कामथे काका (भाग सोळावा)

बायबलचं काय काम असावं....? त्यांना कळेना साधनाचा नवरा ख्रिश्चन होता का?.... काकांनी कधी गुजराथी माणसं ख्रिश्चन असल्याचं पाहिलं नव्हतं. गुजराथी मुसलमान त्यांनी पाहिले होते........ त्यांनी तो विचार तेवढ्यावरच सोडला. त्यांनी सहज म्हणून आतलं एक मोठं पुस्तक ओढलं. ते होतं. " खिस्तायन ". लेखक होते रेव्ह. नारायण वामन टिळक. त्यांचा संशय बळावत चालला. ख्रिस्तायन हातात धरून त्यांनी वाकून पाहिलं, तेव्हा आत एक तळ हाताएवढी फोटो फ्रेम दिसली. ती त्यांनी बाहेर काढली. त्यात एका बाजूला येशूचा वरदहस्त असलेला फोटो होता, तर दुसऱ्या बाजूला मेरी चा फोटो होता. तेवढ्यात आतून सोनाली आली आणि म्हणाली, " काका, जेवायला चला! ", ती लाजून पळाली. त्यांच्या लक्षात आलं, आता सोनालीचा संकोच आस्ते आस्ते दूर होत होता. त्यांनी हातातलं ख्रिस्तायन आणि फोटो फ्रेम कपाटात ठेवून कपाट बंद केलं. ते आतल्या खोलीतून स्वयंपाकघराच्या दाराशी आले आणि आत जावं का न जावं असा विचार करीत उभे राहिले. स्वैपाक घर चांगलंच मोठं होतं. आजकालच्या नवीन फ्लॅटमध्ये असतं तशी केवळ भांडी उकडण्याची ती जागा नव्हती. खिडकी समोरील भिंती ला लागून डायनिंग टेबल होतं. टेबलावर सगळेच पदार्थ नीटपणे मांडलेले दिसत होते. मध्ये चमच्यांचा स्टँड होता. भोवती चार खुर्च्या लावलेल्या होत्या. जेवणारा पाहुणा फक्त मी एकटाच आहे आणि हिने तर एवढे पदार्थ केलेत की जणू काही चार माणसं जेवणार आहेत, असा विचार त्यांच्या मनात आला. काही असो आत खाद्यपदार्थांचा सुग्रास वास येत होता. साधनाने वळून पाहिलं त्यांना तसेच उभे पाहून तोंडावरचा घाम ऍप्रनला पुशीत ती म्हणाली, " या ना आत, बसा. मोकळी हवा असली तरी गॅस मुळे गरम होतच. " काका बसल्यावर तिने वाढायला सुरुवात केली. काका म्हणाले, " तूही बस आमच्या बरोबर. एकट्याने जेवायला मला आवडत नाही. " त्यावर ती चेंज करून येते असं म्हणून आतल्या खोलीत गेली.

दहा पंधरा मिनिटात तिने घरात वापरण्याची साडी नेसली. माफक मेक अप करून ती बाहेर आली. आता तर ती काकांना जास्तच आकर्षक वाटू लागली. ते ओळखून ती म्हणाली, " साडी फारशी चांगली नाही, पण मला घरी नेसायला साध्याच साड्या आवडतात. समोरच्या खुर्चीत ती बसली. जवळ सोना बसली. जेवायला सुरुवात झाली. भरल्या ताटाला नमस्कार करीत काकांनी जेवायला सुरुवात केली. पहिल्याच घासाला त्यांना रोहिणीच्या हातच्या जेवणाची आठवण झाली. त्याला आता पाच सहा वर्ष झाली होती. मग त्यांना गेल्या पाच सहा वर्षात जेलमध्ये घेतलेल्या जेवणांची आठवण झाली. ते घास अत्यंत बेचव आणि न आवडले तरी तसेच गिळावे लागलेले होते. त्यांना त्यातल्या घासा घासाला लागणाऱ्या अन्नातल्या खड्यांची आणि मातीची आठवण झाली. अर्थातच त्याची त्यांनी सवय करून घेतली होती. न करून सांगणार होते कोणाला? आणि आजचं हे सुग्रास अन्न! किती फरक आहे. अन्न तारी हेच खरं. चांगल्या परिस्थितीत माणूस जास्तीत जास्त चोखंदळ पणा करतो. पण पर्याय नसताना, जे मिळेल ते "पूर्ण ब्रह्म " ठरतं, हेच खरं. त्यांच्या मनात आलं. जेल मधल्या अन्नाने पण त्यांना जगवलं होतं. ते जेवताना थोडावेळ थांबले.... विचारांनी थांबावं म्हणून. त्यांना थांबलेले पाहून तिने विचारले, " भाजीत मीठ वगैरे जास्त झालंय का? कधी कधी पडतं माझ्या हातून जास्ती. "..... तोंडात तसाच घास ठेवून काका म्हणाले, " साधना.... फार अप्रतिम जेवण केलंयस तू. इतकं चांगलं जेवण बरेच वर्षांनी मिळतंय मला. म्हणून थोडा थांबलो. ".... पंधरा वीस मिनिटांनी जेवणं झाली. काका हॉल मधल्या सोफ्यावर येऊन बसले. नाही म्हटलं तरी जड अन्नाची पेंग डोळ्यावर येऊ लागली. ती टाळत ते जागत राहिले. त्यांना जेवण झाल्यावर कोणाकडेही चैन पडत नसे. कधी एकदा घरी जाऊन लोळतो असं त्यांना वाटायचं. थोड्याच वेळात साधना बाहेर आली. तिने हातातल्या डबीतून बडीशेप काढून काकांच्या हातावर ठेवली. ते सुखावले. बरेच वर्षांनी त्यांना जेवणानंतर बडीशेप चघळायला मिळाली होती. बाजूच्या टेबलावर बडीशेपेची डबी ठेवत साधना म्हणाली, "आज जेवण बनवताना माझी जरा धांदलच उडाली, बरेच वर्षात बाहेरचं असं कोणी जेवायला आलं नव्हतं. काका फक्त हसले. त्यांना कपाटातल्या बायबलबद्दल विचारायचं होतं. पण तिला कितपत आवडेल अशी त्यांना शंका आली. दुपारचे दोन वाजायला आले होते. पाच दहा मिनिटांनी काका म्हणाले, " चला, मला निघायला हवं. रमेश घरी आला असेल. रमेश माझा मुलगा. " रमेश संध्याकाळ शिवाय येणार नव्हता. पण फालतू कारणं माणूस शोधून काढतोच. त्यावर ती काही च बोलली नाही.... त्यांना आता चांगलीच पेंग येऊ लागली. त्याचा अंदाज येऊन ती म्हणाली, " मला वाटतं, तुम्ही थोडा आराम करावा. मग चहा वगैरे घेऊन जावं...... या! आतल्या बेडरूममध्ये आराम करा. " ते आज्ञाधारक मुलासारखे उठले आणि तिच्या मागून आतल्या मोठ्या बेडरूममध्ये शिरले. तिने उशी दिली. खिडक्या बंद केल्या. पंखा चालू केला. मंद स्मित करीत ती हॉलमध्ये निघून गेली.

काकांनी अंगावरचा जोधपुरी उतरवला आणि ते बिछान्यावर लवंडले. पडल्या पडल्या त्यांचं लक्ष परत भिंतीवरच्या साधनाच्या नवऱ्याच्या फोटो कडे गेलं. त्याचे डोळे थंड होते. तरी ते अंतरंगाचा वेध घेतायत असं त्यांना वाटलं. कदाचित साधनाबद्दलचं आकर्षण त्याला कळलं असावं. मग त्यांनी समर्थन करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला फक्त मोह होतोय. आपण या मोहाला बळी कुठे पडलोय? पुष्पाचाही मोह झाला होता. पण भीतीमुळे आपण तेव्हा बळी पडलो नाही. त्यांच्या मनात विचार आला, हा फोटो तो गेल्यावर काढला असावा. म्हणून डोळे थंड आहेत................. त्यांचं अंग शहारलं. काकांची पेंग पळून गेली. त्यांनी फोटो वरून नजर वळवली. इकडे तिकडे पाहून फोटो विसरायचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. पण अंतरंगाचा वेध घेणाऱ्या डोळ्यांची पापणी सुद्धा लवली नाही....... मग ते फोटोकडे पाठ करून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. थोड्याच वेळात त्यांना झोप लागली. अर्धा तास गेला असेल. तीन वाजून गेले होते. त्यांना आता जाग येत होती. त्यांनी आजूबाजूला पाहिले. आपण कुठे आहोत त्यांना नक्की कळेना. मग पाठ वळवल्याने पहिल्यांदा काही दिसलं असेल तर भिंतीवरचा फोटो. ते बिछान्यावर उठून बसले. परत त्यांनी जोधपुरी चढवला. तोंड धुण्यासाठी ते वळले आणि समोरच्या एका टेबलावर त्यांना आजचा पेपर दिसला. सहज म्हणून तो त्यांनी हातात घेतला. आज सकाळ पासून त्यांनी पेपर पाहिलाच नव्हता. पेपराचं मुख्य पान पूर्ण उघडल्यावर त्यांची नजर एका बातमीकडे गेली. मथळा होता, " शारीरिक छळ करून निर्घृण खून. " या असल्या बातम्या नेहमीच येतात. काका सहसा वाचीत नसत. पण पहिल्या एक दोन ओळी वाचल्यावर तिथे मृत व्यक्तीच्या हाताचा फोटो काढलेला दिसला. हात पूर्ण पणे सुजलेला होता आणि तो फाडल्यासारखा दिसत होता मारण्या आधी मृताला शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं असावं. पुढच्या ओळींमध्ये नेमकं तेच लिहिलं होतं. बाजूला असलेला फोटो पाहून काकांना उलगडा होईना. माणूस नक्की कोण आहे?....... सदर मृतदेह केळवे बीचला सापडल्याचं लिहिलं होतं. बातमी पुढे काकांनी वाचलीच नाही. त्यांना एकदम आठवलं. हा जीवनराम तर नाही? त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज असल्याचं लिहिलं होतं. आणि त्याच्या छातीवर त्याचं नाव गोंदवल्याने पोलिसांना ते माहीत झाल्याचंही लिहिलं होतं. पण त्याचा नावाचा उल्लेख मात्र त्यात नव्हता. पोलीस गुगली टाकण्यात हुशार असतात...... ते झटकन हॉल मध्ये आले. तेवढ्यात आतून साधना आली. म्हणाली, " लागली ना झोप? " काकांनी पटकन हातातला पेपर होता तिथे ठेवला. आणि ते बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. आता त्यांना तिथे जास्त वेळ थांबणं ठीक वाटेना. ते तोंड पुशीत बाहेर आले. साधनाने चहा ठेवला होता. दहा पंधरा मिनिटात ती चहाचे मग घेऊन बाहेर आली. तिचीही झोप झाली असावी. तिचा चेहरा फारच प्रफुल्लित आणि स्वच्छ दिसत होता. मानेवरून पुढे घेतलेल्या केसांशी चाळा करीत ती म्हणाली, "पेपर घाईघाईने खालीसा ठेवलात? न आवडणारी बातमी होती की काय? " चहाचा घोट घेत काका म्हणाले, " नाही, सकाळी हाच पेपर पाहिला होता, म्हणून ठेवला. " त्यांच्या तोंडावर चलबिचल दिसली, पण तिने विचारलं नाही. प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितलीच पाहिजे असं थोडंच आहे, तिच्या मनात आलं. काकांना कधी एकदा घरी जातो असं झालं होतं. जीवनच्या मृत्यू वर वेगवेगळ्या प्रकारांनी विचार करायला हवा होता. काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनी विचारलं, " खालीच बँक आहे, नाही? " त्यावर ती म्हणाली, " हो, माझं खातंही तिथेच आहे. तुम्हाला उघडायचं असलं तर मी ओळख देईन...... "

हा विषय काकांच्या दृष्टीने उपयोगी होता. नाहीतरी आपल्याला बँकेत जायचंच आहे. ते विचार करून हो म्हणाले. मग त्यांनी एक दोन दिवसात बँकेला भेट देण्याचं ठरवलं. टीपॉयला वळसा घालून ती चहाचे मग आत ठेवण्यासाठी उठली. काय झालं तिलाही आणि काकांनाही कळलं नाही. पण पुढच्याच क्षणी टीपॉयच्या पायात पायाचे बोट अडकून तिच्या हातून चहाचे मग सुटले, आणि काकांच्या अंगावर पडले. थोडाफार चहाही सांडला आणि काकांच्या अंगावर ती कोसळली. तिला आधार देताना नकळत त्यांचे हात तिच्या कमरेभोवती लपेटले गेले, आणि ती त्यांच्या शेजारी सोफ्यावर कलंडली. त्याही अवस्थेत काकांना तिच्या केसांचा आणि तिने लावलेल्या सेंटचा वास आला. तिच्या शरीराच्या ओझरत्या स्पर्शानं ते मोहित झाले. ती लाजून स्वतःला सांवरीत उभी राहिली. त्यांच्या बाजूला सोफ्यावर पडलेले मग उचलीत ती "सॉरी " म्हणाली. आणि आत गेली. आता मात्र काका चांगलेच उत्तेजित झाले होते. पण स्वतःला सांवरीत ते उठले. तिने आतून पाणी आणलं. त्यांच्या जोधपुरी सुटावर पडलेले चहाचे डाग काढण्याचा तिने प्रयत्न केला. पण डागच ते, गेले नाहीत. मग काका म्हणाले, " जाऊ दे ग, लाँड्रीत सूट द्यावा लागेल तेव्हा जातील डाग. मी निघतो. सोना झोपली असेल ना? "..... ती हो म्हणाली. मग शरमून ती सुटावर पडलेल्या डागांबद्दल परत एकदा सॉरी म्हणाली. त्यांची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. तिने खाली मान घातली. ती काहीच बोलली नाही. काकांनी बूट घातले. आणि ते फ्रंट डोअर कडे निघाले दरवाजा बाहेर पडून काकांनी तिला बाय केलं. अर्थातच तिनेही. खरंतर काकांना तिथून जावंसं वाटत नव्हतं. ते लक्षात येऊन ती म्हणाली, " पुन्हा याल तेव्हा आपण कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम आखू. सोनाला पण फार आवडतं. " मग तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करीत

म्हणाले. " आणि तुला? ".... खालच्या मानेने " मलाही! " असं ती म्हणाली. काका मग मात्र खरोखरीच निघाले. रस्त्यावरून त्यांनी तिच्या घराच्या खिडकीकडे पाहिलं. ती खिडकीत उभी होती. त्यांनी हात हालवला. पण तिने हालवला नाही. ती खिडकीत आली, हेच पुरेसं आहे. काकांच्या मनात आलं. मनात विचार भविष्याकडे धावत होते. पण त्यांनी जीवनचा विचार मुद्दाम आणला, आणि साधनाचे विचार झोपताना करण्याचे ठरवले. बस पकडली. ते थोड्याच वेळात घरी पोचले. अजून रमेश आलेला नव्हता. किल्ली कुलुपात घालता घालता, आपण आणखीन काही वेळ साधनाकडे थांबलो असतो तर हरकत नव्हती. घरात शिरता शिरता मन खवचटपणे म्हणाले, " मग काय, हरकत कसली? आजचा दिवस राह्यलो असतो तरी चाललं असतं. त्यांनी मनाकडे लक्ष न देता कपडे बदलले. सोफ्यावर ते शांतपणे बसले.....

मग ते स्वतःशी च म्हणाले, " म्हणजे जीवनला यांनी मारलं तर. पोलिस नक्कीच काही कारवाई करतील. "............ पोलिस कारवाई म्हटल्यावर, आपलं काय? आपणही तिथेच होतो. तो मरताना नाही तरी त्याचा छळ होताना. आपण पोलिसांना खबर दिली तर? पण देणार कशी? दोन तीन दिवस थांबून मग निर्णय घ्यायचं त्यांनी ठरवलं. पोलिसांना खबर अगदी खास कामाबद्दल दिली तर कदाचित आपली सुटकाही होईल. मग ते स्वैपाक घरात आले. त्यांनी चहा प्यायचं ठरवलं. साधना कडचा चहा सौम्य होता. त्यांना जेलपासून कोरा चहा पिण्याची सवय झाली होती. त्या शिवाय आपलं डोकंही चालणार नाही असं त्यांना वाटलं.

(क्र म शः)