कामथे काका (भाग नववा)

काकांना रात्री झोप येईना. ते रोहिणीच्या आठवणींनी व्याकुळ झाले होते. कोणाकरता जगायचं, त्यांना कळेना. आपण एकाकी जीवन जगत असल्याचं त्यांना जाणवू लागलं. रोहिणीच्या सहवासाला ते निकालाच्या दिवसापासून अंतरले होते. मन ती जवळ झोपल्याचं स्वप्नरंजन करू लागलं आणि काकांना रिझवू लागलं. तिच्याबरोबरच्या जवळिकीत ते चांगलेच रंगले. काही वेळ असाच गेला. मग ते भानावर आले. गॅलरीतून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्यात त्यांना पूर्ण चंद्र दिसत होता. आज पौर्णिमा असावी. पण घटना मात्र अमावास्येसारखी घडली होती. पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर उंच उंच कपाटांमधली ती पुस्तकं येत होती. याचा छडा लावलाच पाहिजे. बहुतेक उद्या आपल्याला कामावर जायची वेळ येणार नाही. सकाळी वर्तमानपत्रात रेडची बातमी असणारच. त्यांच्या रेडची बातमी पण अशीच आली होती. घरच्या रेडची आठवण त्यांना कुरतडू लागली. अधून मधून त्यांना त्या दिवशीचे संवाद आठवू लागले. सलीम टेलरचं त्यांच्याकडे संशयाने पाहणं त्यांना दिसू लागलं. त्याचा चेहरा ते बारकाईने निरखून पाहू लागले. आता तो काही हजर नव्हता. मग त्यांना निलंबन कालावधीतले त्यांच्या वाट्याला आलेले ओढगस्तीचे दिवस आठवले. रोहिणीने तर कमी पैशांची सवय करून घेतली होती. पण मुलाचं काय? आताच त्याचं वागणं म्हणूनच तर बिघडलं नव्हतं? रमेशला धड कपडे मिळणं कठिण जाऊ लागलं. तो कुढा आणि तिरसट बनला. खेळताना इतर मुलं त्याला बाजूला काढीत. मग तो इतर मुलांमध्ये भांडणं लावू लागला. तक्रारी होत. कधी कधी घरी मारहाणही व्हायची. कारण काकांचा चिडखोर झालेला स्वभाव. काका त्याही कालावधीत लहान सहान कामं करू लागले. रमेशला त्यांच्या बद्दल अढी निर्माण झाली होती. "आपली सगळी मजा या माणसाने घालवली " असं त्याला वाटू लागलं. कुठल्याही गोष्टीसाठी ते म्हणत "पैसे नाहीत. " त्याला कुठेही ट्रीपला जायला मिळत नसे की ते सगळे कधी कुठे बाहेरगावी गेले. पाहावं तेव्हा दुसरी मुलं, कुठे ना कुठे तरी जायची. रमेश मात्र घरातच असायचा. त्याच्या सगळ्याच सुट्या अशा फुकट जात. अपवाद फक्त रोहिणीचा होता. ती कोणालाच दोष देत नसे. तिने नशिबालाही दोष दिला नाही. तिने परिस्थितीचा स्वीकार केला. आनंदाने की नाईलाजाने, कुणाला माहीत. त्यामुळे तिचा स्वभाव मऊ राहिला. रमेशला ती समजावीत असे. "थोडे दिवस काढ बाळा, सगळं ठीक होईल बघ. " मोठं होता होता रमेशला त्या आश्वासनातला फोलपणा कळू लागला. पण त्याने कधी तिला दोष दिला नाही. जवळ घेणारी, समजावणारी तीच होती. पण या सगळ्याची परिणिती एवढी गंभीर होईल असं मात्र तिला कधी वाटलं नाही.

तिला वाटलं, ऑफिसात चौकश्या होतात, निलंबनही होतं, पण वर्ष सहा महिन्यांनी सगळं सुरळित होतं. तिच्या वडलांचं पण तेच झालं. पण लवकरच सुरळीत झालं. पुढे पुढे तिचीही चिकाटी संपत आली. पण तिने काकांवर कधीही अविश्वास दाखवला नाही. तिच्या लवकरच लक्षात आलं, आपण जर यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर हे कोलमडतील, आणि आपण रस्त्यावर येऊ. म्हणून तिनेही लहान सहान नोकऱ्या आणि हलकी काम केली. कुठलाही विधिनिषेध न ठेवता.... त्यातच रेडनंतर काही दिवसात काकांची आई गेली. नाही म्हटलं तरी काकांना आईजवळ चार शब्द बोलता येत होते. आई गेली तरी काका रडले नाहीत. उलट रोहिणीचं सांत्वन त्यांनी केलं. घरात मोठं माणूस नाही म्हणून रोहिणीला मात्र आयुष्यातली पोकळी जाणवू लागली. बाराव्या तेराव्याला आलेला ब्राह्मण काकांना म्हणाला होता, " आता तुमच्या डोक्यावरचं छत्रं खऱ्या अर्थानं गेलं. लोकं आता काही झालं तर थेट तुमच्याकडे बोटं दाखवतील, आई वडलांच्या हयातीत ते त्यांच्याकडे बोट दाखवतात, म्हणजे जबाबदार धरतात. " त्याचं म्हणणं काकांना पटलं. काका रडले नसले तरी, त्यांना अधून, मधून आपल्याला आई नाही हे जाणवू लागलं, आणि कधी कधी त्यांना मोठ्यांदा रडावासही वाटायचं. पण इलाज नव्हता....... आठवणींच्या गर्तेत कोसळलेल्या काकांना बऱ्याच वेळाने खिशातल्या मोबाईलची कंपनं जाणवली. त्यांनी पाह्यलं, सूर्यनारायणचा फोन होता. त्यांनी नेहमीप्रमाणे ऑफिसला यावं असं सांगणारा. ते कसेतरी झोपले......

सकाळ झाली. काकांनी कामावर जातानाच एक डायरी खरेदी केली. घडत काहीच नव्हतं. त्यांच्या घरी गणपती नसल्याने त्यांना करावं लागत नव्हतं. आता तर रोजची पूजाच बंद झाली होती. रोहिणीने केसचा निकाल लागल्यापासून देवांना शोकेस मध्ये ठेवले ते कायमचेच......... एक दिवस मात्र रमेशला विपुलभाईचा फोन आला. काका त्याच्याकडे जात नव्हते, हे रमेशला समजलं होतं. त्या दिवशी काका असेच लवकर घरी आले होते. सात सव्वासातला रमेश आला. बूट काढता काढताच तो काकांना त्रासिकपणे म्हणाला, " तुम्ही लवकर आलात वाटतं? काम कोणाकडे करता हो तुम्ही? " विचारण्यात वरकरणी सौम्यता दिसत होती. काकांची जीभ कोरडी पडली. पुढे मोठा वाद होणार असं समजून ते घाबरून म्हणाले, " मी सूर्यनारायणकडे जात असतो........ " आणि वाक्य अर्धवट सोडून ते प्रतिक्रियेसाठी थांबले.

"कोण, सूर्यनारायण? " रमेशला आश्चर्य वाटल्याचे दिसले. "त्याने तुम्हाला बरा जॉब दिला. तो फार मोठा वकील आहे. कोणाच्या ओळखीने तुम्ही गेलात? " रमेश त्यांच्या तोंडाकडे पाहता होता.... त्यांना कळेना, आता कोणाचं नाव सांगायचं? किशा दादाचं नाव सांगून उपयोग नाही. वाईट माणसानं कितीही चांगलं काम केलं तरी त्याचं नाव घ्यायला लाजच वाटते. मग ते चाचरत म्हणाले, " अरे आमचे जेलरसाहेब होते ना, त्यांनी सांगितलं होतं.......... " त्याची प्रतिक्रिया अजमावण्याची आता त्यांची पाळी होती...... पण रमेश जरा चिडूनच म्हणाला, " अस्सं? आणि एका शब्दानंही मला सांगावंसं वाटलं नाही?, चांगलीच लपवाछपवी करता हो. विनाकारण विपुलभाईला त्रास दिलात ना? मी तुम्हाला इथे राहू देतोय म्हणून ठीक आहे, खरं तर तुम्हाला बाहेर काढलं पाहिजे. तुमच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा यापुढे? "काका काहीच बोलले नाहीत. शाळकरी मुलासारखा चेहरा त्यांनी केला. तो आत गेला. त्यांच्या मनात आलं, घाबरून जाऊन त्यांनी जागा त्याच्या नावावर केली होती. कोर्टाने जर वाटेल तसा दंड ठोठावला तर त्याची वसुली ते जागा विकून करतील. आणि रोहिणी आणि रमेश बेघर होतील. त्यापेक्षा आपल्या नावावर जागा नकोच, असा विचार त्यांनी केला होता. पण त्यांना काय माहीत, रमेश असा फायदा घेईल. "स्वतःची मोरी आणि मुताची चोरी. " म्हणजे जागेची व्यवस्थाही केली पाहिजे, आणि तीही लवकरच. पण जवळ काही नसताना, हे मुंबईत तरी शक्य नव्हतं. काही न सुचल्याने ते अस्वस्थ झाले. त्यांनी रात्री सावकाश डायरी लिहायला सुरुवात केली. तीही सुटून आल्यापासून नाही तर केस झाल्यापासून, आठवेल तशी. काही जवळ नसलं तरी स्पष्ट आठवणी ही त्यांच्या आयुष्याची मिळकत होती. खूप लहानपणापासूनचे काही ठळक प्रसंग त्यांना संवादासहित आठवत होते. डायरीत मन थोडंसं मोकळं झाल्याने, आज ते जरा समाधानाने झोपले.

सकाळ जरा बरी उजाडली. रमेश कामावर गेला होता. विशेष म्हणजे, श्रेया नीताचा डोळा चुकवून थोडी धरून धरून चालत हॉलमध्ये आली. तिच्या हातात खेळणं होतं. तिचा तोल जात होता. मग काका पुढे झाले. तिला घेऊन म्हणाले, " आले आले आले, नीट चालावं, पलायचं नाही. " तिच्या चेहऱ्यावरून आणि अंगावरून काही वेळ ते हात फिरवीत राहिले. पण मधल्या दारात नीता आलेली पाहून ते घाबरले..... तिला खाली ठेवत ते म्हणाले, " पडली असती ना, म्हणून घेतली. "........ नीता थंड नजरेने त्यांच्याकडे पाहता होती..... जणू काही त्यांनी कोणती तरी सीमा पार केली होती. नीताने पुढे होऊन काही न बोलता, तिला उचलून घेतलं., आणि आत निघून गेली. श्रेया त्यांच्याकडे पाहता दा.. द्दा..... बा... ब्बा..... करीत होती. आज प्रथमच त्यांना बरं वाटलं. वेगळ्याच उत्साहात त्यांनी कपडे घातले. थर्मास घेऊन ते निघाले. बाहेर आल्यावर त्यांच्या मनात आलं, श्रेयाच्या निमित्ताने आपणच पुढाकार घेतला तर?..... नीता बदलेल का?...... पण आपण काय करायचं?...... त्यांना कळेना.......

ते तसेच ऑफिसमध्ये गेले. आज आल्याबरोबर त्यांना सूर्यनारायणने बोलावलं. आज त्याने वकिलाचा सूट घातला होता. गळ्याभोवती वकिलाचा बंद लावला होता. तो एका काळ्या कातडी बॅगेत कामाचे कागद ठेवत होता. त्याचे केस कोणत्याही दिशेत वळवलेले नव्हते. लहानपणापासूनच ते वळत नसावेत. पण काही काही गणवेश असे असतात ते घातल्यावर माणसाचं व्यक्तिमत्त्व त्या त्या कामाप्रमाणे दिसू लागतं. उदा. पोलिसी गणवेश. माणूस आपोआपच रुबाबदार दिसू लागतो. पण काही माणसं मूळचीच रुबाबदार असतात, त्यांना तो जास्त शोभून दिसतो. असो. सूर्यनारायणला आज कुठेतरी जायचं असावं. काकांचा अंदाज खरा ठरला. मग तो त्यांना म्हणाला, " काकाजी, मै जरा एक क्लायंटके पास जाके आता हूं. आप अंदरही बैठना. शायद दादाका फोन आयेगा, मेसेज बराबर लेना. मै छोडकेकिसीको भी अंदर मत लेना. ये बटन दबाया तो फ्रंट डोअर लॉक होता है. " तो लगेचच बाहेर गेला. काकांनी दरवाजा लॉक केला. केबिनमधल्या कार्पेटचा मऊ मऊ स्पर्श नक्कीच सुखद होता. आतमध्ये मंद आणि मधाळ वास दरवळत होता. केबिनचं निरीक्षण पूर्ण झाल्यावर ते सूर्यनारायणच्या खुर्चीत बसले. बसले कसले, बुडले म्हणावं लागेल, इतकी ती मऊ होती. कामावर असताना, लाकडाच्या जुनाट खुर्च्यांमध्ये आपणच गादी विकत घेऊन ठेवावी लागत होती. इतपतच त्यांचा खुर्चीच्या मऊपणाशी संबंध होता. तुरुंगात तर ओल मारलेल्या खडबडीत जमिनीवर झोपावंही लागत होतं. त्या जमिनीची त्यांना सवय झाल्याने रमेशच्या घरातली लादी पण त्यांना चांगली वाटली होती. ही खुर्ची म्हणजे त्यांना सिंहासनच वाटलं.

बसल्या बसल्या त्यांनी एकदा इकडे तिकडे नजर फिरवली. भीतींना आणि छताला किंचित गुलाबी छटा असलेला पांढरा सनमायका लावलेला होता. मंद दिव्यांच्या प्रकाशात केबिनमधलं वातावरण एखाद्या सिनेमागृहातल्या प्रमाणे वाटत होतं. त्यांची नजर स्क्रीन वर गेली. बाहेर काहीच नव्हतं. दाराची चकचकीत केलेली चौकट तेवढी त्यांना दिसत होती. उजव्या हाताला भिंतीत असलेलं गुलाबी पुश बटण त्यांनी सहज दाबलं. त्यांना ते आधी बेलचं बटण वाटलं होतं. पण उत्तरादाखल फक्त एक खण भिंतीतून बाहेर आला. आतल्या तीन चार लहान लहान परदेशी दारूच्या बाटल्या पाहून ते चकित झाले. म्हणजे कुठेतरी ग्लास नक्कीच असला पाहिजे. पण त्यांनी तो शोधायचा प्रयत्न केला नाही. मग खण जागेवर सरकवीत त्यांनी उजव्या बाजूचं असच बटण दाबलं. त्या बरोबर एक झडप वजा झाकण उघडलं गेलं, त्यात मात्र "रिव्हॉल्व्हर " होतं. त्यांनी ते सहज म्हणून उचलून पाहिलं, ते चांगलंच जड वाटलं. त्यांनी ते जागेवर ठेवलं. झडप बंद झाली. त्यांना एकदम काल पडलेल्या रेडची आठवण झाली. रेडमध्ये नक्की काय झालं त्यांना कळलं नव्हतं. सूर्यनारायण काही बोलला नाही. आपल्याला सांगण्याचं त्याला काहीच कारण नसावं. वर्तमानपत्रात आलं का ते पाहायला हवं..... काकांना हे माहीत नव्हतं, की त्यांची ही जी सगळी शोधाशोध चालू आहे ते छतावर बसवलेल्या कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त होत होतं. त्यामुळे त्यांनी कपाटाचे दोन तीन खणही उघडून पाहिले. त्यात फारसं काही नव्हतं. काही सीडीज होत्या. पण खण बंद करणं आणि उघडण्याच्या प्रयत्नात टेबलाच्या खालच्या बाजूचं बटण दाबलं गेलं आणि त्यांना कळायच्या आतच एक चोरकप्पा उघडला गेला. ते घाबरले. त्यात फक्त रिव्हॉल्व्हर होतं. ते घाबरले. सर्व खण त्यांनी बंद केले. पण या चोरकप्प्याचं बटण न सापडल्याने तो बंद होईना नीट पाहिल्यावर त्यांना टेबलाच्याच रंगाचं बटण दिसलं. तो चोरकप्पा एकदाचा बंद झाला....... तासभर कसा गेला त्यांना कळलं नाही.

ते परत खुर्चीत बसले. कुणाचाच फोन आला नाही. अचानक त्यांना स्क्रीन वर आकृती दिसली. तो सूर्यनारायण होता. त्यांनी बटण दाबून दरवाजा उघडला. ते बाहेर आले. तोपर्यंत तो आत आला होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. किंबहुना ते कधीच नसत. साधारणपणे, आपल्या सहाय्यकाला केव्हा ना केव्हातरी त्याचा बॉस कामाबद्दल सांगतोच. पण छे, इथे तर काहीच मागमूस लागत नसे. त्यांना रेडबद्दलही कळलं नाही. खरंतर त्यांनी खणात पडलेल्या सीडीज पैकी काही चालवून पाहिल्या असत्या तर त्यांना ते कळलं असतं. पण त्यांनी तपासणीत बराच वेळ तसाच घालवला. ते आपल्या खुर्चीत बसले. एकदोन फोन आले, त्यांनी सवयीने मेसेजेस आत कळवले. एक वाजायला आला. ते सहज खुर्चीत रेळले. आणि त्यांची नजर सहजच छताकडे गेली. त्यांना धक्काच बसला. वरचे बरेचसे खण रिकामे होते. म्हणजे पुस्तकांमध्ये माल असतो तर. त्यांना शंका आली.... पण पुस्तकात काय ठेवणार?...... त्यांचं डोकं चालेना. त्यांनी बाहेर जाऊन लंच घेतला. त्यांचं दुपारचं सत्र चालू झालं. आज फारसं काही घडत नव्हतं. संध्याकाळी ते सात वाजता घरी जाण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यावर दोन चार ठिकाणी लहान मुलांचे कपडे विकायला ठेवलेले दिसले. त्यांच्या मनात आलं, श्रेया करता एखादा फ्रॉक घ्यायला काय हरकत आहे? म्हणून त्यांनी पांढऱ्या रंगावर लाल निळे गोळे असलेला फ्रॉक विकत घेतला. निदान या निमित्ताने तरी आपल्याला बरे संबंध निर्माण करता आले तर?..... आपण अधून मधून श्रेयाला काही ना काहीतरी आणलं पाहिजे.

ते घरी पोचले. त्यांना तो फ्रॉक एकदम द्यायला अवघड वाटलं. चहा वगैरे झाला. त्यांना स्वतःहून विषय काढता आला नाही. अचानक त्यांना वर्तमानपत्र पाहण्याची आठवण झाली. त्यांनी ते नीट चाळून पाहिलं. पण त्यात कुठेही बातमी दिसली नाही. मग त्यांच्या लक्षात आलं, फसलेल्या रेडचा वृत्तात छापतीलच कसा? असं वाटून ते स्वस्थ बसले. सध्या नवरात्राचे दिवस होते. पुढच्याच आठवड्यात दसरा होता. वातावरणात बदल झाला होता. त्यांना रोहिणीची आठवण झाली. त्यांचा साखरपुडा दसऱ्यालाच झाला होता. त्या दिवशी सगळेच म्हणजे, रोहिणीची आई, वडील आणि मित्र मैत्रिणी आले होते. रोहिणी नटून थटून आली होती. तिला रीतसर अंगठी, साडी, वगैरे दिलं गेलं. मग कोणीतरी म्हणालं, " अरे या दोघांना बाहेर फिरायला तर पाठवा. हल्ली अशी पद्धतच आहे. " कोणाचीच हरकत नव्हती. दिलेली नवीन साडी नेसून रोहिणी त्यांच्या बरोबर बाहेर पडली. काकांच्या मनात आलं, कुठे जायचं?..... चौपाटी? छे!, ती दूर आहे. त्यांनी जवळच कुठलंसं मंदिर पाहिलं आणि तिला घेऊन ते तिथे गेले. रोहिणी आणि ते एकमेकांकडे चोरून पाहता होते. एकदा तर त्यांची दोघांची नजरानजर झाली, आणि दोघेही पकडले गेल्याने हसले. मग काका तिच्या गळ्यात हात टाकून चालत मंदिराच्या मागच्या बाजूला आले. बसल्यावर, एकमेकांना पाहता पाहता काहीतरी बोलायचं म्हणून काका म्हणाले, " रोहिणी ओठांना एवढी गडद लिपस्टिक लावत जाऊ नकोस, मला आवडत नाही. तुझे ओठ तसेच लाल आहेत. " तिने लाजून फक्त मान डोलवली होती........

ते भानावर आले, स्वतःशीच म्हणाले, " वाटेल त्या वेळी हे कसले विचार? त्यांनी आणलेला फ्रॉक श्रेयाला दसऱ्याच्या दिवशी देण्याचं ठरवलं.

(क्र म शः)