नवा चित्रपट : थ्री इडियटस ( ३ वेडपट)

थ्री इडियट्स आणि चालू दिग्दर्शक असे खरे तर ह्या चित्रपटाचे शीर्षक हवे. सामान्य प्रेक्षक अडाणी असतो सगळे सोपे करून चमच्याने भरवल्याशिवाय बहुसंख्य लोकांना चित्रपटाचा मजा लुटता येत नाही हा फंडा राजू हिरानीना बरोबर समजला आहे. उदाहरणार्थ चित्रपटाच्या सुरुवातीला प्रो. सहस्रबुद्धे सगळ्या मुलांना गोळा करून एक पेन दाखवतात. हे पेन म्हणे बक्षीस देण्यासाठी ते योग्य मुलाच्या शोधात असतात. आणि त्यांच्या पूर्ण कारकीर्दीत असा मुलगा त्यांना भेटलेला नसतो. आता सराईत चित्रपट प्रेक्षकाला इथेच समजले पाहिजे हा प्रसंग पेरण्याचा एकमेव हेतू म्हणजे चित्रपटाच्या  शेवटी हिरोलाच हे पेन मिळणार. आणि तसे घडतेही. पण इथे पुन्हा सहस्रबुद्धे मास्तर भाषण ठोकतात मला पेन कुणी दिले? ते मी कुणाला देणार? वगैरे वगैरे... जणू काही गझनी पाहिल्यापासून अमीरच्या प्रेक्षकांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला आहे आणि तासाभरा पूर्वी घडलेला प्रसंग त्यांच्या लक्षातच नाही.

कॉलेज लाईफ, अमीर खान आणि ओवर सिम्प्लिफाइड कथानक असे हुकमी एक्के वापरले (आठवा- जो जिता वही सिकंदर) की चित्रपट गाजणारच हे बरोबर हेरून निर्माता दिग्दर्शकांनी आपापले उखळ पांढरे करून घेतले आहेत. ह्यावेळेला फरक इतकाच होता की १२वी पास होऊन नुकतीच कॉलेजात ऍडमिशन घेतलेला कोवळा दिसणारा रणछोडदास साकारण्यासाठी आता मात्र चाळीशी उलटलेला अमीर खान होता. पण मध्यंतरी इतकी वर्षे गेल्याने अमीर म्हातारा झाला असला तरी कंप्युटर आणि ग्राफिक्स तंत्रज्ञान मात्र कुठल्या कुठे गेले आहे. फ्रेम बाय फ्रेम फोटोशॉपवारुन् अमीरच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या काढल्या आणि सगळे काही गुळगुळीत केले की झाले. पुन्हा तोच कोवळा दिसणारा अमीर खान आणि कॉलेजचे वातावरण बस. मग त्या माधवनला कोण बघतंय? भले तो एखाद्या वयस्कर माणसासारखे सुटलेले पोट घेऊन आणि तशीच देहबोली दाखवत फर्स्ट इयरच्या वर्गात बसलेला का दाखवला असेना. त्याच्या घरी पण त्याचे आई वडील म्हणजे त्याचे भाऊ बहीण का वाटेनात. तसेच ७८ साली जन्मलेल्या म्हणजे साधारण १० वर्षांपूर्वी कॉलेजात असलेल्या मुलांचे कपडे, मोबाईलचा सुळसुळाट हे आजच्यासारखे का वाटेना. असले प्रश्न पडायचा संबंध नाही.

अर्थात शेवटी मसाला/व्यावसायिक चित्रपट आहे म्हणून हे सगळे गळ्यात ढकलले तरी करीना कपूरला बोहल्यावरून आणायला गाडी जेव्हा वळण घेते तेव्हा कथेला जे वळण दिले आहे त्यामुळे क्षणोक्षणी घशात घास अडकल्या सारखे होते. मग व्याक्युम क्लिनरने केलेली डिलिवरी काय, आल इज वेल म्हटल्यावर बाळाने मारलेली लाथ काय सगळेच पचण्याच्या पलीकडे जाते. पण तरीही चित्रपट मला टाकाऊ वाटला नाही. कारण वासरात लंगडी गाय शहाणी असते. 'हिंदी चित्रपट' ह्या नावाखाली इतर वेळेला जे काय काय विकायला ठेवलेले पाहून हा चित्रपट त्यामानाने बराच सुसह्य वाटतो. जमेची बाजू म्हणजे कितीही सोप्प्पा करून मजा घालवला असला तरी मुळांतला संदेश चांगला आहे. मार्कांची पर्वा करू नका, जे मनाला आवडेल ते करा. हा मूळ संदेश असला तरी स्वतःशी प्रामाणिक राहा, हातात अंगठ्या घालून किंवा आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात इ.इ. उपसंदेश आजकालच्या रामदेवबाबा जनरेशनसाठी जास्त महत्त्वाचे वाटले. विनोद हे पानचट आणि ईमेल मधून तसेच कॉलेज कट्ट्यावर कितीदा तरी चघळलेले शिळे असले तरी सादरीकरण प्रभावी आहे. चमत्कार-बलात्कार वगैरे विनोद तर शालेय दर्जाचे असले तरी दिग्दर्शकाचे अभिनय करून घेण्याचे कसब उत्तम असल्याने प्रभावी साकारले आहेत. विशेष म्हणजे मुख्य कलाकारांबरोबरच इतर पात्रांकडूनही उत्कृष्ट काम करून घेतले आहे मग तो मिलीमिटर असो की कॉलेल मधले इतर प्राध्यापक. सर्वांना अभिनयाचे पूर्ण गुण. 

इतरवेळी चित्रपट बरा आहे असे म्हणून सोडूनही दिले असते पण इतका उदो उदो चाललेला पाहून, 'चित्रपट आवडला नाही' असे म्हणणे म्हणजे ब्लास्फेमी की काय असे वातावरण झाल्याने राहवले नाही.