कामथे काका (भाग बाविसावा)

मांडवा बंदराच्या किनाऱ्यावरचा एक वैराण जंगली भाग. रात्री दोनचा सुमार. आत्ता पर्यंत शांतपणे आकाशात चमकणारा चंद्र मध्येच बावचळला असावा. त्याच्याभोवती झालेल्या ढगांच्या दाटीने तरी पाहणाऱ्यास तसेच वाटले असते. असल्या किनाऱ्यावर अशा अपरात्री कोण असणार? आणि कोण बसणार? तसं किनाऱ्याच्या ह्या भागाला जोडप्यांच्या प्रेमगुंजनाचं भाग्य क्वचितच लाभत होतं. त्याला कारण म्हणजे त्या भागाबद्दल उठलेल्या वावड्या. कोंकणंच ते..... रात्री म्हणे तिथे अमावास्येला भुतांची जत्रा भरते. आणि एरव्ही जवळ पासच्या स्मशानाच्या भीतीने तो भाग तसा शापितच झालेला होता. खरंतर जोडप्यांना न बसायला हेच कारण पुरेसं नव्हतं. तर दरवर्षी म्हणे एक तरी तरुण प्रणयात रंगलेल्या जोडप्याचा बळी त्या भागात जातो. आणि योगायोग असा की एकतरी जोडपं तिथेच आत्महत्या करायला येत असावं हे तिथे सापडणाऱ्या जोडप्यांच्या प्रेतांवरून वाटे. तटरक्षक दलाच्या सुरक्षा रक्षकांची तिथे गस्त मात्र असायची पण तीही अनियमित. एकटेपणाने तोही बिचारा गस्त घालायला भिऊन कंटाळायचा किंवा कंटाळून भ्यायचा की काय कोण जाणे. समुद्र किनाऱ्यावरचा वाराच तो. घूं घूं हूं हूं... ऽ करीत वाहत समोरच असलेल्या प्रिन्स जयसिंगजी महाराजांच्या हवेली कम बंगल्याच्या उघड्या खिडक्यांमधून तो मनसोक्त शिरत होता. आणि हवेलीला लागून असलेल्या ताडामाडाच्या जंगलात शिरून त्यांची डोस्की घुसळण्याचा त्याचा उद्योग अव्याहत चालू होता. असं हे रोजच व्हायचं. आजचं वर्णन करण्याचं कारण एवढंच होतं की अशा ह्या खट्याळ वाऱ्याने हवेलीच्या पाहिल्या माळ्यावरच्या राजेशाही दिवाणखान्यातल्या कोचावर अर्धवट झोपी गेलेल्या पेश्तूची झोप चाळवली गेली. त्याने अर्ध्याच तासापूर्वी लागलेल्या झोपेतून जागे होत अर्धवट उघड्या डोळ्यातून दिवाणखान्यावर एक नजर फिरवली. गेल्या जवळ जवळ आठ दहा दिवसांपासून नुसतेच पडलेल्या त्याला शेजारीच पडलेल्या त्याच्या बायकोचाही आता कंटाळा आलेला होता. मायदेशी असता तर आत्तापर्यंत त्याने निदान रोज एकातरी बाई बरोबर मजा केली असती. हट्टाने बरोबर आलेल्या बायकोचा त्याला खरंतर राग आला होता.

त्याला अचानक आपल्या निशाचरी साधनेची आठवण झाली. आल्या दिवसापासून तो रोज रात्री आपला खास ड्रम वाजवून आपण बरोबर आणलेल्या "व्हूडू डॉल " ची स्तुती करीत असे. आणि जमेल तसे तिला प्राणी मारून नैवेद्य दाखवीत असे. तर कधी काहीच मिळाले नाही तर स्वतःच्या हातातून एका लहान बाऊलमध्ये रक्त काढून तिला प्यायला देत असे. म्हणजे तो बाऊल तिच्या तोंडाजवळ नेऊन धरीत असे आणि प्रेमाने तिला पिण्याचा आग्रह करीत असे. नक्की काय जादू होती. कोण जाणे. पण बाऊलमधलं रक्त मात्र नाहीसं होत असे. त्याने उठल्या उठल्या स्वतःच्या आधी दोन तीन कानफटात मारून घेतल्या आणि डॉलची क्षमायाचना केली. आज हे असं घडलंच कसं?....... आपल्या अर्धवट उघड्या पिवळट रंगाच्या चपट्या डोळ्यातून पाहत तो रडू लागला. त्याच्या अगम्य भाषेत तो बोलू लागला. "ओईबोबो, लोआ, शवास्दी! शवास्दी! ऑव नॅन शेष्तू शेष्तू....... " म्हणजे अरे बापरे लोआ (हे त्याच्या व्हुडू डॉलचं नाव होतं)क्षमा कर. क्षमा कर. मी कसा विसरलो कोण जाणे " तरीही घोरणारी झो जागी झाली नाही. त्याची डॉल लोआ म्हणजे एक प्रकारचं वुजगावणंच होतं.

पण एखाद्या प्रेताचे थंड भाव तिच्या चेहऱ्यावर होते. एक दोन अडीच फूट लांबीची गोलसर फुगीर चेहऱ्याची, जिचे डोळे टक्क उघडे असून त्रिकाला पलीकडे पाहत असल्यासारखा भास होत होता. तिच्या जिवणीला रक्ताचे डाग आणि काही पक्ष्यांची पिसे लागलेली होती. म्हणजे तिला खायला घातलेल्या पक्ष्यांची पिसे. तिच्या अंगात मानेपासून गळाबंद काळ्या रंगाचा झगा होता. त्यावर लाल रंगाचे मोठाले गोळे होते. तिचे डोळे मात्र पांढरे आणि बुबळं लाल होती. तिचे केस काटेरी तारांसारखे असून ते अँटिनासारखे उभे होते. त्यातल्या काही केसांचा डोक्यावर बो वांधला होता. एका देवदारासारख्या खोक्यात तिला बसवलेली होती. तिचे हात तिच्या शरीराला चिकटलेले होते. अंगातला झगा खालच्या बाजूला सगळीकडे थोडा थोडा फाटलेला होता. पाय पण एकमेकांना चिकटलेले होते अशा अवस्थेत ती खोक्यात बसवलेली होती. खोका महाराजांच्या एका शिसवी शोकेस मध्ये उभा ठेवलेला होता........ आता त्याने कोपऱ्यात उभा केलेला आपला खास मानवी कातड्याचा बनवून घेतलेला ड्र्म काढला आणि तो वाजवू लागला. "बम बम बम... ऽ म्म म्म म्म... ऽ बम बम बम...... " आवाजाने झो उठली. आणि करवादून म्हणाली," आत्ता आठवण आली वाटतं लोआची? इतका वेळ मुडद्यासारखा पडून होतास. कशाला हे काम घेतलस? कुणास ठाऊक? आपण आपल्या देशात होतो ते काय वाईट होतं का?..... झिनाश्ती झिनाश्ती " अशी शिवी देऊन ती त्याच्या प्रतिक्रीयेसाठी थांबली आणि तोंड वाकडं करून आत निघून गेली.

पेश्तूने तिच्याकडे लक्ष न देता आपले वाजवणे चालूच ठेवले. मग थोडावेळ थांबून तो मंत्र पुटपुटू लागला.

" मशद्द, मशद्द, लोआ, लोआ, इनाशी इनाशी ऑव " म्हणजे लोआ आय लव यू मला सोडून जाऊ नकोस. असं म्हणून त्याने वेडेवाकडे हातवारे करीत नाचणं सुरू केलं. तो एक प्रकारच्या वेगळ्याच जगात गेला. समोरच्या वाहुलीच्या तोंडातून दोन चमकणारे सुळे बाहेर आले होते.

नशा थोडी उतरल्यावर त्याला कळलं की तिला भूक लागली आहे. त्याने नाच थांबवला. आज त्याच्याकडे तिच्यासाठी कोणताही बळी नव्हता. हलकेच त्याने आपल्या खिशातून एक चकचकीत सुरी काढली. सुरीचे पाते लखकन चमकले. तिच्यापुढे गुडघे टेकून जवळच ठेवलेला काचेचा बाऊल जो याच कामासाठी असायचा, तो उचलला. सुरीने त्याने स्वतःच्या मनगटाच्या वर सपकन सुरी फिरवली आणि येणारे रक्त तो बाऊल मध्ये गोळा करू लागला. ते करताना तो काही तरी पुटपुटत होता. कदाचित तो आकडे मोजीत होता. तो पुन्हा ड्रम वाजवून नाचू लागला.....

असल्या अघोरी वातावरणाला छेद देत कोचाच्या बाजूला ठेवलेला त्याचा मोबाईल किंचाळला. पण त्याला त्याची जाणीव झाली नाही. त्याने रक्त जमा केलेला बाऊल हातात घेतला आणि मायेने तो लोआच्या तोंडाजवळ नेऊन तिला आग्रह करीत तो पाजू लागला. काही सेकंदातच ते रक्त नाहीसे झाले. लोआचे तोंड रक्ताने लाल झाले. तिचे डोळे चमकले. तिचा आनंद पाहून पेश्तूलाही आनंद झाला आणि आनंदाने ओरडून तिला जागेवर बसवले. मोबाईलचा आवाज बंद झाला होता. तो समाधानाने आता झोपणार होता. आता त्याची लोआ उपाशी नव्हती. तो झोपायला वळणार एवढ्यात त्याचा मोबाईल किंचाळला. त्याने कपाळावर आठ्या आणून तो घेतला. ते दिवाणजी होते. " गुड नाइट पेश्तू साब (त्यांना गुड मॉर्निंग, गुड नाइट चा सेन्स नव्हता) " पेश्तूने कपाळावर हात मारला. आणि म्हणाला, " बिनाश्ता, जिग्वा(म्हणजे बिनडोक लेकाचा) वेस्टींग अ लॉट ऑफ टाइम, बास्टर्ड " दिवाणजींना काही कळलेच नाही, उत्तरादाखल ते फक्त म्हणाले, " थेंक्यू, पेश्तू साब, जल्दबाजी मत करना. " पेश्तू किंचाळला, "गीव्ह मनी यू लोफर. " दिवाणजींना मनी हा शब्द कळला आणि म्हणाले, " भेज राहा हूं " आणि फोन बंद झाला. पेश्तुने परत एक पेग मारला आणि लाईट मालवून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

हवेलीच्या मुख्य गेटजवळ उभा असलेला वॉचमन तेथे घुटमळणाऱ्या कोस्टल गार्ड जयराम शिंदेला हाकलीत होता. " चलता बन चल. यहां कोई नही. चल.! " असं म्हणून त्याने जयरामला जवळजवळ ढकललेच. जयराम शिंदे नुकताच कोस्टल गार्ड म्हणून भरती झाला होता. त्याला नवीन काहीतरी करण्याची खुमखुमी होती. तशात ड्रमचा येणारा आवाज ऐकूनच तर तो इथवर आला होता. त्याने ही गोष्ट वरिष्ठांना रिपोर्ट करण्याचे ठरवले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

मिटिंगचा दिवस उजाडला. सकाळचे अकरा वाजत होते. काका बाहेरच बसले होते. दादाच्या केबिनमध्ये सात आठ लोक होते. काकांना मीटिंग टाळण्याची फार इच्छा होती. पण त्यांना दादाने फोन करून आत बोलवून घेतले. ते निरीच्छेनेच पाय ओढीत आत गेले. साधनाच्या जवळिकीमुळे त्यांना सारखं इथून पळून जावंसं वाटत होतं. मनाच्या अर्धवट अवस्थेत ते आत शिरले. आत येताच काकांना किशा म्हणाला, " काकाजी, आज आपका मूड नही है शायद. " त्यांनी असं काही नसल्याचं मानेनेच उत्तर दिले.

आजच्या मीटिंगलाही दोन तीन नवीन चेहरे होते. पण काकांना त्यात फार रस नव्हता. तो इंजिनियरसारखा दिसणारा माणूस पण हजर होता. त्याने काय माहिती आणली होती कुणास ठाऊक. मीटिंगला सुरुवात झाली. काकांनी त्यांनी आणि रमजानने मिळून केलेल्या कामाचा तपशील सादर केला. किशाने फक्त मान डोलवून त्याची पसंती दिली. मग मीटिंगच खऱ्या कामाला सुरुवात झाली. एरिकने (इंजिनियर सारखा दिसणारा) आठवड्यातून एकच दिवस रोकड मोठ्या बँकेत भरायला जात असल्याचे सांगितले. कधी कधी ती अंदाजे तीस चाळीस लाख असते असे सांगितले. याचा अर्थ नेहमीच असते असा होत नाही. असेही एरिक म्हणाला. बुधवार हा त्यांचा ठरलेला वार असतो. म्हणजे बँकेत शनिवारपर्यंत फारफार तर वीस एक लाख रोकड जमा होत असावी. कधी कधी रोकड नसेलही अशी शक्यता आहे. बँकेची सेफ उघडण्याचं काम रमजान आणि केशव त्याचा साथीदार यांच्यावर टाकण्यात आलं. त्यांनीही "वो तो आपून बराबर करेगा असं आश्वासन दिलं. " किशा म्हणाला, " मुझे इसमे कोई गलती नही चाहिये, और आजकल सायरनभी होते है, ये ध्यान मे रखो. " असे सांगून त्यांना त्यातील गांभीर्य समजावून दिले. मग शनिवार रात्री दहा वाजायच्या सुमारासच बँकेत शिरण्याचे ठरवले. काही माणसांनी, वॉचमन बँक बंद झाल्यावर सात साडे सातच्या सुमारास परत एकदा आतली सगळी सुरक्षितता तपासून घेतो. मग मॅनेजर आणि रोखपाल यांच्या उपस्थितीत त्यांच्या सह्या असलेली सिले लावून कुलुपे बंद करतो व परत आत येत नाही. सील पुढचा दरवाजा आणि मागचा दरवाजा या कुलुपांवरच असते. परंतु खिडक्यांनाही आतून कुलपं लावण्याची सोय केलेली आहे असेही सांगितले. दोन वॉचमन सारखे मागे व पुढे फिरत असतात. ते रात्रभर फिरतात. मग शुक्रवार रात्रीपासूनच दादा आणि त्याची माणसं आजींच्या फ्लॅटवर राहतील असे ठरले. लागणारी हत्यारे गॅस कटरसहीत आदल्या रात्रीपासूनच नेऊन ठेवण्याचे ठरले. गॅस कटरचा उपयोग रमजान आणि केशव लॉकर उघडण्यात अयशस्वी झाले तरच करण्याचे ठरले.

तेवढयात एक म्हातारासा माणूस उभा राहून म्हणाला " दादा, मेरेकू तो लगता है रोकडसे भी लॉकरमेसे सोना निकालेंगे तो अच्छा रहेगा. सोनेको जगाभी कम लगती है. जो बझारमे नूर देखकर बेचभी सकते है. और रोकडका कही नंबर लिखा रहेगा तो वांधा होगा. " सगळेच थोडावेळ चूप बसले. बुढ्याला मूर्खात काढत काही जण म्हणाले, "अरे चाचा, दिमाग खराब हो गया क्या? सोना बेचने कौन जायेगा बाहर. "..... काही मिनिटे स्तब्धतेत गेली. मग दादा म्हणाला, " अपना विठालाल है ना, वो सब करेगा" अजून काकांनी विठालाल नावाच्या पात्राला पाहिले नव्हते. तो अर्थातच तिथे हजर नव्हता. अकड्याची माणसं चर्चेत फारशी भाग घेत नव्हती. विरारची खाडी त्या मानाने आत पर्यंत जाण्यासारखी नव्हती. दादाला बऱ्याच लोकांनी समजावून सांगितले होते. त्यांना चिंता होती म्हातारीच्या मढ्याची म्हातारीचं मढं आता फुगत चाललं होतं. दहा बारा दिवस होऊन गेले होते. काही ठिकाणी, काळजी घेऊनही, उंदरांनी कुरतडलेलं होतं. तसंही म्हातारीच्या अंगावर फारसं मांस नव्हतं, म्हणून ती उंदरांनाही आवडली नसावी. तरी बरं बर्फाच्या लाद्यांमध्ये ते ठेवलं होतं म्हणून. त्याला स्लॅब फोडण्याचीही काळजी होती. बाकी दरोड्याच्या बाबतीत ते त्यांच्या पद्धतीने सहकार्य करणार असावेत.

आता काकांनी टी. व्ही. वर सांगितलेली बातमी दादाला सांगितली. ती ऐकून तो म्हणाला, " स्साला, एकेक अडचनही पैदा हो रही है. अब क्या करेंग? " त्याने उपायासाठी सूर्याकडे पाहिलं. सूर्या म्हणाला, " मशीन की आवाज नही है तो ठीक है. अकडा अपना काम इतनाही करेगा की एक हातोडीसे वो स्लॅब टूट जायगी. ये मशीनका मुझे इतना भरोसेका लगता नही है. "..... मग किशा म्हणाला, " अरे लेकीन वोही करनेको बाहरी आवाजकी जरूरत है. और काकाजी, बरसात मे पानी तो इकट्ठा होता होगा ना? वो निकालना तो पडेगा के नही. आप रहने दो. अपना एरिक जाके मुआयना करके आयेगा वो भी कलके कल. "...... थोडा वेळ थांबून तो म्हणाला, " जो बोला है वो जल्दीसे जल्दी करना होगा. और मै अब जो बोल राहा हूं वो ध्यान से सुनो....... अपून सब मिलके और हिरा छोडके आठ लोग रहेंगे. दो जन गाडीमे रहेंगे बाकी छे लोग मेरे साथ बूढीके फ्लॅटमे आयेंगे. पूरा काम रात के दो बजे तक होना चाहिये. सब लोग जानवर का नकाब लगाके काम करेंगे. आवाज कोई भी नही करेगा. अगले शनिवार को यहाँ फिरसे मीटिंग होगी. अगर कोई प्लान के मुताबिक काम नही करेगा तो उसको उधरहीच खलास करेगा. काकाको साथमे आनेकी जरूरत नही है. वो दूसरे दिन आके पूरी लूटका हिसाब लगाएगा. " सूर्याला काकांच्या बाबतीत जे सांगितलं ते आवडलं नाही. पण त काही बोलला नाही. मीटिंग बरखास्त झाली. सूर्या केबीन बाहेर घाईघाईने आला. बाहेर त्याने एक माणूस बोलावला होता. त्याचे नाव होतं काण्या चित्ता. काण्याला काका आधीच दाखवले होते. त्याच्या हातात नोटा कोंबत तो दबक्या आवाजात म्हणाला, "देख, ये बूढा कब, कहां जाता है क्या क्या करता है और किस किससे मिलता है इसकी रिपोर्ट मुझे हर दिन चाहिये. वो भी फोनसे. मुझसे मिलना नही. समझे. किसीको शक नही आना चाहिये. चल निकल तेरी ड्यूटी अभीसे चालू होती है " असं म्हणून तो केबीन मध्ये परत आला. सगळेच मग एकेक करून निघाले. काकाही निघाले.

(क्र म शः)