परंतु यासम हा

अभिनेत्यांचा कारकीर्दीतील प्रवास बरेचदा मनोरंजक असतो. अमिताभसारख्या उत्कृष्ट अभिनेत्यालाही चाकोरीतून बाहेर पडायला किती वेळ लागला. याउलट नसिरने एक दशकाहून अधिक काळ एकाहून एक अभिनयाचे आविष्कार दाखवल्यानंतर त्रिदेवमध्ये सुमार भूमिका स्वीकारली.

पहिलाच चित्रपट सुपरहिट झाल्यावर एक चॉकलेट हिरो अशी आमिरची प्रतिमा तयार झाली होती. नंतरचे काही चित्रपट करताना त्याने ही प्रतिमा कायम राखली होती. महेश भटचा दिल है के मानता नही किंवा मन्सूरचा जो जीता वही सिकंदर. अर्थात यातही थोडे वेगळेपण होते पण चवीपुरतेच. आणि या चित्रपटांबरोबरच दौलत की जंग किंवा लव्ह लव्ह लव्ह सारखे टिनपाट चित्रपटही केले. नंतर त्याची निवड सुधारत गेली. अकेले हम अकेले तुम मूळ क्रेमर व्हर्सेस क्रेमरच्या पासंगालाही पुरणारा नसला तरी आमिरचा अभिनय सुधारल्याचे जाणवत होते. तो अनुभवांमधून शिकतो आहे आणि आधीच्या चुका टाळतो आहे हे ही दिसत होते. आमिर सशक्त अभिनेता म्हणून समोर आला तो रंगीलामध्ये. (राख पाहिलेला नाही त्यामुळे यात आमिर कसा आहे कल्पना नाही.) रामूसारख्या हुरहुन्नरी दिग्दर्शकाच्या मदतीने आमिरने यातील टपोरी सुरेख रंगवला. इथेच बहुधा त्याच्या मेथड ऍक्टींगला सुरूवात झाली असावी. रंगीलामध्ये टपोरीच्या भूमिकेसाठी आठआठ दिवस आंघोळ न करणे किंवा राजा हिंदुस्थानीमधल्या दारू प्यायलेल्या प्रसंगासाठी खरेच दारू पिणे असे त्याचे छोटे प्रयोग चालू होते. नंतरचा महत्त्वपूर्ण टप्पा होता दिपा मेहताचा अर्थ ज्यात आमिरने नकारात्मक भूमिका केली. यानंतर आमिर अधिकाधिक चोखंदळ होत गेल्याचे जाणवते. ज्या बॉलीवूडमध्ये तीनतीन शिफ्ट करून अभिनयाच्या पाट्या टाकल्या जात होत्या, तिथे वर्षाला एक चित्रपट करण्याचा निर्णय आत्मघातकी होता. पण आमिरने तो यशस्वी करून दाखवला. यानंतर २००१ ते २००५ च्या दरम्यान आमिरने एकही चित्रपट केला नाही.

गेल्या दहा-पंधरा वर्षात तीन खान लोकप्रिय झाले. विश्वाचा उगम कसा झाला हे जितके अनाकलनीय आहे तितकेच बाकीचे दोन खान इतके बेसुमार लोकप्रिय का झाले हे ही सांगणे अवघड आहे. त्यापैकी एकाला तर आपण अभिनय करतो अशी पुसटशी देखील शंका नाही. माथाडी कामगारांप्रमाणे अंगावरचा शर्ट काढला की चित्रपट लोकप्रिय होतो अशी त्याची भाबडी समजूत आहे. दुसरा त्यापेक्षा जास्त धोकादायक आहे, कारण आपण हे हे करत हसलो आणि माकडचेष्टा केल्या तर त्याचा अर्थ आपण उत्कृष्ट अभिनय करतो अशी त्याची (आणि त्याच्या फ्यानक्लबची) प्रामाणिक समजूत आहे. या दोघांकडे पाहिले की आमिरचे वेगळेपण अंगावर यायला लागते. आमिर कधीही चित्रपटसृष्टीमधल्या पुरस्कार वितरण सोहळ्यांमध्ये दिसत नाही. कदाचित म्हणूनच आतापर्यंत त्याला (फक्त) चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. याउलट किंग खानला दहा (यात मोहब्बतेंसाठी क्रिटिक्स ऍवॉर्ड!!!) तर सलमानला दोन. म्हणजे फिल्मफेअरचा निकष लावला तर आमिर सलमानपेक्षा थोडा उजवा पण शाहरूखपेक्षा फारच कमी दर्जाचा अभिनेता आहे.

तारे जमीं पर त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला प्रयत्न. यात त्याने सर्व नियम धुडकावून लावले आहेत. तो चित्रपटाचा सर्वेसर्वा असतानाही एका अनोळखी बालकलाकाराचे नाव आधी येते. आमिरची एंट्री मध्यंतरानंतर होते. यातल्या दर्शील साफरीचे उपजत अभिनयगुणांबद्दल जास्त कौतुक करावे की हे गुण पारखून त्यांना योग्य संधी दिल्याबद्दल आमिरचे जास्त कौतुक करावे हा प्रश्न सुटणे अशक्य आहे. इंडस्ट्रीमधले काही खान, बहुतेक कुमार आणि बरेचसे इतर या सर्वांना एका पारड्यात टाकले आणि ह्या आठ वर्षांच्या चिमुरड्याला दुसर्‍या पारड्यात टाकले तरी अभिनयाचे पारडे त्याच्याच बाजून झुकेल. आणि मुख्य म्हणजे त्याच्या चेहेर्‍यावर नेहेमीच्या फिल्मी बालकलाकारांचा आगाऊपणा नावालाही दिसत नाही. (पहा, किंवा खरे तर नका हो पाहू : कुछ कुछ होता है)

आणि याबरोबरच आमिरला सामाजिक जाणीव आहे. नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून आपले मत तयार करणे आणि मग मोदी सरकारचा विरोध पत्करून स्वतःच्या मतावर ठाम राहणे. इथे नर्मदा आंदोलन बरोबर की चूक हा मुद्दा नाही. एकीकडे संरक्षित काळवीट मारणारे, बेगुमान गाडी चालवून लोकांना मारणारे किंवा तुरूंगात जाणारे आपले अभिनेते पाहिले की त्या पार्श्वभूमीवर आमिर एक विवेकी आणि जागरूक नागरिक आहे याची साक्ष पटते.

हॅम्लेट

सौजन्य : चित्र विकीवरून घेतले आहे.