कामथे काका (भाग अठरावा)

ऑफिसमध्ये गेल्या गेल्या दादाने त्यांना आत यायला सांगितलं. सगळा तपशील सांगितल्यावर विचार करून तो म्हणाला " तो अंदर जानेका और कोई रास्ता नही? फिर एक बार कोशिश कीजिये. पुरानी बिल्डिंग है. बैंकके अंदर कही ना कही पानी लीक होता होगा. वो बूढीका फ्लॅट भी अंदर जाके देखिये. " ते बाहेर येऊन बसले. त्यांना आश्चर्य याचं होतं, की आजकाल कटील ऑफिसमध्ये येत नव्हता. तो का येत नाही असं विचारण्याचं धैर्य त्यांना झालं नाही. तेवढ्यात त्यांच्या टेबलावरचा फोन वाजला. फोनवरून दादाने विचारले, " अरे अभी तक गये नही? "त्याची अपेक्षा आत्ताच जाण्याची असावी असं त्यांना वाटलं. ते जातो म्हणाले, आणि त्यांनी लगबगीने थर्मास उचलला आणि ऑफिसबाहेर पडले. बाहेरची उष्णता त्यांच्या अंगात एकदम घुसली. बाहेर पावसाळी वातावरण निर्माण झालेलं दिसलं. समुद्रावरचा वाराही गरम येत होता. हळू हळू भयंकर वारा सुटला आणि त्याबरोबर पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. रस्त्यावरील लोकांची तारांबळ उडाली. पावसामुळे एक प्रकारचं सुखद वातावरण तयार होऊ लागलं. मातीचा मादक वास वातावरणाला घेरू लागला. काकांना या वासाचं फार आकर्षण होतं. पडणारे टपोरे थेंब त्यांनी हाताची ओंजळ करून हात ओले केले. ते तसेच त्यांनी मग चेहऱ्यावरून फिरवले. आस्ते आस्ते ते नेहमीप्रमाणे घरी पोचले. दार रमेशने उघडले. तो आज लवकर आला असावा. त्याचा मूडही आज चांगला वाटत होता. त्याने त्यांचे हसून स्वागत केले. "अरे आज फारच लवकर आलात? " त्यावर ते फक्त हसले. त्यांनी भिजलेले डोके पुसले. ते फ्रेश झाले. नीताने सर्वांसाठी चहा केला. तो घेत ते म्हणाले, " श्रेयाचा ताप कसा आहे? " त्यावर ती उतरलाय म्हणाली. त्यांना जरा सुटल्यासारखं वाटलं. लहान मूल आजारी असलं म्हणजे घरात एक प्रकारचं कुंद वातावरण निर्माण होतं. तसंही बाहेर पावसाळी वातावरण होतंच. आत्ता त्यांना कांदा भजी खाण्याची इच्छा झाली होती.

त्यांना अचानक रोहिणीची आठवण झाली. नुकतंच लग्न झालं होतं. पहिल्याच पावसाळ्यात ते असेच एकदा लवकर घरी आले होते. गंमत म्हणून त्यांनी रोहिणीला कांदाभज्यांची आठवण केली. तिने मात्र खरंच स्वयंपाकघरात भजी करायला घेतली. त्यांची आई कुठेशी बाहेर गेली होती. कपडे न बदलताच ते बाहेर बसले होते. भज्यांचा वास सुटला होता. ते रोहिणीला जवळ घेण्याच्या हेतूने आत जायला निघाले. तीही भज्यांची ताटली बाहेर येण्यासाठी वळली. खोलीच्या दारातच त्यांची टक्कर झाली होती. बाहेर पावसाला उधाण आलं होतं. पावसाच्या धारांच्या आवाजात बरेचसे आवाज विरले होते. टक्कर झाल्याबरोबर ताटलीतली गरमागरम भजी इकडे तिकडे उडाली होती. पण नेमकं एकच भजं रोहिणीच्या ब्लाउजमधल्या घळीत अडकलं होतं. ते पाहून ते दोघेही हसत सुटले होते. तिला जवळ घेत मग काकांनी ते भजं तोंडाने उचललं आणि तिच्या तोंडाजवळ नेऊन तिला अर्धं तोडायला सांगितलं होतं. हे सर्व यथासांग झाल्यावर तिला उचलून ते बेडवर घेऊन आले. मग काही वेळ तरी पावसाच्या पार्श्वसंगीतात घराचं रुपांतर स्वर्गात झालं होतं. तेवढ्यात बेल वाजली होती. घाईघाईने कपडे सावरीत रोहिणीने दार उघडलं. दारात काकांची आई भिजलेल्या अवस्थेत उभी होती........ आत्ता देखील दारावरची बेल वाजली. भूतकाळात शिरलेले काका वेगात असलेल्या गाडीला जोरात ब्रेक लागावा तसे जागे झाले. धडपडत उठून ते दरवाजा उघडायला निघाले.

दारात सेल्समन उभा होता. काकांना जरा रागच आला. ही काय वेळ आहे वस्तू विकण्याची? तरीही ते नम्रपणे नको म्हणाले. पण त्यांनी नाखुशीने दार लावून घेतले. रमेशही काही बोलला नाही. मग रमेशने त्याला कंपनी कॅनडाला पाठवणार असल्याची बातमी दिली. अर्थातच सगळं नक्की होईपर्यंत वर्ष सहज लागेल, असं तो म्हणाला. काकांना जरा बरं वाटलं. "चला, निदान आपल्यामुळे त्याचं काही नुकसान झालं नाही " असं ते स्वतःशी पुटपुटले. तशी दिवसाची उजळणी व्हावी असं काही घडलं नव्हतं. नीताचा मूड अर्थातच छान झाला.

गंमत म्हणजे, तिने न सांगताच कांद्याची भजी करायला घेतली. काकांची इच्छा अशा रितीने पूर्ण झाली. मग जेवणं झाली. जेवणही आज जास्तच चवदार वाटलं. एकूण घरातलं वातावरण उत्साही झालं.

दमण्यासारखं काहीच न झाल्याने त्यांना झोप येईना. त्यांना कटीलचं मात्र आश्चर्य वाटलं. ते जेव्हां जेव्हां ऑफिसमध्ये गेले, तेव्हां कटील त्यांना कधीच दिसला नाही. कदाचित तो आपल्या अपरोक्ष येऊन जात असेल, अशी त्यांनी समजूत करून घेतली, आणि मनाचं समाधान करून घेतलं. कारण त्याच्याविषयी दादाला विचारणं त्यांना शक्या होणार नव्हतं. न कळत त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तयार झाले. आज त्यांना बँकेत जायचं होतं. साधनाची आठवण त्यांना झाली. पण त्यांनी तिला फोन करण्याचं टाळलं. ते लवकरच बँकेच्या बिल्डिंगशी गेले. त्यांची नजर सहज म्हणा, किंवा मुद्दाम म्हणा, साधनाच्या फ्लॅटच्या रस्त्यावरील खिडकीकडे गेली. खिडकी उघडी असली तरी आतला पडदा लावलेला होता. त्यामुळे आतला अंदाज येत नव्हता. तो विचार झटकून ते बँकेत शिरले. त्यांनी काउंटरवरच्या मुलीकडे पैसे भरल्याची स्लिप दिली आणि पासबुक पाहिजे असं सांगितलं. तिने स्वतःच्या खणात शोधून पाहिलं, पण तिला ते मिळालं नाही. तिने आतल्या बाजूला बसलेल्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली. तो अधिकारी कालचाच होता. त्याने पास बुक काढून तिच्याकडे दिलं आणि म्हणाला, " सुगंधा, तू नवीन आहेस. आतला फोटो पाहून, माणूस ओळखूनच पास बुक देत जा. आणि रजिस्टरमध्ये सह्या घे. नाहीतर काही खातेदार ते मिळालं नसल्याची तक्रार करतात. " सुगंधा का कोण होती, तिने रीतसर पास बुक काकांना दिलं. काकांनी ते खिशात ठेवलं आणि माहीत असूनही तिला टॉयलेट कुठे आहे ते विचारलं. तिकडे जाताजाता त्यांनी लॉकर्सचा भाग आणि स्ट्राँग रुम परत एकदा पाहिली. तिथे नेहमीप्रमाणे बंदूकधारी सुरक्षा रक्षक वसले होते. काकांनी तोंडावर रुमाल ठेवलाच होता. ते टॉयलेटकडे वळले. आतून एक कर्मचारी बाहेर येत होता. त्याने त्यांच्याकडे अहेतुकपणे पाहिले. आणि जसा सहज आला होता तसाच सहज निघून गेला. ते आत शिरले. टॉयलेट रिकामी होती. काहीतरी करायचं म्हणून त्यांनी बेसिनचा नळ सोडला. उगाचच हात आणि तोंड धुतले. आणि आतला लाइट बंद केला.

दरवाजा किलकिला करून त्यांनी बँकिंग हॉलचं निरीक्षण केलं. काउंटर्सच्या समोरच्या भिंतीकडे पाहिलं तिथे तीन खिडक्या होत्या. पण तिन्ही बाहेरच्या बाजूने भक्कम ग्रिल लावून सुरक्षित केल्या होत्या. आतून त्या जेमतेमच उघडता येत असाव्यात. लॉकर्सच्या बाजूला खिडकी नव्हतीच. पण एक लहानशी बाथरूमवजा केवीन मात्र होती. ते नक्की काय होतं, कळत नव्हतं. त्याच्यावरच्या फ्लॅटमध्ये जर तिथे बाथरूम असेल तर किती बरं होईल असं त्यांना वाटलं. तशी काही वेगळी माहिती मिळत नव्हती. म्हणून त्यांनी लाइट लावला आणि ते बाहेर पडले. आता बँकेत गर्दी वाढली होती. ते लॉकर्सच्या जवळ उगाचच गर्दीत घुटमळले. तिथे एक आजी कसलीतरी पिशवी घेऊन बसल्या होत्या. त्यात ऐवज असावा असं काकांना वाटलं. काका गर्दीतून वाट काढीत काढीत त्या आजींच्या मागे आले. आणि गर्दीमुळे पुन्हा तिथेच थांबले. थोड्या अंतरावर सुरक्षा रक्षक गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. टेबलापलीकडील ऑफिसरने काकांकडे मान वळवून आजींना विचारले, " हे तुमच्याच बरोबर आहेत का? " आजींना कमी ऐकू येत असावं. त्यामुळे आजी फक्त हसल्या. तो ऑफिसरही काकांकडे बघून हसला. काकांची एकदम ट्यूब पेटली. म्हातारीच्या मागे लॉकर्स रूममध्ये जाण्याची संधी त्यांना दिसली. ते पटकन तिच्या मागे गेले. ऑफिसरने आजींना लॉकर उघडून दिला. काका हळूच आत शिरले. ऑफिसर पुन्हा जागेवर येऊन बसला. काकांनी ती रुमही पाहून घेतली. थोडं पुढे गेल्यावर त्यांना दिव्याच्या प्रकाशात भिंतीवर ओल मारलेली दिसली. त्यांनी ओल मारलेल्या भिंतीची दिशा लक्षात ठेवली. आत मध्ये वेगवेगळ्या आकाराचे दीडदोनशे तरी लॉकर्स असावेत, असं त्यांना वाटलं. आजीबाई जमिनीवर बसून लॉकरमध्ये वस्तू ठेवीत होत्या. काकांना त्याचं महत्त्व नसल्याने ते हळूच तेथून बाहेर पडले.

जाताना त्यांना मॅनेजरच्या केबिनवरून जावे लागल्याने फोनवरील त्याचे बोलणे ऐकू आले. तो थोडा उत्तेजित स्वरात बोलत होता. "...... अहो साहेब, हे काम पंधरा वीस दिवस तरी चालेल. शिवाय खर्चही बराच येणार आहे..... हो हो, माहीत आहे मला किमान सहा महिने तरी इथेच काढावे लागतील. पण ही दुरुस्ती फार किचकट आहे. एकदा करायला घेतलं की सगळीकडचं पाहावं लागेल. आणि वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून ते करावे लागेल....... हो हो लोकल माणूसच पाहतोय, काही कोटेशन्सही मागवली आहेत. पण त्यांची बजेट्स फार महागडी आहेत, असं तुम्हीच तर म्हणालात...... बरोबर, म्हणून तर लोकल माणूस पाहतोय. पण कोटियन साहेब तो विश्वासू माणूस मिळाला पाहिजे ना...... " संभाषण पुढे चालूच राहिलं. म्हणजे ह्यांना लीकेजचा प्रॉब्लेम आहे तर. दादाचं म्हणणं बरोबर आहे. आता त्या म्हातारीच्या घरात कसं घुसणार? ते बँकेतून बाहेर पडले. ऊन चांगलंच तापलं होतं. पाऊस नुसताच हुलकावण्या देत होता. कालच आलेल्या पावसाच्या शिडकाव्याने नुसतं चिवचिवत होतं. घाम पुशीत ते थोडावेळ फुटपाथवर उभे राहिले. मग वळून परत बिल्डींगमध्ये शिरले. खरंतर त्यांना त्या म्हातारीचा फ्लॅट आतून बघायचा होता. म्हणून ते साधना घरी नसणार हे माहीत असूनही तिच्या फ्लॅटकडे गेले. उगाच कुणाला संशय नको.

मग ते पुन्हा पहिल्या मजल्यावरच्या म्हातारीच्या फ्लॅटकडे वळले. इकडे तिकडे पाहून त्यांनी बेल वाजवली. आतून थरथरणारा आवाज आला, "आले, आले! ".... काही सेकंदात दार उघडलं. दरवाज्यात ताराबाई सरडे उभ्या होत्या. पाठीत वाकलेल्या ताराबाईंचा खप्पड चेहरा, हालणार तोंडाचं बोळकं आणि खोल गेलेले निस्तेज डोळे, डोक्यावरचं चंदेरी विरळ होत गेलेलं छप्पर, त्यांचं वय ऐंशीच्या घरात असल्याच दाखवीत होतं. बोळकं हालवीत आजींनी विचारलं, " कोऽऽण आहे? काय पाहिजे? " काका म्हणाले, " पवार इथेच राहतात ना? " आजींना कमी ऐकू येत असावं. त्यांना काही उमजत नसल्याचं त्यांना दिसलं. मग त्यांनी मोठ्याने विचारलं, " पवार इथेच राहतात ना? "म्हातारीला अंदाज येईपर्यंत त्यांनी आत नजर टाकली. प्रशस्त हॉलमध्ये जुनाट फर्निचर आणि भिंतीवर एक दोन जुनाट फोटो टांगलेले होते. एका लहान मुलाचा फोटो असावा. मूळचा काळ्या पांढऱ्या रंगातला फोटो आता बराचसा काळा झाला होता. दुसरा फोटो एका माणसाचा असावा, पण ओळखता येत नव्हता. बहुतेक लाद्या सैल झालेल्या होत्या. खरंतर बिल्डिंगला पंधराएक वर्षच झाली होती. पण बांधकाम अगदी स्वस्तातलं असावं अस वाटत होतं. हा बँकिंग हॉलच्या वरचा भाग होता. आत फार अंधार होता. कदाचित एकच खिडकी उघडी असल्याने असेल. भिंतींना

काही ठिकाणी तडे गेलेले होते. ठिकठिकाणी ओल मारल्याने रंग भुसभुसल्यासारखा बाहेर आला होता. आत मध्येही खोली असावी. पण दिसत नव्हतं. आजींची ट्यूब आता पेटली असावी. त्या म्हणाल्या, " दारावरचं नाव वाचता येत नाही का? इथे कोणी पवार राहत नाही. ". असं म्हणून त्या दार लावू लागल्या. तेवढ्यात काका म्हणाले, " आजी जरा पाणी देता का? " तशी आजी वैतागून म्हणाल्या, " पाणी बिणी काही नाही, पाणी बंद आहे. ही सगळी नाटकं समजतात मला..... " असं म्हणून त्यांनी जोरात दरवाजा लावून घेतला. म्हातारी हुशार होती. मग जास्त वेळ न दवडता ते खाली आले. दुपारचे बारा वाजले. त्यांनी येणारी बस पकडली आणि ते थोड्याच वेळात ऑफिसला गेले.

शिरल्याबरोबर त्यांना प्रथमच कटील दिसला. कटीलच्या तोंडावर निष्कारण झालेला धंद्यातला भागीदार अशा अर्थाचे भाव होते. त्याला ते आवडत नव्हते. काकांना हे नवीन नव्हते. ते काहीच बोलले नाहीत. त्यांना दादाने आत बोलावले.

सगळी माहिती दिल्यावर त्याने त्यांना बाहेर बसायला सांगून कटीलला आत बोलावले. बराच वेळ ते दोघे आत खलबतं करीत बसले होते, आजकाल निरोप कमी येत असत. असं असूनही आपल्याला का ठेवलंय त्यांना कळत नव्हतं. कशीतरी संध्याकाळ होत आली. काकांना आत बोलावून दादा म्हणाला, " अभी काम के लिये मै बोलूंगा जभी बैंकमे जानेका, अब बाकीका हम देख लेंगे. "मग ते घरी निघाले. त्यांचा या नोकरीतला इंटरेस्ट जात होता. आता कुठे आपलं आयुष्य चांगलं मार्गी लागत होतं. रमेशला कॅनडाला जायला मिळणार होतं. कदाचित आपल्या नोकरीची आता गरज नाही असही तो म्हणेल. फार कशाला नीता पण आताशा फार निवळली होती. तीही त्यांच्या नोकरीची अपेक्षा करणार नाही असं त्यांना वाटू लागलं. म्हणजे आयुष्य सरळ चालू शकेल तर. मधला काळा कालखंड सगळेच विसरतील....... '

एका फॉरिनला जाणाऱ्या मुलाचा बाप' या कल्पनेनेच ते मोहरून निघाले. त्यांना एकदम हलकं वाटू लागलं. मनाच्या प्रयोगशाळेत एक नवीन प्रयोग चालू झाला..... फार थोडावेळ टिकणारा. आजपर्यंतचं आपलं आयुष्य कसंतरी गेलं. पण मुलाचं आयुष्य सावरलं गेलं. रोहिणी किती खूश झाली असती. बिच्चारी! जिवंतपणी तिला चांगल्या परिस्थितीचं सूख तिला मिळालच नाही. त्यांचं मन परत भरून आलं. जणू काही कल्पनेतलं सगळं आत्ताच घडलं होतं. पण नियतीला हे मंजूर आहे का? असा सामान्य माणूस विचार करू लागला तर तो सामान्य कसा राहील? काका उत्साहाच्या भरात घरी आले. नीताची आता त्यांना भीती वाटेनाशी झाली. ते घरात शिरले आणि पावसाने जी झोंड उठवली, की काही विचारूच नका. तो जणू काकांच्या मनातला प्रयोग पूर्ण होण्याची वाट बघत होता. नंतरचे पाच सहा दिवस असेच गेले. त्यातल्याच एका सकाळी अकरा साडेअकराच्या सुमारास ताराबाई सरडेंच्या घराची बेल दोन तीन वेळा सलग वाजली......

आजींनी " आले... आले.. जरा धीर नाही.... " असं म्हणत दार उघडले. दाराबाहेर तीन चार माणसं उभी होती. त्यांच्याकडे तोंड करून उभा असलेला माणूस पाहून कितीही धाडस असलेला माणूसही घाबरलाच असता. तुटक्या भुवईच आणि काळसर चेहऱ्यावर देवीचे वण असलेल्या माणसाने, त्याला जमेल तेवढी अदब आवाजात आणीत म्हंटले, " आजी खालच्या बँकेने पाठवलंय. बाथरूम मधली गळती काढायचीय..... " त्याच्यामागे उभे असलेले तिघे जण चेहरे दिसू नयेत म्हणून एकमेकांकडे पाहत होते. त्यातल्या एकाच्या हातात प्लंबिंगसाठी लागणारी हत्यारे होती. तर दुसऱ्याच्या हातात एक रिकामी मोठ्या आकाराची गुंडाळलेली गोणपाटाची पिशवी होती. हनुवटीला झोले देणाऱ्या आजींना अचानक असुरक्षित वाटू लागलं. त्या स्वतःला सावरीत म्हणाल्या, " अरे बाबा, इथे काही दुरुस्ती करायची नाही.. जा तुम्ही, चला..... ". आणि आजी दार लावू लागल्या.

पुढेच असणाऱ्या माणसाने आपला एक पाय हळूच दरवाजाच्या आत सरकवला. तो आजींना दिसला नाही. आणि दार लागलं नाही. त्याने हलकेच धक्का दिला. आजी आतमध्ये धडपडल्या. मग उरलेले तिघे आत शिरले. आत शिरल्या शिरल्या धक्का देणाऱ्याने आजींना दम दिला, " ए म्हातारे, शिद्दा बैठनेका हां! आवाज एकदम बं.... द "..... आजी घाबरल्या. थरथरत त्या तिथल्याच जुनाट सोफ्यावर बसल्या. बाकी तिघे आतल्या खोलीत शिरले. आत डाव्या बाजूला एक खोली होती. अकडा बाहेरच्या हॉलमध्येच थांबला. आजींवर लक्ष ठेवणं जरुरीच होतं. त्याने समजावणीच्या सुरात त्यांना सांगितले. "आजी, माझं ऐक. जास्त गडबड करू नकोस. आमचं काम झालं की आम्ही जाऊ. पण आमच्याशी नीट वाग. नाहीतर ढगात पाठवीन. " आतले तिघे हातोडीच्या दांड्याने ठोकून लाद्यांचा अंदाज घेत होते. दोन खोल्यांच्या मधल्या भागात असलेल्या संडास बाथरूम मध्ये ते गेले. तिथल्या लाद्या अर्घ्या फुटलेल्या आणि उरलेल्या उचकटून सैल झालेल्या दिसत होत्या. इथून नक्कीच खाली गळत असणार. काकांनी सांगितलेल्या दिशेलाही त्यांनी नीट पाहिलं. तसं त्यांना तिथे काही दिसलं नाही. बहुतेक वरचा सगळा भाग पोकळ झाला असावा. त्या तिघांनी काही ठिकाणी काही खाणाखुणा केल्या. म्हणजे जिथे जास्त पोकळ आहे तिथे. त्यांचं निरीक्षण पुरं झालं होतं. मग ते तिघे बाहेर आले. आजी भेदरून बसलेल्या दिसल्या.

तिघांनी विड्या काढून प्यायला सुरुवात केली. खालच्या रस्त्यावर ट्राफिकला नुसता ऊत आला होता. जवळजवळ बारा सव्वाबारा वाजत होते. अजून अर्धा तास असाच काढायला हवा होता. अचानक बाहेर मुलांचा आवाज येऊ लागला. अकड्याने दरवाजा किलकिला करून बाहेर पाहिले. शाळेत जाणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या आईबापांची गडबड दिसत होती. त्याने दरवाजा लावून घेतला संधी पाहूनच बाहेर जावं लागणार होतं. अर्ध्या पाऊणतासात बाहेर पुन्हा शांतता होईल असा त्याचा अंदाज होता. पण त्याहीपेक्षा लवकरच शांतता झाली. आता पाऊण वाजत होता. आजींना बसून बराच वेळ झाला होता. फार वेळ म्हातारीला बसवून चालणार नव्हतं. तिने काही खाल्लं होतं की नाही कुणास ठाऊक. नाटकाचा पुढचा भाग चालू करायचा होता. मग तो आजींना म्हणाला, " आजी तुम्ही दहा पंधरा दिवसांसाठी भावाकडे जात आहात असं शेजाऱ्याला सांगा. आणि त्याला घराकडे लक्ष ठेवण्यासाठीही सांगा. कोणत्याही प्रकारचा इशारा केलात तर याद राखा. तसंच पळून जायचाही प्रयत्न करू नका. तुम्हाला गॅलरीतून खाली फेकून देईन. "...... आजींच्या कपाळावर घाम दिसला. तशी तो म्हणाला, " तुम्ही आमच्याशी नीट वागलात तर तुम्हाला काही न करता आम्ही निघून जाऊ. "..... तो बाकीच्या तिघांकडे वळून म्हणाला, " अरे ए, दरिंदर बन करो ये बिडी पीना. " त्याने त्यातल्या त्यात सभ्य दिसणाऱ्या झमझमला जिन्यावर दबा धरून बसायला सांगितलं. झमझम बाहेर गेल्यावर तो आजींना म्हणाला, " आजी चला सांगितलंय तसं करा. " बाहेर जिन्याच्या वरच्या पायरीवरून झमझम रस्त्याकडे पाहत होता. येणारा जाणारा आत्ता तरी कोणी दिसत नव्हता. सगळ्या फ्लॅटवाल्यांचे दरवाजे बंद होते. रस्त्यावर भन्नाट ट्राफिक होता. त्याचा आवाज एवढा येत होता की त्यात फारसं काही ऐकू येणं कठीण होतं.

लटलटणारे पाय सावरीत आजी दाराबाहेर पडल्या. अकडा आतल्या बाजूने त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. आजींनी शेजाऱ्याची बेल वाजवली. एका स्त्रीने दार उघडले. आजी थरथरत म्हणाल्या, " अगं सुशे, मी जरा माझ्या भावाकडे दहाबारा दिवसांसाठी जात्ये तेवढं घराकडे लक्ष ठेव हो. " त्यावर ती स्त्री म्हणाली, " पण आजी तुम्हाला भाऊ असल्याचं कधी म्हणाल्या नाहीत ते? आणि एवढ्या घाबरल्यासारख्या काय करताय? घ्यायला कोण येणार आहे?... काही होतंय का तुम्हाला? ".... नसत्या पंचायती, अकड्याच्या मनात आलं. त्याला अशा बोलण्याची अपेक्षा नव्हती. आता म्हातारीवर अवलंबून होतं. आजींनी  हळूच दरवाजाच्या फटीतून अकड्याच्या घाबरवणाऱ्या डोळ्यांकडे पाहिलं. आणि त्या सावरून कसनुसं हसत म्हणाल्या, " नाही गं बाई, काही नाही. इतके वर्षांनी भावाने बोलवलंय, म्हणून जरा भरून आलं. येईल थोड्या वेळात तो. "... ती स्त्री ठीक आहे म्हणाली. आणि तिने दार लावून घेतलं. अकडा आता अर्धा दरवाजाच्या आत अर्धा बाहेर आला. पण त्याचं लक्ष थोडंसं सरकल्याचं आजींनी टिपलं. म्हणून आजींनी शेवटचा प्रयत्न करून पाहिला. दरवाज्याकडे वळल्याचं दाखवून त्या पटकन वळून धावत जिन्याकडे वळल्या. जिन्यावरून रस्ता पाहण्यात गुंग झालेल्या झमझमला कळे पर्यंत काही सेकंद गेले.

तेवढ्यात आजी तीन चार पायऱ्या कशातरी उतरून दोन जिन्यांच्या मधल्या सपाट भागात धावण्यासाठी स्थिरावल्या. पण वयाने साथ दिली नाही. भीतीने मात्र पाय अडखळले. कोणताही मोठा आवाज करणं परवडणारं नसल्याने अकडा चपळाईने जिन्यावर धावला. आता झमझमला आपल्या कामाची आठवण झाली. तोही एकाच वेळी पुढे आल्याने दोघांना एकमेकांचा धक्का लागला. तो वेळ साधून आजी खालच्या जिन्यावरच्या दोन पायऱ्या आणखीन उतरून गेल्या. पण चपळाईने अकड्याने त्यांचं बकोट पकडलं. आणि हलकंड्या म्हातारीच्या तोंडावर हात ठेवून तिला तशीच उचलली. एवढ्या झटापटीत कोणीच आवाज केला. नाही. पण त्या दोघांनाही बरंच अंतर धावल्यासारखा दम लागला. काळजी घेत त्यांनी आजींना उचलून घरात आणले. पॅसेजमध्ये जास्त मोठ्याने बोलून चालणार नव्हते. दरवाजा लावल्याबरोबर आजी म्हणाल्या, " अरे मेल्यांनो कुठे फेडाल हे पाप? म्हाताऱ्या माणसाला त्रास देता. आया बहिणी नाहीत का तुम्हाला? " मग अकड्याने  इतरांच्या मदतीने आजींच्या तोंडात बोळा कोंबला, आणि रुमाल बांधला. आजी सुटकेसाठी धडपडत होत्या. त्याने झमझमच्या एक कानफटातून मारून त्याला विचारले, " भोसडिके, तेरेको क्या पिक्चर देखनेको खडा किया था क्या?. पूरा प्लान चौपट करेगा क्या?...... सणसणीत शिवी देऊन त्याने संभाषण थांबवले. मग पुन्हा एकदा आजींचा गळा धरून म्हणाला, " तेरेको क्या लगा, हम लोग चूतिया है? मरना चाहती है तू? "

मग त्या सगळ्यांनी आतल्या खोल्या परत तपासल्या. बँकेचा फ्लोअर प्लान काकांनी सांगितल्याप्रमाणे काढलेला होता. त्यावरून सध्यातरी असं दिसत होतं की आजींचं संडास बाथरुम मागच्या दरवाज्यातून जो गोल जीना जातो त्या भागावर येत होते. अर्थातच अजूनही त्यांना त्याची खात्री करून घ्यायची होती. घरातल्या सगळ्या किल्ल्या त्यांनी शोधून ताब्यात घेतल्या. त्यात कपाटांच्या किल्ल्या धरून मुख्य दरवाजाच्याही ज्यादा किल्ल्या होत्या. मुख्य दरवाजाच्या ज्यादा तीन किल्ल्या पाहून अकड्याला आश्चर्य वाटलं. आजी एकट्याच राहत होत्या तरी एवढ्या किल्ल्या आहेत, याचा अर्थ आजींकडे कोणीतरी राह्यलाही येत असावं. पण दादाला त्याच्या सहकाऱ्यांनी जास्त डोकं चालवलेलं आवडत नाही हे त्याला माहीत असल्याने त्याने तो विचार सोडून दिला. मग सर्वांनी मिळून आजींचं मुटकुळं त्यांच्या विरोधाची पर्वा न करता आणलेल्या गोणपाटाच्य पिशवीत  कोंबलं. पिशवी त्याच कामासाठी वापरली जाई. पिशवीला योग्य ठिकाणी भोके होती. आजींचा देह फार लहान असल्याने पिशवी जास्त मोठी वाटत होती. अकड्याने बाहेरचा दरवाजा अर्धवट उघडून पॅसेजमध्ये नजर टाकली. तो निर्मनुष्य होता. आता काम लवकर केले पाहिजे. म्हणून त्याने ड्रायव्हरला फोन लावून बिल्डिंगच्या प्रवेशदाराजवळील एका झाडाखाली गाडी आणण्यास सांगितले. दहा पंधरा मिनिटात एक जाडजूड काळी स्कॉर्पिओ बिल्डिंगजवळील झाडाखाली येऊन उभी राहिली. आधी दोघे मांजराच्या पावलाने बाहेर पडले. मग ज्याच्याकडे मुटकुळं होतं तो आणि सर्वात शेवटी दरवाजा नीट लावून अकडा बाहेर आला.

ते खालच्या जिन्यावर पोचले. आणि थांबले. बाहेर बँकेचा वॉचमन उभा होता. त्यांच्या सुदैवाने तो काही कारणाने आत गेला. तेवढ्यात झमझम अतिशय सहजतेने गाडीजवळ पोचला. त्याने दोन दरवाजे आणि मागचा दरवाज्या उघडा ठेवला. त्याने हाताने दुसऱ्याला इशारा केला. मग मुटकुळं वाल्याला इशारा केला. अजून तरी वॉचमन बाहेर आला नव्हता. मुटकुळंवाला कचऱ्याचं पोतं घेऊन जातात अशा आविर्भावात ते घेऊन गाडीच्या मागच्या दरवाज्यातून आत शिरला. मग दुसरे दोघे हळूच पण सहजतेने गाडीत जाऊन बसले. ट्राफिक चालूच होता. ऊन रणरणत होतं. कोणी पाहिलं नसावं आणि जरी पाहिलं, तरी कोणी हटकलं नाही. मुंबईत कोणी कोणाला संशय आला तरी विचारीत नाहीत, याचा फायदा त्यांना झाला. बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरून कोणी पाह्यले असले तरी त्याचा विचार अकड्याच्या पार्टीने केला नाही. गाडी सुरू झाली. आणि निघाली. गाडीवरच्या नंबर प्लेटस अर्थातच खोट्या होत्या. अर्ध्या तासात ती गाडी कटीलच्या ऑफिसजवळ पोचली. म्हातारीचं मुटकुळं घेऊन ते चौघे आत शिरले. तेव्हा तीन वाजत होते. आजींना घेऊन ते थेट केबिन मध्ये शिरले. काकांनी पाहिलं. त्यांना संशय आला. पण त्यांनी काहीही विचारलं नाही.

(क्र म शः )