कामथे काका (भाग सतरावा)

समोरच दूध होतं. पण त्यांनी कोरा कडक चहा केला. कप घेऊन ते सोफ्यावर येऊन बसले. सहा वाजत होते. चहा घेतल्यावर डोकं ठिकाणावर आल्यासारखं त्यांना वाटलं. खरंच पोलीस काय करत असतील, काय माहीत?..... जीवनरामचं नाव कळलं असेल तर ते कटीलच्या ऑफिस मध्ये येतील का?..... कुणास ठाऊक?... समजा ते तिथे आले आणि आपण तिथे असलो तर?..... आपण निष्कारण प्रकाशात येऊ. किंवा रात्रीत ते कदाचित दादाला किंवा त्या हरामखोर कटिलला तरी नक्कीच अटक करतील........ आपण या गोष्टींपासून लांब राहावं हे उत्तम..... त्यापेक्षा आपण उद्या नाहीच गेलो तर....? असंही त्यांना वाटलं. पण त्यांनी स्वतःवर ताबा ठेवला. उद्या सकाळ आणि आत्ता, यात कितीतरी अंतर आहे. बघू नंतर...... विचार सुद्धा असे असतात की डोकं पूर्ण पिंजून काढल्याशिवाय थांबत नाहीत..... मग त्यांची नजर इकडे तिकडे फिरली. त्यांना उतरवलेला जोधपुरी दिसला. सोफ्यावर तो अस्ताव्यस्त पडला होता. चला! कपडे आवरले पाहिजेत. रमेश नीता येतील इतक्यातच. त्यांनी चहा संपवला. कप आत जाऊन विसळून ठेवला. कपडे आवरून ते पायजमा चढवतात न चढवता तोच बेल वाजली. त्यांनी घाईघाईने दार उघडले. नीता आणि रमेश श्रेयाला घेऊन आत शिरले. काकांनी श्रेयाला घेतलं. हल्ली ते दोघेही काकाशी नीट बोलत असत. तासाभराने श्रेयाशी खेळून झाल्यावर त्यांनी तिला रमेशकडे दिले. तो पर्यंत नीता स्वैपाकाला लागली होती. हळूहळू रात्रीचे आठ वाजायला आले. काका गॅलरीत उभे होते. खालून चाललेली वाहने मुंगीच्या पावलाने सरकत होती. जणू अंगावर प्रकाशाची ठिणगी लावलेल्या कामकरी मुंग्या रेंगाळत चालल्या होत्या. एवढ्या उंचीवरून वाहतुकीच्या वेगाचा अंदाज येत नव्हता. रस्त्यावरच्या सर्कलभोवती गाडीच्या दिव्यांचं फिरणं चक्रासारखं दिसत होतं. आयुष्य असं लांबून बघता आलं असतं तर किती बरं झालं असतं, असं काकांच्या मनात आलं. ते भारल्यासारखे पाहत होते. विचारांच्या गोंधळात त्यांना रमेशने मारलेली हाक ऐकू आली नाही. मग तोच गॅलरीत आला आणि म्हणाला, " अहो, असं खाली बघत काय राहिलात? मी केव्हापासून जेवायला बोलावतोय, चला लवकर. " ते घाईघाईने आत गेले....... अर्ध्या तासात जेवण झालं. ते पुन्हा गॅलरीत येऊन बसले. घरात असूनही ते टीव्ही पाहत नसत. उगाच नको, रमेशला नाही आवडलं तर. असं त्यांना वाटे.

वास्तविक त्यांचा वेळ घरी जात नसे. सुट्टीचा दिवस तर त्यांना बोअर होत असे. तरीही आजचा दिवस साधनामुळे लवकर गेला. साडे नऊ वाजून गेले होते. खालची रहदारी आता कमी झाली होती. त्यांनी आज लवकरच अंथरूण घातले. त्यावर उशी उभी ठेवून ते आरामात पाय पसरून बसून राहिले. थंड वाऱ्याची झुळुक बाहेरून येत होती. त्यांच्या मनात आलं, आजचा दिवस मात्र चांगला गेला. मुख्य म्हणजे साधनाचं साधं आणि सभ्य वागणं, तिची चालण्या बोलण्यातली नजाकत त्यांना आठवू लागली. रात्र साधना बरोबरच्या स्वप्न रंगविण्यात आणि शेवटी झोपण्यात सरली....... सकाळ झाली. उठल्याबरोबर पहिला विचार मनात आला, आपण आज दांडी मारू या. किंवा, नाही तरी बँकेचं काम करायचंच आहे ते करू या. मग त्यांनी दादाला फोन लावण्यासाठी फोन उचलला. पण तसं न करण्याचं ठरवलं. समजा तो पोलिसांच्या ताब्यात असेल किंवा ऑफिसमध्ये पोलिस आले असतील, तर निष्कारण आपल्या फोनची त्याच्या मोबाईल मध्ये नोंद होईल. त्यापेक्षा आपण जावं हे बरं. तरीपण जावं की न जावं यात तास दीड तास घालवल्यावर ते तयार झाले. आणि एकदाचे निघाले...... दबकत, दबकत ते ऑफिसच्या फ्रंट डोअरशी आले. नेहमी प्रमाणे आपोआप दार उघडलं गेलं. याचा अर्थ काय?...... कोणी उघडलं असेल दार? दादा? कटील? की..... पोलीस? आस्ते आस्ते ते आत शिरले. जणू काही कुणाला चाहूल लागली असते तर ते मागच्या पावली पळाले असते. पण दरवाजा आपोआप लॉक झाला होता..... आणि आता उघडणार नव्हता. त्यांनी केबिनच्या दरवाज्याकडे पाहिलं, पण काहीच वेगळं दिसलं नाही. सगळ्या वस्तू जिथल्या तिथेच होत्या. कपाटातली सगळी पुस्तकं (खोटी धरून) जागेवरच होती. सगळ्याच वस्तूंनी काकांकडे निर्विकारपणे पाहिलं. मग ते खुर्चीत बसले. काही तरी करणार इतक्यात फोनची बेल वाजली. त्यांनी दचकून फोन उचलला. फोनवर दादा होता. "अंदर आईये" दादा म्हणाला. त्यांना जरा बरं वाटलं. म्हणजे दादा आहे. कटीलचं काय?..... त्यांनी केबिनचं दार ढकललं. दादा आत शांतपणे सिगारेटचे झुरके घेत होता. त्याने त्यांना बसण्याची खूण केली. कटील दिसत नव्हता. कुठे गेला हे विचारणं म्हणजे आपणच विषयाला तोंड फोडण्यासारखं होतं. ते बसल्यावर दादा म्हणाला, " अरे काकाजी, आप इतने टेन्शन मे क्यूं है? आप बहूत सोचते है.... कोई ऑफ हो गया क्या? " ते मानेनेच नाही म्हणाले. मग तो म्हणाला, " आपको बैंककी जानकारी हांसिल करनेको बोला था (काकांच्या चेहऱ्यावर काही च प्रतिक्रिया न दिसल्याने) तो पुढे म्हणाला, याद है ना? ". त्यावर ते गडबडून म्हणाले, " हां हां, याद है " "तो क्या किया आपने? "..... खालच्या मानेने त्यांनी उत्तर दिले, " कल मै गया था, लेकीन बँक बंद थी. आज जाके जानकारी कर लेता हूं. अभी जाऊ क्या?....... "

त्यावर तिरकसपणे तो म्हणाला, " और कितना दिन लेंगे आप?, परसू मुझे पूरी जानकारी नक्शा के साथ चाहिये. अंदर जानेका कोई दूसरा रास्ता है क्या ढूंढिये. अभी आप जाईये और परसू शामको ऑफिसमे आईये. ". ते उठले. केबिनच्या दरवाज्यावर ढकलण्यासाठी त्यांनी हात ठेवला, तेवढ्यात दादाने मऊ आवाजात सहजता दाखवीत प्रश्न फेकला, " आप पेपर पढते है ना?... " काकांची छाती धडकली. त्यांनी मागे वळून पाहिलं. तो म्हणाला, " जीवनराम की बॉडी पुलीसको मिली है. अभी तक उनको ये जीवनराम है ये पता नही पडा होगा. लेकीन साले गुगली बहोत फेकते है. बॉडीका नाम और हत्यारेका नाम मालूम है ऐसा लिखा है. लगता है पुलिस क्रिकेट ज्यादा देखती है. आप मेरे फोन का इंतजार करना फिर ऑफिसमे आना. शायद पुलिस यहॉ आ सकती है. " काका काही न बोलता केबीन बाहेर पडले. थर्मास उचलून रस्त्यावर आले. आता त्यांना अजिबात घबराट वाटत नव्हती.

पण डोक्यातले विचार मात्र थांबत नव्हते. कटीलला जरी पकडला, तरी तो मोडणाऱ्यांपैकी नव्हता. सोल्याची शिक्षा पचवलेला माणूस होता तो. मग त्यांनी मुंबई सेंट्रलला जाणारी बस पकडली. दुपारचे बारा वाजून गेले होते. आत्ता साधना घरी नसणार. बँकेत जायचं म्हणजे तसं धोक्याचं आहे. ते स्वतःशी म्हणाले. आपण निदान बिल्डिंग भोवती फेरी तर मारू. आजूबाजूचे रस्ते, दुकानं वगैरेंची नोंद घेऊ. असं म्हणून ते स्टॉपवर उतरले. साडेबारा झाले होते. सावकाश चालत ते प्रीतम बिल्डिंगच्या समोरच्या फूटपाथवर आले. दुपारची वेळ असल्याने वाहनांची पण रहदारी फार नव्हती. मध्येच एखादी स्कूल बस ये जा करीत होती. एप्रिल महिना म्हणजे परीक्षांचे दिवस. रमेशला आपण क्वचितच शाळेत सोडायला जात असू. बहुतेक वेळेला रोहिणी स्वतःच जात असे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. का रोहिणी आपल्याशी इतकी चांगली वागली? आपण काम नसलं तरी नुसतेच घरी बसून असायचो. पण तिने कधी तक्रार केली नाही. फार चांगली वागली म्हणून लवकर गेली, झालं. दुसरं काय? आत्ता हा विचार काय करायचाय? ते सहज म्हणून एका जागीच थांबले. थांबून पाच सात मिनिटं झाली असतील नसतील, एक फाटका माणूस समोर आला. त्याचा चेहरा चिखलाच्या रंगाचा होता. डोळे नाक कान हे अवयव लक्षात घेण्याची गरज नसलेल्या त्या चेहऱ्याने नाकाला तर्जनी लावून काकांना विचारले, " काय साहेब, काही पाहिजे का?. फोटो तरी पाहून घ्या. " त्याने फोटोसाठी खिशात हात घातला. ते पाहून काका म्हणाले, " चल नीघ! सरकारी इन्स्पेक्टर आहे मी. मुकाट्याने चालू लाग. नाहीतर दोघेही जाऊ या पोलिस स्टेशनात, येतोस? " असं विचारल्यावर तो खाली मान घालून, जसं काही घडलंच नाही अशा तऱ्हेने निघून गेला. काकांच्या लक्षात आलं, असं एका जागी उभं राहून उपयोग नाही. त्यांनी रस्ता ओलांडला. आणि ते बँकेच्या फूटपाथवर आले. मुख्य दरवाज्यातून माणसं ये जा करीत होती. पण आतलं फारसं दिसत नव्हतं. वॉचमन तेवढा आत बसलेला दिसला. ते सहज म्हणून बिल्डिंगच्या मागच्या बाजूला गेले. तेथील रस्ता थोडा अरुंद होता पण बोळासारखा नक्कीच नव्हता. बँकेची ती मागची बाजू होती. तिथे पण एक दरवाजा दिसत होता. तिथूनही काही लोक ये जा करीत होते. बहुतेक स्टाफ असावा. आत वॉचमन होता. एखाद दोन चार सेकंद ते थांबले असतील. तेवढ्यात एक जीप आली.

त्यातून दोन बँकेची माणसं उतरली. दोन पोलीस पण होते. ते गाडीतच बसले होते. दोघा माणसांनी एक मोठी ट्रंक आत नेली. बहुतेक कॅश घेऊन जाण्यासाठी आले असावेत. मागचा दरवाजा आता सताड उघडला होता. काकांनी नीट बघता यावं म्हणून रस्त्यावरील एका झाडाच्या बुंध्याजवळ थुंकण्यासाठी ते वाकले. नजर वर केली. दरवाजाच्या आतल्या बाजूला एक लोखंडी गोल जिना वर गेलेला त्यांना दिसला. कदाचित तो फायर एक्झिट असावा. किंवा आणखीन कुठेतरी जाणारा मार्ग असावा. त्यांना फार वेळ पाहता आलं नाही. ते लगेचच तिथून निघाले. त्यांची नजर जाता जाता सहजच बिल्डिंग च्या गच्चीकडे गेली. जो जिना त्यांनी आत पाहिला होता, त्याचा काही भाग त्यांना गच्चीवर दिसला. याचा अर्थ गच्चीवरून बँकेत जाणं शक्य असावं. पण इतकी लेचीपेची सुरक्षा व्यवस्था असेल असं त्यांना वाटेना. नक्कीच मागील दरवाज्याला ऑटोमॅटिक अलार्म लॉक्स असतील. ते भराभर निघाले. समोरच्याच उडप्याच्या हॉटेल मध्ये बसले. तिथून त्यांना मागील दरवाजा स्पष्ट दिसत होता. पण आतला भाग मात्र दिसत नव्हता. अचानक त्यांच्या डोक्यात एक विचार आला. आपण जर या बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊन पाहिलं तर आपल्याला कळेल की तो जिना नक्की कुठे संपतो. या विचाराने ते एकदम उत्तेजित झाले. मग त्यांनी साधनाला फोन लावला. त्यांचा आवाज ऐकून ती म्हणाली, " अरे अचानक फोनसा केलात? सगळं ठीक आहे ना? " ते म्हणाले, " काही नाही गं, बँकेत खातं उघडण्याबद्दल बोलली होतीस ना, उद्या मी आलो तर चालेल का? माझ्याबरोबर बँकेत आलीस तर माझं काम होऊन जाईल. " तिने त्यांना सकाळी दहा वाजता येण्यास सांगितले....... काका सावकाश उठले. बिल देऊन बडीशेप चघळीत ते बाहेर आले. आता बँकेचा मागचा दरवाजा बंद होता. जीप तशीच उभी होती. ते पुन्हा मुख्य रस्त्यावर आले. त्यांनी कोणी पाहत नाही अस बघून बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. ते सरळ चालत निघाले. त्यांना कोणीही हटकलं नाही. एक वाजून गेला होता. बहुतेक लोकांची दारं बंद होती. जेवणाची वेळ असावी. शाळेतून आलेल्या मुलांचीही गडबड दिसली नाही. बिल्डिंगला पाच मजले होते. ते जिने चढू लागले.

त्यांची नजर दुसऱ्या मजल्यावरच्या साधनाच्या फ्लॅटकडे गेली. तो बंद होता. तोंडावर सहजतेचा भाव आणून ते जिन्यामागून जिने चढत होते. दहा बारा जिने चढायचे होते. त्यांना गच्चीतला "तो" जिना पाहायचा होता. चवथ्या मजल्यावर आल्यावर मात्र दोन मुलं तेथील पॅसेज मध्ये क्रिकेट खेळताना दिसली. त्यातील एकाने काकांना "कुठे जायचाय " म्हणून विचारलं. मुलं आठ दहा वर्षाचीच होती. ते केवढे दचकले. त्यांना एकदम उत्तर सुचेना तरीही ते झटकन म्हणाले, " मला पस्तीस नंबर मध्ये जायचाय. " त्यावर त्यातला मघाशी विचारणारा मुलगा म्हणाला, " पण तिथे तर कोणीच राहत नाही. " मग ते खरंतर वैतागून, पण सहजता दाखवीत म्हणाले, " असू दे. असू दे " त्याने पुढे बोलण्याच्या आतच ते घाईघाईने पाचव्या मजल्यावरच्या जिन्याकडे वळले. भराभर चढत ते गच्चीकडे जाणाऱ्या जिन्यावर चढले. समोर गच्चीला जाण्याचा दरवाजा होता. पण तो बंद होता. क्षणभर त्या कुलुपाकडे निराशेने पाहत ते थांबले. त्यांनी हा दरवाजा बंद असेल हा विचार केलाच नव्हता. वर येताना कार्ट्यांनी हटकलं. म्हणून असं झालं. त्यांना त्या मुलांचा राग आला. ते परत पाचव्या मजल्यावर आले. मुलांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी बाहेरून कुलूप असतानाही पस्तीस नंबर फ्लॅटची बेल वाजवली. अर्थातच कोणीच उघडले नाही. वरती दोनच फ्लॅट होते. पस्तीस नंबरचं नाव होतं, "जी. एम. शाह" आणि छत्तीस नंबरचं नाव होतं. "डी. पी. भोजने. " ते पटकन खाली जाण्यासाठी जिन्याकडे वळले. शाहाची बेल ऐकून भोजने बाहेर यायचा आणि आपण पकडले जायचो. उतरताना मात्र चवथ्या मजल्यावरचा मुलगा परत म्हणाला, " मी सांगितलं होतं ना पस्तीस नंबरमध्ये कोणीच राहत नाही. " पण काकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ते जवळ जवळ धावतच जिने उतरले. आणि एकदाचे बिल्डिंगच्या बाहेर पडले. छातीतली धडधड वाढली होती. घामही आला होता....... "नुसतं त्या मुलांनी हटकलं तर आपण किती घाबरलो. असली डिटेक्टिव्हगिरी आपल्याला महागात पडायची. : असं स्वतःशी म्हणत त्यांनी रस्ता ओलांडला आणि बस साठी ते उभे राहिले. लवकरच बस आली, ते घरी पोचले.

दोन वाजून गेले होते. घरी अर्थातच नीता आणि श्रेया होती. ते लवकर आलेले पाहून नीता म्हणाली " आज लवकर सुटलात? " उत्तरादाखल ते म्हणाले, " आज काम बाहेरच होतं, पण उद्या मात्र झाली तर रात्र होऊ शकेल. "तिने त्यांना जेवायला वाढलं. जेवण झाल्यावर ते जरा लवंडले. त्यांनी डायरी काढली. आणि लिहायला सुरुवात केली. डायरी आता चांगलीच भरत आली होती. जवळ जवळ वर्षभराची डायरी लिहून झाली होती. उन्हाची तल्खली बाहेर वाढली होती. एप्रिल महिना असूनही एवढं गरम होत होतं. खरंतर त्यांना आत्ता थंडगार सरबत नाहीतर थंड पेय तरी हवंसं वाटत होतं. पण ते काहीच बोलले नाहीत. त्यांना अजूनही नीताची खात्री वाटत नव्हती. कदाचित ती ठरवून चांगली वागत असेल. मनात नसताना सुद्धा. तसेही आपण इथून कुठेही जाणार नाही हे वास्तव तिने स्वीकारलं असावं....... उरलेला दिवस कसा काढला त्यांना कळेना मग त्यांना एकदम काळ्या जादूची आठवण झाली. त्यांना माहिती गोळा करायला सांगितलं होतं. आपण जवळच्याच ग्रंथालयात जाऊन पाहावं किंवा रस्त्यावर विकायला ठेवलेली जुनी पुस्तकं पाहावीत. म्हणून त्यांनी साडेपाच सहाला बाहेर पडण्याचं ठरवलं. काही वेळ त्यांचा श्रेयाशी खेळण्यात गेला. पण सहाच्या सुमारास नीताने त्यांना श्रेयाला बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. ते तयार होऊन श्रेयाला बाजूच्याच बागेमध्ये घेऊन गेले. घसरगुंडी आणि इतर साधनांशी खेळता खेळता सात वाजायला आले. ते सारखे श्रेयाला घरी घेऊन जाण्याची आठवण देत, पण ती ' अजून खेळूया ना! ' असं म्हणून हट्ट करू लागली. मग कसतरी समजावून त्यांनी तिला घरी सोडले. आणि ते निघाले. मुख्य रस्त्याला आले. तिथे त्यांना एका विक्रेत्याकडे वेगवेगळी जुनी पुस्तके पडलेली दिसली. त्यात एवढी विविधता होती की त्यांना समजेना. तरीही त्यांनी काही पुस्तकं उचलून चाळायला सुरुवात केली. त्यातली काही भुताटकीची तर काही जादूची, तर काही इंग्रजी जादूचीही पुस्तकं होती. तसंच काही पिवळी पुस्तकं पण होती. त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही. एक काळ असा होता. की ते असली पुस्तकं कोणी बघत नाही असं पाहून चोरून आणायचे आणि चोरून वाचायचेही. पण सध्या काम वेगळं होतं. त्यांनी " अस्सल इंद्रजाल, आणि इंग्रजी "विचक्रफ्ट " (म्हणजे चेटुक विद्या) तसंच काली किताब वगैरे दोन चार पुस्तकं उचलली. ते ती चाळू लागले. त्यात विक्षिप्त प्रकार होते. मग हातातली पुस्तकं खाली ठेवून त्यांनी दुसरी पुस्तकं उचलली. ते पाहून विक्रेता त्यांना म्हणाला, " काकाजी, आपको क्या चाहिये, अगर लेना नही है तो टाइम पास नही करना. " विक्रेता एक ओढलेल्या चेहऱ्याचा म्हातारा होता. त्याला एक प्रकारचा त्वचारोगही होता. आधीच तो रोगाने परेशान झाला होता. अशा विक्रेत्यांचं एक तत्त्वज्ञान असतं. त्यांना वाटतं उचललेलं पुस्तक घेतलंच पाहिजे. खरंतर त्यांची विक्री सहसा होत नाही. पण त्यांचा चेहराच असा असतो की गिऱ्हाईक तिथे फिरकायला तयार होत नाही. असो. मग काकांनी अस्सल इंद्रजाल व इंग्रजी विचक्राफ्ट ही पुस्तकं विकत घेतली. नीट गुंडाळून त्यांनी ती खिशात ठेवली. असली पुस्तकं घेतल्यावर माणसाला एक प्रकारची लाज वाटते, तशी ती त्यांनाही वाटली. म्हणजे आपण लोकांना छांदिष्ट किंवा मंत्रचळी वाटतो.

मग काका त्यांच्या ओळखीच्या ग्रंथालयात गेले. थेट काळ्या जादूवरच पुस्तक पाहिजे असं विचारणं जरा कठीण वाटलं म्हणून त्यांनी भयकथा, कादंबऱ्या असली पुस्तकं पाहायला घेतली. बराच वेळ शोधूनही त्यांना पाहिजे ते पुस्तक सापडेना. कंटाळून ते घरी आले. कपडे बदलता बदलता ते गॅलरीत गेले आणि आणलेली पुस्तकं त्यांनी त्यांच्या कपाटात दडवली. जेवण झालं. आज त्यांनी साडेनऊ वाजताच अंथरूण घातलं. दोन्ही पुस्तकं चाळायला सुरुवात केली. वाचताना त्यांना असं वाटलं की केव्हातरी साऱ्या जगात असले प्रकार सर्रास चालू असणार. नाहीतर असे विधी लिहिणं फार कठीण आहे. हे प्रयोग कितपत सिद्ध होत असतील कोणास ठाऊक. ते स्वतः शी पुटपुटले. त्या काळात साध्या साध्या घटनांचा संबंध या पद्धतीने लावला जात असावा. पण अजूनही लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतात म्हणजे कमाल आहे. या पुस्तकात मानवी हाडं, कवट्या, पुरलेली मृत शरीरे, रक्त, पक्ष्यांचे व प्राण्यांचे अवयव वाघ सिंहांची नखं, इ. अनेक वस्तू मिळणं कठीण आहे आणि मागितल्या तर मागणारा हास्यास्पद ठरेल. इंग्रजी पुस्तकातल्या चेटुक विद्येतही तोच प्रकार. त्यात मृताला जिवंत करून कामाला लावणे(आजकालच्या रोबो सारखं. ). इच्छित व्यक्तीस बोलावणे, संतती प्राप्तीचे अघोरी आणि हिडीस उपाय, मृत स्त्री बरोबरचे वेडेचार इत्यादी प्रकार त्यांना दिसले. साधारणपणे सगळ्या प्रयोगांच्या सिद्धतेसाठीच्या अटी तंतोतंत अस्तित्वात मिळणं कठीण पडावं अशा रीतीने उपाय दिले होते. तरीपण काका त्या वाचनात रंगले.

रात्रीचे साडेबारा वाजले. दमून काकांनी दोन्ही पुस्तकं नीट दडवली. रात्र संपली. काका उठले. आज ते लवकरच तयार झाले. आज त्यांनी पांढरी कॉलर असलेला निळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. मंद सेंट मारून ते निघाले. त्यांना प्रथम साधनाकडे जायचं होतं. आवश्यक ती कागदपत्रं त्यांनी घेतली. बस पकडली. लवकरच ते साधनाच्या फ्लॅटशी पोहोचले. बेल वाजल्याबरोबर लगेचच दार उघडलेलं दिसलं. तिने खिडकीतून पाहिलं असावं, असं त्यांना वाटलं. ती हसून म्हणाली, " सोनाने तुम्हाला पाहिलं म्हणून दार लगेच उघडता आलं. " हे ऐकून ते हसले. तिने विचारले, " हसलात का? " त्यावर ते म्हणाले, " अगं माझ्या मनात हाच प्रश्न आला आणि तूही त्याचंच उत्तर दिलंस. म्हणून हसलो. " तिने आज आकाशी रंगाचा लाल आणि सोनेरी डिझाइन असलेला ड्रेस घातला होता. आकाशी रंग तिचा आवडता असावा. केसांचा पोनी बांधून त्यावर लहानसा गजरा पण माळला होता. मंद मधाळ सेंटचा वास येत होता. ती कोवळ्या नारळाच्या खोबऱ्या प्रमाणे फ्रेश दिसत होती. इथे रोहिणी असती तर त्यांनी तिला पटकन दाबून कवेत घेतले असते. पण मोठ्या कष्टाने मोहाला बाजूला सारीत ते साधनाकडे फक्त पाहतं राहिले. मागे सोना कसलंस खेळणं घेऊन उभी होती. ते आत शिरले दहा वाजत होते. म्हणून ते, म्हणाले, " चल जाऊ या लवकर. तुला ऑफिसला जायचं असेल ना? " मग ती आणि ते निघाले. सोना एकटीच होती. जाता जाता ती म्हणाली, " तसं मी उशिरा येणार असल्याचं सांगितलंय. अकरा साडे अकरा पर्यंत गेलं तरी चालणार आहे. कॉरिडॉर अरुंद असल्याने अधून मधून त्यांना तिच्या दंडाचा स्पर्श होत होता. ते तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करीत होते. पावडर लावताना काही प्रमाणात पावडर कानाखाली आणि मानेवर चिकटून बसली होती. पण त्यांना तिला तसं सांगण्याचं धाडस झालं नाही. दोन तीन मिनिटातच ते बँकेत शिरले. काल लांबून पाहिलेली बँक त्यांना आता जवळून पाहायला मिळत होती.

आत शिरल्याबरोबर एक लांबलचक कॉरिडॉर दिसला. त्याच्या एका बाजूला वेगवेगळी काउंटर्स दिसत होती. शेवटी कॅशियरची केबीन होती. त्यात एक पैसे घेणारा आणि दुसरा पैसे देणारा बसला होता. कामाचा दिवस असल्याने बऱ्यापैकी गर्दी होती. रोकड भरायला जास्त गर्दी वाटली. ते सहजपणे काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाले, " बँकेचे व्यवहार फार मोठे वाटतात नाही?, जरी लहान दिसत असली तरी. " साधना म्हणाली, " हो ना. मोक्याच्या जागेवर असल्याने नेहमीच गर्दी असते. आणि फार जुनी व भरंवशाची बँक आहे ही. पूर्वी ही बँक अंधरीला होती. ही बिल्डिंग बांधल्यापासून म्हणजे जवळ जवळ दहा ते पंधरा वर्ष बँक इथेच आहे. आता ही जागा त्यांना अपुरी पडते.. " साधना अगदी बँकेची मॅनेजर असल्यासारखी माहिती देत होती. खरंतर दोघेही फार गंभीरतेने हे बोलत नव्हते. काका बाहेरच उभे राहिले. ती काउंटर्स मधून जाणाऱ्या रस्त्याने आत एका टेबलापाशी गेली. टेबलापलीकडच्या खुर्चीत एक मध्यमवयीन पुरुष बसला होता. त्याचा चेहरा टिपीकल बँक कर्मचाऱ्यासारखा होता. म्हणजे "वेल फेड वेल पेड " टाईप. त्याने नजर वर करून चष्मा कपाळावर सारून तिला ओळखीचं हसू दिलं. तो म्हणाला, " साधना बेन तुम्ही? बरेच दिवसांनी दिसताय? काय लोन बीन पाह्यजे काय?? त्यावर साधनाने माझ्या एका मित्रांसाठी बचत खाते उघडण्याचा अर्ज पाहिजे असं सांगितलं त्याने तो तत्परतेने सह्या करण्याच्या जागी खुणा करून दिला. आपला चेहरा फार वेळ दिसू नये म्हणून काका मुद्दामच बाहेर थांबले होते. पण फोटोसहित भरलेला अर्ज देताना तो दिसणारच होता. त्यांची कागद पत्रे ऑफिसरकडे दिली. साधनाची ओळख असल्याने शिपायाकरवी हजार रुपये कॅश काउंटरला भरून खातं उघडलं गेलं. मग काका साधनाला म्हणाले, " तू जरा बाहेर बस. मी आलोच. " असं म्हणून ते टॉयलेट शोधण्यासाठी ते आत शिरले. कोणीतरी त्यांना एक दरवाजा दाखवला. मध्ये जाताना मुख्य मॅनेजरची केबीन होती. जी सर्व बाजूंनी पारदर्शक होती. आत एक बुटकासा जाड बांध्याचा टकला माणूस बसलेला दिसला. दोन चार माणसं त्याच्या समोरच्या खुर्च्यांमध्ये बसली होती. केबीन ओलांडून काका सांगितलेली दिशा सोडून दुसऱ्याच दिशेला गेले. तिथे स्ट्राँग रूम होती. तेवढ्यात कोणीतरी त्यांना हटकलं..... "ओ मिस्टर! तिकडे काय आहे? काय पाहिजे तुम्हाला? " मग त्यांनी त्याला टॉयलेटबद्दल विचारलं. तो म्हणाला, " इकडचा नाही, तो समोरचा दरवाजा आहे तिकडे जा. काका दरवाजा लोटून आत शिरले. टॉयलेट अंधाऱ्या जागेत होती. टॉयलेटच्या दुसऱ्या बाजूला एक बंद दरवाजा होता. कदाचित हाच मागचा दरवाजा असावा. टॉयलेट मध्ये शिरून त्यांनी चूळ भरला. आत दुसरं कोणीही नव्हतं. त्यांनी आतला मंद लाइट बंद केला. दरवाजा अर्धवट उघडला. दरवाजाच्या बऱ्यापैकी उघड्या भागातून त्यांनी बँकिंग हॉलची पाहणी केली. एकूण पाच ऑफिसर्स, आणि दहा ते पंधरा कर्मचारी, चार शिपाई, चार वॉचमन आणि एक मुख्य मॅनेजर असा स्टाफ होता. मॅनेजरच्या केबिनच विरुद्ध बाजूला स्ट्राँग रूम कडे जाणारा दरवाजा होता. जिथे ते चुकून (म्हणजे मुद्दाम) गेले होते. तो अर्थातच उघडा होता. त्यात एका बाजूला लॉकर्स होते. काही माणसे आत जात होती. पण एका वेळेला एकच माणूस जात होता. बाहेत ऍटेंडंट बसला होता. प्रत्येक दरवाज्यावर एकेक बंदूकधारी वॉचमन होता. तशी बँकेला जागा कमी पडत असावी. एखादी तरी रेकॉर्ड रूम असणार. असं त्यांना वाटलं. आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. एक माणूस लॉकर्स आणि स्ट्राँग रूम यांच्या मधल्या दरवाज्या मधून बाहेर पडला. जणू तो जमिनीतून बाहेर आला होता. नक्कीच जमिनीखाली रेकॉर्ड रूम असली पाहिजे. नंतर त्यांनी एकूण खिडक्या मोजल्या. वेळ थोडा होता. कोणीही येण्याची शक्यता होती. त्यांनी प्रथम टॉयलेटमधला लाइट लावला. बाकी तपशील त्यांनी थोडासा बघून घेतला. त्यांना दिसलेला गोल जिना कुठेच दिसत नव्हता. दुसरी भेट आवश्यक आहे असं त्यांना वाटलं. आत कॅमेरे लागले आहेत की काय बघावं लागणार होतं. ते बाहेर पडले. त्यांनी छतावर सहज म्हणून पाहिलं. त्यांना तसं काहीच दिसलं नाही. पण कॅमेरे असणारच. स्ट्राँगरूमच्या दरवाज्याचे गज मुठीएवढे जाड होते. शिवाय आणखीन एक दरवाजा आत असल्याने त्यांना काहीच दिसलं नाही. ते खाली मान घालून साधना बसली होती तिथे आले. परवा येऊन पास बुक घेऊन जाईन असं ते साधनाला म्हणाले. बाहेर पडल्यावर साधना म्हणाली, " या वर. नाश्ता वगैरे करून जा. "

तिचा सहवास पुन्हा लाभेल म्हणून ते तिच्या घरी गेले. आज ते सोनाशी खळले. सोनाही मोकळेपणाने खेळली. तिने त्यांना विचारलं, " काका तुम्ही राहता कुठे? तुमच्या घरी पण लहान मुलं आहेत का? " मग त्यांनी तिला श्रेयाबद्दल सांगितलं. आणि तिच्या वेगवेगळ्या खेळांबद्दलही. ते ऐकण्यात सोना रंगली. थोड्याच वेळात आतून कांदा पोह्याच्या बश्या घेऊन आली. मग तिघांनी त्याचा समाचार घेतला. सोना आत गेल्यावर साधनाने विचारलं, " आज तुम्हाला ऑफिसला जायचं नाही वाटतं.? " त्यावर ते म्हणाले, " छे! छे! जायचंय की, जरा उशिरा, तुझ्यासारखंच. ".... या योगायोगावर ती माफक हसली. जास्त वेळ न थांबता ते निघाले. जाताना त्यांनी सोनंच गालावर थोपटलं आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. खरंतर हे सर्व आपल्याला साधनाबरोबर करता आलं असतं तर बरं वाटलं असतं, असं त्यांच्या मनात आलं. पण ती घाई ठरली असती. त्यांनी सहेतुक तिच्याकडे पाहिलं. बहुतेक तिला कळलं असावं. पण कोणतीही प्रतिक्रिया न देता ती तशीच थांबली. कष्टाने ते बाहेर पडले. आज जाताना त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. खाली उतरताना पहिल्या माळ्यावर जिन्याच्या डाव्या कोपऱ्यात एक म्हातारी बाई उभी होती, तिकडे त्यांचं सहज लक्ष गेलं. दारावर पाटी होती. ताराबाई सरडे. म्हातारी कमरेत वाकली होती. असेल ऐंशी पंचाऐंशी वर्षांची. ते तसेच खाली उतरले. त्यांची नजर बँकेकडे वळली. आणि पुन्हा वर वळली. म्हातारी गॅलरीत अजून उभी होती. मग एकदम त्यांच्या मनात विचार चमकला. म्हातारीचा फ्लॅट बरोबर बँकेच्या वर होता. पण त्यांना तसा काही विचार सुचेना त्यांनी मनातला विचार उडवून लावला. ते बस पकडून घरी पोचले. दादाचा फोन अजून तरी आला नव्हता. उद्यापर्यंत आला नाही तर पास बुक आणण्याच्या निमित्ताने त्यांना बँकेची अधिक पाहणी करता येणार होती. घरी नीता एकटीच होती. श्रेया झोपली होती. तिला आज बरं नव्हतं. ताप असावा. त्यांनी तिच्या अंगाला हात लावून पाहिला. नीताला विचारलं, " ताप बराच आहे. डॉक्टरांकडे जाऊन आलीस का? " ती मानेनेच हो म्हणाली. बहुतेक आवाज झाला असता तर श्रेया उठली असती. जेवणात त्यांचं लक्ष बेताचंच होतं. त्यांना अचानक असुरक्षित वाटू लागलं. आपण त्याच बँकेत खातं उघडतोय ज्या बँकेवर दादा दरोडा घालणार आहे. हे विचित्र वाटतंय. नाही म्हटलं तरी आपण बँकेच्या रेकॉर्डवर येणार आहोत. सध्या त्यांना काहीच सुचेना. मग अचानक त्यांचा मोबाईल घरघरला. त्यांनी उचलला. पलीकडून दादा बोलत होता. "ऑफिस आ जाईये. ".... खरंतर परवा पर्यंत दादाने वेळ दिला होता. त्यांना कंटाळा आला होता. विश्रांती घ्यावीशी वाटत होती. पण जायलाच पाहिजे. त्यांनी नीताला सांगितलं. आणि तेच कपडे घालून ते निघाले......   ( क्रमशः)