कामथे काका (एकविसावा)

 सकाळ झाली. काका उठले. चहा नाश्ता झाला. आजकाल काकांना नाश्ता रमेशबरोबरच मिळायचा. तेवढ्यात श्रेया बाहेर आली. तिला उचलून घेऊन ते बाल्कनीत आले. तिला ते वेगवेगळे आवाज काढून ते खेळवू लागले. ती पण खूश होऊन त्यांना प्रतिसाद देत होती. रमेश ऑफिसला जायला निघाला. आज तो जास्त खूश होता. आयुष्यात मनाप्रमाणे गोष्टी झाल्या तर बरं असतं त्यांच्या मनात आलं. काकांनी श्रेयाला खाली सोडले. पण ती "आपण बागेत जाऊ या ना, खेळायला. " म्हणून काकांच्या मागे लागली. त्यांनी नीताकडे पाहिलं. तिने त्यांची अडचण ओळखली. मग ती म्हणाली, " आपण जाऊ बाहेर, आजोबांना ऑफिसला जायचंय. " असं म्हणून ती आत गेली. रमेश बाहेर पडला. दाराला लागलेला पेपर त्याने काकांना दिला आणि दरवाजा बंद केला. पेपर चाळायला सुरुवात केली. बातम्या नेहमीच्याच होत्या. तरीही माणूस रोज पेपर पाहतो अचानक एका पानावर त्यांना एक जाहिरात दिसली.
" पुण्याजवळील एका गावात असलेल्या वृद्धाश्रमासाठी रेसिडेंट मॅनेजर पाहिजे. कोणत्याही शाखेचा पदवीधर. विनापाश सेवानिवृत्त माणसास प्राधान्य. वय ४५ ते ६०. वैद्यकीय तपासणी अनिवार्य. पगाराच्या अपेक्षेसहित अर्ज करावा. "

काकांना जाहिरात फारच आवडली. आपल्याला ही नोकरी नक्कीच मिळेल असं त्यांना वाटू लागलं. मग त्यांनी तीच जाहिरात बारकाईने परत परत वाचली. आणि त्यांच्या लक्षात आलं, आपण विनापाशही नाही आणि सेवानिवृत्तही नाही. आपल्याजवळ सेवानिवृत्तीचा आदेश नसून बडतर्फीचा आदेश आहे असे त्यांच्या लक्षात आले. अचानक त्यांचा उत्साह कमी झाला. येणारी सुटकेची संधी गेल्यामुळे त्यांना तीन दिवसांनी होणाऱ्या दादाबरोबरच्या मीटिंगचा विचार करणं आता भाग होतं. आपण परत बँकेत जाऊन यावं म्हणजे जरा फेरविचार करता येईल..... कसला फेरविचार? त्यांच्या मनात आलं. ते यांत्रिक पणाने उठले. बाथरूम मध्ये जाऊन अंघोळीला बसले. त्यांना आता आपल्याभोवतीच्या परिस्थितीत आपण मिसळलो नाही असं वाटून अस्वस्थ वाटू लागलं. कोणत्याही प्रकारे मनापासून जोडणारा दुवा नसल्याचे त्यांना जाणवू लागलं. सगळं कसं परकं वाटू लागलं. साधनाला तिची मुलगी आहे. रमेशला त्याची बायको आणि मुलगी आहे, किशाला त्याची टोळी आहे, आपल्याला धरून राहणारं कोण आहे? असल्या लोंबकळत्या स्थितीत ठेवणाऱ्या विचारांनी ते उद्विग्न झाले. त्यांचं मन विनाकारण बंड करून उठलं. मग ते स्वतःशी म्हणाले, " आपण मीटिंगलाच गेलो नाही तर? फार कशाला आपण हे शहर सोडून पळून गेलो तर? तसंही आपल्याला काय भविष्य आहे या नगरीत? "पण साधनाच्या आकर्षणाचा विचार मनात आल्यावर त्यांच्या मनात नेहमीसारखे विचार येऊ लागले. त्यांना एकदम साधनाकडे जाण्याची निकड वाटू लागली. बँकेत आणखीन एक फेरी टाकावीशी वाटू लागली.
ते अंघोळ झाल्यानंतर बाहेर जाण्यासाठी कपडे घालायचे सोडून उगाचच इकडे तिकडे करीत राहिले. त्यांनी मनाला समजावणारा विचार केला. पळून जाऊन कुणाबरोबर तरी सहजीवन जगण्याची वयाबरोबर वाढणारी गरज थोडीच कमी होणार होती?........ त्यांना रोहिणीचा अभाव जाणवला. साधनाला आपण उघड उघड लग्नाबाबत विचारायला हवं. त्यांना त्यांचं मन साधनात चांगलंच गुंतल्याचं
जाणवत होतं. ते तिच्याशिवाय जगू शकत नाहीत. असले वांझोटे विचार मनात येत राहिले. त्यांनी अनिच्छेनेच कपडे केले आणि नीताला सांगून ते बाहेर पडले. त्यांच्या खिशातला मोबाईल जागा झाला. त्यांनी तो उघडून कानाला लावला. तो रमजान होता. "काकाजी कभी जानेका बैंकमे? " काका म्हणाले, " मीच फोन करीन ". फोन तर बंद झाला. आपण रमजानला काय सांगणार? आधी बँकेत जावं. म्हणून त्यांनी बस पकडली.
काका बँकेच्या रस्त्यावर आले. त्या दिवशी बुधवार होता. ते बँकिंग हॉल मध्ये शिरले. त्यांनी कौंटरवरच्या मुलीकडे पासबुक भरायला दिले. ती ओळखीचं हसू हसली. ती सुगंधा होती. त्यांची नजर लॉकरला लागून असलेल्या बाथरुमवजा खोली कडे गेली. दरवाजा बंद होता. बाहेरून बोल्ट लावलेला दिसला. आज बँकेत फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे बिनाकामाचं फिरता येत नव्हतं. काकांच्या मनात आलं. गर्दीत एक बरं असतं कोण कुठे का फिरतोय हे समजतही नाही आणि कोणी विचारीतही नाही. गर्दीची अशी एक सुरक्षितता असते. "देअर इज सेफ्टी इन नंबर्स ". असं कुठेतरी वाचल्याचं त्यांना आठवलं. त्यामुळे त्या खोलीजवळ जाणं कठीण होतं. तिला आतून बोल्ट होता की नाही, हे कळणं कठीण होतं. जर कोणाला त्या खोली बद्दल विचारलं आणि पुढे काही घडलं तर काकांचा संबंध त्याच्याशी जोडला जायचा. माणूस कितीही व्यग्र असला तरी त्याला प्रसंगानुसार बारकावे आठवू शकतात. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही. आणि अशीच लोकं पोलिसांना सापडतात व मदत करतात. पोलिस म्हंटल्यावर, काकांना पोलीस किती बारकावे शोधतात याची आठवण झाली. त्या विचारासरशी ते घाबरले. पण माहिती काढणं आवश्यक होतं. काकां या बँकेत यायला लागल्यापासून तोंडावर रुमाल ठेवीत असत. त्यांची अशी समजूत होती
की समोरच्या माणसाला पूर्ण चेहरा आठवत नाही आणि जर कुठे कॅमेरे वगैरे लावले असतील तर सगळा चेहरा तरी त्यात येणार नाही. काकांच्या स्वतःच्या अश्या बऱ्याच समजुती होत्या. ते विचारात असतानाच सुगंधा म्हणाली, " काका पासबुक वेळेवर अपडेट करीत जा, म्हणजे फार वेळ लागणार नाही. पास बुक त्यांच्या हातात देत ती पुन्हा एकदा गोड हसली. आता मात्र काकांनी आवाजात आणि चेहऱ्यावर जास्तच सहजता आणीत त्या बंद खोलीकडे बोट करून तिला विचारलं, " बाथरूम तिकडे आहे का (बाथरूम कुठे आहे ते माहीत असतानाही) "..... त्यावर त्या दिशेला वळून पाहतं ती म्हणाली, " छे छे!, अहो ती अडगळीची खोली आहे, त्यात जुनी रजिस्टरं वगैरे ठेवतो आम्ही, जागा कमी पडते ना म्हणून. बाथरूम ते तिकडे आहे. " असे म्हणून तिने काकांना माहीत असलेल्या बाथरूमकडे बोट दाखवलं. काकांना आपलं नशीब जोरावर असल्यासारखं वाटलं. काका स्वतःशीच हसले. त्यांच्या मनात आलं. काही काही लोक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना न विचारलेली माहिती पण कशी भोळसटपणाने देतात ते. सुगंधाला काय माहीत पुढे या माहितीचा कोण कसा वापर करणार आहे म्हणून?. काकांचं काम झालं होतं. ते पास बुक खिशात टाकून बाहेर पडले.
त्यांना साधनाला भेटायचं होतं. ते लवकरच तिच्या फ्लॅटजवळ पोहोचले. बेल वाजवली. आतून तत्परतेने दार उघडले गेले. दारात साधना त्रासिक चेहरा करून उभी होती. त्यांना पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यात बदल झाला. त्यांना आत येऊन देत ती
म्हणाली, " अहो, आताच्या आत्ता, तीन वेळा बेल वाजली. कधी सेल्समन, कधी मदत मागणारी मुलं, तर कधी वेगळ्याच नावाची चौकशी करणारी माणसं. घाईच्या वेळेतच येतात. " ते आत येत म्हणाले, " ठीक आहे मी संध्याकाळी येईन. " असं म्हणून ते सोफ्यावर बसले. पण गेले नाहीत. तेवढ्यात ती आतून सरबताचे ग्लास घेऊन आली आणि म्हणाली, " तसंच तुमचं काही काम असेल तर मी लवकर येऊ का? मी
येईपर्यंत बसा" तिने मनापासून विचारले. ते म्हणाले, " नाही नाही, माझं खास असं काही काम नाही. " ती म्हणाली, " नक्की ना? मला वाटतं तुम्हाला काही बोलायचंय असं दिसतंय. " तिची नजर टाळीत ते काही न बोलता उठले. तिच्या मनात आलं, यांचं काहीतरी बिघडलंय. ते बाहेर आले, ते तिला ऑफिसला जायचं असेल, हे विसरले होते. स्वतःवरच चिडले. त्यांना तिच्याशी जमलं असतं तर लग्नाबद्दल बोलायचं
होतं. निदान त्यांना थोडा मोकळेपणा हवा होता. तिच्याबरोबर तिच्या सहवासात त्यांना राहायचं होतं. तिच्याशी त्यांना जवळीक साधायची होती. त्यांनी कंटाळून रमजानला फोन केला. " कल सुबे ग्यारा बजे आना " आणि त्यांनी त्याला पत्ता सांगितला. ते समोरच्या रेस्टॉरंटमध्ये शिरले. जरूर नसताना त्यांनी नाश्ता मागवला. प्लेटमधल्या वस्तूशी ते खेळत राहिले. जवळ जवळ अर्धा तास त्यांनी घालवला. आपलं काय बिनसलं हे माहीत असूनही ते पाहायला तयार नव्हते. खरंतर आत्ता त्यांना साधनाला जवळ घेऊन आलेला रिकामपणाचा सगळा शीण नाहीसा करायचा होता. आत्ताही ते तिने लावलेल्या सेंटमुळे आणि तिच्या कपड्यातून दिसणाऱ्या आकर्षक बांध्यामुळे उत्तेजित झाले होते. बाहेर येऊन आता वर्ष होऊन गेलं होतं. पण कुणाशीतरी प्रेमाच्या चार गोष्टी कराव्यात, हे काही साधत नव्हतं. त्यांना एक प्रकारच्या निराशेने घेरले. घेतलेला नाश्ता अर्धवट टाकून ते बाहेर आले. त्यांची प्लेट उचलणारा पोऱ्या म्हणाला, " साला, हमको खाने को मिलता नही, और
खाना फेकके चला गया. " अर्थातच त्यांना काही ऐकू आले नाही. त्यांनी मग रस्त्यावर आल्यावर दादाला फोन केला आणि आपली तब्येत बरी नसल्याने आपण येणार नसल्याचं सांगितलं. त्यावर दादाने त्यांना कामके पीछे रहो असं सांगितलं आणि फोन बंद केला.
त्यांनी बस पकडली आणि ते घरी निघाले. लवकर आलेले त्यांना पाहून नीता म्हणाली, " आज बाहेरच काम होतं की काय? " त्यांनी होकार भरला आणि म्हणाले, " कदाचित आज रात्री मला माझ्या मित्राकडे जावे लागेल. तो काही दिवसांपूर्वी आजारी होता
ना, तोच. " त्यावर ती काहीच बोलली नाही. अशा रितीने त्यांनी वातावरण तयार केले. खरंतर त्यांना सुचत नव्हतं. त्यांनी जेवणानंतर कसातरी वेळ काढला. दुपारचे चार वाजले. फालतू कारणासाठी ते खाली उतरले. त्यांनी साधनाला फोन लावला आणि आज ते राहायला येत असल्याचं त्यांनी तिला सांगितलं. येताना श्रेयासाठी ते चॉकलेट आणायला विसरले नाही. श्रेया जुलै मध्ये दोन वर्षांची होणार होती. ते सुटून आले तेव्हा तिचा वाढदिवस त्यांना सामील न करता झाला होता. आता त्यांनी ते लक्षात ठेवलं होतं. तिला आणि रमेश नीताला
पण त्यांनी चांगल्यापैकी भेट देण्याचं ठरवलं होतं. मागच्या वर्षीच्या वाढदिवशी घरात स्वीकारलं गेलं नव्हतं आणि त्यांच्या जवळ पैसेही नव्हते. श्रेया झोपल्याने त्यांनी चॉकलेट नीता जवळ दिले. अगदी जुजबी कपडे घेऊन ते साडेपाचच्या सुमाराला निघाले. आज ते साधनाला विचारणार होते. तसे साधनाशी मैत्री होऊन वर्ष होत होते. म्हणजे काही फार जुना परिचय होता असे नव्हते. पण काकांना धीर निघत नव्हता. एकटेपणा स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत जास्त समजूतदारपणे स्वीकारतात. काही वेळेला शेवटापर्यंत निभावून नेतातही. पण पुरूष त्या मानाने
उतावीळ असतात. आणखी एखाद दोन वर्ष त्यांनी काढली असती तर हरकत नव्हती, असं कोणीही म्हणेल. पण त्यांची मानसिक अवस्था आणि जगण्याची अनिश्चित अप्रिय चाकोरीच त्यांना हा निर्णय घ्यायला भाग पाडीत होती. तिच्या घराकडे जाता जाता मनातल्या मनात ते स्वतःशीच म्हणाले, " मी सोनाचं सगळं काही करीन पण मला स्वतःचं असं घर हवं. स्वतःची अशी जीव लावणारी बायको हवी, मी एकटा जगू शकत नाही. रमेश आत्ता ठीक वागतोय, उद्या काही कारणांनी त्याने घरातून जायला सांगितलं तर? "..... स्वतःच्या निर्णयाचं समर्थन करणारे संवाद त्यांच्या डोक्यात चालू राहिले. त्याच विचारात ते साधनाच्या बिल्डिंगमध्ये शिरले.
त्यांनी तिच्या दारावरची बेल वाजवली. सोनाने दार उघडले. " मम्मी काका आल्येत, " असं म्हणून ती आत गेली. साधना आतून टॉवेलने तोंड पुशीत बाहेर आली. ती नुकतीच आली असावी. ती म्हणाली, " तरी मी सकाळी विचारलं होतं. पण तेव्हा काहीच बोलला नाहीत. " घरच्याच कपड्यात ती त्यांना आत्ता जास्तच आकर्षक वाटली, तिचा एकूण बांधा आणि शरीराची गोलाई त्यांना जवळून पाहावीशी वाटली. कदाचित याला कारण, रोहिणी गेल्यापासून ते कोणत्याच स्त्रीच्या संपर्कात आलेले नव्हते, हेच असावे........ त्यांनी तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर दिले नाही. ते फारसं काहीच बोलत नाहीत असं पाहून ती म्हणाली, " काय घ्याल? चहा, कॉफी की थंड? " त्यावर ते काहीही चालेल म्हणाले. ती काहीतरी पेय आणण्याच्या दृष्टीने आत वळली. तिला त्यांचं मौन नवीन होतं. म्हणजे हे नाराज झाले की तोंड बंद ठेवून बसतात वाटतं. तेवढ्यात त्यांनी बाहेरून सोनाला हाक मारली. सोना आत येत म्हणाली, "काका, आपण चेस खेळू या? मम्मीने आजच आणलाय. " ते काहीतरी करायचं म्हणून हो म्हणाले. सोनाने लवकरच चेस बोर्ड आणि सोंगट्या आणल्या. त्यांनी सोंगट्या पटावर मांडून तिला खेळ समजवायला सुरुवात केली. त्यांचं लक्ष चहा घेऊन येणाऱ्या साधनावर जास्त होतं. तरीही त्यांनी सोनाला समजावून सांगितले. तिने नेसलेली लाल साडी तिला शोभून दिसत होती. काका तिच्या प्रेमात पडले होते हेच खरं. खरंतर या वयाची स्त्री त्यांना आकर्षक वाटणं हा एक विचित्र योगायोग होता....... ते अधून मधून तिच्याकडे पाहतायत हे तिच्याही लक्षात आलं. त्यांनी चहाचा कप हातात घेताना तिच्या हाताला हेतुपूर्वक स्पर्श केला. आणि ते तिच्या प्रतिक्रिये करिता थांबले...... पण तिने काहीही निदर्शनास येऊ दिले नाही. सोनाला वेगवेगळ्या सोंगट्यांच्या चाली पुन्हा एकदा समजावून सांगितल्या. तसं एकदम हे लक्षात ठेवणं तिच्या सारख्या लहान मुलीलाच काय एखाद्या मोठ्या माणसालाही शक्य नव्हतं. तरीही तिने फार लवकर लक्षात घेतलं. फक्त घोडा आणि वजीराची चाल तिला लक्षात येईना. मग काका साधनाकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकून म्हणाले, " घोडा असाच चालतो, थोडा सरळ थोडा तिरका, काही काही माणसं कशी विचित्र वागतात, तशी. "..... सोना पटकन म्हणाली, " म्हणजे माझ्या मम्मीसारखा का? ती अशीच करते कधी कधीइतकी छान वागते ना तर कधीकधी विचित्रच. " तिने साधनाकडे पाह्यलं. साधनाने डोळे वटारले आणि म्हणाली, " फार बोलायला लागल्येस हं सोना! आत जा पाहू " सोना जोरात म्हणाली, " मी नाही जाणार, तूच जा. मला आत्ता काकांशी खेळायचंय " वातावरण बिघडतंय असं पाहून काकांनी मध्यस्थी केली. " अगं मी आज तुझ्याकडे राहणार आहे, कशाला काळजी करतेस, आपण आज खूप खेळू. तू असं कर सध्या आत जा आणि तुला सांगितलंय त्याची प्रॅक्टिस कर पाहू. आपण थोड्या वेळाने सगळेच बाहेर जाऊ, (साधनाकडे वळून म्हणाले) काय चालेल ना? " त्यावर ती म्हणाली, " तुम्ही दोघे जा मी स्वयंपाकाचं बघते" आता मात्र सोना तिच्या मागे लागली, " चल ना मम्मी, ते एवढं म्हणतायत तर. आणि आपण आज बाहेरच जेवू आणि आइसक्रीम पण खाऊ. " मग नाईलाजाने ती हो म्हणाली. सोना आत गेली. काकांना जरा मोकळं वाटलं. ते जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, " मग काय जायचं ना बाहेर? " थोडावेळ जाऊन देऊन ती म्हणाली, " आपण सगळेच बाहेर पडलो तर लोकांचा गैरसमज व्हायला वेळ लागणार नाही. मला इथे राहायचंय. तुम्ही माझे कोण आहात काय सांगणार मी? " तिचं म्हणणं त्यांना पटलं. तिने मग आत जाऊन सोनाला समजावलं की आज जाण्यापेक्षा आपण रविवारी जाऊ. आणि आपण जर बाहेर गेलो तर तू काकांशी खेळणार केव्हा, ते तर उद्या सकाळी जातीलही. सकाळी तुला शाळा आहे आणि मला ऑफिसही आहे. सोनाला हळू हळू पटलं. तरीही ती थोडी नाराजच होती. पण काकांनी तिला बाहेर बोलावले आणि ते तिला खेळ समजावून सांगू लागले. ती लवकरच त्यात रंगली. मध्येच खेळ सोडून ते आत जाण्यास वळले. त्यावर ती म्हणाली, " काका बसा ना आता तुमची चाल आहे. काय हवय तुम्हाला? ".... ते म्हणाले, " अग
आत मम्मी एकटी आहे ना आणि तू आता माझी चाल खेळून विचार कर बरं. मी आलोच दहा मिनिटात. ती त्यांच्या चालीवर विचार करू लागली. तेवढ्यात ते आत गेले. साधना आत भाजी चिरून कुकर लावण्याच्या तयारीत होती. ती सिंकमध्ये ठेवलेल्या कपबश्या विसळीत होती. काका हळूच तिच्यामागे आले. तिला कल्पना आली नाही. त्यांनी तिच्या खांद्यांना स्पर्श केला ती केवढी तरी दचकून मागे वळली. काकांनी तिला घट्ट धरून ठेवली. तिच्या केसांमधून हात फिरवीत ते म्हणाले, " साधना, का कोण जाणे सारखं तुझ्याकडे यावंस वाटतं. तुला काय वाटतं? " त्यांनी तिच्या गालावर ओठ टेकवीत म्हटलं. बऱ्याच वर्षांत तिला असा स्पर्श झालेला आठवत नव्हता. काकांनी तिच्या कमरेभोवती हात घालून तिला घट्ट धरून ठेवली. तिच्या ओटीपोटाचा स्पर्श त्यांना जाणवला. पण ती पटकन भानावर येत बाजूला झाली आणि म्हणाली, " बाहेर सोना एकटीच आहे, केव्हाही घरात येईल. त्यांनी तिला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे पुन्हा विचारलं. तिने त्या प्रश्नाचं उत्तर टाळलं आणि कुकर लावायला घेतला. खराच सोना धावत आत आली. आणि म्हणाली, " काका बघा हं, मी तुमची चाल कशी खेळले ती. आता तुम्ही नक्की हरणार. ". त्यावर ते साधनाकडे पाहत म्हणाले, " अगं मी नेहमीच हरत आलोय" असं म्हणून ते तिच्या सोबत बाहेरच्या खोलीत आले. सोनाला चांगलंच डोकं होतं. तिने खरंच त्यांची द्विधा मनःस्थिती केली होती. त्यांना पुढची चाल सुचेना. पटावरचीही आणि साधनाबरोबरचीही. ते काहीतरी खेळायचं म्हणून खेळले. खराच साधनाला आपण केललं आवडलं का? का आपण असं काही करू अशी अपेक्षाच नव्हती? त्यांच्या मनात हेही आलं, आपण किती विचार करतो. या गोष्टींची कारणं शोधीत बसायचं नाही. केलं केलं, नाही केलं नाही केलं. ती लावील तिला काय अर्थ लावायचाय तो. आपण आपली भूमिका प्रथमच स्पष्ट केली. ती आता काय प्रतिक्रिया देते पाहू. असं म्हणून ते खेळायला बसले. आता
त्यांना खेळ सुचू लागला. एकदा का वास्तव समजून घेतलं की माणसाला सुटल्यासारखं वाटतं. त्यांच तात्पुरत तसंच झालं. आज तिचा जो निर्णय असेल तो आपण स्वीकारायचा. तिला आपला विचारही सांगायचा. म्हणून तर ते आले होते. पुन्हा एकदा खेळ सोडून ते उठले. पण सोना आता काहीच बोलली नाही. कारण ते आता आत न जाता समोरच्या उघड्या खिडकी जवळ जाऊन बाहेर पाहू लागले. बाहेर पावसाची बऱ्यापैकी काळोखी आली होती. पडला तर बेदम पाऊस पडेल. पण वारा सुटला तर अजिबात पडणार नाही. संध्याकाळचे साडेसहा होऊन गेले होते. रस्त्यावरचे दिवे लागले होते. लोकांची घरी जाण्याची लगबग सुरू होती. तुडुंब जनसमुदायातून बसेस चालल्या होत्या. जणू काही पाण्यातून बोटी. त्यांनी लांबवर नजर फेकली. त्या वातावरणात ते स्वतः नसल्याने त्यांना बाजूला काढलेल्या माणसासारखे वाटू लागले. मग त्यांना कामावर असताना आपली होणारी घाई आठवली. रोहिणी आणि रमेशच्या ओढीने आपण कसे जात होतो. रमेश लहान असे पर्यंत घरात
शिरल्या शिरल्या आई कुठे आहे ते पाहून ते रोहिणीला मिठीत घेत असत. त्यावेळी रोहिणी जे बोलत असे ते त्यांना आठवले. "अहो काय हे, जनाची नाही तर मनाची तरी बाळगा जरा. " त्यावर ते म्हणायचे, "रोज बाहेर जाताना घरातलं सौंदर्य मला दिवसभर बघायला मिळणार नाही अशा भावनेने मी जातो. खराच रोहिणी इतर पुष्कळ स्त्रिया तुझ्यापेक्षाही सुंदर पाहतो, पण तू ती तूच. मला मात्र तूच आवडतेस. " त्यांच्या स्तुतीने ती सुखावलेली पाहण्यात त्यांना अशी कितीतरी वर्ष धन्यता वाटली होती. अचानक रोहिणी चार वर्षांपूर्वी गेली ती हरवलीच, तीही कायमचीच. ते थोडे खिन्न झाले. सोनाने त्यांना आत्तापर्यंत तीन चार वेळा तरी हाका मारल्या असतील, पण त्यांना आत्ता कुठे ऐकू आलं. ते लगबगीने पुन्हा खेळाकडे बळले. त्यांचं लक्ष खेळात बिलकुल लागत नव्हतं. म्हणून ते मोठ्याने म्हणाले, " मी सोनाला घेऊन बाहेर जाऊन येऊ का? " त्यावर साधनाने ओरडून सांगितले, " जरूर, पण लवकर या. आणि पावसाचंही चिन्ह दिसतंय. रेनकोट छत्री घेऊन जा. "
सोना आहे त्याच कपड्यांवर बाहेर जाण्यास तयार झाली. रेनकोट घेऊ नका, त्याऐवजी छत्री घ्या असं ती हळूच म्हणाली. मग काकाही तिला घेऊन रेनकोट न घेता निघाले. उतरता उतरता त्यांची नजर ताराबाईच फ्लॅट कडे गेली. कुलूप अजून तसंच होतं. आत कोणीतरी नक्कीच असणार. ते घाईघाईने सोनाचा हात धरून रस्त्यावर आले. सोना म्हणाली, " काका आपण आइसक्रीम खायचं का? " तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. काका म्हणाले, " आता आइसक्रीम खाऊन कसं चालेल? " ती म्हणाली, " मम्मीला थोडंच खाल्ल्यावर कळणार आहे? " ते म्हणाले, " सर्दी झाली म्हणजे मम्मीला आपोआप कळेल. " ती थोडी निराश झाली. मग थोड्यावेळ चालल्यावर ती म्हणाली, " काका तुम्ही आमच्याकडेच का राहतं नाही? " उत्तरादाखल त्यांनी तिचा एक पापा घेतला. पण उत्तर दिले नाही. मनातल्या मनात म्हणाले, त्याच प्रयत्नात तर आहे मी. पण उघडपणे म्हणाले, " तुझ्या मम्मीला सांग म्हणजे मी राहीन. " ते इकडे तिकडे फिरले आणि पावसात भिजायला होईल म्हणून लवकरच घराकडे निघाले. येताना मात्र तिचं लक्ष आइसक्रीमच दुकानाकडे आहे हे पाहून त्यांनी मग दोन चॉकोबार विकत घेतले तिला तिचा चॉकोबार लवकर खायला सांगितला. हळूच बिल्डिंगमध्ये शिरले. घरात शिरेपर्यंत तिचा चॉकोबार संपला नाही. साधनाने दार उघडले. ती लटक्या रागाने म्हणाली, " का घेऊन दिलात तिला चॉकोबार, आता ती तुम्ही नसतानाही हट्ट करील. पावसाचे दिवस, सर्दी होईल नाही का? " त्यावर सोना म्हणाली, " पण मम्मी तू काकांना आपल्याकडेच राहायला सांग ना " आता मात्र ती निरुत्तर झाली. तिने मग सोनाला तिच्या अभ्यासाची आठवण करून दिली.
साडे आठ नऊच्या सुमारास ते जेवायला बसले. जेवण अप्रतिम होते. त्यामुळे जेवताना कोणीच फारसं बोललं नाही. साधनाचं लक्ष आपल्याकडे आहे हे काकांच्या लक्षात आलं. पण त्यांनी तसं दाखवलं नाही. सगळी आवरा आवर होई पर्यंत त्यांनी टी. व्ही. पाहिला. शेवटी दहाच्या बातम्या पाहिल्या, त्या बंद करण्यासाठी काकांनी रिमोट हातात घेतला, पण एका बातमीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. "पावसामुळे महापालिकेने रस्ता दुरुस्तीची कामे तात्पुरती तरी रद्द केली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये व नगरसेवकांमघे निराशेचे वातावरण पसरले आहे " त्यांनी तपशील ऐकला नाही. या बातमी मुळे त्यांच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली. अरेच्च्या म्हणजे, रस्ता खोदण्याचे मशीन वापरणे आता कठीण आहे. त्याचा आवाज त्यांच्या कामाला महत्त्वाचा होता. दादाला हे सांगितलेच पाहिजे. आत्ता तर सांगणे कठीण आहे पण उद्या सांगायला हवे. म्हणजे तो दुसरी काहीतरी व्यवस्था तो करील. साधनाचं आतलं काम झालेलं होतं. तिने सोनाला आत बोलावून तिला झोपवण्याचं कामकेलं. अर्ध्या पाऊण तासात सोना झोपली. तो पर्यंत काका हॉलमधल्या
सोफ्यावर आडवे झाले होते. ते पेंगुळलेले असतानाच साधना हॉलमध्ये आली. काकांनी येणारी झोप उडवली. आज हिच्याशी जवळीक साधून लग्नाबाबत बोललंच पाहिजे, असा विचार करून ते उठून बसले. ती सोफ्याच्या बाजूला असलेल्या एका खुर्चीत बसली. काही वेळ ते दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. नंतर ती म्हणाली, " काय पाहताय? काहीतरी बोलायचं होतं ना? "...... खदकीबाहेर पाहत ते म्हणाले, " पाऊस जरा जास्तच आहे नाही? " पटकन मुद्यावर न येणाऱ्या माणसाचा आपल्याला कसा राग येतो, तसा काकांच्या बोलण्याने तिला आला.
तिने सहजपणे म्हंटले, " अच्छा हेच सांगायचं होतं म्हणून आलात वाटतं, चला, झोपायचं बघितलं पाहिजे. " असं म्हणून ती उठून त्यांच्या बाजूने जाऊ लागली. पण पटकन तिचा हात ओढत काका म्हणाले, " काय हे? हे बोलायला येईन का मी? बस इकडे मला बोलायचंय तुझ्याशी. " असं म्हणून तिने बसावे म्हणून सरकणार इतक्यात हात ओढल्याने तिचा तोल जाऊन त्यांच्या अंगावर कोसळली. तिला जवळ घट्ट
धरीत ते म्हणाले, " साधना, मला तू आवडतेस, आय लाइक यू (लव्ह यू नाही, ते फक्त रोहिणीकरिता, असं मनातल्या मनात म्हणून त्यांनी ओठाशी आलेले शब्द मागे ढकलले) " त्यावर त्यांच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न न करता ती म्हणाली, " बसं झालं. आता अंथरूणं घालून झोपून जाऊ. नाहीतर काहीतरी भलतंच व्हायचं. ".... काका चावटपणाने तिच्या ओठांवर ओठ टेकत म्हणाले, " भलतंच करण्यासाठीच
तर आलोय. " दोघांच्याही उष्ण श्वासांनी निर्माण झालेली मादकता आता काकांना कधीच भंग पावू नये असं वाटत होतं. पण कसं तरी सोडवून घेत ती म्हणाली, " चला मला सकाळी लवकर उठून सोनाला शाळेत न्यायचंय"... ती बेडरूममध्ये जाण्यासाठी उभी राहिली. आता मात्र काका उठून तिला धरून चालू लागले. तिच्या इतर अंगांवर हात फिरवीत ते म्हणाले, " अंथरुणं कशाला घालायला पाहिजेत? डबलबेड आहे की आत. " त्यावर तिने पुन्हा एकदा सोडवून घेत ती खट्याळपणे म्हणाली, " आता मात्र मला सोनाजवळ जाऊनच झोपावं लागेल. "....... काकांच्या तोंडावर निराशा पसरली. ती आत जाऊन पाण्याची बाटली घेऊन आली. आणि बेडरूममध्ये शिरली. तिने बाटली एका बाजूच्या टेबलावर ठेवली. काका पण बेडरुममध्ये आले. त्यांनी विचार केला तिला जर आवडत नसतं तर ती जाऊन सोनाजवळ झोपली असती. मग तिला गृहीत धरूनच काका बेडवर तिच्या शेजारी लवंडले..........
तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना त्यांना एक वेगळंच सुख लाभत होतं. चार पाच वर्षांनंतर लाभलेला हा शारीरिक सहवास अधाश्यासारखा हातात घेण्यासाठी ते आसुसले होते. पण त्यांच्या मनाने त्यांना ही रोहिणी नसल्याची आठवण करून दिली. प्रत्येक स्त्री ही रोहिणी असूच शकत नाही. नकळत त्यांचा हात मागे आला. तिच्या ते लक्षात आलं. तिने डोळे मिटले. का.....? ते त्यांना कळलं नाही........ ही मूकसंमती समजून त्यांनी तिच्या उघड्या दिसणाऱ्या छातीच्या भागावरून हात फिरवला. ती लवकरच त्यांना बिलगली नकळत त्यांचे हात एकमेकांवर फिरू लागले. लाइट विझवण्याचीही त्यांना शुद्ध राहिली नाही. तिला जवळ घेऊन तिच्या उघड्या अंगावरून हात फिरवता फिरवता त्या दोघांनी एकमेकांची बऱ्याच वेळा चुंबनं घेतली. बेडरूमला कधी नव्हे तो प्रणयाचा वास येऊ लागला. तिच्या उघड्या छातीवरून हात फिरवता फिरवता, त्यांनी तिचा हात कुरवाळीत हातात घेतला. आणि म्हणाले, " साधना...... " पुढे बोलण्याचं धाडस ते करणार तेवढ्यात कुरवाळीत असलेल्या तिच्या हाताच्या अंगठ्या कडे त्यांची नजर गेली. त्यावर "ख्रिश्चन लोकांचा क्रॉस "गोंदवलेला त्यांना दिसला...... त्यांनी तिचं अंग कुरवाळणारा हात मागे घेतला. आलेली नशा थोडी बाजूला सारून तिने विचारले, " काय झालं? थांबलात का?.......... " त्यावर ते म्हणाले, " साधना तुझया अंगठयावर क्रॉस गोंदवलायस तू? हिंदू असूनही?.... अचानक तिला काय झालं कोण जाणे त्यांना बाजूला सारून ती म्हणाली, " त्यांनी काय झालं. समजा मी ख्रिश्चन असले तर कुठे कमी पडले का? ख्रिश्चन स्त्री, स्त्री नाही? तिला भावना नाहीत? ति प्रेम करू शकत नाही? बाजूला व्हा...... तुमच्या सारखे लोक आधी जात धर्म बघता काय? शरम नाही वाटत तुम्हाला मला बाजूला सारताना? मी ख्रिश्चन, म्हणून तुमचं आकर्षण कमी झालं. असच ना? "तिने कपडे केले. ती ताड ताड बोलत होती. काकांना धक्क्यावर धक्के बसत होते. अर्धे उघडे काका तसेच बिछान्यावर बसले होते. त्यांनी सहज म्हणून आजूबाजूला पाहिलं. पाऊस थांबला होता. साधनाच्या नवऱ्याच्या फोटो कडे त्यांची नजर सहज म्हणून गेली. त्याचे डोळे थंड असले तरी वटारलेले दिसत होते...... काका घाबरले. साधना उठून आतल्या खोलीत गेली. सोना जवळ तिला आता जास्त बरं वाटलं. तिला तिने मिठीत घेतली. साधनालाही पटकन झोप लागेना. आपण बोललो ते बरोबर आहे का? अशी टोचणी तिला लागली. एखाद्या माणसाला आश्चर्य वाटू शकेल अशीच ही गोष्ट आहे. पण त्यांनीही एकदम बाजूला सारायला नको होतं. विचार करता करता तिला झोप लागली. तिकडे काकांनी लाइट बंद केला आणि झोपायचा प्रयत्न केला. ते स्वतःवरच चरफडले. आता काहीही करता येण्यासारखं नव्हतं. रात्र अशीच तळमळत काढावी लागणार. मग त्यांना काही महिन्यांपूर्वी तिच्याकडे जेवायला आलेले होते तो प्रसंग आठवला. तिच्या हॉलमधल्या कपाटात त्यांना बायबलची प्रत दिसली होती. खरंच ही ख्रिश्चन तर नाही? पण मग एका जैन माणसाशी तिचं लग्न कसं झालं होतं. त्याला कसं चाललं? ज्याअर्थी त्याला चाललं, तर मलाही चालायला काय हरकत होती. काय फरक पडला मिळणाऱ्या सुखामध्ये? आपल्या हाताने आपण सुख घालवले. साधना म्हणाली ते काय चूक होतं? आपलं आकर्षण, ओढ एवढी तकलादू आहे? छे! चूकच झाली आपली. आता लग्नाबद्दल काय बोलणार?....... त्यांना अस्वस्थता आली. झोप लागत नव्हती. पाऊस बंद झाल्याने चांगलंच उकडू लागलं. आता फक्त आपल्याला सोनाच्या मदतीनेच सगळं करावं लागेल. उद्या सकाळी उठून तिला शाळेत पोचवायचं काम आपणच करावं. पाहू साधनाचा उद्या मूड कसा असेल तो...... आज आवाज येत नव्हता.
त्यांनी परत परत नीट कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. पण आज आवाज आला नाही. उद्या रमजान बरोबर बँकेत जायचं आहे. गर्दी असेल तर बरं होईल. मग त्यांना स्वप्न पडलं. बँकिंग हॉल, थोडासा गर्दीने झाकोळलेला. ते आणि रमजान इकडे तिकडे करतायत. मध्येच रमजान त्या खोलीजवळ मागे हात करून काहीतरी करीत होता. तेवढ्यात कोणीतरी ओरडून विचारले, " काय चाललंय तिकडे? " काका घाबरले. त्यांना
अचानक स्वप्नातच घाम फुटला, थरथर सुटली. त्यांनी घाम पुसायच्या आतच सिक्युरिटी गार्डने त्या दोघांना रंगेहात पकडलं. आणि मॅनेजर पुढे उभे केले. मॅनेजरने लगेच पोलीस बोलावले. सुगंधाचाच पोलीस झालेला दिसला त्याला पाहून काकांची घाबरून झोप मोडली. मग लक्षात आलं की हे स्वप्न होतं. स्वप्नात काहीही दिसतं. त्यांनी लाइट लावला समोर ठेवलेल्या बाटलीतून पाणी प्यायलं. लाइट बंद करून ते झोपी गेले.
सकाळी सहालाच साधना उठलेली होती. कपबश्यांच्या आवाजाने काकाही उठले. साधनाची लगबग चालू होती. सोनाचा डवा, आणि बाकी तयारी वगैरे करीत होती. काका आत आले. सवयीने ते बाथरूममध्ये गेले. फ्रेश होऊन बाहेर कपडे घालून बेडवर बसले. आतून साधनाने चहा आणि नाश्ता ट्रे मधून आणला. बाजूच्या टेबलावर ठेवीत तिने विचारले, " लगेच निघालात? " तिच्या लालसर आणि सुजमटलेल्या डोळ्यांकडे पाहत ते म्हणाले, " हिला शाळेत सोडून येतो. उगाच तुझा वेळ जायला नको. ".... थोडा वेळ त्यांच्याकडे पाहत ती म्हणाली, " मला रोजचीच सवय आहे. आणि शाळेत जायला बस समोरच्या फुटपाथवर येते. मी जाईन. " तरीही ते म्हणाले, " मी सांगितलं ना तिला सोडीन म्हणून. " तेवढ्यात सोना आत आली. तिने बोलणे ऐकलं असावं. " मम्मी आज काका सोडतील हं मला". त्यावर साधना म्हणाली, " ते रोज येणार नाही आहेत. ".... "हो, पण आज आहेत ना " असं सोना म्हणाली. साधनाला तिचा तो आगाऊपण वाटला. ती काही न बोलता आत गेली. दहा पंधरा मिनिटांनी काका सोनाला घेऊन बाहेर पडले. खाली गेल्यावर खिडकीत उभ्या असलेल्या साधनाने सोनाला हात केला. तिनेही केला. गंमत म्हणजे काकांनीही केला. दहा मिनिटं थांबल्यावर तिची बस आली. सोना शाळेत
गेली. काका मग वर आले. आज साधना बहुतेक बोलणार नाही. दार उघडंच होतं. ते लावीत काका आत शिरले. साधना स्वयंपाकघरात स्वतःचा डबा तयार करीत होती. ते आलेले पाहून ती म्हणाली, " आय ऍम सॉरी. " माहीत असूनही काकांनी कशासाठी असे विचारले. तेव्हा
तिने रात्रीच्या प्रकाराबद्दल असे सांगितले. आता मात्र काकांना राहवले नाही. आपण पुढे होऊन गैरसमज दूर केला नाही तर सगळंच फिसकटेल असे वाटून ते म्हणाले " मला सुद्धा माफ कर. मी असं वागायला नको होतं. पण मला एक सांग, तुझ्या हातावर हा क्रॉस गोंदवला कोणी? "
ती म्हणाली, " मम्मीने. माझी मम्मी ख्रिश्चन होती. पण तिनी आम्हाला म्हणजे मला, वडलांना आणि एक भाऊ आहे त्याला कधीच चर्च मध्ये जाण्याची सक्ती केली नाही. मी स्वतःहून चर्चमध्ये खूप वेळा गेलेली आहे. ती जेव्हा आजारी पडायची तेव्हा तर प्रभूला साकडं घालायची. तसंच गणपतीलाही घालायची. मग मी मेहतांशी लग्न केलं. तोही आमचा प्रेम विवाह होता. वडलांना पसंत होता. मम्मी तेव्हा नव्हती. पण भावाला पसंत नव्हता. त्यांनी संबंध कधी ठेवलाच नाही. कालच्या प्रकाराबद्दल खरंच मी माफी मागते. " तिच्या डोळ्यात पाणी आलं. आता काकांनी तिला मनापासून जवळ घेतलं. हिची कथा आणखीनही काही तरी गूढ असणार असं काकांना वाटलं. पण त्यांनी ते बोलून दाखवले नाही. ती केव्हातरी सांगेलच. अचानक तिने विचारले, " तुम्ही थेट कामावर जाणार आहात की आधी घरी जाणार? " त्यावर ते म्हणाले, "अगं मला खालच्या बँकेत जायचंय. तुझं काही काम असेल तर सांग. " तिचं काय काम असणार, असं समजून ते म्हणाले. तिने उत्तर देण्याऐवजी त्यांनाच सुचलं. हिचं पण पास बुक असेल. ते भरायचं असलं तर आपल्याला बँकेत जायला वेगळं कारण लागणार नाही. फार तर नाही म्हणेल. तसं माझ्याजवळ पासबुक द्यायला काहीच हरकत नाही. ते विचारण्यासाठी अधीर झाले. चुळबूळ करीत तिथेच उभे राहिलेले पाहून ती म्हणाली, " माझ्याबरोबरच बाहेर पडा. "....... थोडावेळ जाऊन देऊन ते हॉलमध्ये जाऊन बसत म्हणाले, " तुझं काही खालच्या बँकेत काम असेल तर सांग, म्हणजे पास बुक वगैरे काही भरायचं असेल तर,....... " असं म्हणून विचारलेलं सहज वाटावं म्हणून पेपरात डोकं घातलं. काकांचे अनुभवाने ठरलेले काही सिद्धांत होते. ते म्हणजे, जर काही काम असेल आणि काम करणारी व्यक्ती ते कितपत करील याची शंका असेल तर त्याला फोन वरून विचारावं, किंवा जर समोरच विचारायची वेळ आली तर दुसरीकडे लक्ष वळवून मग मोठ्याने विचारावं. शक्यतोवर ती व्यक्ती नाही म्हणत नाही. तसंच अशी व्यक्ती जायला निघाली की विचारावं. म्हणजे लगेच निर्णय मिळतो, अर्थात नकारात्मक उत्तर ऐकण्याची तयारी ठेवावी. पण सहसा होकारार्थी उत्तर मिळते असाच त्यांचा अनुभव होता. आत्ताही तसेच झाले. ती म्हणाली, " भरायचंय, पण असलं फालतू काम तुम्हाला काय सांगायचं. मीच जाईन कधीतरी. ".... आपलं काम बिघडेल असं वाटून ते घाईघाईने म्हणाले, " अगं त्यात काय मोठं, लहानसं काम आहे म्हणूनच विचारलं पाहा हं, म्हणजे मला नसेल द्यायचं तर आग्रह नाही माझा. " मग मात्र ती म्हणाली, " छे छे
तसं नाही" असं म्हणून तिने आतल्या एका कपाटातून त्यांना पास बुक काढून दिले. थोड्याच वेळात ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली, तेवढ्यात त्यांनी रमजानला फोन लावला. आणि बरोबर सव्वा अकराला बँकिंग हॉलमध्ये यायला सांगितलं.
साधना तयार झाली. पर्स वगैरे घेऊन ती निघाली. आत्ता तरी काकांना रमजानचं काम कसं होणार याची काळजी होती. त्यामुळे त्यांचं फारसं लक्ष तिच्या कपड्यांकडे आणि दिसण्याकडे गेलं नाही. तरीही तिच्या अंगाचा सुगंध त्यांना आवडला. ते दोघेही दरवाजा वंद करून खाली आले. नुकत्याच सुशिलाबाई आणि साठे मामा पोलिस स्टेशनला गेले होते. काकांनी बिल्डिंगच्या गेटजवळ तिचा मूक निरोप घेतला. उगाच कोणी पाहायला नको. ते बँकेत शिरले. तिथल्या बाक्ड्यावर रमजान दिसला नाही. त्यांनी घड्याळाकडे बघितलं. अकरा वाजून पाच मिनिटं झाली होती. त्यांची नजर "त्या " खोलीकडे गेली. ती जशी आधी दिसली होती, तशीच होती.... '. बं..... द '.
बँकेत आज बऱ्यापैकी गर्दी होती. पण भरपूर. नव्हती. ते बाकड्यावर टकले न टेकले तोच दार ढकलून रमजान आत आला. तो मलमलचा पांढरा शर्ट आणि तंग लेंगा घालून आला होता. तो तसा किडकिडीत होता. पण चिवट वाटला. गोरटेलेसा रमजान वीस एकवीस वर्षांचा होता. काकांना माही त नव्हते की तो तिजोऱ्या उघडण्यात पटाईत होता. त्याच्याजवळ काहीच नव्हते. काका उठून सुगंधा ज्या कौंटरमागे बसली होती, तिथे आले. तो त्यांच्या मागे होता. त्यांनी तिच्याकडे साधनाचं पास बुक दिलं. ते उघडून पाहत ती म्हणाली, " वेळ लागेल. बसा जरा. आज गर्दी आहे आणि पास बुक बरेच दिवसात भरलेलं नाही. " तरीही काका तिथेच उभे राहिले. नंतर वळून त्याला त्यांनी दबक्या आवाजात कोणती खोली ते सांगितले. चाणाक्ष रमजानने ती नीट पाहून घेतली. रुमच्या आजूबाजूला जराशी गर्दी होती. तिथेच लॉकर उघडून देणारा ऑफिसर बसला होता आणि त्याच्या टेबलाभोवती तीन चार माणसं उभी होती. दुसरे दोन म्हातारे, खुर्च्यांवर बसले होते. मग काकांनी रमजानला आपण टॉयलेटला जाणार आहोत म्हणून सांगितले आणि त्यांच्या पाठोपाठ यायला खुणावले. टॉयलेटला लॉकर ऑफिसरला ओलांडून जावे लागत होते. आणि ती रूमही लॉकरच्या खोलीजवळ होती. अचानक बँकेत गर्दी वाढली. ते पाहून बँकेतला गार्ड पुढे होऊन गर्दीला सांभाळू लागला. त्याने प्रत्येकाला कामाबद्दल विचारले आणि त्या त्या रांगेत उभं राहायला सांगितले. काकांच्या मागे वाट काढीत रमजान जात होता. काका लॉकर ऑफिसरच्या टेबलापाशी घोटाळले. त्यांनी खुणेने लॉकरच्या जवळच असलेल्या खोलीकडे इशारा केला. रमजान त्या खोलीजवळ उभ्या असणाऱ्या दोन तीन लोकांच्या मागे अशा रितीने उभा राहिला की त्याची पाठ खोलीकडे असेल. काका लॉकर बद्दल चौकशी करण्यासाठी त्या दोन तीन लोकांच्या पुढे उभे राहिले. हळूच मागे सरकत रमजान त्या खोलीच्या दरवाज्याला टेकला. आपल्या खिशातून स्क्रू ड्रायव्हर बाहेर काढून त्याने मागे न बघता हातानेच बोल्टचा अंदाज घेतला. बोल्ट चांगलाच सैल होता. पण दाराच्या चौकटीच्या भोकात अडकवलेला होता. त्याने स्क्रू काढून बोल्ट काढण्यापेक्षा बोल्ट आणि दाराचा भाग यात स्क्रू ड्रायव्हर घालून जोर लावला. लहानसा... ' कट'... असा आवाज करीत बोल्ट उचकटून ठेवला. आता स्क्रू खाली पडले होते. एक दोन सैल स्क्रूंवर तो बोल्ट तिथेच लागला होता. आतून जर जोरात दरवाजा ओढला तर बोल्ट तुटला असता आणि खोलीचा दरवाजा उघडला असता. त्याने हातात अवचित आलेले स्क्रू आणि स्क्रू ड्रायव्हर खिशात टाकीत अधून मधून प्रश्नार्थक पाहणाऱ्या काकांना काम झाल्याचा इशारा केला. काका लगेचच सुगंधाकडे जाण्यासाठी वळले. ते पाहून त्यांच्या मागची दोन तीन माणसे कुरबुरली, " काही काम नव्हतं तर जागा अडवून हा गृहस्थ कशासाठी उभा होता कोण जाणे? " काकांनी तिकडे लक्ष दिले नाही. ते आणि रमजान परत कौटरजवळ आले. काकांना आणि त्याला गार्डाने हटकले. "आपका काम हो गया है तो निकलो. बहूत भीड हो गयी है. " रमजान कडे वळून तो म्हणाला, " आपका क्या काम है? " मग काका पुढे झाले तो त्यांच्या बरोबर आहे असे म्हणाले. त्यावर गार्ड म्हणाला, " आप लाईनमे लगो उनको उधर बैठनेको बोलो. " रमजान चुपचाप बाकड्यावर बसला. तेवढ्यात सुगंधाने खुणेने त्यांना बोलावले आणि भरलेले पास बुक हातात दिले. ती परत ओळखीचे हसू हसली. ते दोघेही लवकरच बाहेर पडले. आणि ऑफिसला गेले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

सुशीला कापसे, आजींच्या शेजारीण बाई. आजी नाहीशा झाल्या दिवसापासून बाहेरगावी गेल्याने त्यांनाही आजी आल्या नसतील याची पुसटशी देखिल कल्पना नव्हती. त्या मंगळवारी संध्याकाळी बॅगा घेऊन वर आल्या. त्यांनी कुलूप उघडताना सहज म्हणून आजींच्या दरवाज्याकडे पाहिलं. पण त्यांना आश्चर्य वाटलं नाही. आजींना भावाने अगदी मनापासून ठेवून घेतलेले दिसते आहे असे समजून कोणतीही चौकशी न करता घरात शिरल्या. आत शिरून दरवाजा लावतात न लावतात तोच त्यांच्या दाराची बेल वाजली. त्यांनी साडी बदलण्यासाठी काढलेला पदर परत खांद्यावर टाकला आणि जरा रागातच दार उघडले. दारात साठे मामा होते. सोसायटीचे सेक्रेटरी. आता हे कशाला आल्येत, म्हणून त्यांनी प्रश्नार्थक रितीने भुवया उंचावून त्यांच्याकडे पाहिले. साठे म्हणाले, " अहो सुशीला बाई, या आपल्या
ताराबाई बाहेरगावी जाऊन बरेच दिवस झालेत. कुठे गेल्येत माहीत आहे का? अहो अजून सोसायटीचे पैसे पण दिले नाहीत. " त्यावर त्या म्हणाल्या, "अहो त्या त्यांच्या भावाकडे जात्ये म्हणून म्हणाल्या " " असं! पण भाऊ आहे कुठे त्यांना? त्यांना तर कोणीच नाही, तुम्हाला माहीत नाही का? " खरंतर साठ्यांचा जिकडे तिकडे नाक खुपसण्याचा स्वभाव सुशीला बाईंना आवडत नव्हता. पण आजींना जाऊन बरेच दिवस झाले होते, हेही खरं होतं. मग त्यांनी साठ्यांना आजी गेल्या त्या दिवशीचा प्रसंग सांगितला. त्यावर साठे म्हणाले, " सुशीला बाई मला वाटतं, आपण पोलिस कंप्लेंट केली पाहिजे. तुम्ही याल का बरोबर? " सुशीला बाई थोडावेळ घोटाळल्या आणि म्हणाल्या, " हो येईन की. पण आज नको. मी आत्ताच आले. आपण एक दोन दिवसात जाऊ. " मग साठे गेले. त्यांची अपेक्षा होती, त्यांनी लगेचच यावं. पण सामाजिक
बांधिलकी, शेजारधर्म हे शब्द यांना काय कळणार? असं त्यांच्या मनात आलं. साठेच ते. उचापतींशिवाय दुसरं त्यांनी काही केलं नव्हतं. ज्याला ते समाज कार्य म्हणत असत. नेहमी असच घडायचं. पण आत्ता मात्र साठ्यांचं वागणं एकदम बरोबर होतं.
गुरुवारी सकाळी रमजान आणि काका बँकेत शिरले तेव्हा साठे मामा आणि सुशिलाबाई पोलिस स्टेशनला निघाले. बस पकडून ते पोलिस स्टेशनला पोहोचे पर्यंत त्यांना अकरा वाजून गेले होते. मामा तिथल्या ड्यूटी ऑफिसरकडे गेले. त्यांनी त्यांना आपण कोण कोठून आलो आणि येण्याचे कारण सांगितले. त्यावर तिथेच बसलेला कॉन्स्टेबल सखाराम म्हणाला, " अहो, ते सगळं ठीक आहे हो. पण आजींच्या जाण्याची तारीख, टाइम काय होता? आणि त्यांचा एखादा फोटो पण पाहिजे. " सुशिलाबाई म्हणाल्या, " म्हणजे बघा मागचा मंगळवार बुधवार असेल, दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास त्या गेल्या, मला सांगून गेल्या पण किल्ली ठेवली नाही, नेहमी ठेवतात हो. "
" अहो बाई तुम्ही शिकलेली माणसं. साधी गोष्ट आहे फोटो नको का? मिसिंगची कंप्लेंट लिहून घेऊ, पण शोधणार कसं? आणि दुसरं म्हणजे एवढ्या म्हाताऱ्या माणसाच्या डोक्यावर परिणामही होतो कधी कधी. येतील लवकरच परत. दोन दिवस वाट बघा. " मग मात्र साठे मामा थोड्या तावाने म्हणाले, " अहो बरेच दिवस झाले म्हणून आलो. आता आणखीन कशाला वाट पाहायची? तुम्हाला कंप्लेंट नोंदवून घ्यायची नसेल तर तसं सांगा. वरच्या साहेबांना भेटतो. " आता मात्र कॉन्स्टेबल तापून म्हणाला, "ओ काका, इतका वेळ तुम्ही मोठी माणसं म्हणून ऐकून घेतलं. आमचाच कायदा आम्हाला शिकवू नका. बघा एखादा फोटो आणा. लगेचच कंप्लेंट नोंदवून घेतो, म्हणजे तपासाला सुरुवात करता येईल. निघा आता. " मामा आणि सुशीला बाई बाहेर पडले. आता फोटो आणायचा कुठून? त्यांच्या घराची दुसरी चावी पण कोणाकडेही
नव्हती. पोलिसांनी खरंतर कुलूप फोडून पाहायला काही हरकत नव्हती. पण पोलीस आहेत ते, त्यांनी आपलं ऐकलं मग काय राहिलं? त्यांनी विचार सुशिलाबाईंना बोलून दाखवला. ते दोघेही निराशेने घरी परतले. घरात शिरता शिरता सुशिलाबाईंनी एकदा नीट निरखून कुलुपाकडे पाहिलं. पण संशय घेण्यासारखं काहीही दिसलं नाही. कुलूप फोडून फोटो शोधायला आत कशाला जायला पाहिजे? त्यांच्या मनात आलं.
या जुन्या लोकांचे फोटो मिळण्याची मोठीच मारामार असते. मग त्यांना जरा संशय यायला सुरुवात झाली. त्या स्वतःच्या घरात शिरल्या. त्या दिवशी आजी खूप घाबरलेल्या दिसत होत्या. कां बर? त्या स्वतः शी पुटपुटल्या. स्वतःच्या भावाकडे जाताना माणूस घाबरण्याचं काहीच कारण असायला नको. हे सगळं पोलिसांना सांगायला हवं, असं त्यांनी ठरवलं. आणि सोमवारी पुन्हा एकदा पोलिस स्टेशनला एकटीनेच जायचे ठरवले. त्या ही घरात एकट्याच राहतं असत. त्यांचे यजमान बाहेर गावी कामाला असल्याने महिन्यातून एक दोन वेळा येऊन जायचे. त्यांनी ते आले तर त्यांना सांगायचे ठरवले आणि जमलं तर त्यांना बरोबर घेऊन पोलिस स्टेशनला जायचं ठरवलं. तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं.

(क्र म शः)