कामथे काका (भाग विसावा)

आपण उगाचच अस्वस्थ होतोय. त्यांच्या मनात आलं, कुठला का आवाज असेना, सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत असं थोडंच आहे? पण वरवरच्या मलमपट्टीने मन मानेना. तेवढ्यात साधनाने कूस बदलली. तिच्या श्वासाचा मंद आवाज येत होता. त्यांना आता पडण्यापेक्षा उठून बसावंस वाटलं. अधून मधून खरवडण्याचा आवाज येतच होता. ते परत अस्वस्थ झाले. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. तीन वाजत होते. ठोके पडू द्यावेत, मग उठावं. नाहीतर त्या आवाजाने साधना उठली आणि आपण तिला जागेवर दिसलो नाही तर.....? त्यांना गैरसमजाची भीती वाटली. दहा मिनिटं नुसतंच पडून राहायचं होतं. मग त्यांनी नीताचा विचार करावयास सुरुवात केली. तिला संशय तर आला नसेल? त्यांना नीताकडून सुरुवातीला मिळालेली तुच्छतेची वागणूक आठवली. त्याने ते व्यथित झाले. आता तीन वाजून गेले होते. पडलेले ठोके त्यांना आठवणींच्या ओघात ऐकूच गेले नाहीत. मग त्यांचं लक्ष सहज घड्याळाकडे गेलं. तीन वाजून चांगली दहा मिनिटं झाली होती. त्यांना वाटलं, ठोके पडूनही त्यांनाच काय साधनालाही ऐकू आले नाहीत. ते जागेच होते तरीही. माणूस उगाचच घाबरतो. कारण तो तेवढा निर्ढावलेला नसतो. त्यांना मनाचं आश्चर्य वाटलं. स्वतःच प्रश्न निर्माण करतं आणि स्वतःच उत्तर किंवा वेगवेगळे तर्क वितर्क पुढे आणतं. आपण सहज पणानं वागावं, माणूस हेच नेमकं विसरतो. असो. ते जागचे उठले. परिचितासारखे स्वयंपाकघरात आले. एवढ्या पावसाळ्यातही ते फ्रीज मधलं थंड पाणी प्यायले......

आणि त्यांनी पुढच्या दाराला कान लावला. आवाज थोड्या थोड्या वेळानं येत होता. जणू कोणी ऐकत नाही ना

याची खातरजमा करूनच काम करणारा आवाज करीत होता. त्यांनी हळूहळू लॅच उघडला. बोल्टही सरकवला. पुढचा दरवाजा अर्धवट उघडला. कॉरिडॉरमधून पावसाळलेला पिवळा प्रकाश एकदमच त्यांच्या तोंडावर आल्याने त्यांचे डोळे अंमळ दिपले. मग त्यांनी मागे वळून आत पाहिलं. मागे अर्थातच कोणीही नव्हतं. त्यांनी सावकाश दरवाज्याचं लॉक बंद केलं. दरवाजा कमीत कमी उघडा ठेवून ते बाहेर पडले. झडीच्या पाण्याने पायाला लागणारा ओलसरपणा अंगवळणी पाडत ते जिन्यापर्यंत गेले. आता खाली उतरणार एवढ्यात समोरच्या अंधारात दोन डोळे चमकले. गुरगूर करीत झोपलेलं कुत्रं त्यांच्याकडे आलं. त्यांचा वास घेतला. मग जागेवर जाऊन शांतपणे पडून राहिलं..... ते तसेच खाली उतरले. आता आवाज खरवडण्या ऐवजी ठप्प.. ठप्प असा येत होता. एवढ्या रात्री कोण आणि कसली दुरुस्ती करतंय? आणि आजूबाजूच्या फ्लॅटमधले लोक बाहेर कसे आले नाहीत? का ते बेशुद्ध झाले आहेत? काही ठिकाणी गॅलऱ्यांच्या बाहेर लावलेल्या पत्र्यांमुळे पावसाचा आवाज जास्त येत होता, म्हणूनही तो आवाज कोणाला ऐकू आला नसावा अशी समजूत त्यांनी करून घेतली. हळू हळू ते पहिल्या माळ्यावर आले. सरडे आजींच्या घरातून आवाज येत होता. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांचं लक्ष आता लगतच्याच फ्लॅट कडे गेलं. त्यालाही बाहेरून कुलूप होतं. शेजारच्या माणसालाही दादाच्या माणसांनी बाहेर काढलं होतं की काय? ते थोडे शहारले. दादाने आजींना मारून फ्लॅट बळकावला होता. आणि इथून ते बँकेत घुसणार होते..... त्यांनी हा विचार घाबरून दडपून टाकला. हे शक्यच नाही. दुसरा कुठला तरी आवाज असेल. पण मनात निर्माण झालेली शक्यता एवढी प्रबळ होती आणि खरीपण (ज्याची त्यांना खरीतर जाणीवही होती), की त्यांना आता आपण खाली आलोय, आणि आपल्याला कोणी पाहिलं तर काय होईल, या भीतीने ते चटकन मागे वळले. वरच्या जिन्याकडे जाण्यासाठी त्यांनी पावले उचलली. इकडे तिकडे चोरासारखे पाहतं (जणू काही तेच ताराबाईंचा फ्लॅट फोडत होते)ते तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. दरवाज्याशी आले तर, दरवाजा सताड उघडा होता. आत साधना उभी होती........ आता तर त्यांची बोबडीच वळली. साधनाने लाइट लावला नव्हता, त्यामुळे ती एखाद्या अनोळखी आकृती सारखी दिसत होती. ते आ वासून पाहत राहिले. ती म्हणाली, " हे काय चाललंय तुमचं? ".... ते थरथरत म्हणाले, "नं...! नाही काही नाही!..... "

" मग एवढ्या रात्रीचे बाहेरसे गेलात? कोणी आलं होतं? " तिने काळजीने विचारले. तिच्या बोलण्यात त्यांना भीतीही जाणवली. आत येत तिला समजावणीच्या सुरात ते म्हणाले, " अगं मला कसला तरी आवाज आला म्हणून मी पाहायला गेलो इतकंच ". तरी ती संशयाने म्हणाली, "इतकंच? चला झोपा आता. तुम्हाला पहिल्यापासून झोप कमीच आहे का? असे रात्रीचे कितीतरी आवाज येतात, तुम्ही सगळ्या आवाजांचा माग काढता की काय? ती तशीच पाठमोरी होऊन तिच्या बिछान्याकडे वळली.

मग तेही अंथरुणावर चुळबुळत पडून राहिले. ती काहीच बोलली नाही, पण त्यांना कांडकोडल्यासारखं झालं.

* * * *

* * * *

* * * *

* * * *

इकडे कॉन्स्टे. सावंत ड्यूटी संपली असूनही परत पोलिस स्टेशनकडे निघाला. स्वतःच तोल सांभाळीत तो रस्त्याने चालला होता. त्याला अजूनही शंका होती, या बदमाशांनी कुणातरी बाईला पळवून आणली आहे, नाहीतर तिथे ती सोन्याची बांगडी कुठून आली?. ती त्याच्या हातातून मिळे पर्यंत सूर्या इतका अस्वस्थ का झाला होता? मग त्याला वाटू लागलं, आपण नक्की शुद्धीवर होतो ना? काहीही झालं तरी बांगडी आणि तो म्हातारा नक्कीच आपण पाहिला होता. त्यामुळे त्याला सदर घटनेची सायबाला सांगून स्टेशन डायरीत नोंद घेतली पाहिजे असं वाटू लागलं. आता तो चांगलाच शुद्धीवर आला होता. त्याचा तोल जाण्याचं थांबलं. त्याला आपल्या पिण्याचा राग येऊ लागला. एकदम त्याला आपण केव्हा प्यायला सुरुवात केली ते आठवावंस वाटलं. पण मेंदूला ताण देऊनही त्याला आठवेना. त्याने डोकं पुन्हा पुन्हा हालवून प्रयत्न करून पाहिला. पण सुचेना. मग आलेला ताण विसरण्यासाठी त्याला परत एखादा पेग तरी घ्यावा असं वाटू लागलं. या सगळ्या तंद्रीत त्याला स्टेशन कधी आलं ते कळलं नाही. रात्रीचे नऊ वाजत होते.... त्याचा सहकारी सखाराम पानतावणे त्याला पाहून म्हणाला, " सावतानू रस्ता चुकलात जनू? हे घर नाय पो. स्टेशन हाय. संध्याकाळीच रिलीव्ह झालास अन लगेच आलास? " सावंतला सख्याचा राग आला, त्याला हलकी शिवी देत तो म्हणाला, " सायेब हाय का बघ. माझ्याजवळ इंफरमेशन आहे. " फारसं काम न करणाऱ्या सावंतकडे इंफर्मेशन आहे म्हंटल्यावर खवचट पणे सखाराम म्हणाला, " लवकरच पीएसाआय होणार बघ गड्या तू" सावंतला त्याची लगट आवडली नाही. नाही म्हंटलं तरी आपण याला चांगलेच सीनियर आहोत. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करीत तो आत शिरला.

इन्स्पे. श्रीकांत कोणत्यातरी फायलीत डोकं घालून बसले होते. ते वाचता वाचता विचारमग्न होत होते आणि बाजूच्या कागदावर टिपणे काढीत होते. थोडक्यात ते फाइलचा अभ्यास करीत होते. त्यांच्यासमोर एका मृत व्यक्तीचा फोटो होता. तो जीवनरामचा होता. ते पुन्हा पुन्हा फोटोतला चेहरा फायलीतल्या फोटोशी पडताळून पाहत होते. आतापर्यंत एकच खूण जमली होती, ती म्हणजे छातीवरचे गोंदवलेले नाव. हा पेरियरच्या टोळीतला म्हणजे पेरियरला नक्कीच माहिती असणार. त्यांना इतरही काही नवीन कल्पना सुचल्याहोत्या त्यांचेही टिपण त्यांनी काढले होते. त्यांचे वरिष्ठ म्हणजे "एसीपी खंडागळे. " त्यांना इन्स्पे. श्रीकांतांचं ज्योतिषवेड माहीत होतं. आणि ते त्यांना अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या सूचना व अनुमानं ते जरा विचार करूनच स्वीकारीत असत. आता सुद्धा इन्स्पे. श्रीकांतांनी कारवाई साठी योग्य वेळ शोधून काढली होती. अचानक दरवाजा ढकलून आत आलेल्या कॉन्स्टे. सावंतमुळे त्यांची तंद्री भंग पावली. कपाळावर आठ्या घालून आणि सावंतच्या तोंडाचा भपका टाळीत ते म्हणाले, " सावंत, ऑफिसरच्या केबिनमध्ये शिरतानाचे रीतिरिवाज विसरलास वाटतं? ".... मग सावंतने खाली मान घालून सॉरी म्हंटले आणि कडक सलाम ठोकीत तो म्हणाला, " सायेब एक इंफर्मेशन आहे..... " थोडा वेळ थांबून श्रीकांत ओठाच्या कोपऱ्यातून तुच्छतेचं हसू हसत म्हणाले, " तुझ्याकडे आणि इंफर्मेशन? काम कधी पासून करायला लागलास? " सावंत थोडावेळ चुळबूळ करीत म्हणाला, " सायेब किशा आणि त्याची माणसं यांनी एका बाईला पळवून आणलेली आहे. म्हणजे त्याला आपल्याला खंडणीच्या केसमध्ये पकडता येईल. " मग त्याने सविस्तर जे घडले ते सांगितले. ऐकून घेऊन श्रीकांत म्हणाले, " हं! बरंच मोठं स्वप्न पाहिलंस वाटतं, घेतल्यावर? " त्याबरोबर सावंत म्हणाला, "आयच्यान सायेब, आपण दारू पितो, पैशे पण खातो, पण खोटं बोलत नाही. काही करून तुम्ही किशा आणि सूर्याला ताब्यात घ्या. आणि तिथं एक म्हातारा बी होता, कुठं पळाला कोण जाणे..... " असं म्हणत सलाम ठोकून तो केबीन बाहेर पडला.

श्रीकांतच काय, सावंतचं बोलणं गंभीरपणे घ्यायचं नाही, असं जणू सगळ्या स्टाफने ठरवलं होतं.श्रीकांत सर परत फायलीत घुसले. त्यांना खंडागळे साहेबांना भेटून काढलेली टिपणं दाखवून कधी एकदा पेरियरला ताब्यात घेतोय असं झालं होतं. पेरियर, एक नामचीन गुंड. काही वर्षांपूर्वी श्रीकांत सरांचा त्याच्याशी सबंध आला होता. त्यावेळी त्याने त्यांना जी तुच्छता दर्शक वागणूक दिलेली त्यांना आठवत होती. म्हणजे त्यांना तो बोललेलं आठवत होतं. "स्साला, आजकल डिपार्टमेंटमे कुत्तेके माफिक लोगोंकी भर्ती करवाते है... ". तो आणखीनही काही बोलला होता. पण हे त्यांच्या लक्षात राहिलं होतं. आणि बरेच दिवसात हातही साफ केले नव्हते. ते तसेच उठले. काढलेल्या टिपणांसहित फाइल घेऊन ते खंडागळेंच्या केबीन पाशी पोहोचले. आत कुणीतरी अधिकारी बसला होता. ते दुसऱ्या पो. स्टेशनचे एसीपी शिरसाट होते. ते श्रीकांतांना ओळखत होते. केव्हातरी भविष्य विषयक प्रश्न पाहिल्याने त्यांची ओळख झाली होती. खंडागळे साहेबांनी बाहेरची हालचाल पाहून आत येण्यास फर्मावले. आत शिरल्यावर सलामी झाली. आणि श्रीकांतांना शिरसाट दिसले. ओळखीचं हसू झाल्यावर खंडागळे साहेब म्हणाले, " काय आणलंय? कुंडल्या की काय " थोडं खवचटपणाने त्यांनी विचारलं. वातावरण थोडं सैल झाल्याचं पाहून श्रीकांत म्हणाले, " सर, कुंडल्याच आहेत, फक्त गुन्हेगारांच्या, इतकंच. " खंडागळेंना असली जवळीक आवडली नाही. शिरसाटांबरोबर ते हसले, पण बेताचेच. मग श्रीकांतांनी काढलेली टिपणं व फाइलमधील फ्लॅग लावलेले भाग दाखवले. खंडागळे म्हणाले, " फाइल ठेवून जा,मी वघतो आणि बोलावतो तुम्हाला. " खंडागळे साहेबांना अर्थातच फाइल शिरसाट साहेबांसमोर पाहायची नव्हती. तेवढ्यात शिरसाट म्हणाले," ठीक आहे, मी चलतो. चालू द्या तुमचं. " तशी खंडागळे म्हणाले, " कामं होतच राहतात हो. आज लंच घेऊनच जा. "..... पण शिरसाट दहा पंधरा मिनिटातच उठले.

श्रीकांत आपल्या जागेवर परतले होते. त्यांना खंडागळेंकडून कौतुकाची अपेक्षा होती. आपण काहीतरी मौलिक शोधून काढल्यासारखे वाटत होते. या पेरियरच्या टोळीतल्या माणसाचा खून अंतर्गत वैमनस्यामुळेच झाला असणार. हे त्यांना जो जो विचार करावा तो तो वाटू लागलं. एकदा जीवनरामच्या घरीही जाऊन आलं पाहिजे. असा विचार करता करता टेबलावरचा फोन खणखणला. खंडागळे साहेबांनी त्यांना बोलावलं होतं. ते अपेक्षेने उठले. आणि साहेबांसमोर हजर झाले. एसीपी खंडागळे, एक चौकोनी चेहऱ्याचा, मोठ्या नाकाचा, जाड मिशांचा, काळसर दगडी माणूस. ते कधी हसले असतील की नाही हे कुणासही सांगता आले नसते. त्यांनी उग्र नजरेने श्रीकांतांना न्याहाळले, आणि बसण्याची खूण केली. थोडावेळ असाच घालवून त्यांनी विचारले, " श्रीकांत तुम्ही कोणत्या बॅचचे इन्स्पेकटर? " हा प्रश्न अनपेक्षित होता. आणि थोडा निराशाजनकही. माणूस जेव्हा एकदम तुमच्या सर्व्हिसवर किंवा बॅचवर घसरतो, तेव्हा काहीतरी अप्रिय घडणार असं समजावं, असा श्रीकांतांचा होरा होता. त्यांचे अंदाज साधारणपणे बरोबर येत. फाइल वर गंभीर चर्चा होईल असं त्यांना वाटलं होतं. ते चाचरत म्हणाले, " पंचात्तरची बॅच सर "..... " म्हणजे तुम्ही या पदावर गेली पंधरा वर्ष आहात तर. " खंडागळे त्यांचा चेहरा न्याहाळीत म्हणाले. अर्थातच ते येस सर म्हणाले. त्यांचे तोंड उघडे राहिले. त्यांना कळेना हे सगळं कुठे जाणार? ते अस्वस्थ झाले.

खंडागळे कुजकटपणे म्हणाले, " ज्योतिषशास्त्रात लक्ष घालण्यापेक्षा फोर्सच्या कामात लक्ष अघाला. अहो, पेरियर तुम्हाला आवडत नाही, म्हणून तुम्ही हा चान्स घेताय. पण त्याच्या विरुद्ध तुमच्याकडे काय आहे? मृत व्यक्ती त्याच्या टोळीतली होती म्हणून त्याची चौकशी करणार का तुम्ही? तुम्हाला माहीत आहे ना तो कुणाचा पिट्टू आहे ते? आं! त्यापेक्षा मृत व्यक्ती बाबत मिसिंगची तक्रार आहे का ते का पाहत नाही? किंवा त्याच्या घरच्यांना बोलावून बॉडी आयडेंटिफाय का करीत नाही. काही प्राथमिक उपचार पूर्ण करायचे सोडून, हे काय करताय तुम्ही? कामं अशी चालतात होय? "..... "सॉरी सर, पण मला वाटतं जीवनरामचा संबंध किशाच्या टोळीशी तरी नक्कीच असावा. निदान सूर्याला तरी ताब्यात घ्यावा. जीवनरामने किशाच्या टोळीबद्दल आपल्याला खबर कशाला दिली होती. जरी आपली रेड फसली होती, तरी त्याने खबर दिली म्हणूनही कदाचित त्याला किशाने मारला असावा. "...... आपल्या बोलण्याला फाटे फुटतायत असं वाटल्याने खंडागळे चिडले, " हे पाहा,सध्यातरी जीवनरामची बॉडी आयडेंटीफाय करून घ्या, मग विचार करू तुमच्या दुसऱ्या पर्यायाचा. यू मे गो नाउ ". असं म्हंटल्यावर श्रीकांत नाराजीने आपल्या केबीन कडे निघाले. खुर्चीवर रेळून ते बसले. आपलं डोकं चालवण्यात काही अर्थ नाही, हेच खरं. त्यांना एकदम सावंतची आठवण झाली. त्यांनी त्याला बोलावले. पण तो घरी गेला होता.

* * * *

* * * *

* * * *

* * * *

सकाळ झाली. काका ऑफिसला जायला निघाले. आज साधनाची तब्येत बरी होती. चहा आणि नाश्ता तिनेच तयार केला होता. काका दरवाज्यापाशी आले. साधनाने त्यांना विचारले, " संध्याकाळी येणार आहात की घरी जाणार आहात?. त्यावर ते बघतो म्हणाले, आणि निघाले. जिना उतरताना त्यांची नजर पहिल्या मजल्यावरच्या ताराबाईंच्या फ्लॅटकडे गेली. त्याला बाहेरून कुलूप होतं.

आता आवाज थांबला होता. आश्चर्य म्हणजे त्याच्या शेजारच्या फ्लॅटलाही बाहेरून कुलूप होतं. त्यांनी जास्त विचार केला नाही. पावसाची रिपरिप थांबली होती. ते बस साठी थांबले. येणारी बस पकडण्यापूर्वी त्यांना परत साधनाच्या घरी परत जावे असे वाटले, किंवा बाहेर राहून ताराबाईंच्या फ्लॅटवर नजर ठेवावी आणि कोण येतं कोण जातं ते पाहावं असं वाटलं. पण त्यांच्यात तेवढं धाडस नव्हतं. ते ऑफिसमध्ये पोहोचले. ते खुर्चीत बसताक्षणीच त्यांना दादाने आत बोलावले. केबीन मध्ये आज मीटिंग असावी. अकडा, त्याच्याबरोबरचे तिघे आणि इतरही एक दोन माणसे होती. त्यातला एक माणूस एकदम स्मार्ट दिसत होता. तो इंजिनियर किंवा एखाद्या कंपनीचा डायरेक्टर वगैरे असावा असं काकांना वाटलं. गोरटेलेश्या चेहऱ्यावर सोनेरी काडीचा चष्मा त्याला शोभून दिसत होता. उंच कपाळ, त्या खालचे तेजस्वी डोळे पाहून तर काकांची खात्रीच झाली, की तो कुणीतरी इंजिनियर असावा. अंगात ताम्रवर्णी ब्लेझर आतल्या लालसर शर्टावर शोभून दिसत होता. असली रंगसंगती दुसऱ्या कोणालाही शोभली नसती असं त्यांना वाटलं. काका आत आल्याबरोबर, दादाने विचारले, " काकाजी, आपके पास कुछ रस्ता है, ये बैंकका काम जलदी खतम करनेके लिये.? "...... काका विचार करू लागले. बाकीच्या लोकांना काका काय सांगणार कपाळ असं वाटत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्वच्छ दिसत होतं. काका म्हणाले, "एखादा दिनके लिये म्युन्सिपाल्टीका रास्तेका, या गटरका काम निकलेगा तो अच्छा होगा. क्यूं की....

काकांना पुढे बोलू न देता किशा घाईघाईने बाकीच्यांना म्हणाला, " तुम लोगोंको क्या लगता है? " आणि विचारात गढला. बाकी कोणी प्रतिक्रिया देण्या आधी सूर्या म्हणाला, " काकाजी की सलाह से चलेंगे तो समझ लो हो गया कल्याण. " त्याचा उपरोधिक स्वर जाणवला. मग किशा म्हणाला, " काका ठीक कहता है, काम निकलेगा नही, निकालना पडेगा. और मशीन की आवाजमे अकडा अपना काम जलदी भी कर सकता है. ये सब जलदी होना मंगता है. पह्यले ऐसे कॉंट्रॅक्टर को ढूंढो जो हमेशा मशीन किरायेपर देता है. उसे यहां पकडके लाओ.फिर उसे पटानेका काम मै करुंगा. और काकाजी आपको और एक बार बैंकमे जाकर जिस बाथरूममे हम उतर रहे है वो दरवजा खुला कैसा रहेगा ये सोचो............... ". त्याने थोडा वेळ जाऊ दिला मग काकांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तो म्हणाला, " हैआप डरना नही. मै किसी दूसरेको साथमे भेजूंगा. "..... हे ऐकल्यावर काका जरा विचारात पडले. एखादा लहानसा सहभागही त्यांना त्या दरोड्याशी जोडणार होता. " काकाके साथ रमजान जाएगा. रमजान एक दो छोटा स्क्रू ड्रायव्हर साथ लेके जायेगा. बाकी सब कैसा करनेका काका देखेगा. " बाजूलाच उभ्या असलेल्या एका वीस बावीस वर्षाच्या मुलाकडे बोट करीत दादाने म्हंटले. दादा पुढे बडबडत होता. " ऐसा हप्ता हप्ता गवाना मुझे परवडेगा नही. समझे ना तुम? (त्याचा रोख अकड्याकडे होता) अगले हप्तेका शनिवार पक्का किया है. अभी ये एरिक साब बैंकमे रोजका रोकडा कितना आता है और वो कभी बडे बैंकमे भरनेके लिये जाते है वो अगले दो दिनमे ढूंढके निकालेगा. फिर इस शनिवार को पूरा प्लान बना लेंगे, क्या क्या कैसे करना है. काकाजी आपको भी शनिवार की मिटिंगमे आना है "

अब सब लोग अकडा और उसके साथी छोडकर निकलेंगे. ".... असं म्हंटल्यावर सगळेच बाहेर पडले. आत फक्त अकडा, सूर्या आणि त्यांचे साथीदार तेवढे बाकी होते.

बाहेर आल्यावर रमजान काकांना भेटला. काकांनी मग त्याचा फोन नंबर लिहून घेतला. आणि लवकरच त्याला संपर्क करण्याचे आश्वासन दिले. नंतर ते तडक घरी आले. रमेश आज विषेश खुशीत होता. त्याला बहुतेक लवकरच काही महिन्यांसाठी कॅनडाला जावं लागण्याचं निश्चित झालं होतं. ते काम जमलं की मग त्याचे प्रमोशन होऊन तो जास्त कालावधी साठी जाणार असल्याचं तो म्हणत होता. काकांच्या डोक्यात परत बँकेत जाण्याच्या विचाराची सावली पडू लागली. एक प्रकारचं अनिश्चितपणाचं ओझं त्यांना वाटू लागलं.

खरंतर त्यांना आता हे सगळं कोणाला तरी सांगावसं वाटू लागलं. पण सांगणार कोणाला??? ते परत परत विचार करू लागले. त्यांचं जेवणातलं लक्ष उडालं, हे रमेशच्या लक्षात आलं. त्याने विचारलं, "तुम्ही कसला विचार करताय? मी परत येई पर्यंत नीताला तुमची सोबत होईल. "..... नीताला फारसं आवडलं नाही. पण तिने मानेनेच होकार भरला. दोन तीन महिन्यांचाच तर प्रश्न आहे. करू कसं तरी. काकांना वाटलं रमेशला आपण विचलित झाल्याचं जाणवलं असावं. पण भीतीला आवर घालून ते हसले. आणि म्हणाले, " अरे तू अजिबात काळजी करू नकोस. मी सांभाळीन सगळं. " मग ती चर्चा तेवढ्यावरच राहिली. अंथरूणावर पडल्या पडल्या ते विचार करू लागले. त्यांना ते बँकेतलं मॅनेजरच्या केबिनजवळचं दार दिसू लागलं. आता रमजानला फोन करावा लागणार होता. कामाचं टेन्शन काकांना नव्हतं. एक बरं होतं की अजून तरी त्यांचा सक्रिय सहभाग नव्हता. दादाची माणसं मात्र आपल्या कामात वाकबगार होती. मग त्यांनी आधी साधनाकडे जायचं ठरवलं.

तिची तब्येत पाहण्याच्या निमित्ताने त्यांनी ती म्हणाली तर तिथेच राहण्याचं ठरवलं. म्हणजे तिच्या जास्तीत जास्त जवळ आपल्याला जाता येईल आणि लग्नाचा प्रस्ताव तिच्यापुढे ठेवता येईल. सुटून आल्यापासून ते तसे एकटेच होते. रमेश आणि नीता आता बरे वागत होते. पण आपण लग्न करतोय म्हंटल्यावर त्यांच्या रागीट प्रतिक्रिया नक्की येतील याची त्यांना भीती वाटू लागली. मग आस्ते आस्ते साधनाच्या जवळिकेचा विचार करता करता त्यांना झोप लागली.

(क्र म शः)