कामथे काका ( भाग पहिला )

सकाळची दहा साडेदहाची वेळ होती. मध्यवर्ती तुरुंगाच्या बाहेर आज थोडीशी गर्दी होती. म्हणजे दहा पाच माणसं. जवळून जाणारा लहानसा रस्ता मुंबईला जाणाऱ्या हमरस्त्याला मिळायचा. दिवस उन्हाळ्याचे होते. सूर्य नारायण प्रसन्न होते. आपली पॉवरबाज किरणं पृथ्वीवर टाकून स्वतःच्या अस्तित्वाची ते जाणीव करून देत होते. मुख्य गेटच्या बाहेरची गर्दी सकाळी आठ पासूनच होती. आज काही कैद्यांच्या सुटकेचा दिवस होता. नेमकी गांधी जयंती होती. कुणाची बायको पोरांसहीत आपल्या नवऱ्यासाठी आली होती, तर कुणाची बहीण, तर कुणाचे मित्र व नातेवाईक, आपल्या माणसाच्या सुटकेसाठी आले होते. काही वर्षांपासून बिचाऱ्यांनी वाट पाह्यलेली होती......... अचानक, मुख्य दरवाजा उघडला गेला. आतून तीन चार कैदी आपापले सामान घेऊन बाहेर आले. बाहेरील माणसांशी त्यांची गळाभेट झाली. डोळ्यातले आनंदाश्रू लपवता लपवता बाया माणसांची पुरेवाट झाली. एकूण बाहेर आनंदाचे, निदान स्वागताचे तरी वातावरण होते. नंतर आणखीन एक कैदी बाहेर आले. चार वर्षांचा कारावास भोगून त्यांनी आज बाहेर पाऊल ठेवलं होतं. त्यांना न्यायला किंवा भेटायला मात्र कोणीही आलेलं नव्हतं. त्यांचं नाव होतं........... " का म थे का का ".

साधारण छप्पन सत्तावन वर्षांच वय. ओढलेला सुकलेला चेहेरा. डोळ्यांवर जाड आणि गोल भिंगाचा, लाल काड्यांचा चष्मा त्यांच्या जरा फुगीर नाकावर घट्ट बसलेला होता. त्यांनी भुवया आक्रसून बाहेरच्या जगाकडे पाह्यलं. मग चेहेरा पुसायचा म्हणून त्यांनी चष्मा काढला आणि जुनाट मळकट रुमालाने तो पुसला. जणूकाही चार वर्षांचा काळ त्यानी झटकन पुसून टाकला. डोक्यावरचे केस पांढरे होतेच. पण डोक्याच्या मध्यापासून ते मागेपर्यंत टकलाचा एक लहानसा पट्टाच तयार झाला होता. काकांचा मुळचा चेहेरा चांगला भरलेला आणि रुंद होता. गेल्या दहा वर्षातल्या दगदगीने इतका ओढला गेला होता की तो ओळखीचा माणूसही चटकन ओळखू शकला नसता. अंगावर तेच जुने चार वर्षांपूर्वीचे कपडे होते. एक साधारणसा हलक्या निळसर रंगाचा ओपन शर्ट आणि काळी पँट. डाव्या हातातली पिशवी सांभाळत त्यांनी पुन्हा एकदा चष्मा चढवला. कपाळावरचा घाम पुशीत ते जरा थांबले. त्यांनी एकदा आलेल्या माणसांवर नजर फिरवली. अर्थातच रमेशच्या येण्याची त्यांना अपेक्षा नव्हतीच. नाही म्हंटलं तरी निराशा आलीच. आता त्यांना प्रश्न होता, जायचं कुठे?.... रोहिणी तर ते तुरुंगात गेल्या गेल्याच काही दिवसात गेली होती. आता घरी रमेश, त्यांचा मुलगा, त्याची बायको नीता आणि दीड एक वर्षाची श्रेया एवढीच माणसं होती. त्याना रोहिणी च्या आठवणीने गलबलून आलं. त्यांची बाजू घेणारी, त्यांना निर्दोष मानणारी, त्यांची काळजी घेणारी रोहिणी आता हयात न्व्हती. काकांनी भावना दाबल्या. अश्रू आवरले....... निदान निलूनी तरी यायला हवं होतं. आपुलकीनं चौकशी करायला हवी होती. आपल्याला किती त्रास झाला तिला सांगता आलं असतं. आतला एकाकीपणा, जगापासून दूर राहणं आणि त्यामुळे आलेला कडवटपणा तरी तिला सांगता आला असता. पण आजकालच्या मुलांना माया नसते हेच खरं.

निलू त्यांची एकुलती एक मुलगी अमरावतीला होती. ती येऊ शकत नाही हे त्यांनाही माहित होतं. पण माया वेडी असते. त्यांना कोणाजवळ तरी जाऊन मन मोकळं करायचं होतं. त्यांच्या मनात आलं. जावयाचं ठीक आहे. पण मुलींना बापाबद्दल माया असते असं त्यांनी वाचलही होतं आणि पाह्यलंही होतं. पण त्यांचा अनुभव फारसा चांगला नव्हता. जवळ जवळ पाच सात मिनिटं झाली. काका गेट जवळच उभे होते. आतल्या हवालदाराने विचारलं, " काय काका, कोणी आलं न्हाई का न्यायाला? " त्यांना तुरुंगात पण काकाच म्हणत. ते आत आले त्या दिवशी भेदरलेल्या मनस्थितीत होते. त्यांना पाहून अट्टल चोर दरोडेखोर, किशा दादा त्याचे पाय दाबित बसलेल्या जेबकतऱ्याला म्हणाला " अरे ए, बघ बघ, अस्सल वरण भात आलाय. " मग त्यांच्याकडे वळून तो म्हणाला, " खाया नही पिया नही गलास त्वोडा बारा आना. किती मुक्काम? " मग जेलर ओरडला. "किशा थोबडा बंद कर. चारच वर्षासाठी आलाय. तुझ्यासारखा वारकरी नाही. " काकांचं मन शब्दा शब्दाला भूतकाळ पूढे आणू लागलं. भानावर येत काका गेटावरच्या हवालदाराला म्हणाले, " अरे बाबा, मी काय तीर्थयात्रा करून थोडाच आलोय, की माझं दर्शन घ्यायला आणि अशिर्वाद घ्यायला कोणी येईल?...... चालायचच, " असं म्हणत जड आणि थंड पावलं टाकित ते रस्त्यावरून चालू लागले. घरी गेल्यावर रमेश काय म्हणेल? आज तो घरीच असणार. दोन ऑक्टोबर म्हणजे "गांधी जयंती ". खरतर आज तुरुंगात जरा वेगळं. जेवण असतं. बाहेरून मिठाई येते. रमेश घरी असणार या विचारानी त्याना बरं वाटलं. निदान, त्याची बायको, चिमुरडी श्रेया पण दिसेल? कोणासारखी दिसत असेल बरं? रोहिणीसारखी?, त्याच्यासारखी? की माझ्यासारखी? मग त्यांची मान मनातल्या मनात खाली गेली आणि स्वतःशीच म्हणाले, " माझ्यासारखी कशाला? अपशकुनी, आपल्यात घेण्यासारखं काय आहे? " ते आत असतानाच रमेशचं लग्न झालं. त्यांची लग्नाला जाण्याची इच्छा पण होती. जेलरनी एक दिवसाची रजा पण मंजूर केली होती........ मुसलमान असूनही. सहृदय गृहस्थ होते ते. काकांची केस त्यांना माहिती होती. पण लग्ना आधी दोन दिवस तो त्यांना भेटायला आला. त्यांना वाटलं आग्रहाचं बोलावण बापाला करायलाच हवं या भावनेनी तो आलाय. पण भेटण्याच्या रुम मध्ये बसलेला रमेशने त्यांनी लग्नाला न यावं हे सांगायला आला होता. तो म्हणाला, " आई नाहीच आहे. तुम्ही येऊन निष्कारण कार्याची शोभा वाढवू नका. सासुरवाडच्या लोकांना थोडी फार कल्पना दिलेली आहे. ते तयार झालेले आहेत. त्यात खोडा घालू नका. " बस. एवढीच वाक्य. पण किती तटस्थ होती.... तो त्यांना पुढे काही बोलायला न देताच जायला वळला देखील.

त्यादिवशी रात्री काका अंथरूणावर पडल्या पडल्या किती रडले होते. हे फक्त त्यांना आणि जेलर साहेबांनाच ठाऊक. कारण राउंडवर असलेले जेलर साहेब रडण्याचा आवाज ऐकून जवळ आले होते. पाठीवरून हात फिरवीत ते म्हणाले होते, " अरे आयुष्य असच असतं, जीव ज्याच्यावर लावा आणि अपेक्षा करावी तोच नेहेमी फिरतो. रडू नकोस काही उपयोग व्हायचा नाही. " मग ते थांबले. खरच रडून उपयोग नाही. भावनाना वाट वगैरे कथा, कादंबऱ्यांमध्येच ठीक असतं. काका समजायला लागेपर्यंत जे काही रडले असतील तेवढेच. मग लक्षात आलं की रडणं हे नामर्द पणाचं लक्षण समजतात. आई वडील गेले तेव्हाही ते रडले नाहीत. उलट त्यांची बायको रोहिणी मात्र रडत होती. तिचं त्यांनीच सांत्वन केल होतं. तिचं मात्र कौतुक झालं, "सासू सासऱ्यांसाठी रडणारी सून" म्हणून.

असो. कोणी येणार नाही याची खात्री झाल्याने म्हणा किंवा दुसरं कुठे जाणार, ही लाचारी असल्याने म्हणा, ते विचारांच्या वादळातून बाहेर येऊन, त्यांनी बस स्टॉप शोधला. त्यांना परळला जायचं होतं. बस आली. ते बस मध्ये चढले. तिकिटासाठी पैसे देण्याकरता खिशात हात घातला आणि एक घडी घातलेला कागद चुकून खाली पडला. कंडक्टर म्हणाला, " काका, असे कागद खाली पाडू नका, महत्त्वाचा असला तर पंचाईत होईल. " त्याने वाकून तो कागद त्यांच्या हातात दिला. त्यांना जरा बरं वाटलं. निदान कोणीतरी आपल्याशी नीट बोललय.... ̱ घडी घातलेला कागद म्हणजे त्यांची तुरुंगातून सुटल्याची रिलीव्ह ऑर्डर होती. हा कागद सांभाळून काय करायचाय? त्यांच्या मनात आलं. त्यांनी अहेतुक पणे तो उलगडला. त्यात त्यांचं पूर्ण नाव होतं.........

"रामचंद्र भास्कर कामथे वय ५७, राहणार,........... त्यात त्यांचा परळचा पत्ता होता. आजची तारीख... वेळ..... कंसात मध्यान्ह पूर्व असं लिहिलेलं होतं....... यांना मध्यवर्ती तुरुंगातून..... सोडण्यात येत आहे. त्यात त्यांच्या जवळच्या वस्तूंची यादी होती. ज्या त्यांना परत दिल्याचे व त्यांचे तुरुंगातिल कामाचे पैसे दिलयाचे ही लिहिले होते. त्यांचच संपूर्ण नाव मोठ्या आवाजात घुमलं. असच नाव कोर्टात शिक्षा ठोठावताना घुमलं होतं. काका व्यथित झाले. त्यांच्या मनात आलं. हे प्रशस्तिपत्र की सुटकेची परवानगी? त्यांनी घाईघाईने चोरासारखा तो कागद घडी घालून खिशात ठेवला. आणि बाजूच्या प्रवाशाकडे पाह्यलं. त्यांच्या मनात आलं. त्याने वाचला तर नसेल? त्याला काय वाटलं असेल? एक कैदी त्याच्या जवळ बसलाय. पण बाजूच्या प्रवाशाचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. तो खिडकीतून बाहेर बघत होता. मग काकांना त्याचा विनाकारण राग आला. मनात म्हणाले, " डांबरट लेकाचा. पाहूनच्या पाहून आणखीन खिडकीतून बाहेर पाहतोय. " बस धावत होती. शेवटी परळ आलं. सगळ्यांबरोबर काका स्टॉपवर उतरले.......

(क्र म शः )