कामथे काका (भाग पाचवा)

"तमे कोण? तो म्हातारा म्हणाला. काकांनी नाव सांगितलं, ते आत शिरले. थोडा अंधारलेला हॉल ज्याच्या दुसऱ्या टोकाला एक केबिन होती. हॉल मध्ये जुनं फर्निचर होतं. भिंतींलगत काचेची लाकडी कपाट आणि दोन तीन फाईलिंग कॅबिनेट्स होती. चार पाच जुन्या पद्धतीची टेबलं आणि खुर्च्या होत्या. सध्या मात्र सर्वच टेबलं रिकामी होती. एक बाई तेवढ्या एका टेबलाशी बसून कसलेसे पेपर्स बघत होत्या. आत शिरल्या शिरल्या एका भिंतीजवळ एक खड्डा पडलेला सोफा होता जणू काही त्यात केव्हातरी हत्ती बसला होता. त्यावर टेकत काका बसले. काम करणारी बाई काकांना पाहून अहेतुक हसली. दार उघडणाऱ्या म्हाताऱ्याने केबिनवर थाप मारून आत व्हिजिटर आल्याची वर्दी दिली. पाच दहा मिनिटं बसल्यावर केबिनवरील बेल वाजली. काकांना आत बोलावलं होतं. काका उठले. केबिन वर नॉक करून ते दार उघडून आत गेले. त्यांच्या मनात आलं. जवळ जवळ बारा वर्षांनी ते कोणत्यातरी केबिनमध्ये पाऊल ठेवीत होते. त्यांचा ऑफिसशी संबंध तेव्हापासूनच संपला होता. त्यांचं निलंबन बारा वर्षांपूर्वी झालेलं होतं. तुरुंगातच त्यांना त्यांची बडतर्फीची ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे आता "त्या " ऑफिसशी संबंध येणार नव्हता. त्यांना आठवत होत्या फक्त "कोर्टाच्या चकरा आणि चार वर्षांचा शिक्षेचा कालखंड...... काकांनी केबिन मध्ये शिरताच " टेबलापलीकडे बसलेल्या दोघांना "गुंड मॉर्निंग " म्हटला.

एका मोठ्या लंबवर्तुळाकार टेबलामागे एक चाळिशीच्या आसपास असलेला एक तरुण निळ्या रंगाचा सूट घालून बसलेला होता. उभट गोरा चेहरा, जिवणी एका कोपऱ्याला कायम खवचट हसण्याच्या बेतात असलेली. पिंगट केस आणि चंचल डोळे. हडकुळे नाक, ज्याच्या शेंड्याला कोणीतरी चांगलाच चिमटा घेतला असावा असा चिंबलेला. टेबलावर एक नावाची त्रिकोणी आकाराची पाटी होती.; त्यावर सोनेरी अक्षरात "ऍडव्होकेट, नरेश गडा " असं लिहिलेलं होतं. काकांच्या गुड मॉर्निंगला प्रतिसाद न देता आणि बसायला न सांगता तो म्हणाला, " मि. कामथे?.... " काका "येस..... " म्हणाले आणि थांबले. सर म्हणावं की नाही, या बाबत त्यांचा निश्चय झाला नाही. अजून आपण ह्याच्याकडे कामाला सुरुवात केलेली नाही. असं त्यांच्या मनात आलं. आणि त्यांना कोणालाही "येस सर" असं म्हणायला आवडत नसे. नरेश गडाच्या बाजूच्या खुर्चीवर बसलेला माणूस काकांना थोडा रफ लुक देऊन म्हणाला, " तुमी रमेशभाईचे पिताजी ना? " त्याच्या तोंडावर देवीचे वण होते. काका हो म्हणाले. बसायला न सांगितल्याने चुळबुळं करीत काका अवघडलेल्या स्थितीत उभे होते. मग नरेश भाई म्हणाला, " सुटून कवा आला तुमी? "

" पंधरा दिवस झाले " ते म्हणाले. त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यायची इच्छा नव्हती. बाजूच्या माणसाच्या तोंडावर हात होता. तो कुत्सित हसत असावा. असा काकांना संशय आला. मध्येच नरेशभाईनी प्रश्न फेकला " घरी बसून काय करतात तुमी? "..... " काही नाही.... " इति काका. अजून मुद्द्याचा बोलणं होत नव्हतं.... " काही नाही? ग्रेट! खवचट हसत नरेश म्हणाला, "क्वालिफिकेशन काय? "

"बी कॉम " ते म्हणाले. मग त्या दोघांमध्ये काही कुजबूज झाली. आणि नरेश भाई म्हणाला, " हे बगा, अमी तुमच्यासारक्या मानसाला कामावर ठेवते नाय, पण रमेशभाई माजा क्लासमेट, म्हनून ठेवून घेते, काय? तुमाला जे सांगेल ते काम करावा लागेल. कदी ओफिसबोयचा बी काम करावा लागेल तर कदी बुक आनी ब्रिफ घेऊन कोर्टामध्ये बी जावा लागेल. मंजूर है तर बगा. तुमी कोमपुटर चालवते काय? ".... काका नाही म्हणाले. "हे तो चांगला नाय, पण शिकून घ्या. मी तुमाला पाच हजार रुपिया देनार. मेहंगाई वगैरा सब उसीमे आ गया. पगार एटलोच रहेगा. बरसनंतर वाडेल नाय. जमत असेल तर उदिया पासून कामावर या. " काका ठीक आहे म्हणाले.

" तुमचा टाइम नऊ वाजताचा हाय, बाकी स्टाफ दहाला येते. ते भायेर काका आनी साधना बेन हाय नि ते तुमाला तुमचा काम बराबर बोलेल...... मग थोडं थांबून परत म्हणाला काय हाय ना गुनहगारला कोनी ठेवते नाय, ह्ये ध्यानमदी ठेवा. जरा पन चूक चालेल नाय. घर जायचा टाइम इथे नाय, तुमी साधना बेनला विचारा. आमी सांगितला का जायचा. " काकांनी मान डोलवली.

" ठीक हाये, यू मे गो नाउ. "....... काका वळले. केबिन बाहेर आले. त्यांनी प्रथम घाम पुसला. ते बसणार एवढ्यात त्यांना साधना बेनने बोलावले. ती खरोखरीच स्वभावाने चांगली होती. तिने प्रथम काकांना बसायला सांगितले. तिच्या समोरच्या खुर्चीवर काका बसले. हॉल त्यांना अजूनही अंधारलेला वाटला. साधना बेननी त्यांच्याकरता, ते नको नको म्हणत असताना सुद्धा, चहा आणि बिस्किटं मागवली. ती म्हणाली, " आत काहीही होऊ द्या, पण इथे अगदी मोकळेपणानं वागा. मला माहीत आहे सगळं..... ". तिनी असं म्हटल्यावर हिला आपण सजा भोगून आलोय हे माहीत आहे की आत काय झालं हे माहीत आहे?, असं वाटून काकांना एक प्रकारची भीती वाटली. पण त्यांनी विचारलं नाही. चहा बिस्किटं आली. काकांनी चहा घेतला, पण बिस्किट मात्र एखाद दुसरच घेतलं. साधना बेन, एक सुटलेल्या अंगलटीची पंचेचाळिशी ओलांडलेली स्त्री होती. पण जेव्हा होता तेव्हा तिचा बांधा चांगला असावा. ती थोडी उंच होती. गोलसर चेहरा, डोळ्यांवर आकर्षक फ्रेमचा चष्मा आणि थोडी घट्ट नेसलेली साडी, त्यामुळे तिचे साधेपणातलं सौंदर्य उठून दिसत होतं. तिच्या निमगोऱ्या रंगाला आज तिने नेसलेली हलक्या अंजिरी रंगाची साडी खुलून दिसत होती. कोरलेल्या भुवयांखालचे स्थिर आणि थंड डोळे ती विचारी असल्याचे दाखवीत होते. ती तिच्या कामात वाकबगार असावी. माणुसकी आणि दया हे गूणही तिच्यात असावेत असे कुणालाही सहज वाटले असते. असो. काकांना तिचा स्वभाव थोडासा रोहिणीच्या स्वभावाशी मिळता जुळता वाटला. गंमत म्हणजे रोहिणी लावीत असलेल्या सेंटचा वासही त्यांना आला. पण नक्की समजेना., की मन फसवीत होतं, कोण जाणे. काही असो, काकांना साधना बेन ठीक वाटली. त्यांनी तिचा निरोप घेतला. ते खोलीच्या बाहेर पडले. आता ती गुजराथी बाई नव्हती. पण इतर बायका आणि खेळणारी मुलं वाढली होती. शाळा सुटली असावी. म्हणून ही गर्दी होती. काका भराभर जिने उतरीत खाली आले. खालच्या मुस्लिम हॉटेल मधून मोठ्या आवाजात "ये दुनिया, ये मैफल, मेरे कामकी नही".... ̱हे गाणं लागलं होतं. थोड्याच वेळापुरते का होईना ते फुटपाथवर रेंगाळले. उद्या सकाळी नऊ वाजता इथे यायचं. का यायचं? असं वाटू लागलं. आता त्यांना तो नरेश गडा अधिकच बदतमीज आणि नालायक वाटू लागला. आपल्याला त्याने बसायलाही दिलं नाही आणि वागणूकही विचित्र दिली. त्यांचा अस्वस्थपणा वाढू लागला. एक प्रकारच्या अनिच्छेचं वातावरण मनात तयार झालं. ज्यातून त्यांना सुटका दिसेना. त्याच मनस्थितीत त्यांनी रस्ता ओलांडला. रमेशला सांगावं का, की वेळ बदलून घे, म्हणून. मग त्यांनी विचार केला, ठीक आहे, अजून उद्या उजाडायचाय. जाईपर्यंत नाही म्हणता येईल. फार काय इथे येऊनही आपण नाही म्हणून सांगू शकतो. एवढ्या तात्पुरत्या विचाराने त्यांना जरा सुटल्यासारखं वाटलं.

ते एका उडप्याच्या हॉटेलात शिरले. त्यांनी त्यांना आवडणारे पदार्थ मागवले. आणि थंड मिरिंडा मागवला. आता कुठे त्यांना बरं वाटलं. जर आपण हे काम स्वीकारलं नाही तर आपण काय करणार? आता कामाशिवाय घरी बसायचं म्हणजे कठीण आहे. मुळात म्हणजे "रोहिणी नाही ते घर कसलं?. मग त्यांना एकदम आठवण झाली. सुटकेच्या आदल्या रात्री त्याम्ना जेलर साहेबांनी बोलावलं होतं आणि म्हणाले होते, " तुला मी काम मिळवून देऊ शकतो. माझी एक दोन ठिकाणी ओळख आहे. मी असं कोणालाच आजपर्यंत सांगितलं नाही, पण तू वेगळा वाटलास, म्हणून सांगितलं. " म्हणजे अजूनही आपल्याला आशा आहे, असं मनात येऊन ते सुखावले. पैसे देण्यासाठी त्यांनी खिशात हात घातला आणि बाहेर काढला तेव्हा नोटाबरोबर एक जाडसर कार्ड पण बाहेर आलं. त्यांनी पैसे बिलाबरोबर ठेवले आणि ते हातातलं कार्ड सरळ करून पाहू लागले...... ते होतं. किशा दादांनी दिलेलं कार्ड. ज्या दिवशी जेलर साहेबांनी बोलावलं त्याच दिवशी रात्री त्याला किशा दादा येऊन भेटला. म्हणाला, " ये देख, काकाकी अवलाद, ये कार्ड ले. ये अड्रेस पर जा. अपना आदमी है. रख लेगा तेरेकू. क्या समझा?, ये रिश्तेदारी वगैरे भूल जा. सब साले हरामी होते है. एक बार इधरका डिग्री मिल गया ना तो कोई खडा नही करता. मै बोल के रखेगा. तू कभीभी जा, तेरेकू वो रख लेगा. " काकांनी कार्ड पुन्हा पुन्हा पाह्यलं. त्यावर लिहिलं होतं, ऍडव्होकेट "सूर्य नारायण कटिल. ' पत्ता होता, लॅमिंग्टन रोडचा. त्यांनी ते कार्ड परत खिशात ठेवलं. ते हॉटेल बाहेर पडले. मग घाईघाईने त्यांनी बस पकडली. ते यांत्रिक पणे घराकडे जाणाऱ्या गल्लीत शिरले.

(क्र म शः)