कामथे काका (भाग अकरावा)

नेहमीप्रमाणे ते ऑफिसला जायला निघाले. आज जरा लवकरच निघाले. त्यांची मानसिक अवस्था काल रात्रीच्या प्रसंगा पासून फार नाजुक झाली होती. ते कसेतरी ऑफिसला पोहचले. त्यांचं आज कामावर अजिबात लक्ष नव्हतं. किंबहुना त्यांचा आज मूडच नव्हता. पण घरी बसून काय करणार? म्हणून ते आले होते. त्यांच्या डोळ्यासमोरून पुष्पाचा चेहरा हालत नव्हता.......... पुष्पाचा फायदा सहज घेता आला असता. नाहीतरी ते रोहिणी गेल्यापासून बऱ्याच सुखांना पारखे झाले होते.

त्यात हे महत्त्वाचं सुख समोर उभं असतानाही त्यांना काही करता आलं नाही. मग काल रात्री आपण संयमाचं नाटक तरी का केलं? त्यांनी स्वतःला विचारलं. थोडक्यात आपल्यात निभावून नेण्याची ताकद नाही, हेच खरं. कितीतरी लोक विवाहबाह्य संबंध ठेवतातच की. त्यातून आपण तिच्याकडे गेलो नव्हतो. त्यांनी जिभल्या चाटणाऱ्या मनाच्या बाजूने विचार केला. मग मोह टाळताना होणाऱ्या यातनांना ते स्वतःच जबाबदार असल्याचं त्यांनी कबूल केलं. माणूस चांगुलपणाचं बंधन स्वतः च घालून घेतो असंही त्यांना वाटू लागलं. आपण रमेशशी एवढे चांगले वागतोय, काय मिळतंय आपल्याला?..... थोडक्यात त्यांना मोह टाळण्याचा पश्चात्ताप होत होता. अधून मधून मेसेज येत होते, ते निर्विकारपणे आत पाठवीत होते. मग त्यांना एकदम आठवलं. त्याने ते घाबरले...... पुष्पा काल रात्री धावत खाली गेली, ती घरी गेली असेल ना?..... आपण हा विचारच केला नाही. निदान सकाळी तरी थोडं थांबायला हवं होतं......... थांबून आपण काय करणार होतो? पुष्पाच्या घरी जाणं म्हणजे रात्रीच्या प्रसंगाचा बभ्रा करण्यासारखं होतं...... कदाचित...... कदाचित पुष्पा घरी गेली नसेल तर?.... मग कुठे जाणार होती ती?...... छे, छे. ती घरी गेली असलीच पाहिजे.... तिनी स्वतःचं काही "क रु न घे त लं " तर नसेल? अचानक त्यांना हलकासा घाम येत असल्याची जाणीव झाली. किती किती गोष्टींना आपण अप्रत्यक्षपणे जबाबदार राहणार आहोत. दिवस मुंगीच्या पावलाने सरकत होता. त्यांनी हातावरच्या घड्याळात पाहिले, जेमतेम साडे अकरा होत होते. सकाळपासून त्यांनी सात आठ वेळा तरी घड्याळात पाहिलं असेल. हे काटे आपण फिरवले तरी काळ पुढे जाणार नव्हता. सबंध दिवस अजून भुतासारखा एकट्याने काढायचा होता. नुसतं बसून बसून आता मऊ खुर्ची त्यांना काट्यांसारखी टोचू लागली होती. कपाळावर हात ठेवून त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला. रात्री नीट झोप न झाल्याने थोडी डुलकी त्यांना लागली. नाही म्हणायला बारा वाजून गेले. ते जागे झाले. पुन्हा एक दोन फोन आले. निरोपादाखल फक्त कोणीतरी आकडे सांगितले. ते स्वतःवरच चिडले. काय हे काम? मग एक वाजला. ते जेवायला म्हणून बाहेर पडले. जेवणावर त्यांची वासना नव्हती. अर्धवट जेवून ते उठले. नेहमीचा वेटर त्यांच्याकडे पाहात राहिला. त्यांनी त्याची पर्वा केली नाही. ते बाहेर आले, संत्र्याचा रस घेऊन परत ऑफिसमध्ये आले. वेळ चालला होता. आज त्यांनी आणलेला थर्मास मधला चहा सुद्धा घेतला नाही. चार वाजले. जांभया देऊन देऊन ते वेळ घालवू लागले. पाच वाजत आले. काकांचा पेशन्स आता संपला होता. त्यांनी आत फोन लावला आणि सूर्यनारायणला म्हणाले, " मुझे आज जरा जलदी जाना है. क्या करूं?....... " असं म्हणून त्यांनी प्रश्न अर्धवट ठेवला. जाऊ का असं विचारलं नाही, तो नाही म्हणाला असता तर?..... पण सूर्यनारायणने परवानगी दिली. ते निघाले. जाता जाता त्यांना रोहिणी गेली तो दिवस आठवला.

दोन कॉन्स्टेबल त्यांना घरी घेऊन आले होते. दुपारची वेळ होती. रोहिणीचं पार्थिव शरीर घरात ठेवलं होतं. चाळीतल्या त्या लहानशा जागेत पंधरा वीस नातेवाईक तरी आले होते. काही लोक खाली उभे होते. रमेश एकटाच थिजल्यासारखा रोहिणीजवळ बसून होता. पोलीस बाहेर थांबले होते. काकांनी प्रथम रमेशच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले होते, " बाळा, मी काय बोलणार? ती अशी जायला नको होती रे. थोडी थांबली असती तर बरं झालं असतं. " पण रमेशवर काहीच परिणाम झाला नाही. त्याचे डोळे कोरडे होते. रागाने त्याने त्याच्या खांद्यावरचा त्यांचा हात बाजूला काढला, आणि म्हणाला, " एक अक्षरही बोलू नका. तुमच्या मुळे ती गेली. तुम्ही तिला मारलीत...... माझ्या आईला मारलीत तुम्ही, समजलं? " आणि नंतर तो हुंदके देऊन रडू लागला. काका बघतच राहिले. आलेले सगळेच स्तंभित झाले होते. त्यावेळी शांततेचा भंग करीत शेजारी राहणारे देसाई आजोबा म्हणाले होते, " असं कुणी कुणालाही मारू शकत नाही. हे केवळ प्रारब्ध होतं तिचं. थोडं दुःख आवर. पुढचं सगळं तुलाच करायचंय ना? मग शांत राहा बरं. " असं म्हणून त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला होता. स्मशानात अग्नी दिला तेव्हा सुद्धा काका परक्या सारखे उभे होते. तेव्हापासून रमेशने त्यांना आयुष्यातून बाजूला काढलं होतं. रोहिणी गेल्याचा दोष त्यांनाच दिला गेला...... ते गल्लीच्या तोंडाशी आले. गल्लीत एक प्रकारची गढूळ शांतता होती. लोक गटा गटाने उभे राहून दबक्या आवाजात चर्चा करीत होते. मग पाटकराच्या खोलीपाशी त्यांना गर्दी दिसली आणि ते बावचळले. मग गर्दीतल्या एकाने त्यांना माहिती पुरवली. पुष्पाने काल रात्रीच जवळच कुठेशी विहीर होती ती जवळ केली होती....... म्हणजे काल रात्री ती गेली....... ती गेलीच.... कदाचित तिला पाहिजे तसे आपण वागलो असतो तरीही तिने आत्महत्या केलीच असती..... असती का? ते स्वतःशीच पुटपुटले. त्यांना विचारांनी बांधून ठेवले. त्यांची बुद्धी चालेना. गर्दीतून वाटत काढीत रघुमल येताना त्यांना दिसला. तो त्यांच्याकडेच येत होता. "अरे काका, हे बग, काय जाला. साला साडेदस अग्यार वागे तो इसका बोडी किसी बच्चेने देखा. बादमे पुलीस आयी. (म्हणजे आपण ऑफिसला निघाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासातच सगळं झालं म्हणायचं. त्यांच्या मनात आलं. ) सब हुआ, पंचनामा हुआ. सब हुआ. बोडी अभी ताबेमे मिला. ये पागल थी ना इसलिये पुलिस ने जादा तकलीफ नही दी. " मग रघुमलने त्यांना दाखवलं. पुष्पाला खाली आणत होते. तिला तिरडीवर ठेवलं̱. घरात पाटकर आणि त्याची आई असे दोघेच राहात. थकल्यासारखा पाटकर खाली आला. त्याची नजर गर्दीत उभ्या असलेल्या काकांकडे गेली आणि तो त्यांच्या अंगावर धावून येत म्हणाला, "अरे हरामखोर माणसा, माझ्या मुलीचा बळी घेऊन तू पाहायला आलास काय?. खरं बोल, काल ती तुझयाकडे आली होती की नाही? " काकांना कळेना याला कसं कळलं? पण तो अंधारातही तीर मारीत असेल कोणी सांगावं. मग खालच्या आवाजात ते म्हणाले, " पाटकर सध्या तू दुःखात आहेस, म्हणून असं म्हणतोस. तिची शपथ घेऊन सांगतो ती नव्हती आली. " पाटकर चिडून म्हणाला, " अरे आता तिचीच शपथ घेणार तू, गेली ना ती? तू.... तू मारलीस तिला. मी पोलिसात तक्रार करणारच आहे..... " रघुमल मध्ये पडून म्हणाला, " अरे पाटकर, साला ती काकाकडे कशाला जाएल?. आता तिला मशान मदे, जलदी जलदी घेऊन चला. ये काका तो चीटी को भी नही मारेगा. कैसी बात करता है तू भी. ".......

अर्ध्या पाऊण तासातच यात्रा निघाली. काका घरी जाऊन कपडे बदलून आले. तिला पोचवून यायला त्यांना रात्रीचे आठ वाजले. त्यांच्या मनावर मळभ आलं. आता हा पाटकर खरच पोलिसात तक्रार करतो की काय?. मग त्यांनी विचार केला. करील तेव्हा पाहू. त्याच्याजवळ तरी पुरावा काय आहे? या सर्व प्रकारात नीता त्यांच्याशी एक अक्षरही बोलली नाही. ती त्यांच्याकडे संशयाने पाहात मात्र होती. काही काही कुत्री कशी तुमच्यावर भुंकत नाहीत, पण लक्ष ठेवून असतात तशी. रमेशही काही बोलला नाही. पाटकर आता एकटाच राहत होता. त्याने आईला गावी दुसऱ्या भावाकडे पाठवली. पुष्पाला जाऊन आता दोन महिने होत आले. अजून तरी पाटकरने तक्रार केली नव्हती. काका आता त्या बाबतीत बधीर झाले होते. पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्यांना अपराधीपणाची जाणीव होत होती. अप्रत्यक्षपणे आपण जबाबदार आहोत असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी विचार केला, आपण जरी तिच्या इच्छेप्रमाणे वागलो असतो तरी वेगळेच प्रश्न उभे राहिले असते, आणि ते जास्त तीव्र स्वरुपाचे असते. होतं ते बऱ्याकरताच होतं. आपल्या हातून निष्कारण पाप घडलं असतं. मग त्यांनी आपली चूक नाही याची खात्री पटवली आणि दैनंदिन आयुष्यात झोकून दिलं. परंतु पुष्पा मात्र मनात रोहिणीसारखी बसून राहिली. तसं अजून काही घडत नव्हतं. घडू नये अशीच त्यांची इच्छा होती. मात्र अधुनमधून ते नैराश्याने ग्रासले गेले. मन कोणाशीही उघड करता येत नव्हतं किंवा काही विरंगुळाही नव्हता. एक दिवस रमेश म्हणाला, " तुम्ही एखादा ग्रुप का जॉईन करत नाही? किंवा भजनाला वगैरे का जात नाही? " खरंतर त्यांना वेळच नव्हता. तरीही हळूहळू त्यांची बिल्डिगमधल्या अमराठी लोकांशी ओळख झाली. गंमत म्हणजे त्यांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल काही विचारलं नाही. काकांना बरं वाटलं. थोडेसे संपर्क वाढले, चार लोक त्यांना ओळखू लागले. हे चांगलं की वाईट त्यांना कळेना.

असाच पुन्हा एक दिवस सूर्यनारायण कामानिमित्त बाहेर गेला. तो चांगला दोन तीन तासांनी आला. त्या अवधीत काकांनी फ्रंट डोअर लॉक केलं. घोडा सरकवला. त्यावर उभं राहून त्यांनी एकदम वरच्या खणाच्या काचा सरकवल्या. एक पुस्तक उचलण्यासाठी त्यांनी आत हात घातला. एवढं मोठं पुस्तक जडच असणार, असं वाटून ते उचलायला गेले. पण ते इतकं हलकं होतं की बाहेर काढताना काचेच्या दरवाजाला लागून ते खाली आवाज करीत पडलं. त्यांना आश्चर्य वाटलं. ते खाली उतरले. पडलेल्या पुस्तकाचा वरचा भाग झांकणासारखा उघडला गेला होता. पुस्तक नव्हतंच ते. पुस्तकाच्या आकाराचा, रंगाचा आणि डिझाईनचा एक पत्र्याचा डबा होता. त्याचं वरचं झाकण आतली स्प्रिंग दबल्याने उघडलं होतं. " म्हणजे असं आहे तर! " ते स्वतःशी मोठ्याने म्हणाले. ही पुस्तकं नाहीतच. मग त्यांनी जिथून पुस्तकं चालू होतात, त्याच्या जवळचा डबा बाहेर काढला. तो उघडायचा प्रयत्न केला. पण उघडला नाही. पण रिकामा होता. केवळ पुस्तकाच्या आकाराचे रिकामे डबे. डिझाइन एवढं बेमालूम होतं की वरच्या भागावर पानं असल्यासारख्या ओळी काढलेल्या होत्या. भरलेले असताना कोणी च हात लावला नसता. प्रत्येक डब्यावर सोनेरी अक्षरात "ऑल इंडिया रूल मॅन्युअल " वर्षासहित लिहिलेलं होतं. उघड्या डब्याचा वास त्यांनी घेऊन पाहिला, पण काहीच वास आला नाही. मग काही डबे तपासून त्यांनी ते रिकामे असल्याची खात्री करून घेतली आणि जागेवर ठेवले. ते खाली उतरले. घोडा जागेवर ठेवला. जागेवर बसून ते विचार करू लागले. आत काय माल असेल? जो किमती नक्कीच असणार. कॅमेऱ्याने त्यांची ही कृती पण टिपली असणार हे त्यांना लक्षात आलं. पण त्याची पर्वा केली नाही. माल काय होता हे शोधायलाच पाहिजे. कोणताच माग लागत नव्हता........

मध्येच कर्कशपणे फोन वाजला. पलीकडून आवाज आला. "तीनसो " आणि फोन बंद झाला. ते स्वतःशीच म्हणाले, " तीनसो " पण काय? मग त्यांना थोडासा संदर्भ लागल्यासारखा वाटला. तीनसो म्हणजे तीनशे डबे माल हवा असावा....... कदाचित पैशाचाही हिशोब असावा...... किंवा आणखीन काही...... ते केबिनमध्ये शिरले. सहज नजर फिरवून पाहिली. काही समजेना. त्यांची नजर स्क्रीन कडे गेली. बेल वाजली. दारावर सूर्यनारायण आल्याचे त्यांना दिसले. त्यांनी बाहेर येऊन दार उघडलं. का कोण जाणे पण सूर्यनारायण त्यांच्याकडे शोधक नजरेने पाहात होता. त्याला संशय आला असावा, असं त्यांना वाटलं. त्यांनी आलेला मेसेज त्याला दिला. निर्विकार चेहऱ्याने तो आत गेला. नंतर फोन सारखे येतच राहिले. दिवस तसा कामात गेला. संध्याकाळी ते घरी आले. आल्या आल्याच आज ते घरात शिरतात न शिरतात तोच रमेश त्यांच्या अंगावर ओरडला. " बाबा, हे तुम्ही काय चालवलंय? आत्ताच पाटकर येऊन धमकी देऊन गेला. खरं सांगा, जायच्या आदल्या रात्री पुष्पा आपल्याकडे आली होती की नाही? " त्यांना प्रथम पाटकरचा राग आला. मग त्यांनी विचार करून सांगितलं, "नाही!, अजिबात नाही! " खो टं बोलायचंच असं ठरवून ते ठासून म्हणाले, " अरे त्याच दिवशी पाटकरने खाली तमाशा केला. मी त्याला तेच उत्तर दिलंय. " रमेश तापून म्हणाला, " त्याला दिलेलं उत्तर नकोय मला. खरं काय ते सांगा. " मग ते खाली मान घालून म्हणाले, "सांगितलं ना एकदा, ती आली नव्हती. हेच खरं आहे. विश्वास ठेव, नाहीतर ठेवू नकोस. " रमेश आत गेला. ती चर्चा तेवढ्यावरच थांबली.

डिसेंबर उजाडला. साधारण थंडीसाठी मुंबईकरांनी स्वेटर बाहेर काढले. काका एक दिवस संध्याकाळी बाहेर पडत होते. जवळच्याच एका दुकानाबाहेर एक आठ दहा वर्षांची मुलगी रडत उभी होती. अधून मधून ती सारखी "मम्मी, मम्मी "... ऽ असं ओरडायची. काकांना एकदम निलूची आठवण आली. एकदा केव्हातरी ते तिला घेऊन जत्रेला गेले होते. रोहिणी दोन चार दुकानं पुढे गेली होती. काका बरोबर असूनही निलूने रडून गोंधळ घातला होता. इथे तर ही मुलगी एकटीच होती. काका थांबले. तिला म्हणाले, " अगं तुझी मम्मी पुढे गेली असेल तर येईलच. चल शोधू या का आपण तिला? कुठे गेली तुला माहीत आहे का? " उत्तरादाखल ती म्हणाली, " नाही माहीत म्हणून तर ना! पण मी तुमच्याबरोबर नाही येणार. " त्यावर काका म्हणाले, " बरं असू दे हं! " आणि तिथेच थांबले. दुसऱ्या कोणी तिचा फायदा घेऊ नये म्हणून. मग त्या मुलीला तिची मम्मी दिसली असावी. म्हणून ती रस्ता ओलांडण्यासाठी धावत निघाली. रस्त्याला वाहनांची गर्दी होतीच. एका टॅक्सी खाली ती येणार असं दिसल्याबरोबर काका धावले आणि वेळेवर बाजूला खेचल्यामुळे ती वाचली. टॅक्सीवाला वैतागून म्हणाला, " स्साला बच्चीको सम्हालनेको आता नही तो पैदा कायकू करते हो? " असं म्हणून तो निघून गेला. तिला परत फुटपाथवर आणले तोवर तिची मम्मी जवळ आली. ती साधनाबेन होती...... बहुतेक साधनाबेन रस्त्याच्या पलीकडे गेली असावी. मुलगी साधनाबेनला बिलगली. काका म्हणाले, " अरे साधनाबेन तुम्ही? " ती हसून म्हणाली, " अहो केव्हातरी बाहेर पडावंच लागतं. आणि मला साधना म्हणा हो. बेन काय? मी गुजराथी नाही, चांगली मराठी आहे. तुम्ही इकडे कसे? " मग त्यांनी ते ऍडव्होकेट कटील कडे काम करतात असं सांगितलं. त्यावर ती म्हणाली, " काय सांगता? कटील फार मोठा माणूस आहे, असं ऐकलंय.... अं! ही माझी मुलगी सोनाली. " ती मुलीकडे पाहून म्हणाली, " काकांना हाय कर बेटा. " पण मुलीने तसं काहीच केलं नाही. तिचा मूड नसावा....... मग काका म्हणाले, " घरीच चाललो होतो. मध्येच ही एकटी दिसली. म्हणून थांबलो. आणि तुमची भेट झाली. कुठे राहता तुम्ही? "..... " मुंबई सेंट्रल.... तुम्ही परळला राहता ना? " ते "हो " म्हणाले. " या, आपण कॉफी घ्यायची का? " ते आशेने म्हणाले. तिची मुद्रा थोडी विचारमग्न झालेली पाहून ते म्हणाले, " म्हणजे तुमची हरकत नसेल तर. " ती म्हणाली, " सध्या घाईत आहे. पुन्हा कधी भेटलो ना की नक्कीच घेऊ., थांबा हं! " असं म्हणून तिने त्यांना स्वतःचे कार्ड दिले. आणि म्हणाली, " हे घ्या. माझा पत्ता आहेच. या एकदा घरी. "

" हो, हो! येईन. निघा तुम्ही. मिस्टरांची येण्याची वेळ झाली असेल ना? " ते सहज म्हणाले. ती म्हणाली, " मिस्टर? अहो, मी एकटीच राहते. त्यांना जाऊन पाच एक वर्ष झाली. चला निघू मी? बस आली बहुतेक. असं म्हणून ती लगबगीने समोर येणारी बस पकडण्यासाठी गेली. तिने बस पकडेपर्यंत काका तिथेच उभे राहिले. तिच्या आकर्षक आकृतीकडे त्यांना पाहात राहावंस वाटलं. त्यांना ती परत रोहिणीसारख्या स्वभावाची वाटली. बस दिसेनाशी झाली तेव्हा ते निघाले........ जानेवारी महिना उजाडला. नवीन वर्षाची सुरुवात झाली. खास काही घडत नव्हतं. आयुष्य ठीक चालू होतं. मग ते एकदा एका बँकेत खातं उघडण्यासाठी गेले. सर्व अर्ज भरून झाल्यावर दुसऱ्या खातेदाराची ओळख पाहिजे असं तिथला अधिकारी म्हणाला. आता ओळख कोण देणार? काकांनी त्याला विचारलं, "समजा ओळख नसेल तर? "..... "खातं उघडता येणार नाही " तो तत्परतेने म्हणाला. ते घरी आले. रमेशला सांगण्यात अर्थच नव्हता. शेवटी त्यांनी रघुमलला विचारलं. तो त्यांच्याशी नीट बोलायचा. त्याच्या ओळखीने एकदाचं खातं उघडलं गेलं. सध्या जवळचे पैसे खर्च होऊनही त्यांच्याजवळ 'पन्नास पंचावन्न हजार होते. ते पैसे त्यांनी दहा दहाच्या हप्त्याने भरायचे ठरवले. एकदम एवढे पैसे कुठून आले असं कोणी विचारू नये असं त्यांना वाटलं.

मग एक दिवस ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांना किशा दादाचा फोन आला. "कैसा चल राहा है, काकाजी? दस मार्च ध्यानमे रखना, आ राहा हूं. सूर्याको भी बोला है...... पार्टी करेंगे. काम भी बहुत है, तयार रहना. "

( क्र म शः)