कामथे काका (भाग तिसरा)

जेमतेम बारा बाय दहाची रूम होती. आत एक जुनं लोखंडी कपाट एका भिंतीला उभं होतं. ते अर्थातच काकांचं होतं. त्याच्या आरशात काकांना आपलं प्रतिबिंब दिसलं. केवढा फरक पडला चेहऱ्यात त्यांच्या मनात आलं. तुरुंगात असताना, आरसा हा प्रकार कधी सापडला नाही. केव्हातरी एकदा दिसला तो भेटीच्या रूममध्ये, त्यात नक्की कुठल्या काळातलं प्रतिबिंब दिसायचं हे समजत नसे. फार वेळ त्यांनी त्यात घालवला नाही. बाजूला दुसरं एक लाकडी कपाट होतं. त्यालाही आरसा होता. पण काकांनी त्यात पाह्यलं नाही. बाजूच्या भिंतीला एक खिडकी होती. त्यातून पूर्वी त्यांच्या चाळी समोर असलेली दुसरी चाळ होती. एवढ्या वरून ती चाळ अगदी बुटकी आणि फार जुनाट वाटत होती. ती चाळ पाहून त्यांना पाटकराच्या पुष्पाची आठवण झाली. पुष्पा एक प्रौढ कुमारिका. तिचं लग्न का होत नव्हतं कुणाला माहीत. खरंतर ती चांगलीच उफाड्याची. वयापेक्षा जरा मोठी वाटायची. दिसायला सामान्य असली तरी तिचा उफाडा पाहून चाळीतल्या बऱ्याच लोकांना उकाडा व्हायचा. काकाही त्याला अपवाद नव्हते. ती उगाचच त्यांच्या मनात रेंगाळत राहिली. काकांनी तो विचार झटकून टाकला, त्यावर सवडीने विचार करता येईल. खिडकीला लागूनच एक डबलबेड होता. बाजूच्या रिकाम्या भिंतीला लागून एक टीपॉय होता. त्यावर काही जुनी वर्तमानपत्रं होती. आणि दोन उष्टे चहाचे कप होते. जे आता दोन तासात करवडले होते. त्यांच्या मनात आलं, रोहिणी खूपच स्वच्छ आणि व्यवस्थित होती. असले उष्टे कप तिच्या हातून कधीच राहत नसत. बेडवर कशातरी सोडलेल्या साडीचा पुचका आणि एक ब्लाऊजही पडला होता. मग त्यांची नजर सहजच वर गेली. सीलिंग फॅन जुनाच होता. त्यालाही कचऱ्याची काळी बॉर्डर तयार झाली होती. तो कधीच पुसला जात नसावा.

खिडकीच्या वरच्या भिंतीवर रोहिणीचा एक फोटो टांगलेला होता. ती जणू त्यांच्याकडेच पाहत होती. आणि विचारीत होती., "किती उशिरा आलात, खूप वाट पाह्यली.; पण आलाच नाहीत. " त्यांना तिच्या डोळ्यात पाणी असल्याचा भास झाला. पण, खरंतर त्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. काही क्षण त्यांना त्या खोलीत ते उभे आहेत असा याचा विसर पडला. मग ते भानावर आले. कपाटांच्या समोरील रिकाम्या भिंतीवर एक माळावजा स्लॅब होता. त्यावर दोन ट्रंका आणि एक निळसर रंगाची व्हीआयपी ट्रॅव्हल बॅग होती. दोन्ही ट्रंकांना आता जवळ जवळ तीस एक वर्ष झाली होती. एक त्यांना रोहिणीच्या बाबांनी लग्नात दिली होती. आणि दुसरी त्यांनी विकत आणली होती. प्रत्यक्ष हनीमूनला जाताना मात्र त्यांनी त्यांच्या मामाने दिलेली व्हीआयपी बॅग नेली होती. इकडे तिकडे पाहत त्यांच्या मनात आलं आपण चहा करून प्यावा. सकाळचा चहाच मुळी त्यांना नऊ वाजल्याशिवाय मिळत नसे. सकाळी उठल्या उठल्या चहाचा कप फक्त रोहिणीच देत असे. अर्थातच तुरुंगात पद्धत वेगळी होती. तिथे ऍल्युमिनियम्च्या टमरेलामध्ये चहा, पाणी प्यावं लागायचं. आता त्यांचा सगळा चोखंदळ पणा नाहीसा झाला होता. मग ते किचन मध्ये डोकावले. सकाळी रमेशचा डबा तयार करताना वापरलेली भांडी ओट्यावर आणि गॅसवर तशीच होती. तिथेच एका लहानशा पातेल्यात दूध होतं. त्यांनी गॅस पेटवून ते तापत ठेवलं. एक लहान भांड घेऊन चहासाठी आधण ठेवलं. त्यांना एकदम ट्रंकची आठवण झाली. ते पटकन बेडरूम मध्ये आले. बेडवर चढून त्यांनी एक ट्रंक खाली काढली आणि उघडली. त्यात त्यांचे आणि रोहिणीचे जुने कपडे इतर वस्तूही होत्या. त्यात त्यांना लग्नाच्या फोटोंचा अल्बम सापडला. तो ते पाहू लागले. तोहिणीच्या फोटोवरून मायेने हात फिरवू लागले. फोटो पाहता पाहता त्यांचं भान हरपलं. आणि लग्नातल्या एकेक प्रसंगाची त्यांना आठवण आली.......

रोहिणी बारीकच होती. गोरटेली, नाकी डोळी आकर्षक असलेली रोहिणी काकांना पाहताक्षणीच आवडली होती. त्यांनी तिला पाह्यला गेल्या वर लगेचच होकार दिला होता. आत मध्ये रोहिणीची आई आणि इतर बायका कुजबुजत होत्या. त्यांचे अर्धवट शब्द कानावर पडले. " मुलगा किती उतावळा आहे नाही......? "

त्यावर सगळ्या जणी हसल्या होत्या. आणि ते आठवून काका आताही थोडे वरमले. सगळा प्रसंग कस जिवंत झाला. नंतर त्यांचं रोहिणीशी लग्न ठरलं होतं. ते तिला भेटायला जायचे. तिला घेऊन ते बऱ्याच ठिकाणी फिरायचे. तिच्या अंगाच्या वासात मिसळलेला सेटचा वास त्यांना उत्तेजित करायचा. तो वास मनात ठेवून ते घरी यायचे. त्यांना मग झोप लागत नसे. कधी एकदा लग्न होऊन रोहिणीला मिठीत घेतोय असं त्यांना वाटायचं. असे अनेक प्रसंग त्यांना आठवू लागले. मग त्यांना त्यांची पहिली रात्र आठवली. घरात पाहुण्यांची गर्दी, मुलांचा कलकलाट, प्रायव्हसी मिळणार कशी, म्हणून त्यांच्या मामांनी स्वतःच्या घराची चावी दिली होती. ते तिकडे झोपायला गेले होते. रोहिणी आणि ते खोलीत शिरल्या शिरल्या, त्यांनी जेमतेम दरवाजा लावून तिला मिठीत घेतली आणि तिच्या अंगाचा वास पूर्णपणे भरून घेत त्यांनी तिची पटापट चुंबनं घेतली होती. तिनेही तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद दिला होता. तो वास अजून त्यांना आठवत होता............

मग त्यांना मध्येच अतिशय घाण करपटलेला वास आला. म्हणजे जळणाऱ्या प्रेताचा येतो तसा. त्यांना आपल्या घराजवळ स्मशान आहे की काय असं वाटू लागलं. पण समोरची जुनी चाळ तेवढी दिसली. वास अधिकच वाढू लागला. त्यांना एकदम आपण दूध आणि चहासाठी आधण ठेवल्याचं आठवलं. ते ट्रंक तशीच उघडी ठेवून स्वैपाक घरात डोकावले. ते काळ्या कुट्ट धुराने भरले होते. त्यांनी पटकन तिथली खिडकी उघडली. धूर बाहेर जाऊ लागला. मग घाईघाईने गॅस बंद करताना त्यांच्या लक्षात आलं, दुधाचं पातेलं कधीतरी स्टेन्लेस स्टीलचं असावं असं वाटण्याइतकं ते काळं पडलं होतं. एवढ्यात फ्रंट डोअरचा लॅच उघडत असल्याचा त्यांना आवाज आला....... त्यांना भीतीने थरथर सुटली. तोंडाला कोरड पडली. नक्कीच नीता आली असणार. आता स्वयंपाकघर साफ करावं का बेडरूम मध्ये जाऊन ट्रंक जागेवर ठेवावी. त्यांचा निश्चय होईना. नीता खांद्यावर झोपलेल्या श्रेयाला घेऊन आत शिरली. तिला वास तर आलाच पण घुसमटल्यासारखं होऊन ती खोकू लागली. किचनची खिडकी उघडल्याने तिथे धूर थोडा कमी झाला होता, पण हॉलमध्ये मात्र धूर अजून भरला होता....

काका हॉल आणि बेडरूमच्या मधल्या बोळात खाली मान घालून अपराध्यासारखे उभे होते. तुरुंगातही त्यांना मोठ्या जेलरसाहेबांचा राउंड असला की असच खाली मान घालून उभं राहावं लागे, त्याची त्यांना आठवण झाली........ बिचारे काका. करायला काय गेले आणि झालं काय? मनावर ताबा नव्हता हेच खरं. कशा कशाचा खुलासा देणार होते ते? चहा करून पिणं गुन्हा होता, की घर पाहणं? की फोटो पाहणं? नक्की कोणता गुन्हा होता? ते मुलाच्या घरी राहत होते. पण चोरट्यासारखी अवस्था झाली होती. एखाद्या विद्यार्थ्याची वही तपासाला घ्यावी आणि शुद्धलेखनाच्या जागी चित्रं सापडावीत असं त्यांना झालं मुद्देमालासहित ते पकडले गेले होते. खोटंच काय पण काही बोलणं शक्यच नव्हतं.....

"काय,...... काय चाललंय हे? " नीताने खोकल्यावर ताबा आणीत करवादली. चहाच हवा होता, तर सांगायचं ना, आणि घराची तपासणी करता का?, का आमच्या खाजगी गोष्टी तपासता? " काकांच्या मानेवरून घामाचा थंड थेंब खाली सरकला. त्यांचं अंग शहारलं. तरीही ते चाचरत म्हणाले, " मला रोहिणीचे फोटो पाह्यचे होते, आणि मध्येच चहा घ्यावासा वाटला, गैरसमज करून घेऊ नकोस. थोडं दुर्लक्ष झाल्यानं दूध जळलं. पण मी तुला दूध आणून देतो. कदाचित श्रेयाची दुधाची वेळ झाली असेल. मला माफ कर. " नीताने त्यांचाच शब्द धरला, आणि तुच्छतेने म्हणाली, " दुर्लक्ष? चोरटेपणाने वागण्याची तुमची मूळ वृत्ती जाणार नाही. तरी मी रमेशला नाही म्हणून म्हणत होते. पण त्यानं ऐकलं नाही. मला वाटलं एवढ्या शिक्षेने तुमच्यात सुधारणा झाली असेल. पण छे, शेवटी चोर तो चोरच...... आणि या वयात बायकोचे फोटो पाहत बसता, म्हणजे कमाल आहे. खरंतर तुम्हाला लाज वाटायला पाह्यजे. बाहेर कळलं ना तर आमची बदनामी होईल. " ती असच काहीतरी बडबडत आत गेली. आणि आवरायला घेतलं. काका मात्र बाहेरच्या सोफ्यावर खाली मान घालून बसून राह्यले. श्रेया पलंगावर झोपली होती. नीताने कसातरी स्वैपाक केला आणि त्यांना जेवायला वाढलं. ते एकटेच जेवले. दुपार अशीच वाईट गेली. त्यांच्या मनात आलं, आता रमेश आला की जास्तच बोलेल. पण तसं काहीच झालंनाही. नीताचा आवाज आतून येत होता. पण आवाज दबका होता. त्यांना फार थोडं ऐकायला मिळालं. "त्यांना काहीतरी करायला सांगा, इथे माझ्या उरावर बसवून जाऊ नका. नाहीतर घरातून जायला सांगा. त्याने तिची समजूत कशी काढली काही कळलं नाही. पण रात्री साडेदहा अकराच्या सुमारास तो हॉल मध्ये आला, काका झोपण्याच्या तयारीत होते. त्यांना म्हणाला, " पाहिलंत, ना तुम्ही एक काम करा. मी माझा एक वकील मित्र आहे त्याच्याशी बोललोय, त्याला उद्या त्याच्या शिवडीच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटा. तो तुम्हाला ठेवून घेईल. काय पगार देईल तो देईल. हे त्याचं कार्ड. " असं म्हणून एक व्हिजिटिंग कार्ड त्यांच्या हातावर ठेवलं. आणि जास्त न बोलता, किंवा त्यांना बोलण्याची संधी न देता, तो झोपायला निघून गेला........

आपल्यावर रमेशनी तरी विश्वास ठेवायला हवा, असं त्यांना सारखं वाटत राह्यलं. त्याच मनस्थितीत त्यांना झोप लागली. मग त्यांना रात्री एक स्वप्न पडलं. त्यात रोहिणी आली होती, पण तिचा चेहरा सारखा पाटकराच्या पुष्पा सारखा दिसत होता. ती हसत होती. जणू काही तिला वेड लागलंय. त्यांची झोप मोडली. रात्रीचे दोन वाजत होते. त्यांनी पहाटे चार पर्यंत असाच बसून वेळ काढला. पहाटेचा थंड वारा सुटला होता. त्यांना किंचितशी थंडी वाजू लागली. आज त्यांना चादर दिली नव्हती. त्या दोघांकडे ती मागण्याचं त्यांना धैर्य झालं नाही. एक प्रकारच्या ग्लानीतच त्यांना झोप लागली. सकाळी ते लवकर सहा वाजताच उठले. आज त्यांना विपुल शहाच्या ऑफिस मध्ये जायचं होतं. मन मानीत नव्हतं. तरी ते दहा वाजेपर्यंत तयार झाले. कामावर जाताना रमेश त्यांच्याशी काहीच बोलला नाही, तसाही तो फारसा बोलत नसे. आधीच नसलेलं संभाषण जास्तच कठीण होऊन बसलं. पायात चपला घालून ते दाराबाहेर पडले. ते मात्र नीताला ओरडून सांगून निघाले. पंधरावीस दिवसात ते प्रथमच लिफ्टने खाली आले.......

(क्र म शः )