कॅसेटकथा १ -कैफी रफी

प्रास्ताविकः आपल्याकडे असलेल्या गाण्यांच्या संग्रहाचा परिचय करुन  देण्याचा हा प्रयत्न. कॅसेटस, सीडीज, त्यांमधील गाणी आणि जमलं तर त्या गाण्याचा छोटासा रसास्वाद. वाचकांनी यात भर घातली तर तिचे मनापासून स्वागत आहे.
"एवढं कॅसेटसचं कलेक्शन आहे चांगलं, तर ते सगळं एम पी ३ फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करून ठेवा."  एक शुभचिंतक मित्र कळवळ्यानं म्हणाला. "कॅसेटी काय, आज आहेत उद्या नाहीत. ही टेक्नॉलॉजी आता बंदच होणार हळूहळू.  प्लेअर मोडला तर दुरुस्तसुद्धा करता येणार नाही. मी सांगतो वाटलं तर तुम्हाला कसं करायचं हे ते" मी नाराजीनं मान डोलावली. आम्ही दोघांनीही माझ्या कॅसेटींच्या संग्रहाकडे बघीतलं. कुठूनकुठून गोळा केलेलेया कॅसेटी.  कॅसेटचं अनेकवचन सहजपणानं 'कॅसेटी' असं होत असे, अजूनही होतं. कॅसेटी आता कालबाह्य होणार हे पचायला अवघड जात होतं. सीडी, डीव्हीडी, एम पी ३, पेन ड्राईव्ह, आयपॉड अशा माध्यमांशी अद्याप सलगी झालेली नाही. कॅसेटी अजूनही आपल्या वाटतात. अचानक काही  ऐकावसं वाटलं तर अजूनही हात कॅसेटकडेच जातो. घरात पहिला प्लेअर घेतला तेंव्हा हौसेहौसेने विकत घेतलेल्या, मुद्दाम यादी तयार करून तशा रेकॉर्ड करून आणलेल्या (त्याला 'भरुन' आणणे असं म्हणत असत), इंपोर्टेड म्हणून कवतिक असलेल्या आणि  फर्माईशी गाणी ऐकण्याचा पहिला आनंद देणाऱ्या कॅसेटीच.  या मित्राच्या सल्ल्यानं
बाकी जरा दचकायला झालं. कॅसेटी बंद होणार?  मला तर नवीन गाडीत सीडी, एमपी३ , पेनड्राईव्ह प्लेअर आहे याच्या कौतुकापेक्षा कॅसेट प्लेअर नाही याचं दुःख झालं होतं. कुठूनकुठून गोळा केलेल्या कॅसेटी..
एका गाण्यासाठी इतर भरताड सहन करून विकत घेतलेल्या कॅसेटी. वीस वीस वर्षे सांभाळून ठेवलेल्या कॅसेटी
चळतीतली वरचीच कॅसेट मी प्लेअरमध्ये टाकली. 'देखी जमाने की यारी... '  खोल डोहातून येणारा रफीचा आवाज.  या गाण्याने प्रत्येक वेळा 'ज्वुवेल थीफ' आठवून लिहायचं म्हटलं तर 'दिलमें कुछ हो जाता है'.  'रफी सिंग्ज फॉर कैफी आजमी' हे या कॅसेटचं नाव. खरं तर रफी, कैफी आणि मदनमोहन असं काहीसं या कॅसेटचं नाव असायला पाहिजे होतं.  कारण यातली तीन गाणी सोडली तर बाकीच्या सगळ्या गाण्यांना मदनमोहनचं संगीत आहे. असो, तर 'बिछडे सभी' चं सांगत होतो. 'मतलब की दुनिया है सारी.. ' यातल्या "सा...... री" मध्ये एक गारुड आहे. हा तर  अल्लातालाचा हात लागलेला सूर. 'इक हाथसे देती है दुनिया, सौ हाथोंसे लेती है... ये खेल है कबसे जारी.. ' इथे सस्त्या शब्दांत सांगायचं तर 'पैसा वसूल' होतो.
या 'कैफा'तून जरा बाहेर पडता पडता  व्हायोलिनची एक जबरस्त करुण सुरावट सुरू होते. व्हायोलीन हे जरासं हृदयविकाराला आमंत्रण देणारंच वाद्य. माणसाच्या आवाजाच्या सर्वात जवळ जाणारे सूर फक्त व्हायोलीनमधून निघू शकतात असं ऐकलं आहे.  'मै ये सोचकर उसके दरसे उठा था, के वो रोक लेगी, मना लेगी मुझको...' तालवाद्याची संगत नसलेलं आणि सुधीरसारख्या सामान्य नटावर चित्रित झालेलं हे गाणं कितीही वेळा ऐका. 'आता पुरे' असं वाटत नाही. 'शायरी माझी ऐकताना जो म्हणेल की आता पुरे, तो रतीला चुंबतानाही म्हणेल की आता पुरे.... '  लडाखमधील त्या निष्पर्ण राखाडी रंगाच्या टेकड्या, खडकाखडकांवर पत्रं वाचत बसलेले शिपाई आणि एकटाच पाठमोरा सुधीर.... 'हकीकत' ची सगळीच गाणी ही एक जादू आहे. पण हे गाणं म्हणजे जरा खासच.
पुढचं गाणं म्हणजे 'दो दिल' मधलं हेमंतकुमार यांनी संगीतबद्ध केलेलं  'तेरा हुस्न रहे मेरा इष्क रहे.. ' त्यातल्या रफीसाहेबांच्या नशील्या आवाजाला कसं विसरता येईल? 'इसी मस्त नजरसे पिलाये जा, मेर सामने जाम रहे ना रहे... ' यातल्या 'नजर' या शब्दावर एक फिरक  आहे. जामची आठवण करून देणारी जर नजर असेल तर तिनं असं जरा हौले हौलेच प्यायला लागणार...
यापुढच्या 'हकीकत' मधल्याच  'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या गाण्यावर सगळं लिहून-बोलून झालं आहे. 'जिंदा रहने के मौसम बहोत है मगर, जान देने की रुत रोज आती नही' असल्या सणसणीत ओळी असलेलं हे गाणं. "छू न पाये सीता का दामन कोई, राम भी तुम, तुमही लक्ष्मण साथियों" हे लिहिणाऱ्याचा आणि गाणाऱ्याचा धर्म कोणता असला प्रश्न त्या काळात कुणाच्या मनात आला असेल का?  बहुदा नसावा. 'तुमचं आडनाव आझमी आहे, मग तुम्ही राम या विषयावर का लिहिता?' असे सवाल विचारले जाण्यापूर्वी कैफीसाब निघून गेले ते बरंच झालं.  'बांध लो अपने सरपे कफन साथियों' हे त्यानी कोणत्या अर्थाने लिहिलं आणि ते खरं कोणत्या अर्थाने होत आहे.....
त्या  या बाजूचं शेवटचं 'नौनिहाल' मधलं 'तुम्हारे जुल्फ के साये में शाम कर लूंगा' हे रफीच्या अजरामर गीतांपैकी एक. 'नजर मिलायी तो पूछूंगा इश्क का अंजाम, नजर झुकायी तो खाली सलाम कर लूंगा' अशी शायरी फक्त प्रयत्नसाध्य असेल यावर विश्वास बसत नाही.
मी कॅसेटची दुसरी बाजू लावली. 'मिले न फूल तो काटोंसे दोस्ती कर ली' कैफीजींच्या सर्वोत्कृष्ट  गाण्यांपैकी एक गाणं हे. 'नजर मिली भी न थी और उनको देख लिया' यात रफीसाहेबांचा आवाज घरंगळत खोल जातो. 'जुबां खुली भी न थी और बात भी कर ली' हे कसं शक्य आहे हे अनुभवी लोकांना सांगायला नको. 'अनोखी रात' मधलं मुकेशचं 'ओहरे ताल' तर अजरामर आहेच, पण 'मिले' ला ही तोड नाही. पुढची 'मेरी आवाज सुनो' आणि 'ये दुनिया ये महफिल' ही गाणी मला जरा दळण वाटतात . 'हीर रांझा' हा एकूणच मदनमोहनच्या प्रतिमेला न शोभणारा चित्रपट. असो. या कॅसेटचा शेवट 'तुम जो मिल गये हो' या 'हसते जख्म' मधल्या सुरेख गाण्याने होतो. मदनमोहन हा फक्त अभिजात भारतीय संगीताला कवटाळून बसणारा संगीतकार नव्हता, तर संगीतात अनेकानेक नवीन प्रयोग करणारा अवलिया होता. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित मामोहन यांची गाणी तर अप्रतिम आहेतच, पण 'तुम जो' मध्ये त्यांनी पाश्चात्य संगीताचा जो प्रयोग केला आहे, तो कुठेही ठिगळजोड वाटत नाही, हे विशेष.
तर माझ्या कॅसेटींच्या संग्रहातील माझ्या सर्वात आवडत्या कॅसेटींपैकी ही एक. मोजून नऊ गाणी. नवरत्न किंवा नवलखा हार असलं काही लिहीत नाही, पण सदा सुहागन अशी ही कॅसेट.