कामथे काका (भाग एकोणिसावा)

काका अजूनही बाहेरच होते. बोलावल्याशिवाय कसे आत जाणार?..... आजींचं मुटकुळं दादासमोर ठेवून आकडा म्हणाला, " वैसे बुढ्ढी कम नही है, दादा. " मग त्याने झमझम बद्दल सविस्तर सांगितले आणि स्वतःच्या प्रसंगावधानाने केवढा मोठा धोका टळला होता हेही सांगायला तो विसरला नाही. झमझमको सबक सिखानेकी जरूरत है असेही त्याने सांगितले. दादाने त्याच्याकडे लक्ष न देता गोणपाट उघडायचा इशारा केला. सावकाश गोणपाट काढले गेले....... आजींचा हलकंडा देह खालच्या गालिच्यावर ठेवला गेला. तिच्या तोंडातला बोळा काढला गेला. म्हातारी बेशुद्ध झाली असे समजून तिच्या तोंडावर पाणी मारले. पण हालचालीचे चिन्ह दिसेना. तशी दादा म्हणाला, " वो जिंदा नही है....... " अचानक विक्षिप्त शांतता पसरली. " किसने किया ये "...... दादाच्या बोलण्यात जरब होती. त्याने आकड्याकडे रागाने पाहिले. म्हातारीवर जास्त पाणी ओतून पाहिले, पण हालचाल दिसेना. म्हातारीला हालवून प्रयत्न करणाऱ्या आकड्याला कॉलर धरून उचलीत दादा म्हणाला, " डाक्टरको बुलाओ... जाव, जलदी..... " कपाळावरचा घाम शर्टाच्या बाहीने पुशीत आकडा म्हणाला, " डाक्टर कहांसे आयेगा, दादा.... " दादा सिगारेट शिलगावीत म्हणाला, " अपना डाक्टर मर गया क्या? " आकड्याने कटील कडून नंबर घेतला आणि तो केबीन बाहेर आला, आणि काकांजवळचा फोन लावून म्हणाला, " ए डाक्टरके बच्चे! दादाके ऑफिसमे फौरन आ जा" काकांचे डोळे विस्फारले गेले. ते पाहून आकडा तिरसटून म्हणाला, " ज्यादा होशियार होनेकी जरूरत नही है, हम सब देख लेंगे" त्यालाही काका आवडत नसावेत. तो केबिनमध्ये शिरला. काकांना संशय आलाच होता. नक्कीच कोणीतरी मेलं असलं पाहिजे. पंधरा वीस मिनिटात दरवाजा उघडला गेला. हातात डॉक्टरची बॅग असलेला, बऱ्यापैकी दिसणारा, पस्तिशीला पोचलेला, एक मुलगासा माणूस आत शिरला. त्याने पांढरा शर्ट खोचलेला होता. गळ्यात स्टेथेस्कोप अडकवलेला होता. तो सरळ केबिनमध्ये शिरला त्याने काकांकडे पाहिलं नाही. काकांना आत जावंसं वाटलं. पण ते तसूभरही हालले नाहीत. मुटकुळं मेलेल्या माणसाचं असणार. त्यांच्या मनात शहारणारा विचार आला. का कोण जाणे पण त्यांना मेलेल्या माणसाची फार भीती वाटायची. खरंतर मेलेला माणूस हा जगातला सर्वात निरुपद्रवी माणूस. जिवंत

माणसंच भानगडी करतात. पण त्यांना कोण समजावणार? असो. त्यांनी बरीच नावं आठवून पाहिली. पण अंदाज येईना. शेवटी ते जडपणे खुर्चीत बसले.

आत आल्या आल्या दादा म्हणाला, " देख, बुढ्ढी जिंदा है क्या? ". डॉक्टरने मग म्हातारीची नाडी पाहिली, छाती दाबून पाहिली, उपडी उताणी करून तपासून पाहिली. मग कानातली नळी काढीत म्हणाला, " दादा, मै इंजक्शन देता हूं, इसे होश आया तो ठीक, नही तो...... " त्याने वाक्य अर्धवट सोडले. इंजक्शन भरून म्हातारीच्या वाळक्या दंडात घुसवले. मग त्याने परत नाडी हातात धरून दहा पंधरा मिनिटे वाट पाहिली. पण तिची काहीच हालचाल होईना. तिचे हातपाय चोळले, डोळे तपासले, पण म्हातारी काहीच प्रतिसाद देईना, तेव्हा त्याने ती गेल्याचं जाहीर केलं. दादा संतापून म्हणाला, "ठीक देखा क्या तूने? मंगता है तो फिरसे जांच ले. अधा अधुरा डाक्टर". तरीही डॉ. ने तेच सांगितले. डॉक्टर एम. बी. बी. एस̮. च्या शेवटच्या वर्षाला असताना, एका रॅगिंगच्या केसमध्ये अडकला आणि त्यातून झालेल्या खुनाला जबाबदार ठरला म्हणून त्याला युनिव्हर्सिटीने रस्टिकेट केला. शिक्षा झाली. आत गेला. तिथे दादा भेटला. म्हणाला, "मूंह मागे दाम दूंगा, छूटनेके बाद मुझे मिलना, डिग्रीकी फिकर नही करना, वो मै तेरेकू लाके दूंगा" मग डॉक्टरने त्याच्यासाठी काम केलं. लवकरच तो चांगल्या वस्तीत राहू लागला. दोन दोन गाड्या वापरू लागला. पण अनाधिकृत गर्भपात, शस्त्रक्रिया आणि इतर उलटे सुलटे उपचार करू लागला. खूप कमावू लागला. त्याच्या धंद्यात दादा सकट सगळ्यांनीच कमावून घेतलं होतं. म्हातारीच्या बाबतीत त्याचा निर्णय ऐकून दादा भडकला. आकड्याला आता आकडी येण्याचं बाकी होतं. दादाने त्याला तिरकसपणे विचारलं, " हमारे साथ काम करनेका कंटाला आ गया क्या? ऐसे भूलको पेरियरके टोलीमे क्या सजा मिलती थी? " आकडा दादाकडे यायच्या आधी पेरियरसाठी काम करायचा. आकड्याला गप्प पाहून दादा ओरडला, " हरामी तेरी जबान चिपक गयी क्या? ".... खालच्या मानेने तो म्हणाला, " मौत ". दादाने जागेवरून उठत त्याला सणसणीत शिवी हासडून एक कानफटात मारली. तो भेलकांडला. दादा म्हणाला, " पहले सोचा नही था क्या? इसकी मौत होगी तो उसे ठिकाने लगाना पडेगा? " आकडा म्हणाला, " दादा हमे अंदाजा नही आया, गलती हो गयी. माफ करना. " त्याने दादाचे पाय धरले. त्याचे केस धरून त्याला उठवीत दादा नरमाईने म्हणाला, " बेटा अपने धंदेमे माफी बोले तो मौत. स्साला कोई भरवसे का राहा नही. जीवनरामने गलती किया, तूने भी गलती किया " मग सूर्या मध्ये पडला, " इसके बारेमे बादमे सोचते है, इसको मारेंगे तो इसको भी ठिकाने लगाना पडेगा. चाहे तो सोल्याको बुलाते है" आकड्याच्या अंगाला कंप सुटला. "सोल्या? " इससे अच्छा तो मरना ठीक है. त्याच्या मनात आले. पण तो काहीच बोलला नाही. मग सर्व प्रथम त्यांनी म्हातारीची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. मग काय झालं. कोण जाणे. स्क्रीनवर दादाला मुख्य दरवाज्याशी आलेल्या पोलीस हवालदाराचा चेहरा दिसला. त्यांबरोबर दादा म्हणाला, " पुलीस आयी है, बूढीको लेकर तुम सब लोग अंडरग्राउंड छुप जाव. सिर्फ सूर्या रहेगा मेरे साथ. " कार्पेट गुंडाळून म्हातारीला उचलून ते सर्वजण खालच्या भुयारात उतरले. सूर्याने कार्पेट परत सारखे केले.

मुख्य दरवाजा उघडला गेला. हवालदार साहेब आत आले. काकांना पाहून ते म्हणाले, " काकाजी, पोतं घेऊन आत शिरलेले ते सगळे गेले कुठे? " काकांना अचानक काय बोलावं सुचेना. त्यांनी एकदा केबीन कडे पाहिलं. आणि हवालदाराकडे. हवालदाराने ओळखलं. "केबिनमध्ये आहेत तर..... " असं म्हणत तो केबीन कडे हातातली काठी नाचवीत निघाला. दरवाजा उघडून कटीलने त्याला आत घेतले. तेवढ्यात दादाने काकांना फोन करून जाण्यास सांगितले. म्हणजे खरं काय ते कळू नये. पडत्या फळाच्या आज्ञेप्रमाणे ते थर्मास घेऊन बाहेर पडले. साडेसहा झाले होते. आत शिरलेल्या हवालदाराला दादा म्हणाला, " काय जाला हवालादार साहेब? बसून जा! बसून जा! " हवालदार मात्र इकडे तिकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाला, " ये कार्पेटपर पानी कायकू डाला?, क्या गडबडा है? "... दादा म्हणाला, " अरे साहेब, ये तो हमारा सूर्या है ना, साले को जरा भी अकल नही. पी पाके आता है, और उल्टी करता है, अरे आपभी लीजिये ना थोडी. " असे म्हणून त्याने देशी दारूची चपटीशी बाटली काढली आणि त्याच्या पुढ्यात ठेवली. ते पाहून हवालदाराने विचारले, " ये मेरे लिये है ".... त्यावर दादा म्हणाला, " हां! हां! बिलकुल, आपहीके लिये है. आज आप यहां नही आते तो थानेमे पहुंचा देते". तिकडे लक्ष न देता त्याने विचारले, " देखो मैने यहां गोणपाटके पिशवीमे कुछ लाया करके देखा है, और पीछा भी किया है. क्या लाया उसमे?.... बोलो! मुझे भुलानेकी कोशिश नही करना. और ये बोटल मेरेको नही चाहिये. मग दादा नरमाईने म्हणाला, " अरे हवालादार साहेब, आपके दिमाग की दाद देनी पडेगी. असलमे आपको इनस्पेक्टर होना चाहिये था. लेकीन सरकार छोटे आदमीको देखती नही. अरे, साब ये पंटर लोग रास्तेपर गंदगी करते है, तो मैने उनको बोला, अपनी मुंबई साफ सुथरी होनी चाहिये, इसलिये किया हुआ कचरा भरके यहॉ लाव, इधर उधर नही डालना. वो देखो, कोनेमे पडी है गंदगी. " कोपऱ्यातल्या बाटल्या, काही लाकडी फळ्या दाखवून दादा म्हणाला. तरी पण हवालदाराला पटेना. मग दादाने आतून एक नोटांचं बंडल काढलं आणि त्याला देऊन म्हणाला, " अरे ये रखो. ये तो चलेगा न? काम आयेगा. वैसाभी पुलिस को पगार देरीसे मिलती है, ऐसा सुना है. " पुढ ठेवलेलं बंडल खिशात घालीत समोरच पडलेल्या बाटल्या आणि फळ्यांकडे संशयाने पाहतं म्हणाला, " तुम लोगोने, कचराही लाया था न? " जास्त काही विचारण्यासारखं न दिसल्यानं तो उठला. तो कार्पेटवर पाहतं पाहतं केबिनच्या दरवाज्याजवळ पोचला. तिथे मात्र त्याला सोन्याची बांगडी पडलेली दिसली. ती उचलून म्हणाला, " ये क्या

है? लगता है, यहांपर कोई औरत आयी होगी. "... त्याने संशयाने दादाकडे पाहिले व म्हणाला, " किसीको आगवाह किया है क्या? " असल्या आरोपाला कोणी हो म्हणणार नाही, याच विचार त्याने केला नाही. आवाजात मऊपणा आणीत दादा म्हणाला, " अरे आपके दिमागकी तो दाद देनी चाहिये. हमारे बच्चे सब ऐसेही है. मजा करने औरत को लाते है और ऐसे चीजे फैल जाती है. "..... हवालदाराकडून बांगडी घेत सूर्या म्हणाला, " आईये आपको छोड आता हूं. " त्याला जवळ जवळ ढकलीतच त्याने बाहेर काढलं. तरी त्याने विचारलेच, "यहां एक बूढा बैठा था, वो किधर गया.? " "कौन बूढा? " सूर्याने विचारले..... हवालदार म्हणाला, " अरे वोही जो अभी था.... "

"अरे वो? वो तो दादासे मिलने आया था, आपको देखकर घबराकर निकल गया शायद. "......

तरीही शेवटी हवालदार म्हणाला, " मेरेको शक है, साला ये बांगडी कहांसे आया? " स्वतःवर ताबा ठेवीत सूर्या म्हणाला, " दादाने बोला ना, किसी औरतकी गिरी होगी. "..... दरवाजा उघडून त्याने हवालदाराला बाहेरची वाट दाखवली. दरवाजा लॉक झाला. सूर्या आत आला. दादा म्हणाला, " सबको बुलाव. " मग ते पाचही जण एकेक करून म्हातारीचं प्रेत घेऊन वर आले. ज्याने म्हातारीला धरले होते, त्याने इतक्या अलगजपणे खाली ठेवले, की जणू काही ती जरा जोरात ठेवलं तर ओरडली असती असा त्याचा समज असावा. पण ती केव्हाच सगळ्याच्या पलीकडे गेलेली होती. दादा रागावून आकड्याला म्हातारीची बांगडी दाखवीत म्हणाला, " क्यूं बे बुढीकी चुडी नही सम्हाल सके? " तो अर्थातच काही बोलला नाही. सूर्या म्हणाला, " दादा ये बाते तो होती रहेगी, पहले बूढीको ठिकाने लगाने की सोचो. " मग सर्वानुमते असे ठरले, की आकड्याने एकट्याने म्हातारीला विरारच्या खाडीत फेकून द्यायचे.... कुणाच्याही मदतीशिवाय. केलेल्या चुकीची ही शिक्षा होऊ शकत नाही, हेही दादाने बजावले. मग एकेक करून ते जायला निघणार एवढ्यात फोन वाजला. दादाने तो घेतला. पलीकडून दिवाणजींचा आवाज आला, " नमस्ते दादासाब! हमारे कामके बारेमे आपने क्या तय किया? " म्हातारीच्या प्रकरणात दादा ते काम विसरलाच होता. पण स्वतःला सावरीत रागाने म्हणाला, " क्यूं दो लाख वापिस भिजवा दूं क्या? " आवाजात अजिजी आणीत दिवाणजी म्हणाले, "अरे दादासाब आप गुस्सा मत होइये. वो तो आपके स्वागतके लिये थे. मैने सिर्फ अपने कामके बारेमे पूछा. सरजी अफ्रिकासे पेश्तू साबका फोन आया था....... " त्यांनी वाक्या अर्धवट सोडले. त्यावर दादा म्हणाला, " देखिये हमारे काकाजी जब पूरी जानकारी करेंगे तभी हम आपको बोलेंगे. "

...... "आप अपना वक्त लीजिये सरकार, तकलीफ माफ करना. " थोडक्यासाठी काम खराब व्हायला नको म्हणून त्याने घाबरून घाईघाईने फोन ठेवला असावा. त्यावर दादा काहीच बोलला नाही. सूर्याची अपेक्षा दादा त्याच्याशी चर्चा करील अशी होती. पण तसे काहीच घडले नाही...... संध्याकाळचे साडेसात वाजत होते. आकडा एकटाच त्या म्हातारीबरोबर भुयारात बसला होता. तो आज रात्रीच म्हातारीला फेकणार होता.

त्यांना त्याची फिकीर नव्हती. त्या दोघांनी मग बाटली काढली, आणि आणलेल्या चिकनवर ताव मारायला सुरुवात केली.

इकडे काका जवळ जवळ धावतच रस्त्यावर आले. त्यांना मेलेल्या माणसाच्या उघड्या डोळ्यांची फार भीती वाटे. अर्थातच हा मुडदा त्यांनी पाहिला नव्हता. फार काय मुडदा होता, की जिवंत माणूस होता हेही त्यांना माहिती नव्हते. ते घरी पोचले. रमेश अजून घरी आला नव्हता. ते घरी पोचले आणि चिडलेल्या माणसागत जोरदार पावसाला सुरुवात झाली. ते थोडक्यात बचावले होते. फ्रेश होऊन कपडे बदलतात न बदलतात तोच त्यांचा मोबाईल वाजला. फोन सोनाचा होता. 'सोना' साधनाची मुलगी. तिच्या फोन करण्याचं कारण त्यांना कळेना. त्यांना साधना बोलेल असं वाटलं. पण सोना म्हणाली, " काका, आईला बरं वाटत नाही, तुम्ही याल का? मला फार भीती वाटते..... " तिचा आवाज रडवेला झाला होता. काकांच्या मनात आलं, साधनाला कोणीच नातेवाईक नाहीत की काय? पण त्यांनी तो विचार झटकून टाकला. मग ते म्हणाले, "घाबरू नकोस मी येतो. ".... खरेतर जेमतेम साडेसात वाजत होते. तसं जेवण तयार व्हायला अजून तास दीड तासाचा अवधी होता. त्यामुळे ते चहा घेऊन परत कपडे करू लागले, तशी नीताने विचारले, " हे काय, पुन्हा जायचंय? " ते हो म्हणाले आणि त्यांची वाट पाहू नको असेही त्यांनी सांगितले. जास्त संशयाला जागा नको म्हणून ते म्हणाले, " अगं, माझ्या मित्राकडे जातोय, तो फार आजारी आहे आणि घरी त्याची नऊ दहा वर्षाची मुलगीच असते, ती घाबरली बिचारी. कदाचित मी आज आणि उद्या सुद्धा त्याच्याकडेच राहीन. " तिने जास्त विचारू नये म्हणून ते छत्री, नाइट ड्रेस व थर्मास घेऊन लवकरच बाहेर पडले. खाली उतरले. त्यांना बिल्डिंगला लागून असलेल्या बोळवजा रस्त्यावर गर्दी दिसली. ते कोणाला तरी विचारणार, एवढ्यात रघुमल पुढे झाला आणि दबक्या आवाजात म्हणाला, " पाटकर चला गया, उसके पापने ही उसको मारा, अच्छा हो गया" काकांना वेळही नव्हता आणि इंटरेस्टही. ते घाईत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि ते छत्री उघडून निघाले. वारा आणि पाऊस छत्री डोक्यावर धरू देत नव्हते. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. ते जेमतेम बस स्टॉपवर पचले. दहा पंधरा मिनिटात बस आली. आत शिरले. बसता बसता त्यांच्या मनात आलं, बरं झालं पाटकर गेला ते. आपण कायमचे सुटलो. अशीच वेगवेगळ्या व्यापातून सुटका झाली तर बरं होईल. त्यांना काय माहीत, ते दुसऱ्या व्यापात पाऊल टाकत होते. वीस पंचवीस मिनिटात ते साधनाबेनच्या बिल्डिंगपाशी आले. पाऊस ऐकायला तयार नव्हता. आकाशात विजा चमकत होत्या, पण बिल्डिंगच्या अर्ध्या भागातली वीज मात्र गेलेली दिसली. ते छत्री बंद करून पावसाला चुकवीत साधनाच्या फ्लॅटपाशी पोचले. बेल दाबून पाहिली. पण वाजली नाही. म्हणून त्यांनी दाराची कडी जोरात वाजवली. साडे आठा होत होते. त्यांना खरंतर खूप भूक लागली होती. येताना आपणच काही खाण्याचं घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं असा विचार करीत असतानाच दरवाजा उघडला गेला. दारात सोना हातात मेणबत्ती धरून उभी होती. रात्रीच्या अंधारात ती त्यांना चर्चमध्ये उभ्या असलेल्या मुलीसारखी वाटली.

काका आत शिरले. सोनाच्या हातातली मेणबत्त्ती घेऊन तिला जवळ घेत म्हणाले, " आलो ना मी, आता घाबरू नकोस. तू एकटी नाहीस बरं का. " तिला घेऊन ते साधनाच्या मास्टर बेडरूममध्ये शिरले. आत एका स्टुलावर ठेवलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात बिछान्यावर पडलेल्या साधनाकडे पाहिले. सोनाला हातातली मेणबत्ती घरात नेऊन ठेवायला सांगितली. बिछान्याशी उभ्या असलेल्या काकांना तिच्या शेजारी बसावं की नाही, कळेना. त्यांची अडचण ओळखून ती क्षीण हसत म्हणाली, " बसलात तरी हरकत नाही. सोनाने आग्रह धरला म्हणून तुम्हाला बोलावलं. " तिच्या जवळ बसत ते म्हणाले, " आणि तुझं काय?.... प्रतिक्रिये करिता ते थोडावेळ थांबले. तिच्या तोंडावरचे लाजरे भाव पाहून ते काय समजायचं ते समजले आणि पुढे म्हणाले,.... बोलण्याचा सुद्धा त्रास घेऊ नकोस".... मग त्यांनी धीर करून आपला उजवा हात तिच्या कपाळावर ठेवला. ते कोमट होतं. पण किंचितसा घामही तिला येत होता. आता ते मागे राहिले नाही. त्यांनी चटकन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, " साधना एकदम कशी गं आजारी पडलीस? "ते तिच्या केसांमधून हात फिरवीत राहिले. तिला भरून आले. डोळ्यात येणारे पाणी एका हाताने पुसत ती म्हणाली, " काय माहीत?...... ". मग त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यांचा हात घट्ट धरून ती म्हणाली, " थँक्स! एकच भाऊ आहे, पण तो सांगलीला असतो. मी जातीबाहेर लग्न केलं म्हणून तो येत नाही.... काय सांगणार? " त्यांनी दोन्ही हातांनी तिचा चेहरा कुरवाळण्यासाठी स्वतःचा हात सोडवून घेतला. पण तेवढ्यात सोना आली आणि वीजही. त्यांनी अर्थातच विचार बदलला. सोना काकांना चिकटून उभी राहिली. तिला एका हाताने घट्ट धरीत ते म्हणाले, " आता मम्मी बरी होईल हं! सकाळी औषध आणलय ना? " सोना हो म्हणाली. तिच्याकडून टॉवेल आणून साधनाला देत ते म्हणाले, " आलेला घाम पुसून घे बरं. घामावर वारा बसला तर पुन्हा ताप चढेल. " बाहेर पावसाची वाऱ्याबरोबर युद्धासारखी धुमश्चक्री चालू होती. रस्त्यावरच्या दिव्यांचा पिवळा प्रकाश वाऱ्या पावसाबरोबर हालत असल्याचा भास होत होता..... मग एकदम विजेचा लखलखाट होऊन धडाम धूम आवाज होऊन ती कोठेतरी पडल्याचा आवाज झाला..... एका हाताने सोनाला आणि दुसऱ्या हाताने साधनाचा चेहरा घट्ट धरून काका तिला बिछान्यावर चिकटून बसले. साधनानेही कुशीवर वळून एक हात काकांच्या कमरेभोवती लपेटला. विजेच्या लखलखाटात साधनाचा क्षणभर तेजाळलेला चेहरा पाहून तिला आपली गरज असल्याचे त्यांना जाणवले. मग काही क्षण दोघींना तसेच धरून बसले. साधनाच्या अंगातून येणाऱ्या जवळिकेच्या भावनेने त्यांना व्यापून टाकले. तिच्या शरीरच इतका निकटचा स्पर्श भावनेसहित त्यांना प्रथमच जाणवत होता. ते उत्तेजित झाले. त्यांच्या मनात आलं, वेळ काय आणि काय हे विचार?. भानावर येत साधना बाजूला झाली. पुन्हा वीज गेली. आता मात्र आजूबाजूच्या सगळ्याच इमारतींमधील वीज गेल्याचं दिसलं. नशीब मगाशी लावलेली मेणबत्ती ते विझवायचे विसरून गेले होते.

मग काकांचे लक्ष सहज समोरच्या भिंतीकडे गेलं. साधनाच्या नवऱ्याचा फोटो तिथेच टांगलेला होता. फक्त आता तो दिसत नव्हता. दूरवर कुठेतरी वीज असावी. तिथला अंधुक उजेड तिच्यावर पडत होता. त्या प्रकाशात फोटोची काच तेवढी काहीशी चकाकत होती. का कोण जाणे पण काकांना तिच्या नवऱ्याचं त्यांच्यावर लक्ष असल्यासारखं त्यांना वाटलं. आणि ते अस्वस्थ झाले. परत त्यांच्या मनात आलं, "मेलेल्या माणसाची पापणी न लवणारी थंड आणि स्थिर नजर" त्यांना न्याहाळतं आहे. खरंतर दिसत काहीच नव्हतं. पूर्वी त्यांनी तो फोटो पाहिलेला असल्यानेच तसं झालं होत..... भेद्रट विचार जावेत म्हणून ते बिछान्यावरून उठले आणि सोनाचा हात धरून ते समोरच्या खिडकीपाशी गेले. पावसाची झड आत येत होती. पण त्यांनी खिडकी बंद केली नाही. ते बाहेर डोकावले. एकदोन बसेस जात येत होत्या. रस्त्यावर असणारी तुरळक माणसं, वाहनांच्या प्रकाशात लाइट अँड साउंड कार्यक्रमात हालचाली करतात तशी दिसत होती. आयुष्य असच लाइट अँड साउंड कार्यक्रमासारखं असावं असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला....... त्यांची भूक आता चांगलीच पेटली होती. त्या दोचींचीही जेवणं व्हायची असणार, ते स्वतःशी म्हणाले. ते साधनाजवळ येऊन म्हणाले, " तू आणि सोनाने काही खाल्लंय का? " ती नाही म्हणाली. तिच्या तोंडावरचे भाव दिसणं कठीण होतं. त्यांची सावली तिच्यावर पडली होती. मेणबत्तीचा प्रकाश उजेडापेक्षा अंधार अधिक जाणवून देत होता. खोलीतलं वातावरण पावसाने ओलसर झालं होतं. तसं ते मादक वातावरण होतं. पण साधना बरी असती तर त्यांना इथे वोलावलं गेलच नसतं असाही त्यांनी विचार केला आणि विचार मागे सारले. मग ते म्हणाले, " मी सोनाच्या मदतीने तुझासाठी थोडा भात टाकतो. आणि आमच्या दोघांसाठी मी बाहेरून काहीतरी घेऊन येतो. उडप्याचं हॉटेल मागेच आहे. "..... ती म्हणाली, " ठीक आहे, पण एवढ्या पावसाचे फार लांब जाऊ नका. "..... त्यांना हे वाक्य ऐकल्यासारखं वाटलं. आणि त्यांना रोहिणीची आठवण झाली. रोहिणी आणि साधनामध्ये त्यांना अजिबात फरक वाटला नाही. खरंतर अशी वाक्य साधारणपणे माणूस बोलतोच. आणि ती स्थलकालाबाधित ऐकू पण येतात. पण काकांना एवढं तिचं आकर्षण होतं की मन दरवेळेला रोहिणीबरोबर साम्य शोधीत असायचं. त्यांना तो चमत्कार वाटायचा. साध्या गोष्टी गूढ आहेत असं समजून चालणाऱ्याला कोण समजावून सांगणार? आयुष्य सपाटच असतं, पण आपण त्यात रंग भरतो आणि ते रंगीत करतो.....

सोनाला घेऊन ते प्रथम स्वयंपाकघरात शिरले. तिच्या मदतीने त्यांनी भात लावला. ते पुन्हा साधनाच्या खोलीत आले, म्हणाले, " भात लावलेला आहे, सोनाला घेऊन मी बाहेर जाऊन येतो. किल्ली घेऊनच जातो. तू उठू नकोस. येतो लवकरच. " ती मंद हसली. पण त्यांना दिसले नाही. मग ते सोनाचा हात धरून छत्री घेऊन बाहेर पडले. बिल्डिंगच्या मागच्याच बाजूला उडप्याचं हॉटेल असल्याचं त्यांना आठवलं. जिन्यावरून उतरताना पुन्हा वीज आली. वीज सारखी लपंडाव खेळत होती. का कोण जाणे पण ताराबाईंच्या फ्लॅट समोरून जाताना त्यांना बाहेरील कुलूप पाहून त्यांचं काय झालं असावं कळेना. त्यांना वेगळीच शंका आली. ताराबाई घरातून कशाला जातील? त्या दिवशी पोत्यात घातलेल्या ताराबाई तर नव्हत्या.....? त्यांना आपला त्यांच्या नसण्याशी उगाचच संबंध असल्यासारखा वाटला. रस्ता ओलांडून ते बिल्डिंगच्या मागच्या बाजूच्या हॉटेल मध्ये शिरले. इडली सांबार, डोसा आणि पुरीभाजी त्यांनी पार्सल करायला सांगितली. हॉटेलच्या आतून बँकेच्या मागच्या दरवाज्याकडे पाहिलं. तो बंद होता...... वॉचमन तिथे बसलेला दिसला. त्यांच्या अंगातून अचानक भीतीची लहर चमकून गेली. याच आठवड्यात दादा बँकेवर दरवडा घालणार होता. तेवढ्यात उडप्याने "ये लो साब आपका पार्सल" असे म्हणून त्यांच्या समोर पार्सल ठेवले. ते उगाचंच दचकले. जणू काही उडप्याने दरवड्यातला त्यांचा वाटा समोर ठेवला होता. ते भानावर आले. सोनाला घेऊन ते भराभर निघाले. पावसाची थांबण्याची इच्छा नसावी आणि काकांचीही. ते घाईघाईने साधनाच्या फ्लॅटमध्ये शिरले. लाइट असल्यामुळे अंधारात ठेचकाळण्याचा प्रश्न नव्हता. आल्या आल्याच त्यांना भात जळल्याचा वास आला. पण गॅस बंद केलेला दिसला बहुतेक साधनाने केला असावा. ते प्रथम साधनाच्या बेडरूम मध्ये शिरले. मग ते तिघेही जेवायला बसले.

साधना आजारी असल्याने तिला जेवण फारसं खपलं नाही. पण काकांना मात्र सकाळ पासून जेवण न मिळाल्याने आणलेलं सगळंच खपलं. साधनाच्या हे लक्षात आलं असावं. तिला वाटलं आपण उगाचच यांना बोलावलं. पण ती काही बोलली नाही. पाऊसही थोडासा थांबला होता. जणूकाही त्याचाही डिनर टाइम असावा. जेवणं संपतात न संपतात तोच पुन्हा पाऊस त्वेषाने सुरू झाला. मग सोना साधनाच्या बाजूला झोपली. काका बेडच्या समोर खुर्ची घेऊन बसले होते. साधनाचा ताप आता पूर्ण उतरला होता. अंगाला येणारा घाम पुशीत ती म्हणाली, " तुम्हालाही झोपायचं असेल तर झोपा........ " असे म्हणून तिने वाक्य अर्धवट सोडले. मोहाला टाळीत काका म्हणाले, " मी बाहेरच्या खोलीत झोपतो...... " आणि ते झोपण्यासाठी उठले. त्यावर साधना म्हणाली, " इथेच खाली गादी घालून झोपलात तरी चालेल,.... " असे म्हणून तिने त्यांच्याकडे पाहिले. जणू काही तिला 'माझा विश्वास आहे तुमच्यावर' असं म्हणायचं असावं. त्यांच्या मनात त्यांचं उत्तर तयार होतं 'पण माझा माझ्यावर विश्वास नाही'. मग ती म्हणाली, " म्हणजे मला काही लागलं तर तुम्हाला उठवता येईल, बाकी काही नाही. " त्यावर ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी आत जाऊन पायजमा आणि शर्ट घातला. काढलेले कपडे ठेवण्यासाठी त्यांनी कपाट उघडले. आत काही पुरुषी कपडे होते आणि तिच्या काही साड्याही होत्या. त्यांना आश्चर्य वाटलं, नवऱ्याचे कपडे तिने अजून जपून ठेवले असावेत, असं त्यांना वाटलं. पण ते काही बोलले नाहीत. कपाट बंद करून त्यांनी साधनाच्या खोलीत आपली गादी घातली. आणि ते लवंडले. पाठ टेकताच त्यांना खरंतर पेंग येऊ लागली. सकाळ पासून त्यांना जरादेखील पाठ टेकायलाही मिळालं नव्हतं. आता रात्रीचे साडेनऊ वाजले होते. त्यांनी मध्येच उठून साधनासाठी गरम पाणी आणि स्वतःसाठी गार पाणी आणून ठेवलं. ही कामं रोहिणी करीत असे. त्यांना एकदम आठवण झाली. खोलीत एक लहानसा नाइट लँप लावला होता. काकांना पूर्ण अंधार लागत असे. ते झोपेची आराधना करू लागले. साधनाची बिछान्यावर चाललेली चुळबूळ ऐकू येत होती. ती दिवस भर पडून असल्याने तिला झोप लागत नसावी. एकदम काय बोलावं दोघांनाही कळेना. दोघांनाही बोलायचं होतं. पण धीर होत नव्हता. साधनाने मध्येच प्रश्न फेकला. " तुमची बायको आजारी असताना तुम्ही काय करीत होतात? ".... त्यांनी बराच वेळ उत्तर दिलं नाही. या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तरी चालण्यासारखं होतं. पण थोडावेळ घेऊन काका म्हणाले, " काय करणार? असाच खाली झोपत होतो. माझी तर जागाही खूप लहान होती. " त्यांना खरंतर त्यांचा सगळा इतिहासच तिला सांगावासा वाटत होता. पण त्यांनी मनाला आवर घातला. ते फार बोलत नाहीत असं पाहून विषय टाळीत ती म्हणाली, " तुम्हाला जर नाइट लँप नको असला तर वंद करू शकता. " ते उठले आणि पडत्या फळाची आज्ञा मानून त्यांनी लाइट बंद केला. काळोखात एक बरं असतं, तोंडावरच्या भावना दिसत नाहीत. पण बोलण्याच्या पद्धती वरून त्या ओळखता येतात. प्रकाशात मात्र या बीन शब्दांच्या भावना लपवता येत नाहीत. त्यांच्या मनात आलं. म्हणून तर त्यांना काळोख आवडायचा. ते स्वतःशीच म्हणाले, " आता कसं स्वप्न रंजन करायला हरकत नाही........

जवळ जवळ अर्धा तास असाच गेला. घड्याळात दहाचे ठोके पडले. बाहेर पिवळा प्रकाश झिरपवणारा पाऊस इमानदारीत पडत होता. जणू काही त्याला कोटा दिला होता. मग त्यांच्या मनात ताराबाईच्या फ्लॅटचे विचार आले. कुठलीच लिंक न लागल्याने त्यांनी विचार करणं सोडून दिलं. साधनाही झोपली होती. असेच अकरा वाजले. काकांना झोप लागली. एक दीडच्या सुमारास त्यांना मुख्य दरवाजा बाहेर खरवडण्याचा आवाज आला. ते नीट ऐकू लागले. त्यांची झोप अचानक गेली. ते आवाजाच्या दिशेने ऐकू लागले. तो आवाज खूप लांबचा असावा असं त्यांना वाटलं. पण तो कुठून येतोय त्यांना कळेना. त्यांनी काळोखात साधनाच्या पलंगाकडे पाहिलं. दोघी गाढ झोपेत होत्या. ते मांजराच्या पावलाने उठले, आणि आतली खोली ओलांडून हॉलमध्ये पोहोचले. आता तो खरवडण्याचा आवाज आणखीन लांबून येत असल्याचं त्यांना जाणवलं. मध्येच पावसाचा आवाज येई आणि तो आवाज नाहीसा होई. पावसाचा एवढा आवाज होता, की त्यात लहान सहान आवाज सहज हरवले असते. ते मुख्य दरवाज्यापाशी पोहोचले, आणि त्यांनी दरवाज्याला कान लावला. आत तर पावसाच्या आवाजामुळे त्या आवाजाची दिशाच हरवली. ते कंटाळले. दार उघडून बाहेर पडावं असं त्यांना वाटू लागलं. निदान तो आवाज कोठून येतोय एवढं तर पाहून येऊ. पण साधना उठली तर?..... या भीतीने ते मागे वळले. पुन्हा बिछान्यावर लवंडले. त्यांची नजर परत साधनाच्या नवऱ्याच्या फोटो कडे गेली. पण आता ते न घाबरता त्याला मनातल्या मनात म्हणाले, " मी तुला बिलकुल घाबरणार नाही, आणि साधनाशी मी लग्नही करीन. " परत खरवडण्याचा आवाज आला. ते जवळ जवळ अर्धातास तो आवाज ऐकत पडले. त्यांची झोप आता पळाली होती. डोळे अंधाराला सरावले होते. जणूकाही समोरचं त्यांना स्पष्ट दिसत होतं. पावसाचा आवाजही वाढला होता. त्याचं डोकं फिरलं होतं आणि त्यांचंही........   

(क्रमशः)