मी मोर्चा नेला आहे, मी संपही केला आहे........

सायंकाळी सातच्या सुमारास बाल्कनी मध्ये आलो. समोर रस्त्यावरून हाती मेणबत्या घेतलेला मोठा जनसमुदाय शांतपणे "भारत माता की जय" च्या घोषणा देत वाटचाल करीत होता. क्षणाचाही विलंब न करता हाती एक मेणबत्ती घेउन जमावात सामिल झालो. पत्नी म्हणाली की वयानुसार चाला आणि दमलात कि घराकडे निघा. मी वाट पाहत आहे. मला जथ्यातील कुणी बोलावले न्हवते. अनोळखी लोकांसमवेत चालताना एक प्रसिद्ध गाणे आठवले. त्याचा आशय मी आयुष्यात काहीच केले नाही. ना मोर्चा , ना संप ,ना साधा निषेध, ना धरणा, ना दगडफेक बसची काच फोडली नाही वगैरे.

कित्येक वर्ष केलेल्या नोकरीतील दिवस आठवले. अहोरात्र झटलो प्रामाणिकपणे वागलो. कामाचे स्वरुप पाहता भरपूर माया जमवणे कठीण नव्हते. माझे काही वरीष्ठ व कनिष्ठ मला त्यात ओढण्याची कुठलीही संधी सोडत नसत. पण सर्वांशी स्नेहाचे संबंध राखून त्यांच्या या व्यवहारापासून शेवटपर्यंत दूर राहिलो. माझे अकोल्यातील सन्मित्र व जिवाभावाचे शेजारी श्री मोडक ईरिगेशन डिपार्टमेंटमधे नोकरीस होते. तेही भ्रष्टाचारी विळख्यापासून कसे दूर राहता येईल या विवंचनेत असत. शेवटी सिस्टीमच्या जीप ऍक्सिडेंटनी त्यांना वाटेतून कायमचे दूर केले.ही आंतरिक सल कायम अस्वस्थ करीत राहिली. पण अशा अनेक अभद्र गोष्टी दिसत असुनही सिस्टीमचे त्यांना भक्कम बळ मिळत असल्याने व काही भरीव करणे शक्य्य दिसत नसल्याने स्वताःचे अंतर्बाह्य प्रामाणिक राखल्याने सुखाची झोप येई. 

भ्रष्टाचारी चक्रव्युव्हातून अभिमन्यू सारखा बाहेर पडलो हाच माझा प्रतिकार , माझा मोर्चा , माझा संप , माझा निषेध. तो दिसला नसला तरी तो मी आणि माझ्या सारख्या अनेकांनी केला - एक दोनदा नव्हे जन्मभर केला.

अनोळखी जथ्याबरोबर मी  ' वंदे मातरम ' 'भारत मात की जय' म्हणत चालत राहिलो. हजारो कोसांवरून आलेली उत्साही शांततापूर्ण साद भ्रष्ट मनाला हेलावून जाईल अशीच आशा . यातून काय निष्पन्न होइल हे जरी निश्चितपणे सांगता येणे अवघड असले तरी भ्रष्टांनां भीती व थोडी लाज वाटेल अशी खात्री दिसते. अंधाराचे जाळे विरेल ही भावना मनांत असताना हाती असलेली मेणबत्ती पाघळून चटका बसला. शेजारच्या अनामिकाचे हातून ध्वज घेऊन उंचावून 'भारत मात की जय' म्हणून घराकडे परतलो. पाय जड झाले होते. तीन तास बैंशी वर्षाचे वय विसरून सर्वांसोबत चाललो होतो. तरीही घराकडे उचलत्या पावलाने जाणे जरुरी होते. वृद्ध पत्नी अजुनही पायरीवर वाट पाहत असेल या जाणिवेने.