(पृष्ठ ३)
त्यापुढे मग चार पाच 'पासेबल' सिनेमांमागे एक चांगला येतो, हे सत्य आम्ही कायमचं स्वीकारुन घेतलं, पण तसा आला, की हयगय नाही. हे मधले मधले चांगले चित्रपट मात्र सगळा बिनसणारा तोल सावरत जात. "मैं आझाद हूँ" हा यातला खूपच महत्त्वाचा. तो अशासाठी, की इमेज सोडून ज्या ज्या वेळी अमिताभनं काहीही वेगळं करायचा प्रयत्न केला, की तो व्यावसायिक दृष्टीनं अपयशी, हा प्रवाद प्रबळ करणाराच हा चित्रपट होता. पण त्यात सुपरस्टार अमिताभ जवळ जवळ नव्हता. त्यात एक भाषण होतं अमिताभचं. आम जनतेपुढं दिलेलं, आणि चक्क टिळक स्मारक मंदिरात चित्रीकरण झालेलं. त्यात अत्यंत सुरेख, काळजाला हात घालणारं बोलता बोलता, इतक्या सहजपणे अमिताभ डायस सोडून पुढे येतो, स्टेजजवळ मस्त मांडी घालून बसतो, आणि पुढचं बोलतो. या चित्रपटात अनेक वेळा त्याची ताकद अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत आपल्याला खिळवून ठेवते. पुढचे 'अग्नीपथ' आणि 'अजूबा' हे चित्रपट मी अजून लागले, की दरवेळी पहातो. नंतर मात्र पुन्हा दहा एक चित्रपट अंधार. हा घोळ १९९१ च्या 'इंद्रजित' पासून सुरु झाला, तो थेट २००१ मध्ये 'अक्स' येईपर्यंत पुरला. पुढचा 'आँखे' आणि मग २००३ मध्ये 'बागबान'. हे तीनही चित्रपट आमच्या निष्ठेची धुगधुगी, पुन्हा धगधगीत करुन गेले.
'परवाना' वगळता सरळसरळ खलनायक-अँटिहिरो असा अमिताभ थेट 'आँखे' तच दिसला. आत्तापर्यंत तोही, आणि आम्ही प्रेक्षकही त्याच्या वयानुरुप, किंवा वयाच्या जवळ जाणार्या भूमिकांना सरावल्यामुळं फारसा प्रश्न आला नाही. अमिताभची 'आँखे'च्या पूर्वाधातली जरब, हुकूमत आणि उत्तरार्धातलं 'हातातून सगळं निसटतंय' ही दाखवलेली भावना लाजवाबच होती. परेश रावलची विदूषकी, ओंगळ कॉमेडी हे फक्त 'आँखे'ला लागलेलं गालबोट. बाकी 'आँखे' आणि नंतर आलेला 'खाकी', यात एक मजेशीर गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे समोर 'साहेब' असले, की एरवी नाचगाणी मारामार्या या पलिकडे कामाकडं फार मनावर न घेता पहाणारे नवेलोक कसे शिस्तीत चांगलं काम करतात. 'खाकी'तला तुषार कपूर आठवा. २००४ मधे आलेल्या 'खाकी'नं आमचा-अमिताभचा जुना लोभ प्रचंड प्रमाणात घट्ट केला. सुरुवातीच्या दृश्यापासून शेवटापर्यंत अमिताभच्या सुवर्णकाळातल्या अभिनयाची चमक पुनरुज्जीवित करणारा असा हा चित्रपट. अमिताभचा पुरेपूर वापरुन कसा घ्यायचा याचा दिग्दर्शक राजकुमार संतोषीनं नव्या लोकांना घालून दिलेला जणु वस्तुपाठच. अनेक वर्षांनी अमिताभला दिग्दर्शकानं न भिता दिलेले दोन मोठे मोनोलॉग्ज.. "क्या ....... होती हैं हमारी ड्यूटी?" आणि झुंडीतल्या पावट्यांमध्ये घुसून, अमिताभचा "तरस आता हैं मुझे तुमजैंसे लोगोंपर..." हा सात्विक संताप. त्यानंतर थेट आजपर्यंत बोलण्यालिहीण्यासारखं फार काही नाही. 'देव', 'विरुद्ध', 'बंटी और बबली', 'ब्लॅक' आणि 'सरकार' ही त्यातल्यात्यात निदान उल्लेख करण्याजोगी उत्तेजनार्थ नावं. 'ब्लॅक' मधला अभिनय लोकांना पसंत पडला, अवॉर्डस वगैरेही सगळं झालं... पण बर्याच चाहत्यांना एक काहीतरी कणसूर राहून गेलेला वाटला.
आत्ता त्याच्यासमोर मित्र, शत्रू अशा कुठल्याही भूमिकेत निडरपणं उभा राहून ठसा उमटवणारा 'प्राण' नाही. "क्यूँ विजय? आज तुम्हें गुस्सा नही आया?" असं छद्मीपणे विचारायला प्रेम चोपडा नाही. नजरा, संवाद देहबोलीचं तगडं आदान-प्रदान करायला संजीवकुमार नाही. रागवायला ह्रषीकेश मुखर्जी नाहीत. वीस-पंचवीस चित्रपटातला हक्काचा 'रवि' भाऊ शशी कपूर नाही. मन मोकळं करायला निरुपा रॉयसारखी आई नाही. "जिगर का दर्द उपर से कहाँ मालूम होता हैं....जिगर का दर्द उपर से मालूम नही होता।" अशा टिनपाट शेरोशायरीत हे दु:ख त्यानं बोलून दाखवलंच, तर दळभद्री शायरी केल्याबद्दल हक्कानं डाफरणारा 'मुन्शीजी' ओमप्रकाशपण नाही. पुढच्या बराचसा प्रवास 'तगडे' को-स्टार न घेताच आता त्याला करायचाय बहुधा.
पण आम्ही आहोत. त्याच्या एंट्रीला, थेटरातल्या खुर्चीत टेकून बसलेले, एकदम पुढे झुकून उत्सुकतेनं बघणारे. दहावीच्या परीक्षेनंतर मुंबईला गेल्यावर 'प्रतीक्षा' च्या बाहेर टीनएजरी कुतुहलानं प्रतीक्षा करणारे. साडेतीन हजार रुपये किंमतीचं त्याच्या चित्रप्रवास सांगणारं 'कॉफी टेबल बुक' कष्टानं विकत घेऊन नंतर काही काळ साधूप्रमाणे कमी खर्चात जगणारे. 'सरकार राज'चा जुगार 'फर्स्ट डे फर्स्ट शो' ला खेळणारे. कारण पूर्ण पौगंडावस्था ते आताचं मध्यमवय इतका प्रदीर्घ प्रवास आम्ही अमिताभबरोबर पार पाडला आहे. आमच्याच भाव-भावना पडद्यावर आम्हालाच जास्त गहिर्या करुन दाखवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम आम्ही त्याच्यावर सोडलं होतं. त्यानंही ते जरा जास्तच चांगलं पार पाडलंय. आमच्या रोजच्या जगण्यातलं वास्तव या ना त्या प्रकारे त्यानं सोपं नाही पण सह्य, सुखकर केलंय, या पुढेही करत राहील. त्यामुळं विशिष्ट काही काळानंतर त्याच्या चित्रपटप्रवासाच्या आमच्या आठवणींचा कॅलिडोस्कोप विविध कोनात फिरवून त्याचं ऋण वेळीच कुठेतरी नमूद करणं हेच इष्ट. यहीं है हमारी.....ड्यूटी!.