आवाज बदलत डब करण्याची ताकद लक्षात येईलच.