पिंडदान करावे की करू नये?

१४ जून,१९८० या दिवशी माझे वडील वारले. (त्यांचा वाढदिवस १३ जून होता). मी कॉलेजला होते. कोणी जवळची व्यक्ती जाण्याचा पहिलाच प्रसंग होता. पूर्ण घरच हादरून गेले. यथावकाश त्यांचे दिवस वार केले. त्यांच्या १३व्याच्या दिवशी काही केल्या पिंडाला कावळा शिवेना. त्यांची काही इच्छा तर राहिली नाही याची खात्री होती. तरी काय होते आहे कळेना. माझ्या भावाने तरी देखिल "आईला नीट सांभाळीन. " "नीताचे लग्न कार्य चांगले करीन. " वगैरे सर्व बोलून टाकले. तरी कावळा काही शिवेना. दुपारचे दोन वाजले. शेवटी आई म्हणाली, "मुलांना वाढून द्या. कावळा शिवेल. " आधी कोणालाच ते पटेना. पण जसजसा वेळ जायला लागला तसे शेवटी आईच्या म्हणण्याप्रमाणे केले. आणि काय आश्चर्य कावळा खरेच शिवला. त्याच वेळी आईने सांगून टाकले की माझे हे काही प्रकार करायचे नाहीत. अगदी दिवा सुद्धा ठेवायचा नाही. तिसऱ्या दिवशी अस्थी विसर्जन झाले की सगळे संपले पाहिजे. घरात सुतकी वातावरणही ठेवायचे नाही. पुढे सुद्धा सतत ती हेच सांगत रहायची. ती २१ जानेवारी १९९६ ला गेली. तिच्या इच्छेप्रमाणे तिचे काही केले नाही. आपण म्हणतो की आत्म्याच्या शांतीसाठी हे प्रकार करावे लागतात. पण माझ्या आईने तिच्या वागण्याने हा धडा दिला की असे काही नसते. तिचा आत्मा कुठेही भटकत असल्याचा अनुभव नाही. या पिंडदानाच्या नावाखाली चाललेली लुटालूट तिला मान्य नव्हती. मला वाटते की खरेच या नावाने आपल्या भावनांशी खेळ केले जातात. मी देखिल माझ्या मुलाला हेच सांगितले आहे की माझे काहीही करायचे नाही. तुला फारच वाटत असेल तर येणारा खर्च एखाद्या सेवाभावी संस्थेला दान कर. आजकाल बरेच लोक असे करत आहे. तुम्हाला काय वाटते?